नाटय़सृष्टीत त्यांची ओळख ‘बाळकाका’ अशी, तर घरात त्यांना ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. कशानेही न खचणारा चिं.विं.चा ‘गुंडय़ाभाऊ’ हीच त्यांची प्रतिमा आहे. तो त्यांचा ‘लाइफटाइम रोल’ आहे. त्यांची स्वभाववैशिष्टय़े आणि घरातले त्यांचे वेगळे रूप उलगडून दाखवणारा लेख..
प्रिय दादा,
आज २५ ऑगस्ट! तुम्ही पंचाहत्तरीत पाऊल टाकताय. विश्वासच बसत नाहीए. या काळाच्या वेगाला करावे तरी काय! आठवणींचा पट डोळ्यांसमोर तरळतोय. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. जगात, देशात, राज्यात, सीमेवर.. तशी ती होतच राहणार म्हणा, पण शेवटी कुणाला काय हो त्याचे! प्रत्येकाचे कुटुंब. घर ज्याचे त्याचे जग. आपल्या कुटुंबाच्या ‘या’ जगातल्या अनेक घडामोडी झाल्या. मी आणि केदार आपापल्या करिअरमध्ये स्थिरावलो. आमची घरे झाली. संसारात रमलो, पण या साऱ्यांमध्ये आमच्या मुलांना ज्या आमच्या आईवर आम्ही निर्धास्त सोडत होतो तीच मात्र आता स्वत:च ‘मूल’ झाली. १० मार्च २०१२ ला आईला ब्रेन हॅमरेज झाले. आणि आपले हसते-खेळते घर एकदम शांत झाले. पण ज्या पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही या प्रसंगाला सामोरे गेलात आणि जाताय त्याला तोड नाही. या कठीण काळात केदार आणि अजिता समर्थपणे तुमच्याबरोबर आहेत, ही जाणीव मनाला सुखावून जाते.
माझे कार्यक्षेत्र प्राध्यापकी, पण बऱ्याचदा अजूनही ‘ही गुंडय़ाभाऊंची मुलगी बरं का’, अशीच माझी ओळख करून दिली जाते आणि आपण महाराष्ट्रातल्या एका लोकप्रिय अभिनेत्याची मुलगी आहोत याचा खूप अभिमान वाटायला लागतो. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटलं मनात असतं ते कागदावर उतरवावं…
नाटय़सृष्टीत तुमची ओळख आहे ‘बाळकाका’ या नावाने. आम्ही घरात तुम्हाला ‘दादा’ म्हणतो. पुण्याच्या कडक शिस्तीतल्या अस्सल ब्राह्मणी आणि सुसंस्कारित, पण बाळबोध वातावरणात तुम्ही वाढलात, आम्हाला तसंच वाढवलंत, पण कडक शिस्तीचा बडगा आम्हाला दाखवला नाही. अर्थात तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही हे कळायला तुमचा चेहराच पुरेसा असायचा. आमचे खाण्या-पिण्याचे, कपडय़ांचे भरपूर लाड केलेत. नाटकांच्या दौऱ्यात फिरताना आमच्यासाठी हटकून काही तरी यायचंच. अभ्यासासाठी डोक्यावर बसला नाहीत, की काय शिका याचा आग्रह धरला नाहीत. आमच्या सगळ्या अॅक्टिव्हिटीज्ना भरपूर मुभा, पण आम्ही मैत्रिणींनी माथेरानला जायचा प्लॅन केला, तो मात्र हाणून पाडलात आणि प्रवासाची फारशी आवड नसूनही आपल्या सगळ्यांची माथेरान सहल घडवून आणलीत.
तसे प्रवासाचे आणि वाचनाचे तुम्हाला वावडे आहे. ‘घरातून लांब जाऊन तासन्तास सूर्यास्त पाहणे माझ्या स्वभावात नाही,’ असे तुम्ही म्हणताच. नाटकाच्या निमित्ताने देशात फिरणे झाले. परदेश प्रवास झाले तरी प्रवासापेक्षा त्यात भेटणाऱ्या माणसांचे निरीक्षण करणे तुमच्यातल्या अभिनेत्याला जास्त भावते.
अर्थात तुम्ही फक्त अभिनेते थोडेच आहात! व्यवसायाने इंजिनीअर आणि खरे तर Jack of all traits and even master of all’ आहात. चांभाराच्या सुईपासून शिवणाऱ्या मशीनपर्यंत पकडीपासून ते ड्रिलिंग मशीनपर्यंत असंख्य हत्यारांचा साठा ही तुमची ठेव आहे. सोफ्याची कव्हर्स शिवण्यापासून ते इलेक्ट्रिशियनपर्यंतची सगळी कामे तुम्ही अगदी कालपरवापर्यंत करत होतात. या उद्योगात दोन वेळा पायही मोडून घेतलात. काहीही तुटलं, मोडलं, तरी दादा दुरुस्त करतील हीच आम्हाला कायम सवय! मित्रमंडळींत/ नातेवाईकांत तुम्ही अनेकांचे सल्लागार आहात. मला आठवतंय, काही प्रश्न निर्माण झाला की भक्तीताई (भक्ती बर्वे-इनामदार) तुम्हाला फोन करायची. कुठलंही काम सुबकतेने करण्याकडे तुमचा कटाक्ष! तुम्ही केलेली पूजा तर बघत राहावी. उदबत्त्या/ धूप/ असली अत्तरे यांची तुम्हाला भारी हौस, पण तरीही तुम्ही कर्मकांडप्रिय नाही, उपास तुम्हाला जमत नाही, पण रोजच्या रोज विष्णू सहस्रनाम आणि गणपती अथर्वशीर्ष चुकत नाही. उषा आत्याने एकदा एकाच वाक्यात तुमचं अगदी योग्य वर्णन केल होतं- ‘काम हाच बाळचा विरंगुळा आहे.’
तुमची स्वत:ची अशी ठाम मते आहेत आणि त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक आहात. पूर्णवेळ नाटक अथवा सिनेमा तुम्हाला मान्य नाही. त्यातल्या अस्थिरतेची जाणीव तुम्ही तुमच्या परीने नवोदितांना करून देता. कुठलेही नाटक तुम्ही फुकट पासावर पाहत नाही आणि खरी प्रतिक्रिया द्यायलाही संकोच करत नाही. मला आणि केदारला जरा हे खटकते, पण तुमचे उत्तर ठरलेले, ‘मी नाटक तिकीट काढून पाहतो, खोटे कशाला बोलायचे?’…
पीआरगिरी तुम्हाला जमूच शकत नाही. कुठे मुलाखत यावी, काम मिळावे म्हणून कुणाला भेटावे हे तुम्हाला कधीही जमले नाही. हा लेखसुद्धा मी तुमच्या परवानगीशिवाय लिहिला आहे. उगाच कौतुक करणे ही तुम्हाला न जमणारी आणखी एक गोष्ट किंवा असे म्हणूया की, कौतुक करण्याची तुमची पद्धत वेगळी आहे. तुमची नातवंडे अर्णव आणि अनुश्री यांचे तुम्हाला खूप कौतुक आहे, पण तुम्ही दाखवत मात्र नाही. उलट अर्णव शाळेत जायला लागल्यावर मला सुनावलेत, ‘स्वाती, ‘ममा’ होऊ नकोस.’ ममा म्हणजे ‘महत्त्वाकांक्षी माता’ हा तुमचा अभिप्रेत अर्थ. मुलांच्या मागे शंभर उद्योग लावणे तुम्हाला पटत नाही. मला शाळेत असताना भरपूर बक्षिसे मिळायची, पण कधीच डोक्यावर चढवले नाहीत. आज म्हणून मात्र कळतंय त्यामुळेच आम्ही कायम जमिनीवर राहायला शिकलो. पण एक आठवण ताजी आहे. बारावीत मी खूप आजारी असतानाचे माझे रिपोर्ट्स घ्यायचे धाडस तुम्हाला होईना. ते तुम्ही सुरेशकाकांना सांगितलेत (नाटककार सुरेश खरे) आणि त्यांनी ते नॉर्मल आहेत हे पाहून पेढय़ांचा बॉक्स तुमच्या हाती दिला.
आम्ही शाळेत असताना ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ मालिका खूप जोरात होती. आम्ही बऱ्याचदा सेटवर यायचो. प्रत्येक शूटिंग म्हणजे एक कौटुंबिक उत्सव वाटायचा. तुमच्याभोवती प्रसिद्धीचे वलय असायचे. चाहत्यांची पत्रं यायची. एका गृहस्थाच्या कॅन्सरग्रस्त वडिलांना तुमची गुंडय़ाभाऊची भूमिका बघून त्यांच्या वेदनांचा विसर पडत असे हे सांगणारं पत्र तुम्ही अजूनही जपून ठेवलंय. ‘सूर्याची पिल्ले’, लालन सारंग यांच्याबरोबरचं ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेबरोबरचं ‘आई रिटायर होतेय’, मोहन जोशीबरोबर ‘मनोमनी’, गिरीश ओकसोबतचं ‘कुसुम मनोहर लेले’ या सगळ्या नाटकांची आज आठवण होतेय. ‘स्वामी’, ‘प्रपंच’, ‘महाश्वेता’, ‘अरेच्या कमाल आहे’, ‘वहिनीसाहेब’, सध्या सुरू असलेली ‘राधा ही बावरी’ या सगळ्या मालिका किंवा ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘सुंदरा सातारकर’, ‘पायगुण’, ‘सौभाग्यलेणं’, सई परांजपेंचा ‘कथा’, हे चित्रपट काय या सगळ्या भूमिकांसाठी तुम्हाला बोलावलं गेलं. कुठलीही भूमिका मनाला पूर्ण पटल्याशिवाय तुम्ही केली नाहीत आणि कोणाकडे काम मागितलेही नाहीत. एकदा तुम्हाला कोणी तरी विचारले, तुम्ही चित्रपटात काम करता याचा तुमच्या बायकोला त्रास होत नाही का? तुम्ही उत्तरलात, ‘त्रास काय व्हायचाय? माझ्या भूमिका एक तर विनोदी किंवा खलनायकी, नाही तर हातात गुंडय़ाभाऊचा सोटा. मी थोडाच हीरोच्या भूमिका करत नायिकेच्या मागे पळतोय?’ नाही म्हणायला ‘बन्याबापू’ चित्रपटात ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ या गाण्यावर नायिकेबरोबर तुम्हाला झाडाझुडपात धावताना पाहून आम्हाला प्रचंड मजा वाटली होती…
मुळातच शिस्तप्रिय असणाऱ्या तुम्हाला रंगायनमध्ये रंगमंचावरच्या शिस्तीची सवय लागली. ‘अजब न्याय वर्तुळाचा’च्या जर्मनी दौऱ्यात तुम्ही नेपथ्य यशस्वीरीत्या सांभाळलं. गावागावांतले ‘खवय्ये’ स्पॉट हुडकून काढायचे आणि सहकलावंतांना खायला घालायची तुम्हाला भारी हौस. रात्रीच्या प्रवासात ड्रायव्हरबरोबर जागत बसून त्याच्यावर लक्ष ठेवणं तुम्हीच स्वत:च्या मागे लावून घेतलेलं काम. म्हणूनच बाळकाका आहेत, काळजी नाही असं नेहमीच तुमच्या सहकलावंतांना वाटायचं. पण म्हणून तुम्ही सर्वाना सतत फोन करणे, लोकसंपर्कात राहणे हे कधीच केले नाही. मी तुमच्यापासून इतकी जवळ राहूनसुद्धा कारणाशिवाय माझ्याकडे कधी आला नाहीत, पण काही मदत लागली की धावत येणार.. अर्णव घरी पोहोचला की नाही, तुम्ही प्रवासातून आलात की नाही यासाठी मात्र पहिला फोन करणार, पण हालहवाल कळली की लगेच फोन ठेवणार. तुमचा पिंड अगदी परफेक्ट स्वयंसेवकाचा आहे. गुंडय़ाभाऊ तुमच्या रक्तातच आहे. त्याच भूमिकेतून तुम्ही एक रंगकर्मी आणि सिव्हिल इंजिनीयर या दोन्ही नात्यांनी यशवंत नाटय़मंदिर बांधले जात असताना स्वत: सल्लागार म्हणून मदत केलीत. ‘संध्याछाया’ नाटकातून तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेत, पण उत्तम भूमिका करूनही फारसे मानसन्मान, सत्कार, पुरस्कार तुमच्या वाटय़ाला आले नाहीत. अर्थात याची तुम्हाला मुळीच खंत नाही. आयुष्य येईल तसे स्वीकारून पुढे चालत राहण्याची कला कुठलाही आध्यात्मिक पंथ न जोपासताही तुम्हाला साधली आहे. तुम्हाला सध्या फारसे काम घेता येत नाही, पण तरीही तुमच्या वेळा सांभाळून वीरेंद्र प्रधान तुम्हाला बोलावतात म्हणून तुम्हाला विशेष कौतुक वाटते. ‘उंच माझा झोका’चा एकच एपिसोड तुम्ही केलात. कडक स्वभावाचे वैद्य छोटय़ा रमेचे वागणे पाहून विरघळून जातात. तुमच्या इतक्या वर्षांच्या अभिनयातली आणि जीवनातल्या कडूगोड आठवणींनी आलेली परिपक्वता त्या भूमिकेत पुरेपूर उतरली होती.
