मीना वैशंपायन
थोर संस्कृतज्ञ, धर्मशास्त्राच्या इतिहासाचे लेखक, संशोधक आणि अभ्यासक ‘भारतरत्न’ महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांच्या ५० व्या (उद्या, १८ एप्रिल रोजी ) स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा धांडोळा..
‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।’ (ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही.) या धारणेने ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय केवळ ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार हेच ठरवले होते, असे ‘भारतरत्न’ महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे हे थोर संस्कृतज्ञ, धर्मशास्त्राच्या इतिहासाचे लेखक, संशोधक आणि अभ्यासक होते. १८ एप्रिल २०२२ हा त्यांचा पन्नासावा स्मृतिदिन! यानिमित्ताने त्यांचे व त्यांच्या एकमेवाद्वितीय कार्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या ५०व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन या दिवशी राजभवनात होणार आहे. त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेचा गौरव करणारी, ब्रिटिश सरकारने दिलेली ‘महामहोपाध्याय’ ही सन्मान्य पदवी १९४२ साली आणि ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान १९६३ मध्ये त्यांना मिळाला, परंतु डॉ. काणे यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट आजवर निघाले नव्हते.
मुंबईच्या एशियाटिक सोसायटीशी डॉ. पां. वा. काणे यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध. एशियाटिकमधील अनमोल ग्रंथसंपत्तीशी निगडित असे त्यांचे अभ्यासविषय व संशोधन क्षेत्र. एशियाटिक सोसायटीतील संशोधन कक्ष म्हणजे त्यांचे जणू दुसरे घरच! डॉ. काणे यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या पंचखंडात्मक अद्वितीय ग्रंथाचे व इतरही बरेचसे काम त्यांनी येथे बसून केलेले. या ऋणानुबंधाच्या भावनेतून एशियाटिक सोसायटीने त्यांच्या स्मरणार्थ १९७४ पासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारे पदव्युत्तर अभ्यासाचे अध्यासन, काणे सुवर्णपदक, काणे स्मृती व्याख्यान, काणे चर्चासत्र आदी उपक्रम सुरू केले आहेत. पां. वा. काणे यांच्या ५०व्या स्मृतिवर्षांनिमित्त आता या टपाल तिकिटासाठीही एशियाटिक सोसायटी आणि संस्थेचे माजी अध्यक्ष, विश्वस्त शरद काळे व काणे कुटुंबीयांच्या पुढाकाराने गेली दीड-दोन वर्षे सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. ते आता फलद्रूप झाले आहेत.
डॉ. काणे यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीच्या मदतीने अनेक ग्रंथांचे लेखन केले. आज त्यांच्या नावावर ३९ ग्रंथ (२३ इंग्रजी, १ संस्कृत, ८ मराठी, ६ हिंदी व १ कन्नड) आहेत. इंग्रजी व मराठीतील संशोधनपर ११५ लेख, पुस्तक परिचय व ४५ परीक्षणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक संस्कृत ग्रंथांच्या सटीप, संपादित आवृत्त्या आहेत. त्यांनी आयुष्यभरात सुमारे १५,००० छापील पृष्ठे एवढा मजकूर लिहिला, ज्यातील जवळजवळ निम्मा भाग हा धर्मशास्त्राच्या इतिहासाचाच आहे. एका संशोधक-लेखकाने व्यासंगाच्या जोरावर एवढी ग्रंथनिर्मिती करणे हा एक विक्रमच म्हणायला हवा. संस्कृतज्ञ मो. दि. पराडकर यांनी नोंदवल्यानुसार म्हणता येते की, हे काम इतके विलक्षण आहे की ते डॉ. काणे यांच्यासारखा व्यासंगी व कष्टाळू विद्वानच करू शकतो. त्यातही विशेष हा की त्यांच्याजवळ कधीही संशोधन साहाय्यक, स्टेनोग्राफर, सूचीकार वा नोंदलेखक अशा प्रकारच्या मदतनीसांचा सरंजाम नव्हता, साहाय्य नव्हते. तंत्रज्ञानाची मदतही त्या काळात उपलब्ध नव्हती. तरीही ‘नामूलं लिख्यते किंचित्।’ (पुराव्याशिवाय, आधाराशिवाय काही लिहिणार नाही.) हा बाणा त्यांनी कधीही सोडला नाही.’’
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूणजवळील परशुराम गावी ७ मे १८८० रोजी डॉ. काणे यांचा जन्म झाला. वडील वामनराव संस्कृतचे व्यासंगी, ऋग्वेद मुखोद्गत असणारे. हळूहळू शिकत, वकिलीच्या परीक्षा देऊन ते दापोलीच्या न्यायालयात वकिली करू लागले. वडिलांचा हाच वारसा या ज्येष्ठ पुत्राने- डॉ. काणे यांनी पुढे चालवला. आजोळच्या घरातील वैद्यकीचं व ज्योतिषशास्त्राचंही थोडंसं ज्ञान त्यांनी अवगत केलं होतं. प्रथमपासूनच शिक्षणाची अनिवार ओढ, नवनवीन गोष्टींबद्दलचे अफाट कुतूहल, ते पुरवण्यासाठी आवश्यक अशी शोधक वृत्ती आणि अपार कष्ट करण्याची तयारी ही त्यांची स्वभाववैशिष्टय़े होती. त्याच्या जोडीला कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती ही त्यांना जन्मजात लाभलेली देणगी होती. बालपणीच संस्कृतची आवड लागली व ती वाढतच गेली. अगदी लहान वयातच त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते. एकपाठी असल्याने वर्गात शिकवलेले लक्षात राही आणि घरच्या अभ्यासाचा वेळ ते अवांतर वाचन करण्यासाठी वापरत. लहानपणापासून त्यांना पित्त व पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे शाळेतील एक वर्षही वाया गेले होते. बरीच औषधे घेऊनही या दुखण्याने त्यांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. तरीही हा त्रास सहन करत ते कामात आकंठ बुडालेले असत.
काणे वयाच्या १७ व्या वर्षी मॅट्रिक झाले तेव्हा ते मुंबई इलाख्यात २५ वे आले होते. यानंतरही त्यांनी बी. ए., एम. ए., एल. एल. बी., एल. एल. एम. आदी अनेक परीक्षा दिल्या. त्यांत अनेक पारितोषिके मिळवली व ते विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. संस्कृतमध्ये बी. ए. आणि नंतर एम. ए. करताना अनुक्रमे ‘भाऊ दाजी’ पारितोषिक, ‘झाला वेदान्त’ पारितोषिक अशी प्रतिष्ठित पारितोषिकेही त्यांनी मिळवली. याशिवाय एम. ए.च्या वर्षी ते ‘दक्षिणा फेलो’ म्हणूनही सन्मानित झाले.
लेखनाची लहानपणापासूनच आवड असणाऱ्या काणे यांनी वयाच्या ११व्या वर्षी ‘दुर्योधनमोक्षण (घोषयात्रा)’ हा निबंध मराठीत लिहिला आणि तो ‘महाराष्ट्र कोकीळ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. १९०२ मध्ये ‘Joint authorship of ’काव्यप्रकाश’ हा Indian Antiquery मध्ये प्रसिद्ध झालेला लेख हे त्यांचे पहिले इंग्रजी लेखन! त्यानंतरचे त्यांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीतच झाले. आरंभी दोन-चार लेख त्यांनी ‘वामनसुत’ या टोपणनावाने लिहिले होते. लहानपणापासून घेतलेले हे अभ्यासपूर्ण लेखनाचे व्रत आयमुष्याच्या अखेपर्यंत काणे यांनी सोडले नाही.
घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी रत्नागिरीच्या सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. त्याचवेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘वि. ना. मंडलिक सुवर्णपदका’साठी ‘रामायण व महाभारतात वर्णिलेली आर्याची वर्तनपद्धती व नीतिमूल्ये’ या विषयावर १९०५ साली, तर १९०६ साली ‘अलंकारशास्त्राचा इतिहास’ या विषयावर निबंध लिहिले. दोन्ही वर्षी त्यांना ते सुवर्णपदक मिळाले. याशिवाय वयाच्या २५-२६ व्या वर्षी त्यांनी महाभारताचे तीन वेळा सूक्ष्म वाचन केले होते, त्यासंबंधीची टिपणे काढून त्यांची वर्गवारीही केली होती.
काणे यांना अधिक ज्ञानार्जनाचा व संशोधनाचा ध्यास लागला होता. त्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या मर्यादित अवकाशाऐवजी मुंबईसारखे विशाल, व्यापक अवकाश खुणावत होते. त्यांनी मुंबईला एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये बदली मागितली. पण सरकारी नोकरीतले मानापमान, ब्रिटिश सरकारची मनमानी काणे यांच्यासारख्या गुणवंत व स्वाभिमानी व्यक्तीला अस झाली. (याच ब्रिटिश शासनाने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली, हा काव्यगत न्याय म्हणता येईल.) शेवटी त्यांनी नोकरी सोडून वकिली करायची असे ठरवले. तोवर एकीकडे त्यांनी कायद्याच्या परीक्षा दिल्या होत्याच. आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी १९११ सालापासून हायकोर्टाच्या अपिलेट शाखेत वकिली करण्याचा निर्णय घेतला. ‘त्यात आपल्याला परिश्रम जास्त करावे लागले, पैशांची निश्चिती नसली तरी ते काम बुद्धीचा कस पाहणारे आहे, म्हणून मी ते स्वीकारले व पंचाहत्तरीपर्यंत केले,’ असे काणे म्हणतात.
मुंबई विद्यापीठातर्फे विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चरर, स्प्रिंजर लेक्चरर म्हणून त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली. अशी आव्हाने झेलणे त्यांना आवडे. त्यात त्यांच्या अभ्यासाच्या आवडीला, संशोधनाला अनेक दिशा दिसत. एशियाटिक सोसायटीचे सभासदत्व घेतल्यावर ते तेथे नेहमीच क्रियाशील राहिले. तेथील जर्नलचे संपादन करणे, त्यात संशोधनपर लेख लिहिणे, चांगले लेख मिळवणे इ. कामे ते करत. पुढे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी त्यात भाग घेतला. नीलकंठाच्या ‘व्यवहारमयूख’ या ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती काढण्याचे काम प्रो. श्री. रा. भांडारकरांनी त्यांच्यावर सोपवले. त्यासाठी त्यांनी मुद्रित प्रती व हस्तलिखिते यांचा कसून अभ्यास केला आणि तेव्हापासूनच काणे यांना धर्मशास्त्रात रुची उत्पन्न झाली. आपण धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणार असल्याचे सूचन त्यांनी या प्रस्तावनेत केले आहे. यात त्यांनी ज्या टिपा लिहिल्या आहेत, त्यावरून त्यांचा संस्कृतचा अभ्यास, धर्मशास्त्राचे ज्ञान व केस लॉचा व्यासंग यांचे दर्शन घडते. हा ग्रंथ हिंदू धर्मशास्त्र व संस्कृती यांच्या अभ्यासकांना व हिंदू कायद्याबाबतीत वकिलांना, न्यायाधीशांना मार्गदर्शक ठरला. वकील म्हणून त्यांनी लढवलेल्या खटल्यांमधील तर्ककठोर युक्तिवादाने व सादर केलेल्या संस्कृत ग्रंथांतील, तसेच इतर अद्ययावत पुराव्यांच्या आधारे हिंदू कायद्यासंदर्भात काणे हे अधिकारी व्यक्ती मानले जाऊ लागले.
भारतविद्या (Indology) आणि प्राच्यविद्या (Oriental studies) यांच्या अभ्यासात त्यांचे मन सदैव बुडालेले असे. ‘अलंकारशास्त्राचा इतिहास’ हा संस्कृत काव्यशास्त्रावरील ग्रंथ, ‘साहित्यदर्पण’ची चिकित्सक आवृत्ती आदी ग्रंथ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वाची ओळख सांगणारे व या क्षेत्रातील अधिक संशोधनाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांचा ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा मात्र एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे. प्राचीन व मध्ययुगीन धार्मिक व नागरी कायदे यांचा सविस्तर ऊहापोह करणाऱ्या या पंचखंडात्मक ग्रंथात प्राचीन काळची समाजरचना, तुलनात्मक न्यायदान पद्धती व इतर ज्ञानशाखा यांच्या समृद्धत्वाची कल्पना येण्याच्या दृष्टीने धर्मशास्त्राचा इतिहास सविस्तर सांगणे आवश्यक आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हे अवघड व प्रचंड काम आपल्या शिरावर घेतले. याशिवाय अनेक पाश्चात्त्य प्राच्यविद्यावेत्त्यांनी भारतीयांना दाखवलेली तुच्छता, त्यांच्या ज्ञानाची, संस्कृत साहित्याची केलेली हेटाळणी काणे यांना बोचत होती. त्यामुळे भारतीयांनी पाश्चात्त्यांची उचलेगिरी केलेली नाही हे सिद्ध करून दाखवणे त्यांना आवश्यक वाटले, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या पहिल्या खंडात (१९३०) ‘धर्म’ या शब्दाची व्याख्या करत, धर्मशास्त्रावर झालेल्या ज्ञात-अज्ञात ग्रंथांची व ग्रंथकारांची माहिती दिलेली आहे. काणे यांनी त्यात नंतर भर घातली व त्याचे दोन भाग केले. दुसऱ्या खंडाचे प्रकाशन रेंगाळले व तो ११ वर्षांनी प्रकाशित झाला. त्याचीही पृष्ठसंख्या वाढल्याने तो दोन भागांत प्रकाशित झाला. या खंडात वर्ण, दास्य, अस्पृश्यता, संस्कार, वैदिक यज्ञसंस्था हे विषय आले आहेत. प्राचीन धर्मशास्त्रकारांची धर्माची कल्पना खूपच व्यापक होती. तिने संपूर्ण मानवी जीवन व्यापले होते असे सांगत काणे यातील प्रत्येक बाबीचा सविस्तर विचार करतात. तिसऱ्या खंडात ते राजधर्म, व्यवहार (कायदा व न्यायदान) आणि सदाचार यासंबंधी सांगताना वर्तमानातील बदललेल्या परिस्थितीत या संकल्पनांचा विस्तार, पुनर्विचार करणे आवश्यक आहे असे ते सांगतात. या खंडात विशेष म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन भारतात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पदनामे ते शिलालेखांवरील माहितीच्या आधारे देतात.
