पश्चिम खानदेशात ‘अहिराणी बोली’ बोलली जाते, तर दक्षिणेकडील अजिंठय़ाचा डोंगर ते उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यानच्या तापीच्या खोऱ्यात,
पूर्व खानदेशात ‘तावडी बोली’ बोलली जाते.  या भाषेची स्वत:ची अशी एक नजाकत आहे. स्वत:ची अशी खास उच्चारप्रक्रिया, ध्वनिव्यवस्था व वाक्य नियमावली आहे. व्याकरणिक नियमांची तमा ती मुळीच बाळगत नाही. तिच्यात अंगभूत गोडवा आहे.
पश्चिम खानदेशात ‘अहिराणी बोली’ बोलली जाते. तर दक्षिणेकडील अजिंठय़ाचा डोंगर ते उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यानच्या तापीच्या खोऱ्यात, पूर्व खानदेशात ‘तावडी बोली’ बोलली जाते. त्यात जळगाव जिल्ह्य़ातील सोयगाव, सावळदबारा, बुलढाणा जिल्ह्य़ातील मोताळा, मलकापूर ते थेट मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशाचा समावेश होतो. त्यातील जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका हा तावडी बोलीचा बालेकिल्ला आहे. हा प्रदेश कायम अवर्षणप्रवण क्षेत्रात राहिला आहे. नापिकी आणि दुष्काळ पाचवीलाच पूजलेला. सूर्यकन्या ‘तापी’ या प्रदेशातून वाहत असली तरी येथील भूभाग तपाड, खडकाळ, बरड, लाल मुरमाचा आहे. तसेच येथील तापमानही प्रचंड आहे. रणरणत्या उन्हात तापणारी भूमी म्हणजेच ‘तावडी पट्टा’! या पट्टय़ात बोलली जाणारी बोली ती ‘तावडी बोली’!
येथील लोकांची तावडी ही लोकभाषा असून, इथल्या समाजजीवनाशी ती एकरूप झालेली आहे. या भाषेची स्वत:ची एक नजाकत आहे. तिची स्वत:ची अशी खास उच्चारप्रक्रिया, ध्वनिव्यवस्था व वाक्य नियमावली आहे. व्याकरणिक नियमांची तमा ती मुळीच बाळगत नाही. तिचा स्वत:चा एक गोडवा आहे. तिच्या शब्दांमध्ये विलक्षण नाद आणि लय आहे. अनेक अर्थपूर्ण, नादानुकारी, वैशिष्टय़पूर्ण शब्दांचा भरणा तीत आहे.
जसे की- आयपत (ऐपत), आफत (संकट), आवस (अमावास्या), आयतवार (रविवार), आफेक (आवड), आयेब (कीड), आवंदा (या वर्षी), आयबी (आळशी), आन्खी (आणखी), उपेग (उपयोग), कुठी (कुठे), आठी (येथे), तठी (तेथे), निरनाम (मात्र), आवढा (एवढा), तितंबा (त्रांगडं), बोखारा (जांग), गवांदी (भागीदार), तरफड (जा), ताम्हन (पुन्हा पुन्हा), डोबड (दूध न देणारी म्हैस), पन्हेर (पाणी), ढोसलने (पिणे), टकुरं (डोकं), झमेला (विनाकारण संकट), तिताल (चवचाल), इत्यादी. यासारख्या वैशिष्टय़पूर्ण शब्दांबरोबरच तावडी बोलीमध्ये असे काही शब्द आहेत, की जे अर्थाच्या दृष्टीने वेगळे आहेत. तावडी बोलीमध्ये पुढील प्रकारच्या अनेक अर्थवाही, नादानुकारी शब्द आहेत. आवरसावर (आवराआवर), घाबरघुबर (भीत भीत), घानीमानी (अवतीभोवती), झांबलझुंबल (शोधाशोध), ढोसलढासल (खाणेपिणे), चाफलचुफल (चाचपणी), वयकपायक (ओळखीपाळखी), सोयापानी (व्यवस्था), वजेवजे (हळूहळू), न्यारन्यारं (वेगवेगळं), कान्नूमान्नू (मागेपुढे), येवलीजावली (येणं-जाणं), खरखरा (पस्तावा), इत्यादी. तावडी बोलीत  वडिलांना बाप, आईला माय, बहिणीला बहे, भावाला भो, आजीला बोय, आजोबाला बॉ, आत्याला फुय, आत्याच्या नवऱ्याला फुवा, नवऱ्याच्या मोठय़ा भावाला जेठ, नवऱ्याच्या लहान भावाला देर असे अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत.
कोणत्याही बोलीभाषेतील वाक्प्रचार व म्हणी ही त्या बोलीची खरी ओळख व संपत्ती असते. तावडी बोलीत असे असंख्य वाक्प्रचार व म्हणींचा खजिना आहे, ज्याद्वारे ही बोली समृद्ध झालेली आहे. आकायनी येणे (जेरीस येणे), आगाजा करणे (बोभाटा करणे), इखारपणा करणे (मत्सर करणे), उकडा लावणे (रतीब लावणे), कयवार घेणे (बाजू घेणे), कांडी किरवणे (चुगली करणे), खरखरा करने (पस्तावा करणे), खारपणा करने (द्वेष करणे), गटाना करणे (जीव जाळणे), घर घुसने (लग्न न करता घरात येणे), घुमसाळून घेणे (वापरून घेणे), घोरपड आन्ने (संकट आणणे), चड्डी वल्ली व्हने (खूप घाबरणे), चिवत्या बनाडणे (बनवाबनवी करणे), इत्यादी.
तावडी बोलीतील काही म्हणी अशा आहेत..
आंघे ना मांघे दोन्ही हात संगे (एकटा माणूस भविष्याचा विचार करत नाही), आवडीनं केल्हा पती त्येल्हे झाली रंघत पिती (खूप कष्टाने मिळवलेले यश हातून निसटणे), इय्या सोडून खिय्या केल्हा (अविचाराने वागून नुकसान करून घेणे), कोन्हाची म्हैस कोन्हाले ऊठबैस (नातलग दुसऱ्याचा, त्रास आपल्याला), खऱ्याचा खराबा खोटय़ाले दराबा (खऱ्याला डावलून खोटय़ाचा उदोउदो करणे), गुन्हा झाला तुमच्हा कान धरा आमच्हा (चूक नसताना शिक्षा भोगण्यास तयार असणे).
असे एकेक चमत्कृतीपूर्ण शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी बोलीभाषेची श्रीमंती आणि शब्दसंपत्ती वाढवण्यास हातभार लावत असतात. तावडीत हा खजिना विपुल प्रमाणात आहे. यावरूनच या बोलीचे स्वरूप जाणून घेता येते.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या बोलीची स्वतंत्र अशी उच्चार- प्रक्रिया आहे. सोपेपणाकडे आणि काटकसरीकडे तिचा जास्त कल आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय अभिव्यक्त करणे, अनेक क्रियापदे, स्वर व व्यंजनांचा लोप करणे हे तिचे खास वैशिष्टय़ आहे.
शब्दारंभी येणाऱ्या ‘अ’ऐवजी ‘आ’चा उच्चार, ‘ऊ’ऐवजी ‘वू’, ‘ए’ऐवजी ‘य’, ‘ऐ’च्या ऐवजी ‘आई’, ‘ओ’ऐवजी ‘व’, ‘औ’च्या जागी ‘आवू’ असे उच्चारले जाते. त्यामुळे आरे (अरे), आशोक (अशोक), पावूस (पाऊस), भावू (भाऊ), आंयशी (ऐंशी), वयक (ओळख), वढा (ओढा), आवशद (औषध), हावूस (हौस) याप्रमाणे शब्द बोलले जातात.
याचप्रमाणे व्यंजनबदलही तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. ‘क’ च्या जागी ‘ब’चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका), बोख्या (बोक्या), इ.
‘ज’च्या जागी ‘झ’ वापरतात. जसे- पायझे (पाहिजे), झन (जन), राघझो (राहाजो), पाहाझो (पाहाजी), इ.
‘ण’ च्या जागी ‘न’! जसे- पानी (पाणी), रानी (राणी) इ.
‘द’च्या जागी ‘ध’- नुधी (नदी), गाधी (गादी) इ.
‘प’च्या जागी ‘फ’- दुफार (दुपार), फायी (पायी) इ.
याशिवाय ‘ट’च्या जागी ‘त’, ‘ढ’च्या जागी ‘ट’, ‘न’च्या जागी ‘न्ह’, ‘त्या’च्या ऐवजी ‘त्ये’, ‘ळ’च्या जागी ‘य’चा वापर या बोलीत केला जातो.
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करताना ही बोली शब्दांचीही काटकसर करते. आल्था (आला होता), गेल्था (गेला होता), कधलोंग (कधीपर्यंत), कुठलोंग (कुठपर्यंत), काव्हाचा (केव्हापासून), तधलोंग (तिथपर्यंत), आठलोंग (इथपर्यंत), पाल्या (पाहिला होता), झाल्ता (झाला होता).
कोणत्याही समाजाचे सांस्कृतिक संचित त्या समाजाच्या भाषेला समृद्ध करत असते. त्या समाजातील प्रथा-परंपरा, विविध विधी, सण-उत्सव, संस्कार हे भाषेशी जोडले गेलेले असतात. लोकवाङ्मयातील लोकगीते, लोककथा, कथागीते आणि मौखिक शब्दवाङ्मयाची परंपरा ही पिढय़ान् पिढय़ांपासून जोपासलेली असते. लोकवाङ्मय हेही भाषेचाच आधार घेऊन अवतरते. हे वाङ्मय समाजाच्या जगण्याशी बांधले गेलेले असते. असे लोकवाङ्मय तावडी बोलीत विपुल प्रमाणात आहे.
आशयगर्भ लोकसाहित्यासोबतच तावडी बोलीने लिखित वाङ्मयातही मोठय़ा प्रमाणात भर घातलेली आहे. त्याला प्राचीन वारसा आहे. थेट महानुभाव वाङ्मयात तावडी बोलीची पाळेमुळे सापडतात. तद्वतच साठोत्तरी साहित्यातील मानदंड मानले जाणारे भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे, श्रीराम अत्तरदे इत्यादींनी आपल्या साहित्यात तावडी बोलीचा चपखल वापर केलेला आहे. बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधूनही तावडी बोलीचा आविष्कार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. याव्यतिरिक्त प्रकाश किनगावकर, डॉ. किसन पाटील, मधू वाघोडकर, विजय तुल्हे, रवींद्र पांढरे, दीपध्वज कोसोदे, प्रा. नामदेव कोळी, गोपीचंद धनगर, युवराज पवार, सुरेश पाटील, सुधाकर देशमुख आदींनी जाणीवपूर्वक तावडी बोलीतून साहित्यनिर्मिती केलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा