अजिंठा काय, इजिप्तमधल्या किंवा माया संस्कृतीतली म्हणजे आता मेक्सिको/ ग्वाटेमाला इथल्या ठिकठिकाणची चित्रं काय… ती सारी स्मृती नोंदवणारी प्रसंगचित्रं आहेत- मग ते प्रसंग खरे असोत वा कल्पित. त्या प्रसंगचित्रांतून आपल्याला स्त्रियांचं स्थान दिसून येतं…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्मार्ट र्सिटी’ आणि ‘स्वच्छ भारत’सारख्या योजनांमुळे बाकी काही झालं असेल/ नसेल, पण ‘भारतीय कलेच्या वैभवकाळाची आठवण करून देणारी’ अशी एक गोष्ट तरी झाली, हे नक्की- ती गोष्ट म्हणजे, शासकीय पैशानं भिंतींवर चित्रंबित्रं काढली जाणं! मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा प्रदूषित शहरांमध्ये हल्ली सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर अशी चित्रं दिसतात- चित्रं कशी का असेनात, ‘भिंत’ हे चित्रकलेचं माध्यम फार प्राचीन काळापासून आजही आहे, याचं बरं वाटतं. ही भिंतीवरली चित्रं जगात सगळीकडे आढळतील- आपल्या भीमबेटका गुहा किंवा स्पेनमधल्या अल्टामिरा गुहांमध्ये, इजिप्तमधल्या पिरॅमिडच्या आतल्या भिंतीवर आणि अर्थातच बौद्धकालीन गुंफांमध्ये ही चित्रं रंगवली गेल्याचं इतिहास आपल्याला सांगतो. स्त्रीचं रूपांकन विविध कालखंडांमध्ये कसं केलं गेलं, हे पाहण्यासाठी ही चित्रं आपल्याला उपयोगी पडतात, हे इथं महत्त्वाचं. मानवी संस्कृतीच्या घडत्या काळातल्या गुहाचित्रांबद्दलची दोन निरीक्षणं अशी की, एकतर या चित्रांमध्ये पुरुष आणि बाई असा फरक फारसा दिसत नाही. दुसरं म्हणजे या चित्रांमधल्या मानवाकृती अनेकदा शिकाऱ्यांच्याच दिसतात. त्या साऱ्या पुरुषांच्याच आहेत की काय असा प्रश्न पडणारच. म्हणजे पुरुषांनी, पुरुषांसाठीच इतिहास नोंदवण्याची सुरुवात इतकी जुनी, असंही म्हणावं का? हे पुढल्या काळात दक्षिण अमेरिकेतल्या ‘माया संस्कृती’बद्दल किंवा आफ्रिका-आशियाला जोडणाऱ्या ‘इजिप्शियन संस्कृती’तल्या चित्रांबद्दल मात्र म्हणता येत नाही. मेक्सिकोतल्या कलकमूल इथल्या मृतात्म्याच्या स्मारकाभोवतीच्या भिंतीवरल्या एका चित्रात एक स्त्री दुसरीच्या डोक्यावर घडा देताना दिसते… या शारीरिक हालचालीचे बारकावे या चित्रानं टिपले आहेतच, पण या दोन्ही स्त्रिया सशक्त आहेत. माया संस्कृतीतली भित्तिचित्रं इसवीसनपूर्व २५० वर्षं ते इसवी सन ९५० यादरम्यानची असावीत. चित्रांमधल्या माया पुरुषांच्या अंगावर कपडे असले तरी त्याचं जननेंद्रिय चित्रात दिसेल अशा पद्धतीनं दाखवलं जातं; स्त्रियांबद्दल तसं केलं जात नाही. असं का? हा प्रश्न पाडून घ्यायला आणि त्याचं संभाव्य उत्तर पुन्हा ‘कर्तेपणा’च्या कल्पनांशी जोडायला इथं वाव आहे. इजिप्तमधली भित्तिचित्रं मायांपेक्षा जुनी. पण इजिप्त आणि माया संस्कृती या दोहोंमधली भित्तिचित्रं मर्तिकाशीच संबंधित असल्याचं दिसतं. गेलेल्या व्यक्तीसाठी मृत्यूच्या देवतेची प्रार्थना वगैरे प्रकारचे… ते काय आहेत हे माहीत नसलं तरी आत्ता चालेल, कारण आपण स्त्रियांच्या चित्रणाकडे लक्ष देतो आहोत. इजिप्तमधल्या या भित्तिचित्रांतल्या सामान्य स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी आकाराच्या आहेत, पण हीच स्त्री जर राणी असेल तर तिची आकृती मोठी, ठळक दिसणारी अशी असल्याचं लक्षात येतं. इसवीसनपूर्व १७६० मध्ये कारभार करणारी राणी सोबेकनेफेरू किंवा नेफेरुसोबेक हिच्यानंतर नेफ्रेतिती, नेफेरतारी अशा राण्या होऊन गेल्या. यांपैकी नेफेरतारीची चित्रं बऱ्यापैकी परिचित/ प्रचलित आहेत… इतकी अतिपरिचित आहेत की, गेल्या सत्तर- ऐंशी वर्षांत ‘इजिप्तचं काहीतरी’ असं दाखवण्यासाठी इंटीरियर डिझायनरांपासून अनेकांनी या चित्रांचा वापर केलेला आहे. इथं या मजकुरासोबत जे चित्र आहे, त्यातली पहिली स्त्री आयसिस आहे… ही संरक्षक आणि वंशसंधारक देवता, नेफेरतारी राणीच्या हाताला धरून तिला नेते आहे. राणीच्या डोक्यावर मुकुटासारखं जे काही आहे, ते देवीपेक्षा उंच आहे. इजिप्तमधली किंवा माया संस्कृतीतली चित्रं त्या वेळच्या जगण्याची विविध रूपं दाखवतात. पण त्या संस्कृतींमधल्या या भित्तिचित्रांचा संबंध मरणाशी, कबरींशी आहे. आपली अजिंठ्याची भित्तिचित्रं मात्र निराळ्या हेतूनं काढली गेली आहेत. अजिंठ्यातही गौतम बुद्धाच्या महानिर्वाणाचं उत्थितशिल्प किंवा भित्ति-शिल्प आहे, तथागतांच्या जातककथांची चित्रं आहेत. पण कुणाबद्दल मरणोत्तर आदर दाखवणं हा या चित्रांचा प्राथमिक हेतू नाही. अजिंठ्याच्या बौद्ध गुंफांमध्ये ही चित्रं आहेत आणि त्या गुंफांचा वापर ‘विहार’ म्हणून- जिवंत माणसांच्या राहण्यासाठी- होत होता, इतकं सध्या लक्षात ठेवू. अजिंठ्याची लेणी ही दोन टप्प्यांत तयार झाली, त्यापैकी पहिला टप्पा सातवाहन काळातला आणि तो इसवी सनाच्या शे-दोनशे वर्षं आधीचा होता, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भारतीय स्त्रीची जी चित्रं इथं दिसतात, ती कुठल्या काळातली आहेत हे माहीत हवं. कारण एखादी ‘अप्सरा’ वगळता अजिंठ्याच्या अनेक भित्तिचित्रांतल्या स्त्रिया या राणीवशातल्या महिला, दासी, सामान्य स्त्रिया अशाच आहेत. त्यांचं नेसणं, दागिने घालणं, केशभूषेचे त्यांनी केलेले प्रकार हे सारं ‘आपल्या’ इतिहासातलं आणि वर्तमानाशीही दूरवरून का होईना, जुळणारं आहे. अजिंठ्याच्या गुंफा क्र. एकमध्ये एक मोठं चित्र दिसतं, ते ‘महाजनक जातक’ म्हणून ओळखलं जातं. या महाजनकाची कथा वास्तव आणि कल्पित यांचा मेळ घालणारी आहे. आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचं इतकंच की, राजघराण्याचा- पण राजगादीपासून दुरावलेला आणि ‘विधवेचं मूल’ म्हणून लहानपणी हिणवला गेलेला हा महाजनक योगायोगानं राजा होतो. तो बालपणापासूनच धीरगंभीर आहे, कारण तो बुद्धरूप आहे. राणीवशात, किमान आठ स्त्रियांसह तो मध्यभागी बसलेला असल्याचं या चित्रात दिसतं. त्या काळात बौद्ध कलेत मैथुनशिल्पं (बरहुत इथं तरी) आढळतात, पण अजिंठ्यामध्ये ती नाहीत- महाजनक जातकात मैथुन-क्रियांचा उल्लेखही नाही. हा महाजनक राजा शांतपणे, जणू एकेकीचं म्हणणं ऐकत किंवा एकेकीकडून प्रेमसेवा करून घेत बसला आहे. त्याच्या समोरची स्त्री – बहुधा पट्टराणी- त्याला फळं देते आहे आणि तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरून ती काहीशी उत्सुक वाटते आहे, पण तिच्याच मागची एक स्त्री थेट प्रेक्षकांकडे पाहाते आहे. बाकीच्या अनेकजणी एकमेकींशी गप्पा मारताहेत. त्यांचं लक्ष राजाकडे असेल किंवा नसेलही, पण राजासाठीच आणि राजामुळेच त्या साऱ्याजणी इथं आहेत. महाजनक जातकाच्या त्या चित्रात अनेकींच्या डोक्यावर किरीट (इंग्रजीतला ‘टियारा’- आजच्या सौंदर्यस्पर्धांपर्यंत सर्वत्र वापरला जाणारा) आहे. प्रत्येकीच्या केसांमध्ये निरनिराळ्या डिझाइनचे भांगसर, अग्रफूल आदी दागिने आहेत. नेसण्याच्या पद्धती सारख्याच असल्या तरी दागिने आणि केशभूषा मात्र निरनिराळी. कदाचित ‘उत्सव’ (१९८४) या (इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातच लिहिलं गेलेल्या ‘मृच्छकटिकम्’ नाटकावर आधारलेल्या) चित्रपटाचं कलादिग्दर्शन करताना वेशभूषा-केशभूषांचा अभ्यास म्हणून नचिकेत आणि जयू पटवर्धनांनी अजिंठ्याच्या भित्तिचित्रांतूनही नोंदी केल्या असतील, पण मुळात ही भित्तिचित्रं तो काळ नोंदवण्यात यशस्वी ठरली आहेत. पण या चित्राकडे किंवा अजिंठ्यातल्याच ‘अप्सरे’च्या चित्राकडे पाहताना ‘या चित्रामध्ये दासी कोण असेल, ओळखा पाहू…’ असा खेळ स्वत:शीच खेळायला हरकत नाही. ती ओळखू येते- सावळा रंग, कमी दागिने, एकंदर कमीपणा मान्य करूनच उभं राहण्याची पद्धत, अशा सगळ्यातून! चित्रकारानं प्रत्येक प्रतिमेला स्वत:चं अस्तित्व मिळवून दिलंय, पण राण्याबिण्या वगळता उरलेल्या अनेकजणींचा आत्मविश्वास कमी असावा- म्हणजे तशी तजवीज त्या वेळच्या समाजरचनेनं केली असावी- असं ही चित्रं तरी सांगू शकताहेत.
अजिंठ्याची चित्रकला ही ‘भारतीय कलेच्या जन्माची नेमकी खूण’ अशा अर्थाचा एक भलामोठा लेख, अनेकांचे आवडते लेखक विल्यम डालरिम्पल यांनी २०१४ सालच्या १५ ऑगस्टनिमित्त लंडनच्या ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात लिहिला होता- तिथं डालरिम्पल एकप्रकारे, ‘पश्चातबुद्धी’ वापरत होते… कारण बंगालमधल्या अबनीन्द्रनाथ टागोरांनी अजिंठासदृश बौद्ध कलेचा आधार घेणं, नंतर १९३० च्या दशकात अमृता शेरगिल हिनं अजिंठ्यामुळे प्रभावित होणं, शेर-गिल किंवा अबनीन्द्रनाथ यांच्यापैकी एखाद्याचा प्रभाव नंतरच्या काळातल्या अनेक चित्रकारांनी स्वीकारणं… हे सारं घडल्यामुळे आज अजिंठ्याची चित्रं ही ‘भारतीय’ कलेच्या जन्माची खूण ठरतात- यातलं काहीही घडलंच नसतं, तर कदाचित हीच अजिंठ्याची चित्रं ‘बौद्ध चित्रकलेच्या परंपरेतला एक महत्त्वाचा टप्पा’ म्हणूनच उरली असती.
अजिंठ्यामधल्या चित्रांमागे बौद्ध धम्माची प्रेरणाच प्रामुख्यानं आहे. अजिंठ्यापर्यंत लोक येतात ते बुद्धाच्या प्रतिमा आणि जातककथांचं चित्रांकन पाहायला. आपण मात्र या महान ठेव्यापैकी फक्त स्त्रियाच इथं पाहिल्या. हे कुणाला विचित्र वाटेल. पण अजिंठा काय, इजिप्तमधल्या किंवा माया संस्कृतीतली म्हणजे आता मेक्सिको/ ग्वाटेमाला इथल्या ठिकठिकाणची चित्रं काय… ती सारी स्मृती नोंदवणारी प्रसंगचित्रं आहेत- मग ते प्रसंग खरे असोत वा कल्पित. त्या प्रसंगचित्रांतून आपल्याला स्त्रियांचं स्थान दिसून येतं. म्हणूनच ‘अजिंठ्याला जाऊनही बायकाच पाहायच्या?’- या प्रश्नाला अर्थहीन ठरवण्याऐवजी सरळ उत्तर द्यावं- हो, कुठल्याही काळातल्या चित्रांत बायकाच पाहायच्या… कारण त्यामुळे त्या-त्या समाजाची इयत्ता कळायला मोठी मदत होत असते!