मृदुला दाढे- जोशी  mrudulasjoshi@gmail.com

‘है अजबसी कश्मकश दिल में ‘असर’

किसको भूले, किसको रखे याद हम!’

                         – असर अकबराबादी

प्रेम ही तशी फार गुंतागुंतीची चीज आहे. खरं तर फसवीच. नेमकं काय वाटलं की त्याला प्रेम म्हणता येतं? आणि जे झंकारून जातं त्याचं गुंजन किती काळ निनादत राहावं याला काही नियम आहे का? तर्जनीनं तार छेडली की अनामिकेनं ती छेडलीच जाणार नाही असं काही असतं का? प्रेमात पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, अंतिम प्रेम.. नव्हे, हेच प्रेम.. असे टप्पे असतात का? खरं काय? शाश्वत काय? १९७४ साली आलेला, ख्यातनाम हिंदी लेखिका मन्नू भंडारी यांच्या ‘यही सच है’ या कथेवर आधारित बासू चटर्जीचा, अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रजनीगंधा’ हा चित्रपट म्हणजे एका नाजूक ‘कश्मकश’चीच कहाणी आहे. पहिलं प्रेम.. नंतर आजच्या भाषेत ब्रेकअप्.. मग दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्यात येणं.. ते पक्कं  ठरलंय असं वाटेपर्यंत पहिल्या प्रेमानं पुन्हा साद देणं.. यातून होणारी दोलायमान अवस्था हा याचा गाभा.. मग गोंधळणं, किंचित वाहवणं, स्वत:च्याच मनाचे हे आश्चर्यजनक विभ्रम बघावे लागणं- हे सगळं अतिशय सुंदर संगीताच्या साथीनं ‘रजनीगंधा’मध्ये अनुभवता येतं. कवी योगेश यांनी वेगळ्याच शैलीत ही गीतं लिहिली आणि सलील चौधरी या विलक्षण जीनियस संगीतकारानं अक्षरश: रजनीगंधाच स्वरांमध्ये दरवळत ठेवली. ती तशीच ताजी राहणार आहे कित्येक वर्ष! या चित्रपटात केवळ दोन गाणीच आहेत. पण ती इतकी प्रभावी आहेत, की जास्त गाण्यांची गरजच भासू नये.

दीपा (विद्या सिन्हा) एक कॉलेजकन्यका. तिचं नवीन (दिनेश ठाकूर) नावाच्या एका तरुणावर प्रेम आहे. नवीन काहीसा बंडखोर. कॉलेज प्रशासनाविरुद्ध केलेल्या संघटित उठावात त्याला दीपा साथ देत नाही आणि हे प्रेम प्रकरण संपुष्टात येतं. त्या भावनिक उत्पातापासून स्वत:ला सावरून पुन्हा दीपा शिक्षणात लक्ष घालते आणि तिच्या आयुष्यात संजय (अमोल पालेकर) येतो. खूपसा धांदरट.. कुठेही वेळेवर न पोचणारा.. अखंड त्याच्या ऑफिसमधल्या प्रमोशन्स, अन्याय अशा रुक्ष गोष्टींत अडकलेला. तरीही दीपावर मात्र मनापासून अतिशय भाबडं प्रेम करणारा, तिच्यासाठी निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ घेऊन येणारा संजय! फार काळ त्याच्यावर रुसताही येत नाही तिला. फुरंगटून बसलेल्या दीपाच्या मांडीवर डोकं ठेवताक्षणी तिचा राग विरघळणार हे त्याला माहितीय. त्यानं आणलेली रजनीगंधाची फुलं दीर्घकाळ हवेत स्वत:चं अस्तित्व दरवळत ठेवणारी- शुभ्र.. त्याच्या मनासारखीच! अनेक रंग नसतीलही त्याच्या स्वभावात; पण एक विलक्षण साधेपणा आहे.. या फुलांसारखाच! त्याच्या आठवणींत रमून जाताना उमललेलं गाणं..

‘रजनीगंधा फूल तुम्हारे..’ (कवी- योगेश, गायिका- लता मंगेशकर)

सलीलदांचं सांगीतिक मन हे गुंतागुंतीचंच.. तरीही त्यातल्या त्यात कमी गुंतागुंत असलेलं हे गाणं! संपूर्ण गाण्याला व्यापून उरलाय तो निशिगंधाचा प्रमाथी सुगंध. पण ही प्रेमाची अगदी सुरुवातीची अवस्था.. सर्वस्व त्याच्या अस्तित्वात विरघळून टाकावं असा कोणीतरी भेटलाय तिला.. आणि हे सगळं ती फक्त एका निशिगंधेला सांगतेय.. ही कल्पनाच किती रोमँटिक!

तिच्या भावविश्वात महत्त्व आहे ते फुलांना.. त्या गंधाला.. कारण तो गंध त्याची चाहूल घेऊन येतो. त्या गंधाचं आणि त्याच्या येण्याचं नातं खूप घट्ट आहे. ‘यूँही महके प्रीत तुम्हारी मेरे अनुरागी मन में..’ हे गाताना त्या आवाजात एक आतुरता आहे. कुणाच्या तरी अस्तित्वात स्वत:चं अस्तित्व विरघळून टाकण्याची आस.. ऊर्मी!मला हे वेगळेपण, हे स्वातंत्र्य नकोच!

‘अधिकार ये जब से साजन का

हर धडकन पर माना मैंने

मैं जब से उनके साथ बंधी

ये भेद ‘तभी’ जाना मैंने..’

माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझं अस्तित्व दिसू दे, तुझा अधिकार असू दे.. आणि इथे अवचित एक गुपित सापडल्याचा भास लताबाई आवाजात देतात.

‘कितना सुख है बंधन में’

कळलं नव्हतं, हे बंधन किती हवंहवंसं आहे ते.. त्यातलं सुख आत्ता समजलं.

‘हर पल मेरी इन आँखो में

बस रहते हैं सपने उनके

मन कहता है मैं रंगों की

इक प्यारभरी बदली बनके

बरसूँ उनके आंगन में..’

हेसुद्धा किती नाजूक स्वप्न. प्रेमातली असोशी.. त्याच्यासाठी एक सुंदर आनंदघन बनून का जाऊ नये? बरसावं आणि आपणही रिक्त व्हावं त्याच्यासाठी.. प्रत्येक वेळी लताबाईंचा आवाज इथे बारीक होत जातो. खरं तर सखीच्या कानात गूज सांगितल्यासारखंच आहे हे. ‘रजनीगंधा’ हे संबोधन आहे. इथे लताबाई आपल्या आवाजाचा थ्रो बदलतात. ‘रजनीगंधा’चा ‘नी’ म्हणताना तो सुंदर वळवला जातो. ‘सा’ ते ‘प’ हे अंतर मग जास्त वाटत नाही. कारण ते गाणारा गळा ते मिटवून टाकतो.  ‘महके’चा स्वर मात्र अचाट प्रतिभा दाखवणारा. खर्जातला कोमल गंधार? कुठून आला हा? आणि एकाच अक्षरात सप्तक बदलण्याची ‘सलील किमया’ इथेही. ‘के’ एवढं अक्षर पुढच्या सप्तकातल्या गंधारावर? न सुटणारी कोडी ही!

‘हाँ यूँही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में’ ही ओळ अगदी आतलं गुपित सांगण्यासाठीच जणू अशी खाली खर्जात जाते. अगदी वेगळ्याच टोनमध्ये गायलेलं गाणं आहे हे. सतत आवाजाचा थ्रो कमी-जास्त करत, श्रुतींना फार नाजूक स्पर्श करत गायल्यात त्या! आणि वाद्यमेळसुद्धा किती मर्यादित.. एका गिटारवर सगळं गाणं उभं आहे.. गिटार त्या गाण्याला आणखी रोमँटिक बनवते हे खरं असलं तरी मुळात सगळा अनुराग लताबाईंच्या आवाजात आहे.

दीपाला मुंबईहून नोकरीच्या मुलाखतीसाठी तार येते आणि तिला मुंबईला जावं लागतं. खरं तर ही ताटातूट अगदी नकोशी. तरी आणाभाका होतात.. दीपा मुंबईला पोहोचते आणि एक आश्चर्य तिची वाट बघत असतं. स्टेशनवर स्वागताला चक्क नवीन आलेला असतो.

नवीन मुंबईला सरावलाय. त्याच्या उद्योगात रमलाय. त्याच्यात एक प्रकारचं- स्वत:च्या भावना चेहऱ्यावर दिसू न देण्याचं- व्यावसायिक कसब आलंय. दीपा मात्र मुंबईत नवखीच. पण नवीनला बघून जास्त गोंधळलेली. आता त्याच्या मनात आपल्याबद्दल काय असेल? त्याला अजून आपल्याबद्दल काही वाटतंय का? अजून त्यानं लग्न  का केलं नसावं? ‘नाही, नाही.. मी सांगून टाकेन त्याला संजयबद्दल..’ असं मनात म्हणणारी दीपा त्याला हे अजिबात सांगू शकत नाही. उलट, मुंबईत वावरताना, त्याच्याशी बोलताना नकळत तिला त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागतं. दीपाच्या नोकरीसाठी त्यानं केलेले प्रयत्न, त्याचा वक्तशीरपणा, व्यावसायिक चतुराई.. कुठेतरी नकळत संजयशी तुलना होऊ लागते. आल्या आल्या तिच्या फ्रेश दिसण्यावर, साडीच्या रंगावर उत्स्फूर्तपणे कॉमेंट करणारा नवीन आणि तिनं नवी साडी नेसलेली असताना ते अजिबात लक्षात न येणारा, तिच्याशी त्याच ऑफिसच्या गप्पा मारत राहणारा संजय! दीपा नकळत नवीनकडे ओढली जातेय. त्याची वाट बघणं, त्याला आवडते म्हणून मुद्दाम निळी साडी निवडणं.. हा स्वत:मधला बदल तिलाही जाणवतोय. नवीननं आपल्याला काहीतरी विचारावं.. निदान जवळीक साधण्याचा प्रयत्न करावा.. आपण त्याला भले नकार देऊ; पण त्यानं आपल्याला विचारावं तरी!  मुंबईत टॅक्सीनं फिरताना शेजारच्या सीटवर बसलेल्या नवीनबद्दल दीपाच्या मनात वेगळंच काही झंकारून जातं. बासूदांचं दिग्दर्शकीय कौशल्य हे की, या भावनेला त्यांनी मुक्तपणे पडद्यावर सन्मानानं येऊ दिलं. स्त्रीच्या नीतिमत्तेला कायम प्रश्नार्थक पिंजऱ्यात जखडून ठेवणाऱ्या रूढ विचारांपेक्षा हा विचार फार वेगळा होता.. म्हणूनच अतिशय वेगळं गाणंही जन्माला आलं.

‘कई बार यूं भी होता है, ये जो मन की सीमारेखा है, मन तोडने लगता है..’ (कवी- योगेश, गायक- मुकेश )

आपण अनेक नियम घालून या मनाला बंदिस्त करून ठेवलेलं असतं. इतकं, की आपण शेवटचे नैसर्गिक कधी वागलो हे आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही. सतत एक मुखवटा घेऊन वेगवेगळ्या भूमिका करत राहतो आपण. पण कधीतरी मन बंडखोर होतंच.. कुठल्या तरी अनामिक ओढीनं.. एखाद्या आशेच्या मागे धावत सुटतं.. मग आवरता आवरत नाही.

‘जानू ना, उलझन ये जानू ना

सुलझाऊ कैसे कुछ, समझ न पाऊ

किस को मीत बनाऊ?

किस की प्रीत भुलाऊ?’

एकाला साथ द्यायची, तर दुसऱ्याचं प्रेम विसरावंच लागणार.. ही अजब उलझन सुटता सुटत नाही. पक्का मुंबईकर झालेला स्मार्ट नवीन, की स्वत:चं ऑफिस आणि दीपा यापेक्षा तिसरा विषय डोक्यात नसणारा संजय? एवढय़ा वर्षांनंतर दीपाला भेटूनही चेहऱ्यावर एकदाही खास भावना उमटू न देणारा, बोलताना कुठेही सूचक न बोलणारा नवीन, की मुद्दाम वाट वाकडी करून, फाटकी छत्री घेऊन येणारा संजय? साडीचा पदर हातावर पडूनही मनावर कुठलाही तरंग उमटू न देणारा नवीन, की सहजपणे तिच्या मांडीवर लहान मुलासारखा डोकं ठेवून लाड करून घेणारा संजय? मनात काहूर उठलं आहे. काहीच कसं आठवत नाही याला? आपला एकांतसुद्धा? नवीनचं सतत खिडकीबाहेर बघणं, एक अंतर ठेवून वागणं.. दीपाच्या मनातला गोंधळ वाढलाय.

‘कई बार..’ ही भावना दीपाच्या मनातली, पण सलीलदांनी ती मांडलीय पुरुष-स्वरात.. काय कारण असावं? मला वाटतं, याचं एक सांगीतिक कारण हे असावं की, या पहिल्या ओळीची चालच एक बंधन तोडून जाणारी आहे. ‘प सा प रे सा ग, ग ग प’ असे हे स्वर.. मंद्र पंचमाकडून मध्य पंचमाकडे जातात आणि तो नंतरचा पंचम अगदी रांग मोडून भरकटू दिलाय. आधीचे स्वर अगदी थेट येतात आणि हा पंचम मात्र बंडखोर. त्या सैरभैर मनासारखाच. ‘ये जो मन की सीमारेखा’ म्हणताना ओळ खाली येते.. संयम दाखवायला. पण नाहीच, मनाला कोण बांध घालू शकलंय आजवर!

हे असं काहीसं रूढार्थानं अजिबात ‘गोड’ नसलेलं गाणं स्त्री-स्वरात कदाचित छान वाटलं नसतं. पण ज्या मुकेशजींच्या तयारीबद्दल अनेकांनी शंका घेतली, त्यांच्याकडून सलीलदांनी अत्यंत कठीण गाणी गाऊन घेतली. त्यातलंच हे एक! आपल्या आयुष्यात हे गाणं आपल्याला बऱ्याचदा आठवतं, एक प्रांजळ अनुभूती देतं आणि एक सुंदर धिटाईसुद्धा!  स्वत:च्या भावना ओळखण्याची.. स्वत:चा भावनिक कल्लोळ मान्य करण्याची! आपण ‘असे’ कधीच वागणार नाही असं वाटत असताना ‘जे’ वागून जातो, त्याचं गाणं आहे हे!

पण.. दीपाची दिल्लीला जायची तारीख जवळ आली तरी हवा तो प्रतिसाद नवीनकडून मिळत नाही. ती औपचारिकता.. एक पडदा कायम आहे दोघांच्यात. जास्तीत जास्त वेळ नवीनबरोबर काढूनही तो किंचितसुद्धा त्या तरलतेच्या पातळीवर जात नाही. तिचे डोळे स्वप्नाळू. पण त्याचे अगदी जागे! जणू ‘ही’ दीपा ‘ती’ नव्हेच.. अगदी ट्रेन सुटतानासुद्धा तो ‘हवं’ ते  बोलत नाही. दीपा खिडकीतून बघत राहते. मनातला कल्लोळ अस होऊन खिडकीतून बाहेर काढलेला हात नवीन हातात घेऊ पाहतो; पण गाडी सुटलेली असते. दीपाचं नवीनच्याच दिशेनं अनुकूल झालेलं मन हवा तसा अर्थ घेतं. पहिलं प्रेमच खरं.. हे मनात पक्कं ठसतं.

इकडे दिल्लीत संजय निशिगंधाचा गुच्छ ठेवून बाहेरगावी गेलेला असतो. पण दीपाच्या मनात मुंबईच्याच आठवणी येतायत. त्यातून नवीनला एक पत्रही लिहून होतं.. या पत्राला उत्तर येतं, पण त्याच्या स्वभावासारख्याच मोजक्या शब्दांत. हवी ती वाक्यं वाचण्यासाठी अधीर झालेले तिचे डोळे झरझर पत्रावरून फिरतात. पण ‘शेष फिर..’ या शब्दांनी केलेला शेवट दीपाला जमिनीवर आणतो. खरं तर ‘शेष’ आता काहीच उरलेलं नसतं. समोर संजय असतो- हातात निशिगंधाची फुलं घेऊन. त्याचं निर्व्याज हसणं, तिला धीर देणं, त्याचा स्पर्श.. सगळं आठवतं आणि जाणवतं, की एका मोहमयी दुनियेतल्या त्या कृत्रिम रंगाच्या कागदी फुलांपेक्षा ही खरीखुरी, स्वच्छ, शुभ्र, साधी, पण जीव लावणारी फुलं.. हेच सत्य आहे. हेच शाश्वत आहे आणि हेच माझं आहे.. कधीही न कोमेजणारं.. त्या रजनीगंधेसारखं निरंतर दरवळणारं!

यही सच है!