चौथ्या खंडात पातक, प्रायश्चित्त, कर्मविपाक, अंत्येष्टी, श्राद्ध, तीर्थयात्रा यांसारख्या सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांची चर्चा आहे. पाचव्या खंडाचेही पुन्हा दोन भाग झाले. पहिल्या भागात व्रते, उत्सव, काल, मुहूर्त, धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांची चर्चा आहे. दुसऱ्या भागात शांती, पुराणे, धर्मशास्त्र यांचा संबंध, कर्म, पुनर्जन्म, तंत्रविद्या, बौद्ध धर्माचा लोप होण्याची कारणे असे अनेक विषय आले आहेत. शेवटी भारतीय संस्कृतीची महत्त्वाची लक्षणे सांगून, भारताबद्दलचा भविष्यवेधी दृष्टिकोन दाखवला आहे. या ज्ञानयज्ञाचा आरंभ १९३० ला झाला आणि त्याची सांगता १९६२ ला झाली, असे घोषित करून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी डॉ. काणे यांचे विशेष कौतुक केले.
डॉ. काणे यांनी आपल्या या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांविषयी प्राचीन पुरावे देत विधवा स्त्रीचा मिळकतीचा, वारसा हक्क, दत्तकविधानासंबंधीचे विवेचन, स्त्रीधनाची व्याख्या आदी स्त्रीविषयक बाबी स्पष्टपणे मांडल्या. त्यानंतर यासंबंधातले कायदे तयार करताना काणे यांच्या या ग्रंथाचा आधार घेत व त्यांच्या सूचनांनुसार स्त्रियांना न्याय देणारी विधेयके, वारसा कायदा व हिंदू कोड बिलासारखी बिले संमत झाली. हे त्यांचे फार मोठे योगदान आहे.
प्राचीन धर्मशास्त्राचा अभ्यास करणारे काणे खासगी व सार्वजनिक जीवनात अतिशय पुरोगामी विचारांचे, स्वाभिमानी व कष्टाळू होते. काणे पती-पत्नींनी आपल्या मुलामुलींना त्यांच्या कलाप्रमाणे शिकू दिले. त्यांच्या आयुष्यातील विवाहादी गोष्टींचे स्वातंत्र्यही त्यांना दिले. त्या काळाचा विचार करता हे विशेष होते.
उच्च विद्वत्वर्तुळात वावरणारे काणे यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामाजिक प्रतिष्ठा फार मोठी होती. ते काही काळ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. राज्यसभेचे सभासद होते. अनेक मानसन्मान, पारितोषिके यांचे धनी होते, आंतरराष्ट्रीय परिषदांचे अध्यक्ष होते. अनेकांचे आदरस्थान होते. तरीही त्यांची राहणी अतिशय साधी होती. ते कुटुंबवत्सल होते. आर्थिक स्थिती खूपच सुधारली तरी त्यांनी आपले गिरगाव आंग्रेवाडीतील घर काही शेवटपर्यंत सोडले नाही. दिवसाचे १८-१८ तास संशोधनात रमणारे काणे यांच्यासारखे स्वाभिमानी, साध्या राहणीचा स्वीकार करणारे, ध्येयनिष्ठ, प्रकांड पंडित आता दुर्मीळ झाले आहेत. त्यांना विनम्र आदरांजली.
meenaulhas@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा