मी १९७५ च्या काळात एक वादक म्हणून संगीत क्षेत्रात काम करीत असे. त्याकाळी सिंथेसायझर हा इलेक्ट्रॉनिक वाद्यप्रकार बिपीन रेशमिया (गायक हिमेश रेशमियाचे वडील) यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणला होता. त्याचदरम्यान माझा गायिका सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर एक परदेश दौरा योजलेला होता. आम्ही अमेरिका आणि कॅनडाच्या कॉन्सर्ट टूरवर जाणार होतो. मी सुमनताईंना म्हटलं की, ‘आपण जर हे नवीन वाद्य विकत घेतलं तर आपला ऑर्केस्ट्रा, त्याचा साऊंड भव्य आणि भरलेला वाटेल.’ त्यांनी मला सांगितलं, ‘त्या वाद्याचा ‘मेक’ (make), नंबर वगैरे लिहून आणा. आपण कॅनडाच्या माणसाला सांगू- बुक कर म्हणून.’ मध्यंतरीच्या काळात ही गोष्ट आम्ही पार विसरून गेलो. ज्या दिवशी आम्ही कॅनडाला पोहोचलो त्याच दिवशी दुपारी रिहर्सलच्या ठिकाणी एक टेम्पो आला. त्यातून एक भलाथोरला खोका घेऊन एक माणूस आला आणि म्हणाला, ‘हे तुमचं नवीन Korg वाद्य आणलं आहे.’ आम्हा सर्वासाठीच तो आश्चर्याचा गोड धक्का होता. लगेचच आम्ही अॅम्प्लिफायर (Amplifier) मागवला आणि त्यावर रिहर्सल सुरू केली. सुमनताई जेव्हा गाणं गात असत तेव्हा मी पेटी (Harmonium) वाजवीत असे आणि म्युझिक आलं की ते मी सिंथेसायझरवर वाजवीत असे. आमची मस्त रिहर्सल झाली. सगळेजण खूश होते.
दुसऱ्याच दिवशी आमचा कॉन्सर्ट प्रोग्राम होता. त्यामुळे रिहर्सल संपल्यावर मी सिंथेसायझर बॉक्समध्ये भरण्याआधी त्याची सर्व बटणं ‘O’वर केली व तो त्यात भरून ठेवला.
दुसऱ्या दिवशी प्रोग्राम सुरू झाला. पहिलंच गाणं ‘न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने..’ सुमनताई गाणं म्हणताना मी पेटी वाजवली आणि जसं म्युझिक आलं तसं मी पटकन् सिंथेसायझरवर हात ठेवला मात्र.. त्यातून फक्त एकच आवाज आला : ‘पक् ’! पुढे काही वाजेचना! सर्वत्र दोन-तीन मिनिटं भयाण शांतता! सुमनताई आणि बाकीचे म्युझिशियन माझ्याकडे गोंधळून पाहू लागले. मी आणखीनच ओशाळलो. पटकन् पेटीवर पुढचं म्युझिक वाजवलं.
मध्यांतरात सुमनताईंनी काहीसं नाराजीनं मला म्हटलं की, ‘कृपा करून वाद्याचा आधी अभ्यास करा आणि मगच वाजवायला घ्या.’ त्या दौऱ्यात मग मी ते वाद्य वाजवलं नाहीच.
मुंबईत आल्यावर त्याचा मी बारकाईने अभ्यास केला. त्याची माहिती असलेली पुस्तिका संपूर्ण वाचली. तेव्हा मला कळलं, की मी जी सर्व बटणं ‘O’ वर केली होती, तेच चुकलं होतं. ‘सस्टेन’चं बटण, ‘व्हॉल्यूम’चं बटण ‘ON’ केल्याशिवाय ते वाद्य कसं वाजणार? त्यातून साऊंड कसा येणार? त्यानंतर मात्र सहा महिने मी त्याचा एवढा अभ्यास केला, की एखाद् दोन सेकंदातच मी त्यातून नवीन आवाज काढू लागलो. त्याकाळी दोनच ट्रॅकवर रेकॉर्डिग व्हायचं. आजच्यासारखं कॉम्प्युटरवर जसे अनेक ट्रॅक्स मिळतात- किंवा कुठेही वाजवून ठेवा, ते शिफ्ट करू शकता तुम्ही- तसं नव्हतं. तेव्हा लुईस बँक्ससारखा म्युझिशियन आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहायचा व मला विचारायचा, ‘‘तुम कैसे एक सेकंद में चेंज करते हो?’’
त्यानंतर ते वाद्य वाजविण्यासाठी मला जिंगल क्षेत्रातले मोठमोठे संगीतकार (म्हणजे सुरेशकुमार, वैद्यनाथन, वनराज भाटिया, वगैरे) बोलावू लागले. हळूहळू मी त्यांना ‘टय़ून’ बनवण्यातही मदत करू लागलो. जाहिरात एजन्सीवाले आणि प्रोडय़ुसर्स माझ्यातला हा गुण बघून खूश होत असत. ‘अशोक अच्छा सजेशन्स देता है!’ असं सगळ्यांचं म्हणणं असे.
एके दिवशी एका प्रोडय़ुसरने मला विचारलं, ‘माझ्यासाठी जिंगल करणार का?’ मी म्हटलं, ‘नवीन प्रॉडक्ट असेल तर करेन. कोणाच्या हातचं काढून घेऊन नको.’ तो म्हणाला, ‘नवीनच आहे. Double ‘B’ Soap! ३० सेकंदाची जिंगल आहे. २६ सेकंदांची जिंगल आणि चार सेकंद कॉमेण्ट्री! मी म्हटलं, ‘ठीक आहे.’ दुसऱ्या दिवशी स्टुडिओ आरक्षित केला.
स्टुडिओतच माझ्या हातात स्क्रिप्ट मिळाली. नीला भिडे (निवेदिका नीला रवींद्र) हिला मी गाण्यासाठी बोलावलं होतं. तेही माधवराव वाटव्यांनी सांगितल्यावरून! ते एकदा बोलता बोलता मला म्हणाले होते की, ‘माझी नातसून आहे. तिला कधीतरी गायला बोलव.’ म्हटलं, हीच ती वेळ आहे! अतिशय सुंदर गायली ती. त्या जिंगलचे बोल होते.. ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं? अच्छा साबून कौनसा लाऊं? कपडों को जो उजला बना दे, रंग जमा दे, चमक ला दे। कोई बता दे- मुझे तो कोई बता दे..’
(व्हॉइस ओव्हर) ‘धनतक का डबल ‘B’ सोप!’
हे जिंगल इतकं आवडलं सर्वाना! क्लायन्ट-एजन्सीवाले.. सगळेच खूश झाले. हे जिंगल रेडिओच्या जमान्यात सकाळी बरोब्बर आठ वाजता अनेक वर्षे वाजत असे. या जिंगलवरून लोकांना कळायचं- आठ वाजलेत. चला, निघालं पाहिजे! ८.३५ ची गाडी पकडायचीय!
त्यानंतर मात्र माझ्याकडे जिंगल्सचा ओघ लागला. आज गेली ३५ वर्षे मी जिंगल्सच्या क्षेत्रात अथक काम करतोय. सतत नवीन कल्पना इथे राबवाव्या लागतात. चुकून एखाद् दुसरा सूर जरी रिपीट झाला, तरी क्लायन्ट-एजन्सीवाले तो बदलायला लावतात. त्यामुळे कायम सतर्क राहावं लागतं.
आज या क्षेत्रात काम करण्याची पद्धत बदलली आहे. सिंथेसायझर वाजवणाराच संगीतकार झाला आहे. त्यात तुम्हाला रेडिमेड पॅटर्न्स मिळतात. डोकं वापरायची फारशी गरज नसते. आणखी एक गोष्ट मी माझ्या बाबतीत सांगू शकेन, की त्याकाळी जिंगल्समध्येही मेलडी होती जी आता हरवत चालली आहे. असो!
ये ढेर से कपडे.. मैं कैसे धोऊं?
मी १९७५ च्या काळात एक वादक म्हणून संगीत क्षेत्रात काम करीत असे. त्याकाळी सिंथेसायझर हा इलेक्ट्रॉनिक वाद्यप्रकार बिपीन रेशमिया (गायक हिमेश रेशमियाचे वडील) यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणला होता.
आणखी वाचा
First published on: 02-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व जिंगल बेल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertising jingles