नावात काय आहे? तर- खूप काही! बऱ्याच छोटय़ा उद्योजकांच्या यशात त्यांच्या व्यवसायाच्या नावाचाच मोठा वाटा असतो. एखादं नेमकं नाव ग्राहकांच्या आयुष्यभर तोंडी अन् स्मरणात राहतं; तर एखादं चुकीचं नाव व्यवसायाला अपयशाच्या दारात उभं करतं. तुमच्या व्यवसायाचं नाव हे तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची व्यवसायाची नीतिमत्ता, वेगळेपणा हे लोकांसमोर मांडत असतं. काहींच्या मते, नाव वेगळं, नावीन्यपूर्ण असावं. ते वाचल्यावर किंवा ऐकल्यावर एक विशिष्ट चित्र डोळ्यांसमोर उभं राहायला हवं. तर काहींच्या मते, नाव अतिशय साधं अन् माहितीपूर्ण असावं. माझ्या मते, दोघेही बरोबरच आहेत. पण ते नाव सार्थ करण्यासाठी तशाच प्रकारचं जाहिरातकौशल्यही वापरलं जायला हवं, तरच ते लोकांना पटेल किंवा त्यांच्या लक्षात राहील. पण आजच्या घाईगर्दीच्या व्यवसायजगतात बऱ्याच व्यावसायिकांना ‘नाव’ महत्त्वाचं वाटत नाही. पण नावच तुमच्या व्यवसायाची प्रतिमा घडवत असतं. २ इंच बाय ३ इंच व्हिजिटिंग कार्डवरचं तुमच्या कंपनीचं नाव पाहूनच इतर व्यावसायिक तुमच्याशी लाखो रुपयांचा व्यवहार करण्यासाठी राजी होतात. तुमची व्यवसायातील पहिली व्यावहारिक भेट ही सर्वात महत्त्वाची असते. अन् त्यात तुमच्या कंपनीचं नाव आणि त्याबद्दलची विश्वासार्हता ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते.
भविष्यात तुमचा हा व्यवसाय इतका मोठा होऊ शकतो, की तो देशातील इतर राज्यांत वाढून परदेशातही मोठं नाव करू शकतो. अन् तो दिवसही तितकासा दूर नसेल, की तुमच्या कंपनीचं नाव न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये दिमाखात झळकेल. एखादं ट्रेण्डी नाव तुमच्या ग्राहकाला आकर्षक करेल; परंतु तेच नाव भविष्यात एखाद्या गुंतवणूकदाराला प्रभावित करू शकणार नाही. तसंच नाव इतकं साधं असावं, की ज्याला भाषेचा किंवा धर्माचा अडसर असू नये.
कंपनीचं नाव ठेवण्यासाठी आपण मित्रांची किंवा घरच्या मंडळींचीही मदत घ्यायला काही हरकत नाही. एखाद्या छान संध्याकाळी गप्पाटप्पांमध्ये छानपैकी नाव सुचू शकतं. पण त्यासाठी पुढील पाच नियम डोक्यात ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
१) व्यवसायाचं नाव लक्षात राहील असं असावं अन् लिहायला व उच्चारायलाही ते अगदी सोपं असायला हवं. अर्थात भविष्यातल्या ग्राहकाच्याही ते स्मरणात राहायला हवं आणि ते ऑनलाइन किंवा फोन डिरेक्टरीत सापडायला सोपं असावं. एखादं अवघड नाव ‘कॅची’ असू शकतं, पण त्याचं स्पेलिंग लिहिताना जर कष्ट पडत असतील तर तो मोह नक्कीच टाळावा.
२) नावाची निवड करताना ते उच्चारल्यानंतर त्यातून एखादं विशिष्ट चित्र डोळ्यांसमोर उभं राहील तर अति उत्तम. समजा- जर तुमच्या कंपनीचं नाव आहे- ‘अडमनिंबड’; तर कोणतं चित्र डोळ्यांसमोर उभं राहील? या शब्दाचा अर्थ काय, हे समजून घेण्यातच समोरच्याची बरीच कल्पनाशक्ती वाया जाईल. बऱ्याचदा आपण जे वाचतो किंवा ऐकतो, ते आपल्या डोक्यात चित्राच्या किंवा काल्पनिक चित्राच्या माध्यमातून लक्षात राहतं. त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या नावात एखादा आकार, चित्र, दृश्य वगैरे असायला हरकत नाही.
३) सर्वात महत्त्वाचं म्हणजे नावात थोडीशी भावनिकता असावी. हा ‘शब्द’ मनाला भिडावा किंवा तुमचे उत्पादन वा सेवेची भावनिक माहिती देणारा असावा. उदाहरणार्थ माझ्या ‘बाबांचे लाडू’ अन् माझ्या ‘वडिलांचे लाडू’ हे शब्द घ्या. यातल्या ‘बाबा’ या शब्दात जास्त आपलेपणा आहे. अर्थात आपण जे नाव ठरवाल, ते आपल्या संभाव्य ग्राहकाच्या भावनेच्या जवळचे असावे आणि ते आपल्या व्यवसायाशीही निगडित असावे; ज्यामुळे ‘ते’ नाव घेतल्यावर आपला व्यवसाय काय आहे, हे लक्षात यावं.
४) नावात प्रथमदर्शनीच आपला व्यवसाय काय, हे समजायला हवं. उदाहरणार्थ समजा- आपण फोटोग्राफर आहात, तर कसले फोटोग्राफर आहात, हे आपल्या नावासोबत असेल तर लोकांना समजेल की, आपण फॅशन फोटोग्राफर आहात किंवा लग्नाची फोटोग्राफी करणारे आहात. प्रत्येक कंपनी काही जागतिक कंपनी बनत नाही अन् थोडय़ाच काळात ती ‘NIKE’ किंवा ‘APPLE’  सारखी जगप्रसिद्धही होत नाही. त्यामुळे तुमच्या कंपनीच्या नावात तुमचा व्यवसाय नेमका कसला आहे, हे लोकांना समजायला हवं.
५) नाव नेमकं, सुटसुटीत अन् छोटं असावं. ते दुकानाच्या पाटीवर किंवा बिझनेस कार्डमध्ये मावणारं असावं अन् आपल्या ई-बिझिनेसच्या जगात तेच Domain म्हणून वापता यायला हवं. तसेच कोणी गुगलमध्ये सर्च केल्यानंतर लगेचच ते सापडायला हवं. नावासोबत नावाला शोभेलसा एखादा रंग किंवा आकार हाही तितकाच महत्त्वाचा असतो. त्याचाही विचार करायला हरकत नाही.
जवळपास सर्वच फ्रेंच वाइन्सची नावं खूपच अवघड असतात. उदाहरणार्थ : ‘शॅटो लिंच बेगस.’ पण जेव्हा एखादा फ्रेंच हे नाव घेतो तेव्हा ते त्याच्या फ्रेंच बोलण्याच्या पद्धतीमुळे आणखीनच वेगळं ऐकायला येतं. त्यामुळे बऱ्याचजणांना अशा प्रकारे वाइनचं नाव लक्षात ठेवायला त्रास व्हायचा. ही गोष्ट लक्षात घेऊन एका वाइनच्या कंपनीनं त्यांच्या वाइनचं फ्रेंच नाव बदलून ‘Fat bastard’ असं ठेवलं. नावीन्यपूर्ण अन् हसू येणारं हे नाव लोकांच्या चांगलंच लक्षात राहिलं. अर्थात नाव छान आहे म्हणून काहींनी या वाइनची एक बाटली विकत घेतली, तर चव, वास अन् रंग पाहून काही लोकांनी डझनभर विकत घेतल्या. पण चव, वास अन् रंग पाहण्यासाठी ग्राहकांना आकर्षित केलं ते त्याच्या नावानेच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा