सॅबी परेरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रिय मित्र दादू यास..

सदू धांदरफळेचा नमस्कार.

दिवाळीचा फराळ काल मिळाला. त्याबद्दल आभारी. फराळातल्या चिवडय़ामधील शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे गायब असल्याबद्दल, शंकरपाळे सांदळल्याबद्दल आणि चकल्या वातड झाल्याबद्दल बायको तिच्या स्वभावाप्रमाणे कुरकुर करीत होती. पण मला फराळाच्या कुरकुरीतपणापेक्षा तो पाठवणाऱ्याच्या स्नेहाचा ओलावा अधिक भावतो. म्हणून मी एकटय़ानेच तो फराळ संपवला. माझा स्वभाव आणि तुझा फराळ दोन्ही गोष्टी अशा की कुरकुर करण्याचा किंवा होण्याचा प्रश्नच नव्हता.

दादू, दिवाळी-दसऱ्याच्या सुमारास एकंदरीत माहौलच आनंदाचा असतो. त्यात आपल्या पंतप्रधानांनी ‘आता भारतात सगळं चांगलं चाललं आहे’ असं डझनभर भाषांतून जगाला ओरडून सांगितल्यामुळे त्यांची इभ्रत राखण्यासाठी तरी आपल्याला आनंदी असणे.. किमान तसे दिसणे आवश्यक आहे. आपल्या सगळ्या शारीरिक, मानसिक व्याधींचं मूळ आपल्या खाण्यापिण्यात आणि झोपण्यात आहे असा शोध व्हॉट्स अ‍ॅप युनिव्हर्सटिीतील शास्त्रज्ञांनी लावलेला असल्याने आनंदी होण्यासाठी काही दीक्षित, दिवेकर पद्धती आहे का, हे मी शोधत होतो. ‘लवकर झोपून लवकर उठणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, धन आणि शहाणपणाचा लाभ होतो’ अशी एक म्हण तेवढी मला सापडली. पण आनंदी होण्यासाठी असं खाण्यापिण्याचं किंवा झोपेचं काही पथ्यपाणी असल्याचं मला तरी सापडलं नाही. तुला माहिती असेल तर कळव.

एकंदरीतच आपल्याकडे आनंदी असण्याच्या बाबतीत आनंदीआनंद आहे. आपण लग्नाला, समारंभाला, पार्टीला जातो. तिथे लोक हसताना, खिदळताना, सेल्फ्या घेताना दिसतात. आपण सोशल मीडियावर नजर टाकतो तर तिथे हसणाऱ्या, जगभर फिरणाऱ्या, हॉटेलांत जेवणाऱ्या, नाचणाऱ्या लोकांचे फोटो दिसतात. पण याचा अर्थ ते सगळे आनंदी असतात असा नव्हे. दादू तुला सांगतो, हे मॉडर्न जग आहे. इथे खायचे दात वेगळे आणि दाखवायच्या कवळ्या, इन्प्लांट्स वेगळ्या असतात.

आमचा एक मित्र म्हणायचा की, आनंद हा मानण्यात असतो. शाळेतील आपल्या बॅचच्या पन्नासपैकी चाळीस मुली अजूनही आपल्याला भेटल्या की स्माईल देतात, बोलतात या गोष्टीचा आनंद मानायचा की उरलेल्या दहा आपल्याला बरोब्बर ओळखून आहेत याबद्दल पाटणकर काढय़ाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्यासारखा चेहरा करून बसायचं, हे ज्याने त्याने ठरवायचं.

आनंदी होता येत नसेल तर निदान दु:ख तरी विसरता यावं म्हणून मी खूप प्रयत्न करतो. प्रयत्न करतो म्हणजे टीव्हीसमोर बसतो आणि दक्षिणेकडचे डब केलेले सिनेमे, क्रिकेटची मॅच असं काहीबाही बघतो. पण टीव्हीवालेही सिनेमा आणि क्रिकेटपेक्षा जाहिरातीच जास्त दाखवतात. तुला सांगतो दादू, जाहिरातींमधील सुखी, सुंदर, उत्साही आणि आनंदी कुटुंब पाहून माझ्यासकट माझं अख्खं कुटुंब डिप्रेशनमध्ये आहे की काय अशी मला शंका येते. माझ्या मुली मला चिडवतात. म्हणतात, ‘‘बाबा, तुम्हा जुन्या पिढीतल्या लोकांना आयुष्याचा निकोप आनंद घेताच येत नाही. सदान्कदा तुमच्या डोळ्यांचा मीलन सबवे आणि नाकाचा साकीनाका झालेला असतो!’’

अरे, कधी कुठे नात्यागोत्यात लग्न असलं तर नाइलाजाने तिथं जावं लागतं. तिथे सर्व जण खोटे खोटे हसत असतात. मला एक कळत नाही, ज्यांची लग्नं जमतच नाहीत अशा सिंगल्या लोकांना दुसऱ्यांची लग्नं पाहण्यात कसला आलाय आनंद? आणि आपल्यासारखे जे ऑलरेडी लग्नाच्या आगीत होरपळत आहेत, त्यांना लग्न या प्रकाराचा आनंद होणे शक्यच नाही. तुला म्हणून सांगतो दादू, जरी मी ताकदीचा अभिनेता असलो तरी लग्न समारंभाला जाऊन आनंद झाल्याचा अभिनय करणं दिवसेंदिवस मलाही कठीण होत चाललंय. पण आमच्या बन्सीसारखे काही लोक भलतेच आशावादी (आणि म्हणून आनंदी!) असतात. दोनेक महिन्यापूर्वी तो भेटला तेव्हा इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार, या बातमीमुळे त्याचा आनंद त्याच्या पंक्चर झालेल्या बाईकवर मावत नव्हता. मी त्याला म्हटलं, ‘‘मित्रा, पेट्रोल-डिझेलसाठी प्रति लिटर दोन रुपये अधिक मोजण्याची चिंता सोडून भविष्यात इलेक्ट्रिक कार स्वस्त मिळणार म्हणून आनंद मानणे म्हणजे कडेवरचं लेकरू टाकून उदरातील बाळाची वाट पाहण्यासारखं आहे.’’

पूर्वी लोक पत्र लिहिताना ‘कळविण्यास आनंद होत आहे की..’ अशी सकारात्मक सुरुवात करायचे. आता मात्र ई-मेल आणि मेसेजेसची सुरुवात ‘हाय’ने होत असल्याने आपल्या त्या जुन्या आनंदालाच हाय लागली असेल काय, हा प्रश्न मी माझ्या सोहोनी नावाच्या मित्राला विचारला. त्याच्या तोंडात त्यावेळी तंबाखू, मावा किंवा तत्सम काही असल्याने त्याने तोंडाने उत्तर न देता एका कागदावर लिहिले की, ‘सदोबा xxxx, आनंदाची तुझी व्याख्या आणि तुझं लॉजिक तुझ्याकडेच ठेव. ज्याची त्याची प्रायॉरिटी असते रे. माझं विचारशील तर गर्लफ्रेंड किस द्यायला तयार झाली याचा मला जेवढा आनंद होईल, त्याहून अधिक दु:ख तोंडातली तंबाखू थुकावी लागणार याचं होईल.

दादू, खरं सांगायचं तर आपणच आपल्या अपेक्षा वाजवीपेक्षा वाढवून ठेवतो आणि मग त्या पूर्ण झाल्या नाही की आपल्याला दु:ख होतं. माझ्या मते, माणसाने आपल्या अपेक्षा कमीत कमी ठेवाव्यात, म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख तरी होणार नाही. उद्या आपण विराट कोहलीकडून अशी अपेक्षा करू की प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी तो जे काही बोलतो त्याऐवजी त्याने ‘जय माता दी’ बोलावं, तर चालेल का? म्हणजे आपल्याला लाख चालेल, पण त्याला ते झेपेल का?

माझं असं म्हणणं आहे की, आनंद हा एखादी गोष्ट मिळवण्यात नसून ती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जी धडपड करतो त्यात आहे. अरे दादू, अशी खूप माणसं होऊन गेली, ज्यांनी आपलं सारं आयुष्य एखाद्या ध्यासासाठी वाहिलं आणि शेवटपर्यंत त्यांना आपलं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य करता आलं नाही. म्हणून का ते आनंदी नव्हते? मध्यंतरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पेले याला त्याच्या यशाचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी आनंदासाठी खेळतो म्हणून जिंकतो. मात्र जे केवळ बक्षिसासाठी खेळतात ते हरतात आणि दु:खी होतात.’’ (आता पेलेचा विषय निघालाय म्हणून एक शंका तुझ्यासमोर ठेवतो : ज्या पेलेची अख्खी जिंदगी ‘कप’ मिळवण्यात गेली, त्या एकटय़ा माणसाचं नाव ‘पेले’ असं अनेकवचनी का बरे? ‘पेला’ का नाही?)

आपल्या घरातील वीज गेल्याचं आपल्याला जितकं दुख होतं त्यापेक्षा जास्त दु:ख शेजाऱ्याची वीज गेली नाहीये हे कळल्यावर होतं. काही महिन्यांपूर्वी पेपरमध्ये ती बातमी वाचल्यापासून माझं अगदी तसंच झालंय. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार, आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश अनुक्रमे ६७, ९३ आणि १२५ व्या क्रमांकावर असून, भारताचा क्रमांक १३३ वरून १४० वर घसरलाय. मी रोजच्या रोज सारखा या विषयावर विचार करतो आणि रोज वेगवेगळे विचार माझ्या मनात येतात. कधी वाटते, आपला नंबर खाली गेला तरी हरकत नाही, पण दर आठवडय़ाला किमान एक सर्जकिल स्ट्राइक करून या पाकडय़ांना इतकं दु:ख द्यायला पाहिजे की साले यादीत सगळ्यात शेवटी गेले पाहिजेत. कधी वाटते, हा हॅपिनेस सव्‍‌र्हे ईव्हीएम मशीनने केला असता तर आपलाच नंबर जगात पहिला आला असता. कधी मला डाऊट येतो की, ही त्या बसक्या नाकाच्या चायनावाल्यांची चाल आहे. भारताला डिवचण्यासाठी त्यांनी व्हेटो वापरून स्वत:ला आणि पाकिस्तान, बांगलादेशला आपल्या पुढे घुसवलंय. पण लगेच माझं दुसरं मन म्हणतं, भारताकडे डोळे वटारून बघेल असा त्या चायनामध्ये माओ का लाल आहेच कोण? कधी वाटते, पाकिस्तानमधील फक्त अतिरेकी लोकांचा सव्‍‌र्हे घेतला असेल! बाहेरच्या देशांत आतंकी हल्ले झाले की त्यांना आनंदाचं उधाण येतं. कधी वाटते, युनायटेड नेशन्सकडून पाकिस्तानला आपल्यापेक्षा जास्त आनंदी कशाच्या आधारे ठरवलं त्याचे पुरावे मागायला हवेत. कधी वाटते, कदाचित हा सव्‍‌र्हे बरोबरही असेल. ‘मित्रो’ आणि ‘मन की बात’ ऐकून ऐकून भारताची जनता बिचारी पकली असणार. कधी वाटते, फक्त कॉंग्रेसवाल्यांचा सव्‍‌र्हे केला असेल काय? आधीच्या सारखा भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून तेच सगळ्यात दु:खी आहेत. कधी मी माझीच समजूत काढतो- श्रीमंती आणि आनंद यांचं व्यस्त प्रमाण असतं. लोक जितके गरीब, तितके जास्त आनंदी असतात. कधी वाटते, या सव्‍‌र्हेमध्ये भारतातील फक्त पुरुषांची मते घेतली असावीत. आपण आनंदी आहोत हे कळले तर आपली बायको आपल्यावर संशय घेईल म्हणून त्यांनी दु:खी असल्याचे सांगितलं असेल. तर कधी वाटते, या सव्‍‌र्हेमध्ये पाकिस्तानातील फक्त स्त्रियांची मते घेतली असावीत. आपण दु:खी आहोत हे कळलं तर आपला नवरा नवीन बायको घेऊन येईल म्हणून त्यांनी आनंदी असल्याचे सांगितलं असेल..

यार दादू, लोकांना वाटते की, खूप खरेदी केली की खूप आनंद मिळेल. पण ते काही खरं नाही. भरभरून केलेल्या शॉपिंगने घर भरून जाते आणि त्यातून मिळणारा आनंद मात्र थर्मल पेपरच्या शॉपिंग बिलांवरून शाई उडून जाईस्तोवरही टिकत नाही. तुला सांगतो दादू, वस्तू आणि सेवा खरेदी करून आनंद विकत घेता येत नाही रे. पशाने फार तर दुसऱ्याला दु:ख देता येऊ शकेल. हे बघ, विचार करकरून एक गोष्ट माझ्या ध्यानात आलीय, की दुसऱ्याशी तुलना केली तर आपण कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. दुसरं कुणी येऊन आपल्याला आनंदी करू शकत नाही (सरकार तर अजिबातच नाही.) आणि आपणही दुसऱ्या कुणाला आनंदी करण्याचं फुकाचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊ नये. आपलं आपल्यालाच आनंदी व्हावं लागेल रे!

तुझा सदानंदी मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com