आज, १ डिसेंबर.. ‘जागतिक एड्स दिन’! यानिमित्ताने एड्सचा राक्षस किती खरा आणि किती खोटा, याची चर्चा करणे अप्रस्तुत ठरू नये. आज जगभर एड्सवरील इलाजाच्या संशोधनावर अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. त्याचवेळी एड्स या रोगाची तीव्रताही हळूहळू ओसरते आहे. मात्र, एड्सचा जो बागुलबुवा उभा केला गेला आहे त्यामागे जागतिक औषध कंपन्यांचे हितसंबंध कितपत आहेत, याचा विचार होणेही गरजेचे आहे. आपल्याकडेही सरकार एड्सच्या जनजागरणावर प्रचंड पैसा खर्च करीत आहे. परंतु त्याच्याच इतक्या घातक असलेल्या अन्य रोगांकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एड्स दिनानिमित्त या वास्तवाकडे लक्ष वेधणारा डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा खास लेख..
आ ज ‘जागतिक एड्स दिन’ आहे. मात्र, ९० च्या दशकात ‘एड्स’ या रोगाबद्दल जनमानसात असलेली प्रचंड भीती आज बऱ्याच अंशी ओसरली आहे. संशोधकांनी एड्सच्या विषाणूसंबंधात केलेल्या संशोधनामुळे त्याची भयावहता कमी व्हायला मदत झाली आहे. या रोगाचा प्रसार टाळण्याकामी प्रसारमाध्यमांनीही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
समिलगी संभोगामुळे झालेल्या न्यूमोनियामध्ये हे विषाणू १९८० साली अमेरिकेमध्ये शोधले गेले. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही रोग त्यांना झालेले आढळले. त्यावर काहीही इलाज नव्हता. हा रोग म्हणजे ‘इम्युनोसप्रेशन व्हायरस’! माणसाच्या अंगभूत प्रतिकारशक्तीवर हल्ला करणारे हे विषाणू म्हणजेच एचआयव्ही. या विषाणूंची शरीरात झपाटय़ाने वाढ होऊन शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण- म्हणजे सीडी ४ काऊंटचे प्रमाण २०० च्या खाली गेले असता या रुग्णांमध्ये निरनिराळे रोग उद्भवतात. कारण त्यांची सर्वसाधारण जंतू आणि विषाणूंचीही प्रतिकार करण्याची शक्ती मंदावलेली असते. अशात क्षयरोग, नागीण, बुरशी अशा प्रकारचे विषाणू हल्ला करतात. त्यातून रुग्णाला कॅन्सर किंवा हगवण आणि क्षयरोग होऊन तो दगावतो.
एड्स हा रोग जगभर अक्षरश: त्सुनामीप्रमाणे पसरला. अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स या रोगावरील संशोधनाकरता ओतले. आजही या रोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या तसेच आपले सरकारसुद्धा करोडो रुपये खर्च करीत आहे. १९९५ ते २००५ पर्यंत महाडमध्ये माझ्या रुग्णालयात एचआयव्हीचा किमान एक तरी नवीन रुग्ण आढळत असे. परंतु २००६ नंतर हे प्रमाण नगण्य झाले आहे. याचे कारण म्हणजे त्यावर सापडलेली अँटीरिट्रोव्हायरल औषधे. आंतरराष्ट्रीय संस्था तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे आजही नको तेवढा पसा भारत सरकार आपल्याकडील इतर मूलभूत रोगांवरील उपायांकरिता खर्च न करता एड्सवर खर्च करीत आहे.
आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांनी स्वतच्या स्वार्थासाठी उत्पन्नाचे एक साधन म्हणून  एड्सचे व्यापारीकरण सुरू केले आहे. परिणामी एड्सवर अमाप पैसा खर्च होत असल्यामुळे इतर रोगांकडे दुर्लक्ष होऊन निरनिराळ्या मूलभूत रोगांचा सामना करण्यासाठी आपणास पसा कमी पडतो आहे. अशा रीतीने एड्सने इतर रोगांवरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवून त्यांना खतपाणीच घातल्यासारखे झाले आहे.
आपला भारत हा खेडय़ांचा देश आहे. आजही ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. तेव्हा सरकारने एड्सवर जेवढे लक्ष केन्द्रित केले आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे ते का लक्ष देत नाही, हे जाणून घेण्याची वेळ आज आली आहे. अर्थात झोपेचे सोंग घेतलेले राजकारणी व या रोगावर संशोधन करणारे संशोधक यांना जागविणे कठीण आहे. आपल्या देशात एड्ससंदर्भातील जागरूकता आणि त्यावरील उपायांसंबंधात केला जाणारा अतिरेकी खर्च आणि त्या पाश्र्वभूमीवर अन्य रोग व आजारांकडे होणारे दुर्लक्ष या गंभीर समस्येची वेळीच दखल न घेतल्यास आपला देश अनारोग्याकडे वाटचाल करेल यात काडीमात्र शंका नाही.
एड्सप्रमाणेच बर्डफ्लू, सार्स, स्वाइन फ्लू हे विषाणूधारित रोगही आले नि गेले. परंतु त्यावर झालेला प्रचंड खर्च भरून येणे अशक्य आहे. विषाणूंमुळे होणारे रोग हे कालांतराने नाहीसे होतात. फक्त त्यातले काही रोग- उदा. देवी, पोलिओ, गोवर, कांजण्या हे मात्र त्यांचे बस्तान हटवत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिलस शोधून ते संपविण्यात आले आहेत. प्रतिलस शोधून काढण्याअगोदरच एचआयव्हीचे प्रमाण मात्र बरेच घटले आहे. याचा अर्थ निसर्गामध्येही समतोल साधण्यासाठी अनपेक्षितपणे काही घटना घडत असतात. त्यातलीच ही एक होय.
आपल्या देशाने आरोग्यासंदर्भात इतर देशांशी आपली तुलना करता कामा नये आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबूनही राहता नये.  भारताने आपला देश आणि जनतेच्या भल्यासाठी आज पुढील विषयांवर संशोधन करणे आणि त्यावर उपाय शोधून काढणे आवश्यक आहे.
१) ग्रामीण जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी देशातील सर्व खेडी हगणदारीमुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील लोक घरात स्वच्छतागृह बांधण्यास राजी नसतात. त्यांना त्यासाठी आवश्यक पाणीही बहुतांशी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना त्याकरता अनुदान देऊन आणि मार्गदर्शन करूनही उपयोग होत नाही. या समस्येवर संशोधकांनी संशोधन करून मानवी विष्ठा तसेच अन्य काही घटकांचे खतामध्ये रूपांतर करण्याचा उपाय शोधून काढल्यास तो उपयुक्त ठरू शकेल.
२) ग्रामीण जनतेस उच्च दर्जाचे आधुनिक शिक्षण आणि आरोग्य उपलब्ध करून दिल्यास माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील ‘२०२० मध्ये भारत हा महाशक्ती’ होण्याचा मार्ग सुकर होईल. जे अब्जावधी रुपये एड्स, सार्स, स्वाईन फ्लू यांसारख्या रोगांवर खर्च होत आहेत तेच देशात वेळोवेळी उद्भवणाऱ्या मूलभूत रोगांच्या प्रतिबंधावर आणि त्यावरील उपाययोजनांवर खर्च केल्यास सशक्त भारत जन्माला येईल. हे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. उदा. १. क्षयरोग. यासंबंधात योग्य वेळी योग्य तो निर्णय आरोग्य खात्याने न घेतल्याने तसेच खासगी डॉक्टरांनी क्षयरोगाच्या रुग्णांना वेळीच अचूक उपाययोजना न केल्यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक रुग्णांच्या बाबतीत क्षयरोगावर बाजारात आज उपलब्ध असलेली प्रभावी औषधेही लागू पडेनाशी झाली आहेत. मल्टी-ड्रग रेझिस्टंट जंतूंचा प्रसार होत आहे. परिणामी कुटुंबाचा आधार असणारी व्यक्ती किंवा पालक क्षयरोगाने दगावल्याने कित्येक मुले अनाथ होत आहेत. तसेच प्रतिबंधक औषधांच्या बाबतीत काहीएक मर्यादा वा नियमावलीही नसल्याने अतिमहागडी प्रतिजैविक औषधे वापरूनही क्षयरोग आज दाद देत नाही. त्यामुळे ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे.
२. डासांमुळे उद्भवणारे रोग.. ज्यामुळे आजही हजारो रुग्ण दगावतात- ते म्हणजे मलेरिया, मेंदूज्वर आणि पंगुत्वाकडे वाटचाल करणारे चिकुनगुनिया, डेंग्यू व हत्तीरोग.
३. शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे होणारे किडनीचे आजार. आजही महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडय़ामधील काही जिल्ह्य़ांमध्ये संशोधकांचे व वैद्यकीय मंडळींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे फ्लोरॉसिसचा राक्षस फोफावला आहे. यवतमाळ व नांदेड या जिल्ह्य़ांच्या ग्रामीण भागातील लोकांनी ३०० ते ४०० फूट बोअरवेल खोदून त्यांतील फ्लोराइडमिश्रित पाणी पिण्यासाठी वापरल्याने त्यांना दात व हाडांचा फ्लोरॉसिस होऊन त्यांचे चालणे व काम करणे बंद झाले आहे. काही रुग्ण तर अंथरूणाला खिळून आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी व या भागातील लोकांनी बोअरवेलमधील पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे वेळीच तपासले असते तर हा रोग १०० टक्के टाळता आला असता.
पाण्याच्या दुष्काळामुळे पाणी साठवून ठेवल्यामुळे त्यामध्ये चिकुनगुनियाच्या विषाणूंचे वाहक असणारे ‘एडिस इजिप्त’ हे डास अंडी घालतात. यावर सोपा इलाज म्हणजे ‘ड्राय डे’ पाळणे. हा इलाज तोंडाला पाणी पुसण्यासारखा आहे. ग्रामीण भागांत दीर्घकाळ टिकणाऱ्या पाण्याच्या योजना राबविल्यास हा रोग समूळ नष्ट करता येईल. आजही या रोगाने मराठवाडय़ामध्ये पूर्ण गावच्या गाव आजारी पडते.
२१ व्या शतकात विज्ञानाची वेगाने प्रगती होत असताना आपल्या देशात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रचंड वेळ व पसा खर्च होत आहे. आजही गोरखपूर, बेलारी, गडचिरोली व चंद्रपूर या भागांत जॅपनीज मेंदूदाहाने शेकडो मुले दगावत आहेत. त्यावर लस शोधण्यात अलीकडेच यश आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंश, िवचूदंश हे दुर्लक्षित रोगांमध्ये समाविष्ट केले आहेत. भारतामध्ये साधारणत: ज्यावेळी एड्सने दोन रुग्ण मरतात, त्याचवेळेस एक रुग्ण सर्पदंशाने दगावतो असे प्रमाण आहे. परंतु सर्पदंशावरील औषधाच्या संशोधनावर मात्र एड्सच्या मानाने सरकार काहीच खर्च करत नाही. सर्पदंशावरील प्रतिलस जगामध्ये भारतानेच प्रथम शोधली. परंतु गेल्या शंभर वर्षांत सर्पदंश व त्याच्या इलाजामध्ये प्रतिलसीव्यतिरिक्त कुठलेच मूलभूत संशोधन झालेले नाही. प्रतिलसीसाठी विष लागते, घोडा लागतो व संशोधकास कितीतरी काळ त्यावरील संशोधनाकरता घालवावा लागतो. आज सर्पदंशावरील प्रतिलस उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्पदंशाचे रुग्ण प्रतिलसीच्या उपलब्धतेविना दगावतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. या अपयशाचे कारण हे की, शासनाने व संशोधकांनीही प्रतिलस उपलब्ध नसेल तेव्हा त्यावरील पर्यायी उपाय शोधण्याचे प्रयत्नच केले नाहीत. आता तरी सरकारने व संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत. कुठल्याही रोगाच्या बाबतीत कधीही एकाच उपाययोजनेवर अवलंबून राहणे धोक्याचे असते. म्हणूनच की काय, सन्यात दररोज लढाईचे निरनिराळे तंत्रज्ञान अवगत करण्यावर भर दिला जातो.
आपल्याकडे १९७६ मध्ये िवचूदंशाने मृत्यूचे प्रमाण ४० टक्के इतके होते. त्यावेळी त्यावर प्रतिलस उपलब्ध नव्हती. आपल्या डोळ्यांदेखत विंचू चावलेल्या माणसाचा मृत्यू होताना पाहणे एवढेच डॉक्टर मंडळींच्या हाती होते. या समस्येत मी स्वत झोकून देऊन मूलभूत संशोधन करण्याचे ठरविले. वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक व इतर मंडळींना यासंबंधात मार्गदर्शनाकरता विचारले असता, प्रतिलसीशिवाय इलाज नाही, असे ते सांगत. विंचूदंशाने होणारे मृत्यू हे माझ्यासाठी आव्हान होते. ते आव्हान स्वीकारून सरकारवरही अवलंबून न राहता मी माझे संशोधन सुरू केले. कारण सरकारी यंत्रणा मला या संशोधनाकामी नाउमेद करीत होती. शेवटी अथक प्रयत्नांती प्राझोसिनचा वापर करून मी विंचूदंश झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्य़ाच्या खाली आणले. असाच अनुभव इतर डॉक्टरांनाही आला आणि तेही रुग्णांवर हा इलाज करू लागले. २००० सालामध्ये हाफकिनने िवचूदंशावरील प्रतिलस उपलब्ध केली. तिची किंमत आज १५०० रुपयांपर्यंत आहे. दोन दिवसांपूर्वी हाफकिनमध्ये चौकशी केली असता ही प्रतिलस फार अल्प प्रमाणात उपलब्ध आहे आणि ती खासगी डॉक्टरांना देता येत नाही असे कळले. सरकारी दवाखान्यांतही तिचा तुटवडा आहे. परंतु केमिस्टकडे प्राझोसिन हे औषध सहज उपलब्ध आहे. यावरून प्रतिलस जरी उपलब्ध नसली तरी विंचूदंशाचे रुग्ण आता दगावणार नाहीत. फक्त ते तंदुरूस्त होण्यास उशीर लागेल आणि डॉक्टरांना त्यांच्यावर जास्त कष्ट घ्यावे लागतील.
भविष्यात ब्लडप्रेशर, डायबेटिस, कुपोषण या आरोग्यविषयक बाबीही भयावह ठरण्याची चिन्हे आहेत. जागतिकीकरणाने व जीवघेण्या स्पध्रेमुळे मनोरुग्णांचे प्रमाणही अलीकडे वाढते आहे. या सगळ्यावर अक्सीर उपाय शोधण्याकामी आपण लक्ष पुरवायला हवे.
आरोग्य समस्यांना तोंड देण्याबरोबरच प्रत्येकाने आपल्या मातृभूमीची व देशाची प्रगती करण्यात खारीचा वाटा उचलल्यास हा देश सुजलाम् सुफलाम् व्हायला नक्कीच मदत होईल. देशाच्या प्रगतीच्या आड येणारी सर्वात मोठी समस्या आहे आपली अफाट लोकसंख्या. त्यावर तातडीने उपाय योजायला हवा. देशाची शक्ती, वेळ, पसा गावे, तालुके, जिल्हे, राज्ये यांच्यातील आपापसातील कलह दूर करण्यासाठी वाया न दवडता देशाची प्रगती व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी खर्ची होणे गरजेचे आहे. आज आपण काय करणे गरजेचे आहे, याचा सखोल अभ्यास करून त्याला विज्ञानाची जोड दिल्यास अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील २०२० मधील शक्तिशाली भारत प्रत्यक्षात साकार व्हायला वेळ लागणार नाही.