अलीकडे, विशेषत: आईच्या आजारपणापासून तुम्ही थोडे भावनिक होता, चिडचिडेही होता, हे मात्र मला फारसे रुचत नाही. अतिशय कणखर मन असलेला, कशानेही न खचणारा गुंडय़ाभाऊ हीच तुमची प्रतिमा आहे, तो तुमचा ‘लाइफटाइम रोल आहे.’ भावनाविवश होण्याचा अधिकार देवाने तुम्हाला दिलेला नाही. मला कळतंय, सांगणे सोपे आहे. कालौघात तुमच्यावर आलेले प्रसंग, तुम्हाला श्रद्धास्थानी असलेले तुमचे मोठे भाऊ ती. अण्णा आणि सौ. वहिनी, तुमचे मित्र माधव वाटवे, अरुण जोगळेकर, भक्ती बर्वे, दामू केंकरे या सर्वाचे मृत्यू, तुमच्या मागे लागलेले डायबिटीस, आईचा आजार आणि या सर्वामुळे जाणवलेली जीवनातली अस्थिरता आणि त्यातला अशाश्वतपणा हेच त्यामागचे कारण असावे, पण आम्हाला तुम्ही भरपूर विनोद करणारे आणि अधिकाराने परखड बोलणारे दादाच हवे आहात. आयुष्याच्या नाजूक वळणांवर योग्य सल्ला द्यायला तुम्हीच आहात, ही आश्वासक जाणीवच आम्हाला पुरेशी आहे.
तुमचे मित्र संगीतकार अशोक पत्की आणि तुमचा वाढदिवस एकाच दिवशी. आणि त्या दिवशी आपल्या घरी पार्टी आणि संगीताची मैफल ठरलेली असे. त्यात अशोककाकांना तुमच्या दोन फर्माईशी ठरलेल्या असायच्या- ‘आंसू भरी है ये जीवन की राहें’ आणि ‘काळोख दाटून आला, पालखी उतरुनी ठेवा, बदलून जरा घ्या खांदा, जायचे दूरच्या गावा..’ हे जीवन जरी ‘आँसूभरे’ वाटलं आणि काळोखही जरी दाटून आला तरी तुमच्याबरोबर केदारसारख्या श्रावणबाळाचा समर्थ खांदा आहे. तुमच्या उर्वरित जीवनाची मैफल रंगायलाच हवी आणि रंगणारच.
तुम्ही साठीत प्रवेश केलात तेव्हा आम्ही म्हणालो, साठी-शांत/ एकसष्टी करू या. ‘असे काही केलेत तर मी पळून जाईन,’ अशी आम्हाला धमकी देऊन तुम्ही थांबवलेत; पण तुमच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाटून आलेल्या या साऱ्या आठवणी आणि डोळ्यांतल्या संमिश्र भावनांच्या अश्रुधारा तुम्ही थोडय़ाच थांबवू शकणार?
जीवेत् शरद: शतम्!
आजच्या अंकात काही अपरिहार्य
कारणास्तव ‘उद्धारपर्व’ हे सदर नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा