मेधा पाटकर

मनुष्य हा खरे तर समाजप्रिय प्राणी आहे. तो हिंसा करतो वा हिंसेचे कारण बनतो ते कुठल्या ना कुठल्या नशेपोटीच! यात ज्ञानाची, जातीची, धर्माची जशी; तशीच सत्तेची, धनाची वा निव्वळ गर्वाची नशाही असू शकते. ‘ब्राह्मण्यवादी’ विचारधारा वा विविध रूपाने आजही प्रकट होणारा जातीवाद आणि सांप्रदायिकता ही माणसातले जनावर जागे करणारी वृत्ती ठरते. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये दोन गरीब बालके आपल्या सवयीनुसार, परंपरेनुसार नव्हे तर मजबुरीने रस्त्याच्या काठी शौचास बसली असताना, त्यांचा पिटाई करत केला गेलेला खून हा आजही जिवंत जाती-संप्रदायवाद आणि सामंतशाहीचा संतापजनक नमुना. दिवसागणिक देशाच्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या हिंसक कारवाया मनाला छळत राहतात. कुठल्याही धर्माला जे मान्य नाही, ते करणारे ते खरे तर अधर्मीच! परंतु यातही एका धर्माची दुसऱ्यावर मात, विशिष्ट धर्माचे म्हणून त्याच्या अनुयायींवर आरोप करत, त्यांना ‘हिंसक’ म्हणत पुन्हा हिंसकच आघात, हे धर्माच्या नावाने होते! हिंसेच्या कारणांची परखड तपासणी करता राजकीय-सामाजिक हितसंबंधांतून उद्भवणारा आर्थिक स्वार्थ आणि लूट हीच कारणे समोर येतात. असे संबंध हे त्यांच्या छत्राखाली येणाऱ्या सर्वासाठी स्तंभ बनतात तर न येणाऱ्यांसाठी सूळ. त्यातून झालेल्या हत्यांचा विचार हा आमच्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाने तपशिलात जाऊन तर केलाच, शिवाय यातूनच अनेक ठिकाणच्या हिंसाविरोधी कार्यात, संघर्षांत, प्रबोधनात आणि चर्चा-विवादातही सामील होणे अपरिहार्य होते. यातून एक घनिष्ठ समन्वयही पुढे गेलाच!

shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येने आम्ही सारे हादरलो, ते त्यांच्या विवेकी विचाराला संपवण्याचा प्रयत्न या अविवेकी हल्ल्याच्या मार्गाने करावा, याविषयीच्या विषादाने. डॉक्टर न अ-धार्मिक होते, न अ-वैज्ञानिक! विज्ञान, विकास, विवेक या तिन्हींवरचे त्यांचे भाष्य हे दरवेळेस आध्यात्मिक विवेचनासारखेच भासायचे. अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी कंबर कसली असतानाही त्यांना सकारात्मकता मांडणारी ‘विवेकवाहिनी’ स्थापन करण्याची गरज वाटली. मराठवाडय़ात जातिवादाच्या विरोधासाठीच्या स्थानी विवेकवाहिनीचा स्थापना दिवस होता तेव्हा तेथे मीही हजर होते. पुण्यात असो वा अन्यत्र, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांत आमची हजेरी असे. श्रीराम लागूंसारख्या नास्तिक, पण मानवधर्मी अशांनी तिथे केलेली विचारी मांडणी ही आज प्रकर्षांने आठवते. तिथे कुठेही ना बहुसंख्यांच्या धर्माला लाखोली वाहिली होती, ना अल्पसंख्यांच्या धर्माचे तुष्टीकरण होते. धर्माचे नाते संख्येशी नसते, खोलीशी असते; म्हणून त्या विचारांच्या लांबी-रुंदी-खोलीचा आढावाच पुढे येत राहिला. आजच्या व्हॉट्सअ‍ॅप वा अन्य अफाट फैलावाधारे (बाजारी क्लृप्त्यांतून का होईना) ‘समाज माध्यम’ मानल्या जाणाऱ्या मार्गावर असा आढावा आणि त्यापुढे जाऊन अध्ययन वा त्यातून आंदोलनही आपल्यासमोर येत नसते. म्हणूनच विवेकी तरुणांची फौज उभी करण्यासाठी विशेष तसदी आणि ताकद लावणाऱ्या डॉक्टरांचा निकाल लावला गेला. त्याशिवाय अविवेकी वृत्ती आणि त्यातून पुढे मागे राजकीय सत्ताप्राप्ती या उद्देशाने भारलेल्यांना गत्यंतर नसावेच! मात्र हिंसेच्या कारणांचा शोध, विवेचन वा दोन-चार आरोपींना शिक्षा यावर हे थांबणे शक्यच नसते, नव्हतेही. दाभोलकरांच्या मागोमाग पानसरे आणि कलबुर्गीची आणि नंतर गौरी लंकेशची हत्या ही एकाच हत्यारी विचारसरणीने केल्याचे जसजसे पुढे येत राहिले, तसतसे देशातील अहिंसेच्या पाईकांचे एकत्रित येणे आणि हिंसा-अहिंसेतील भेदावर अत्यंत गंभीरपणे विचार करणे, कृती-कार्यक्रमातून अहिंसेचे मूल्य जपणे आणि जागवणे स्वाभाविकच होते. अनेक जनसंघटनांनी मिळून आजवर जपलेले सत्य-अहिंसेचे मूल्य आणि ही सनातनी हिंसा थांबवण्याची, निदान धिक्कारण्याची कृती पुढे न्यायलाच हवी.

न्याय-अन्याय, समता-विषमता, विकास-विनाशाच्या प्रश्नांना भिडत असतानाच, या हिंसा-अहिंसेच्या आणि त्यामागील प्रत्येक कारणाच्या हात धुऊन मागे लागणे हे आवश्यकच ठरते, हे अशा प्रत्येक हिंसेचा पाठपुरावा करून, तिथले सारे लागेबांधे हुडकून समाजापुढे मांडणारे आमचे साथी दर्शवत राहिले. जीवन-मृत्यूमधली भिंतच उद्ध्वस्त करणारी हिंसा ही जिथे तिथे भेटत गेली, तिथे सामोरे जाण्याचा, तिला थोपवण्याचा जनआंदोलनांचा प्रयत्न हा सगळ्या हितसंबंधांच्या पार जाऊन, कठोर निष्पक्षतेने केला गेल्याने महत्त्वाचा ठरत राहिला. मात्र तो प्रभावी, परिणामकारक होतो, म्हणून ते सहन न होणाऱ्यांनी कधी ‘महाभारत’ही उभे केले. कधी आपलेच साथी-सहकारी समोर उभे ठाकले तर कधी हिंसेला हिंसेनेच उत्तर देण्याचा विचार पक्का असलेले दुराग्रही हल्लेखोर बनले. हिंसाविरोधी विचार तरीही आम्ही पुढे नेत राहिलो तो विविध पातळ्यांवर. बस्तरमध्ये माओवादी आणि सरकार दोन्ही बाजूने होत असलेल्या हिंसेला आव्हान देत; मालेगावमध्ये शब्बेरात के वक्त, मस्जिदपर हुए स्फोट आणि मृत्यू यांवरच्या खोटय़ा-खऱ्या केसेसबद्दल; इस्लामपुरामध्ये रात्री उशिरापर्यंत सभा आणि बठका घेत; ओरिसातील किलगनगरमध्ये टाटांचे साम्राज्य असलेल्या क्षेत्रात झालेल्या १३ आदिवासींच्या हत्येविषयीचे विकृत रिपोर्टिंग हाणून पाडत; मुंबईपासून तर रांचीपर्यंतच्या महानगरांतल्या गरीब वस्त्यांच्या उद्ध्वस्तीकरणापोटी होणाऱ्या महिलांवरच्या हल्ल्याविरोधात ठाम सत्याग्रही बनून, तर कधी सिंगूर-नंदिग्रामच्या स्त्री-पुरुष-बालिकांच्याही जीवन-जीविकेवरच नव्हे, तर शरीरावरही हत्यारे चालवण्याच्या जागतिकीकरण-कंपनीकरणाच्या खेळीमध्ये ताकदीने उतरून! काही संघर्ष हे आत्मघातकी हिंसेविरुद्धही- जसे नशामुक्ती भारत आंदोलनाचा वा अवैध रेतखाणी रोखणारा! प्रत्येकच हिंसेला दिलेले आव्हान हे केवळ शासनकर्त्यांनाच नव्हे तर समाजघटकांनाही द्यावे लागत होते आणि म्हणूनच, विरोधकाला ‘शत्रू’ न मानता ‘प्रतिपक्ष’ मानणाऱ्या गांधीजींचा विरोधकांविषयीच्या भूमिका आणि भावनाही समजावून घेण्याचा फार कठीण प्रसंग, कुठे ना कुठे भिडायचाच! त्यातच व्हायची आंदोलनांच्या, आमच्यासारख्या काही व्यक्तींच्याही अहिंसकतेची आणि संघर्षांच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूची, म्हणजे निर्माणातील कुशलतेची परीक्षा! ती पार पाडणे हे कधी काही दिवसांचे, तर कुठे काही वर्षांचे कार्य ठरले आणि त्याने माझेच काय, आमच्या त्या त्या ठिकाणच्या क्षेत्रीय ते राष्ट्रीय सहकाऱ्यांचे जीवनही व्यापले.

