jitukipitari@gmail.com
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (‘इफ्फी’) ‘गोदावरी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्कार, तर याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी निखिल महाजन यांना विशेष ज्युरी ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने अभिनेते-निर्माते जितेंद्र जोशी यांनी ‘गोदावरी’चा रेखाटलेला हा खळाळता प्रवास..
‘नदी’ हा शब्द केवळ पुस्तकातून वाचलेला होता; परंतु नदी म्हणजे काय हे जेव्हा कळलं तेव्हा डोळ्यापुढे गोदावरी होती. त्याचं झालं असं की, लहानपणी माझ्या आजीसोबत- म्हणजे आईच्या आईसोबत मी पहिल्यांदा नाशिकला आलो होतो. तेव्हा माझी आजी रमा आणि तिची बहीण सरस्वती या दोघी मला घेऊन नदीवर गेल्या होत्या. त्या वयात आंघोळीसाठी नदीवर का जायचं, हे मला कळेना. पण कुंभमेळा असल्यानं त्यांनी मला तिथे नेलं होतं. दोघीही मला घेऊन पाण्यात उतरल्या. तिथे पहिल्यांदा नदी म्हणून गोदावरीची आणि माझी भेट नकळत्या वयात झाली. त्यावेळी गोदावरीचा स्पर्श झाल्यावर काय वाटलं होतं हे शब्दांत सांगता येणं शक्य नव्हतं; परंतु कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात तिच्या स्पर्शाचे तरंग कायम कोरले गेले. कदाचित तेव्हा सुरू झालेली गोदावरी परिक्रमा या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण झाली असावी असं मला वाटतं.
त्यानंतर आत्ता पंधराएक वर्षांपूर्वी सहजच नाशिकला जाणं झालं होतं. तेव्हाही कर्मधर्मसंयोगाने कुंभमेळाच होता. त्यावेळी त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथली गोदावरी अनुभवता आली. पण तिच्या उगमापर्यंत- म्हणजे ब्रह्मगिरीवर काही जाता आलं नाही याची हुरहुर मनात राहिली.
नाशिक शहराचं आणि माझं नातं वेगळंच आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांच्या प्रेमात असणारा मी आणि माझ्या प्रेमात असणारी मिताली देशमुख म्हणजे माझी बायको- तिची आणि माझी पहिली भेटसुद्धा नाशिकचीच. माझे मामा कैलास पांडे नाशिकचे. नाटकाच्या निमित्तानं असंख्य प्रयोगांसाठी नाशिकची वारी वारंवार झाली. त्यामुळे गोदाकाठ आणि त्या काठची माणसं यांचा वावर आणि ठसा माझ्या आयुष्यात कायमच राहिला आहे. पण त्या काठावर कधी मी आपला चित्रपट करेन असा विचारही कधी केला नव्हता.
दिग्दर्शक निशिकांत कामत या माझ्या जवळच्या मित्राचं निधन झालं त्या दिवशी त्याच्या आठवणीदाखल काहीतरी करायला हवं असा विचार मनात आला. तातडीनं ही कल्पना माझ्या आणखी एका जवळच्या मित्राकडे- निखिल महाजनकडे मांडली. ‘काहीतरी कशाला, आपण त्याच्यासाठी चित्रपटच करू या की!’ असं उत्तर निखिलकडून आलं.. आणि चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. हा निशिकांतचा बायोपिक नाही, तर त्याला समर्पित केलेला चित्रपट आहे. म्हणूनच चित्रपटातील नायकाचं नाव ‘निशिकांत’ ठेवायचं आम्ही ठरवलं.
निशिकांत गेला तेव्हा आपल्याकडे करोनाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे निखिलने एक कथा मला ऑनलाइनच ऐकवली आणि विचारलं, ‘‘तुला हा सिनेमा कुठे घडताना दिसतोय?’’ माझ्या तोंडून सहज आलं- ‘नाशिक’! याआधी निखिलने कधीही नाशिक पाहिलं नव्हतं. त्यामुळे नाशिक समजून घेणं फार गरजेचं होतं. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी नाशिकला जायचा आम्ही निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी काय घडलं कोणास ठाऊक, परंतु मी निखिलला काही ओळी ऐकवल्या..
‘तुझ्या प्रवाहाचं
मीही झालो पाणी..
नाद दिला तूच
तुझीच झालो गाणी..
स्पर्श तुझा गार
निळा निळाशार
तुझी आठवण
मला जुनी फार..’
रात्री एक वाजता माझ्या तोंडून सहज या ओळी बाहेर आल्या. या ओळी निखिलने लिहून घेतल्या आणि माझ्या नकळत त्या आमच्या संगीत दिग्दर्शक मित्राला- ए. व्ही. प्रफुल्लचंद्रला पाठवल्या. माझ्या डोळ्यांपुढे तेव्हा दिसलेलं नाशिक, शब्दांतून आलेली गोदावरी यांचं पुढे काय होणार आहे, हे आताच का सुचलं, या कशाचाही मेळ लागत नव्हता. कारण आधी ठरलेल्या कथेत गोदावरी नव्हतीच कुठे.
चार दिवसांनी आम्ही दोघे नाशिकला पोहोचलो आणि नाशिक पाहायला आणि अनुभवायला तिथला आमचा मित्र प्राजक्त देशमुखला आम्ही आमच्या सोबत येण्याची विनंती केली आणि त्याच्यासोबत नाशिक फिरायचं ठरवलं. पहिल्याच दिवशी नाशिक फिरून आल्यानंतर निखिल म्हणाला, ‘चित्रपटाचं नाव- ‘गोदावरी’!’ तेव्हा मला थोडा धक्काच बसला. पण त्याच्या डोक्यात असलेला सिनेमा हळूहळू बदलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ए. व्ही.ने माझ्या शब्दांचं गाणं करून ते आम्हाला पाठवलंही.. जे या चित्रपटात आहे- ‘खळखळ गोदा..’ ते गाणं ऐकून तर मला अवाक्व्हायला झालं.
नाशिकच्या पुढच्या दिवसांच्या भ्रमंतीत मग माणसांच्या भेटी सुरू झाल्या. काही जवळची, परिचयाची, तर काही अनोळखी.. अनेक माणसं आम्हाला भेटली. नाशिकच्या घाटावर, सोमेश्वरच्या धबधब्यावर, मिसळ केंद्रावर. जिथे जाऊ तिथे आम्ही वेगवेगळ्या हरतऱ्हेच्या माणसांशी संवाद साधत होतो आणि ते सगळं आमच्या आत झिरपत होतं. एका रात्री मी गोदावरीच्या काठावर गेलो आणि तिचं पाणी ओंजळीत घेऊन तिला विणवलं, ‘‘बये.. तुझ्या नावाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. तो तू पूर्णत्वास ने. तू माझ्या सोबत राहा.’’ आणि तिला अघ्र्य दिलं. कारण आजी म्हणायची, ‘‘नदीला सांगितलेल्या गोष्टी ती पूर्ण करते.’’ यावर माझा दृढ विश्वास आहे.
त्यानंतर आमची ‘गोदावरी’ प्रवाही होऊ लागली. दरम्यान, हा चित्रपट लिहायला मदत करशील का, असं निखिलने प्राजक्तला विचारलं आणि त्याने होकारही दिला. मग पुढे चार दिवस आम्ही दिवसा नाशिक फिरायचो आणि रात्री हॉटेलवर चर्चा करायचो. याच चर्चेतून मग एक कुटुंब गवसलं, त्यातली माणसं गवसली.
तेव्हा नुकतेच निर्बंध शिथिल झाले असल्यानं आम्हाला वेगळं नाशिक अनुभवता आलं. या प्रवासात आम्ही नदीसारखे प्रवाही होत होतो. तिच्यात असलेली ऊर्जा, वाहण्याची ऊर्मी आम्हा प्रत्येकात संचारली होती. आम्ही काहीतरी शोधत होतो.. ज्याचा शोध गोदावरीकाठी लागला.
चित्रपट लिहून पूर्ण होतोय असं लक्षात येताच निर्मात्याचा शोध घेणं सुरू केलं. निर्माता मिळालाही; पण करोनाकाळात पैसे गुंतवणं जोखीम असल्याने ऐनवेळी तो मागेही झाला. आता निर्माताच नसेल तर पुढे कसं जायचं, हा मोठाच प्रश्न होता. पण मी, निखिल आणि आमचा मित्र पवन मालूनं कशाचाही विचार न करता आपापली आहे तेवढी जमा पुंजी पणाला लावली आणि चित्रपट करायचं ठरवलं. त्यावेळी अनेकांनी मला ‘ही जोखीम घेऊ नकोस,’ असं सांगितलं. पण आम्हाला तो विचार स्वस्थ बसू देईना. चित्रपट करायचं ठरलं आणि ‘गोदावरी’च्या व्यक्तिरेखांना न्याय देतील असे कलाकार संजय मोने, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर, सखी गोखले, सानिया भंडारे ही सगळी मंडळी आमच्यासोबत आली. शमीन कुलकर्णी हा छायाचित्रकार आपल्या पहिल्या सिनेमासाठी सज्ज होऊन निखिलसोबत शॉट् डिव्हिजन करण्यात मग्न झाला. स्नेहा निकम या अत्यंत हुशार वेशभूषाकार मुलीनं एक-एक रंग गोळा करत नाशिकच्या अंतरंगात डोकावणाऱ्या माणसांची खरीखुरी वेशभूषा तयार केली. आमचे बंधू अमित वाघचौरे आणि मानसी वहिनीने नेपथ्यकार म्हणून कथेचं सत्त्व साकार केलं. बेलोन फॉन्सेका या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या कलाकाराने नाशिकचा भवताल आपल्या ध्वनीने मुद्रित केला.
बरं, करोनाकाळात चित्रीकरण करणं ही मोठीच जबाबदारी होती. पण ती आमच्या ‘ब्लू ड्रॉप’च्या टीमने लीलया पेलली. स्वप्नील भंगाळे आणि त्याचा सहकारी चेतन शर्मा यांनी निर्मिती व्यवस्थापन चोख पार पाडलं. त्यांच्या मदतीला प्राजक्तच्या ‘निर्माण मोहा’ या नाटय़ संघातील राजेश, प्रफुल्ल, गिरीश, हेमंत, श्रीपाद हे सगळे नेटाने उभे राहिले आणि ओळखीचं मैत्रीत रूपांतर होत ही मुलं मित्र झाली, आपली झाली. रोहित सातपुते आणि वैभव खिस्ती या आमच्या खंद्या वीरांनी निखिलच्या सहाय्यकांची अत्यंत कठीण भूमिका हसतखेळत पार पाडली. आज चित्रपट पाहताना असं वाटतं, आम्ही सगळे फक्त विश्वासाने आणि अभ्यास करून, तरीही उत्स्फूर्तता ठेवून आत उतरलो आणि हे सगळं त्या गोदावरीने आम्हा सर्वाकरवी पूर्ण करून घेतलंय.
चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर या कुटुंबात संवाद नाहीए. जगायचं म्हणून काहीसं यंत्रवत जगणारी ही मंडळी फक्त वाहत आहेत; ज्यांच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. पण त्या कुटुंबातल्या कर्त्यां पुरुषाला या परिस्थितीचा प्रचंड राग आहे. त्याला गोदावरीचा, तिथल्या माणसांचा.. सगळ्याचाच राग आहे. तो आजच्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय. ज्याला गेल्या पिढीलाही सांधायचं आहे आणि नव्याशीही जुळवून घ्यायचं आहे. अशातच त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो आणि या सगळ्यात आपलं काही चुकतंय का, याचा विचार तो करू लागतो. ही एका कुटुंबाची कथा आहे. हे आजचं वास्तव आहे.
चित्रपटाच्या नायकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर ‘आपण काहीच केलं नाही’ हे अपयश उमगतं. तो समाजावर, जगण्यावर चिडलेला आहे आणि गोदावरीच्या प्रवाहासोबत तो स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. अशा नायकाला शोधताना मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तो न बोलताही बरंच काही बोलणारा आहे. तो नदीसारखा आहे : ज्याचं बा स्वरूप काही वेगळं आणि अंत:स्वरूप काही वेगळं असा तो आहे. त्यामुळे चित्रपटातील निशिकांतशी एकरूप होत होत अवघ्या सोळा दिवसांत चित्रपट पूर्ण झाला.
पण चित्रपट केवळ पूर्ण करून भागणारे नव्हते. कारण तो पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नसल्याने पुन्हा चिंता वाढली. पण आमच्यावर विश्वास दाखवून सहनिर्माते म्हणून आकाश पेंढारकर, पराग मेहता, अमित डोग्रा या मित्रांचे सहनिर्माते म्हणून मदतीचे हात पुढे आले आणि उर्वरित काम पूर्ण झालं.
हृषिकेश पेटवे या तरुण तडफदार संकलकाने कात्री चालवली आणि संकलन पूर्ण केलं. या चित्रपटाची चार गाणी मी लिहिली. ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला अप्रतिम संगीत तर दिलंच; परंतु विशेष म्हणजे नदीचा आवाज, तिचं म्हणणं सांगणारं अचूक पार्श्वसंगीतही त्यानं चित्रपटाला दिलं.
लहानपणापासून ब्रह्मगिरी पाहण्याची अपूर्ण राहिलेली माझी इच्छा यानिमित्तानं पूर्ण झाली. ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम पाहून मी विचारात पडलो. इतक्याशा जागेतून निघणारी गोदावरी पुढे अजस्र रूप धारण करते. दृष्टिपथात मावणार नाही असा तिचा प्रवाह एका छोटय़ा जागेतून सुरू झाल्याचं दिसतं.. तसाच हा चित्रपट आहे. जो एका छोटय़ा गोष्टीतून सुरू झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला.
गोदावरीत नाव चालवणारा नावाडी हा केवळ नदीवर तरंगत असतो. त्याला तारणारी आणि पुढे घेऊन जाणारी नदीच असते. तसंच ही कथा एका विशिष्ट उंचीवर पोहोचण्याचं काम गोदावरीच्याच आशीर्वादाने पूर्ण झालं आहे.
व्हॅंकुव्हर, न्यूझीलंड इथल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून ‘गोदावरी’ वाहती झाली. आणि त्यानंतर अत्यंत मानाच्या अशा ‘इफ्फी’ या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०० चित्रपटांच्या स्पर्धेतून ‘गोदावरी’साठी निखिल महाजन या माझ्या जीवाभावाच्या मित्राला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकाचा विशेष ज्युरी पुरस्कार आणि मला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच; त्याचबरोबर आपला हा प्रादेशिक चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला गेला याचा विशेष आनंद झाला.
‘गोदावरी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झाला, त्याला पुरस्कार मिळाले, कौतुकाचा वर्षांव झाला, तेव्हा प्रश्न पडू लागला : ‘हे कुठून आलं?’ त्याचं एकच उत्तर आहे : ‘हे परंपरेतून आलं.’ आमच्या आधीच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाही झालेल्या आणि आमच्यात खोलवर रुजलेल्या साहित्य, संगीत, व्यक्तिरेखाटन, अभिनय, दिग्दर्शन, नाटय़, चित्रमयता, व्यवस्थापन, संकलन आणि अशा इतर असंख्य गोष्टींमधून तयार झालेली, आणि सौंदर्यदृष्टीसोबत असलेलं माणूसपण आमच्यातल्या प्रत्येकाने गोदावरीच्या काठावर ओतलं आणि त्याचा परिपाक चित्ररूपात आणला.. तीच ही ‘गोदावरी’!
एक परंपरा आम्ही दुसऱ्या पिढीच्या हातात देत आहोत. आजपासून पन्नास वर्षांनंतर जेव्हा कुणी हा चित्रपट पाहील तेव्हा त्याला २०२१ च्या नाशिकचं जरासं का होईना, दर्शन घडेल. त्यांना केवळ नाशिक कळणार नाही, तर तिथली गोदावरीकाठची माणसं, त्यांच्या विवंचना, त्यांचं म्हणणंही त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
हा चित्रपट नसून एक कविता आहे.. जी भाषेवाचून कळते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकही परीक्षक भारतीय नसतानाही त्यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचला. त्यांना तो भावला आणि आम्ही पारितोषिकाचे मानकरी झालो. ‘नदीच्या प्रवाहाप्रमाणेच या नायकाचं दु:ख, संवेदना, भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या..’अशी प्रतिक्रिया आम्हाला परीक्षकांकडून मिळाली. त्यावेळी ‘गोदावरी’च्या अंत:स्थ प्रवाहाचा आम्ही घेतलेला शोध सार्थकी लागल्याची प्रचीती आली.
ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद देशपांडे चित्रपट पाहून म्हणाले, ‘‘तुम्ही भावनेची तीव्रता घेऊन गोदावरीत उतरलात आणि कविता घेऊन वर आलात.’’ त्यामुळे कुणाला ही कविता वाटेल, कुणाला चित्र, तर कुणाला तुमचं-आमचं जगणं. हा चित्रपट पाहून गोदावरीत न्हाऊन निघाल्याचा अनुभव प्रत्येकाला येईल. ते ओलेते पाय घेऊन प्रेक्षक घरी परततील तेव्हा प्रत्येकाच्या घरी ही आपली गोदावरी ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवांतून पोहोचलेली असेल. जय गोदा मैय्या!!