मुंबईतील गोळीबारच्या संघर्षांमागचे कारणच होते, सुमारे ७० ते १०० वर्षे जुन्या वस्तीवरचे बिल्डरशाहीचे आक्रमण. विमानतळापासून जेमतेम तीन कि.मी. अंतरावर असलेल्या या भरल्या-भारल्या वस्तीची वाढ ही म्हटले तर अस्ताव्यस्त आणि अनियोजित पद्धतीने झाली. म्हटले तर सहकारी तत्त्वावर. एकेका दलित, बहुजन समाजातील घटकांत मोडणाऱ्या एकेका जिल्ह्य़ातून इथे पोहोचून सहकारी समित्यांद्वारेच, आपले गृहनिर्माणाचे कार्य पुढे नेलेल्यांचे नियोजन हे खऱ्या अर्थाने ‘सहकारी’! जमीन हडपून नव्हे, तर अनेक ठिकाणी शासकीय जमीन शोधून वा कमी-अधिक खाडी बुजवून. यातले सहकाराचे तत्त्व हे कायद्यात बसो-न बसो, दशकानुदशके त्यांच्यात टिकून राहते, हे गोळीबार क्षेत्रातील गणेश कृपा सोसायटीतल्या संघर्षांदरम्यान दिसून आले. यातील अगदी काष्टा खोचून लढणाऱ्या कोकणी बायकांपासून ते आपले कमी अधिक शिक्षणही आंदोलनाचा हिशोब, पूर्वीच्या काळातल्या मुन्शीची आठवण करून देण्याइतक्या चोखपणे ठेवण्यासाठी कामी आणणाऱ्या गोपाळ नाईकसारख्या साथींपर्यंत, या साऱ्यांनी कशी पणाला लावली स्वत:ची ताकद, ते जवळून पाहात होते. मात्र त्यांच्यावर अगदी स्थानिक पोलीस स्टेशनमधल्या ‘परकीय’ भासावेत अशा पोलीस अधिकाऱ्यांनी बिल्डर्सच्या, तेही ‘मऱ्हाटी माणूस’च गणल्या जाणाऱ्या, अनेक लाभांवर यथेच्छ ताव मारत, केलेला अत्याचार हा हिंसकच होता. इथे अनुभवले ते खोटे गुन्हे दाखल करण्यापासून ते घरावर हातोडा चालवण्याच्या हिंसेपर्यंत! निरपराधांवर लाठय़ा उगारणारे पोलीस एकवेळ परवडले, पण म्हाडासारख्या घर बांधणीसाठी निर्मिलेल्या संस्थेशी, तिथल्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक लालसेशी जोडून घेऊन, पोलीस कमिशनरांनाही अंधारात ठेवून खासगी कमाई करण्याच्या कारवाया अधिक विकृत आणि विघातक, हे इथे लक्षात आले. यातून कुणाच्या घरातील कमावत्याने देह सोडला तर कुणा विधवा बाईने जीवनभर बेघरपण भोगले. या हिंसेचा अनुभव गरीब वस्त्यात ठायीठायी आला तरी त्यावर मात करून, इतक्या अनिश्चिततेतही आपले घरच नव्हे तर आपले हक्क जपणाऱ्यांनाच म्हणायला हवे अहिंसेचे पुजारी. यांच्यातील गांधी, आंबेडकर वा श्रमिकांच्या राज्याचे भाष्य करणारे मार्क्‍स शोधून मांडत राहण्याऐवजी त्यांना सलाम करते.. केवळ तत्त्वज्ञानी नव्हे, तर हिंसेला आव्हान देऊन अहिंसेचा मार्ग दाखवत प्रत्यक्ष लढणारे म्हणून!

सिंगूर-नंदीग्रामच्या संघर्षांत पुढे आलेली एक कोवळी तरुणी अमिता. या संघर्षांत झालेल्या हत्यांची गिनतीच झाली नाही; होऊ दिली गेली नाही. सत्ताधीशांच्या कारवाया या रात्रीच्या अंधारात केवळ मुंबईतील आरे क्षेत्रातील जंगलच कापून काढतात असे नव्हे; नर्मदेतील पाणी रात्रीबेरात्री भरून गावे बुडवतात हेही नव्हे, तर अंधारातच आवाजी गोळ्याही झाडतात हे अनुभवले. राजकीय पक्षप्रणालीलाही त्यांच्याच विचारांना आव्हान देत, भूमिका घेण्यास भाग पाडत आणि त्यातून पोलखोल करत, सहन केला तिथल्या सर्वसामान्यांनी हिंसेचा नंगा नाच, जनआंदोलनाच्या पाठिंब्याने. त्या वेळी राष्ट्रपती ते मुख्यमंत्री आणि घटनाप्रणीत म्हणून नावाजलेले सारे आयोग- अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग वगैरे- हे कमजोरच असल्याचे जाणवल्यावर अखेर हिंसेचे बळी होत होतही लढणाऱ्या राधाबाईसारख्या स्त्रियाच ठरल्या खऱ्या शिपाई! युद्धात सैनिक प्रेते तुडवत पुढे जाताना चित्रातही पाहून थक्क होतो, तशी थक्क होऊन अनुभवत होतो त्यांची ताकद. आजही ती हिंसा त्यांनी एका भारतीय आणि दुसऱ्या इंडोनेशियन कंपनीला तिथून हटवून थोपवली खरी, तरीही त्यांचे त्याच निमित्ताने उद्ध्वस्त झालेले जीवन काय, जखमासुद्धा पूर्णत: पुसल्या गेलेल्या नाहीत. म्हणूनच जनआंदोलने असोत वा राजकीय पक्ष, हिंसा-अहिंसेतील एक संघर्ष संपल्यावर पुढे जात राहतात, तरी मागे वळून पाहण्याची त्यांची जबाबदारी टाळू शकत नाहीतच. सिंगूरमधल्या शेतकऱ्यांना वा भागीदारी (बटाईदारी)तून शेतीवरच जगणाऱ्यांना टाटाच्या शेडखालच्याच नव्हे तर अन्यही जमिनींवर पूर्ण हक्क देऊ न शकल्याबद्दल आजही हळहळते अमिता. तिला त्या वेळच्या संघर्षांतील सहकारी आणि आजच्या सरकारातील खासदार श्रीमती डोला सेन ही सहकार्य देऊ पाहते, तरी ती नाकारते. कारण व्यवस्थाच हिंसक असते; केवळ व्यक्ती नव्हेत, पक्ष नव्हेत हे समजून, व्यवस्थेतील कुणाचीही साथ ही अहिंसक लढवय्यी सहजासहजी नाही स्वीकारत!

व्यवस्थेच्या दारात भीक मागत न जाण्याचे तत्त्व पाळून सत्याग्रहाला त्यापासून सर्व प्रकारे दूर आणि स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करणारे अहिंसेसाठीचे अन्य दोन संघर्ष हे आत्महत्यांविरोधातले. दरवर्षी लाखोंवर मृत्यूच्या दाढेत ढकलणारी नशा ही संपलीच पाहिजे, म्हणत आम्ही उभारलेले ‘नशामुक्ती भारत आंदोलन’. समाजवादी साथी डॉ. सुनीलम्, सर्वोदयी साधूच म्हणावेत असे सुब्बारावजी, तमिळनाडूतील आरुल दास आणि त्याचे दलित युवा सैनिक, सारे सोबतीला. बिहारचा अनुभव गाठीला. राजकीय अपेक्षा आणि स्वप्नं बाळगून का होईना तिथे कठोर कायदा आणून केली गेलेली पूर्णत: नशाबंदी नव्हे, तरी शराबबंदीही खरोखर महिलांवरील हिंसेच्या विरोधातले प्रभावी शस्त्र म्हणून स्वीकारायला हवी. सरकारने या हिंसेला पाठबळ देत सुरू केलेला एकेका राज्यातला ८ ते ५० हजार कोटी रुपयांपर्यंत लाभ देणारा व्यापार हा आपल्याच जनतेच्या जिवाशी खेळणारा म्हणून संपवायलाच हवा, ही घोषणा घेऊन केलेल्या चंद्रपूरच्या पारोमिताच्या लढय़ाचे यश आणि राजस्थानमधल्या सर्वोदयी परिवाराची चिकाटीने मिळवलेली सफलताही समोर होती. मात्र आंदोलनकारींवर हिंसेची पाशवी खेळी तमिळनाडूमध्ये अनुभवली. जिथे ताकद, प्रभाव आणि दबावही आणणारी जनशक्ती वा जनजागरण, तिथे व्यवस्था सीमेवरच्या शत्रूप्रमाणे तुटून पडतेच हा धडा मिळाला. शशी पेरुमल नावाच्या साठीतल्या वृद्ध गृहस्थांना, इरोड जिल्ह्य़ात त्या १०० दिवसांच्या, २००० किमीच्या पदयात्रेत भेटून परतलो, ते राष्ट्रीय आंदोलन उभे करण्याचा निश्चयच मनोमन करत. तेही महिला, बालके आणि युवांची ताकद बांधत. तरी ते साधण्यापूर्वीच, दारूचे दुकान बंद करण्यासाठी मोबाइल टॉवरवर चढलेल्या शशी पेरुमल यांना उतरवण्याच्या नाटय़ातच, रस्सीने करकचून केलेली यांच्या हत्येची थरारकता पाहिली.

सत्ता हेच अस्त्र कुठल्या दिशेने फिरवायचे ते राजनेते ठरवतात, म्हणूनच त्यांच्यापासून सावध राहात तरीही दारूबंदीसारखा कुटुंब हत्या, महिला हिंसा आणि शारीरिक, मानसिकच नव्हे तर विविध प्रकारे होणारी सामाजिक हिंसा थोपवणारा मार्ग आणि मुद्दा हा आजही उठतोच आहे. महाराष्ट्रातील महिलांनी पक्षातीत निर्णय घेतला तर त्या दारूबंदी कायद्यावर प्रत्येक उमेदवाराकडून लेखी बंधपत्र घेऊ शकतीलच.

या हिंसेमागे जशी बेकायदेशीर रेतखाणींमागे उभी असलेली माफियांची फळी यात कोण कोण नेते, पक्षकार्यकत्रे, सामाजिक गुंड वा वरून भगवे, हिरवे, सफेद कुठलीही वेषभूषा असली तरी आत काळाकुट्ट अंधार घेऊन तोच पसरवणारे, हे समजण्याची परीक्षा ही आंदोलनकर्त्यांनी नाही दिली, तर हिंसेला तोंड फोडणे, तिच्या हत्यारांचा साठा उद्ध्वस्त करणे जमणारच कसे? म्हणून यातले कुठलेही आंदोलन हे त्या त्या प्रश्नाचा सखोल अभ्यासच करत, त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे साहस असेल तरच उभे करावे. तसे न केल्यास अर्ध्यावरच सुटलेले वा नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनमानीने सोडून दिलेले आंदोलन हे आपल्यावरच कसे उलटते, याचाही अनुभव घेतला. नर्मदाकाठच्या अनेक गावांतील रेत माफिया, दारू माफिया, हे आम्ही व्यवस्थेच्या कारस्थानांना पुरे न पडल्याने, त्यांना मुळापासून उखडणे नाही साधू शकलो, म्हणूनच तर आजही राजकीय सत्तेतील धेंडांना साथ देऊन आंदोलनाला वेगळे काढण्यात ते गुंतलेलेच आहेत. त्यांना येतेही कमी-अधिक यश, अन्यायाच्या मुद्दय़ाच्या राजकीयीकरणालाच रोखण्यात! आणि मग अ-राजकीय नव्हे पण पूर्णत: अहिंसक अशा आंदोलनाला ‘सामाजीकरण’ याच मार्गावर, जिला शॉर्टकट नसतो, अशी दीर्घ वाटचाल करावी लागते.

याहीमध्ये येतात ‘महाभारतीय’ आव्हाने. सिंगूर-नंदीग्रामच्या वेळी माझ्यावर थुंकण्याचे ‘कार्यक्रम’ घडवणारे; नशामुक्तीच्या निमित्ताने गोमांस खाणे वा दारू पिणे, दोन्हींवरील बंदी ही ‘आजादी’ नाकारणारी आहे, असे म्हणणारे- ‘‘आंदोलनकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली म्हणूनच सर्वसामान्यांना हिंसा भोगावी लागली’’, असे निष्कर्ष खरे-खोटे न तपासता काढणारे.. हे सारे आपलेच असतात. मात्र हिंसा हीच ताकद सोबत घेऊन मिळणारी आणि टिकणारी सत्ता, ती ज्ञानाची, जाती-धर्माची, लिंगपिसाटांची वा राजकीय पीठांची, ही अहिंसेला आज कटघऱ्यातच उभे करून डरकाळत असताना, अहिंसेच्या ‘पुजाऱ्यांनाच नव्हे तर या जीवनमूल्यांना जपण्याचा संकल्प असलेल्यांना तर सक्रिय व्हायलाच हवे; परंतु ‘आंदोलन’ म्हटले तर धसकणाऱ्यांनीही निष्क्रियता सोडायला हवी. आपल्या घरा-दारात, गाव-गल्लीत आणि देश-दुनियेतील हिंसेला वाचा फोडणे, हिंसेच्या प्रसंगी उभे राहणे हे जमले पाहिजे. हिंसक तत्त्वांना सुद्धा फाशीची, जीवन संपवणारी शिक्षा नव्हे, पण दीक्षेसारखी भासेल अशी योग्य सजा देववणे, व्यवस्थेतील साजऱ्या हिंसक प्रवृत्तींना नाकारत आपल्या अहिंसक मार्गानाच कवटाळून राहणे, हे नि:शंक पाळण्याचे ‘मंगल’सूत्र सदैव गळ्यात बाळगायलाच हवे. शब्दांच्या, माध्यमांच्या, खोटय़ा आरोपपत्रांच्या असो की जेलमध्ये डांबण्याच्या वा जीवे मारण्याच्या धमक्यांच्या, कुठल्याही कारस्थानाला ‘हिंसा’च मानली की त्याविरोधात आपली अहिंसा, व्यक्तिगतच नव्हे तर जनशक्तीचीही, पणाला लावणे हे आलेच! हे मानणाऱ्यांची देशात वा जगभरातली संख्या ही कोटींत नव्हे, अब्जांमध्ये गणता, सारी ‘नशा’ उतरवू शकेल, हाच आशावाद!

याचसाठी शिकवतो आम्ही आमच्या जीवन शाळांतल्या आदिवासी मुलांनाही जीवाभावाची प्रार्थना :

हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे,

माणसाने माणसाशी माणसासम वागणे!

medha.narmada@gmail.com

Story img Loader