नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांतून आपला कलात्मक ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांचे आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे साप्ताहिक सदर…
माझे नाव जरी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन या माध्यमांशी निगडित असले, तरी माझ्या बहुआयामी कारकीर्दीची सुरुवात झाली रेडिओपासून. आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वास्तूमध्ये माझ्या व्यावसायिक कार्यप्रणालीची मुहूर्तमेढ रोवली गेली.. माझ्या ध्यानी-मनी-स्वप्नी नसताना! माझी बी. ए.ची परीक्षा जवळ आली होती. अगदी पाच-सहा दिवसांवर. मी दुपारी घरी लॉजिकच्या सिद्धान्तांबरोबर झटापट करीत बसले होते. एक शिपाई माझ्या नावाचा काही सरकारी लखोटा घेऊन टपकला. मराठी निवेदिकेच्या चाचणीसाठी मला आकाशवाणी केंद्रावर बोलावले होते. नवलच! कारण मला या ऑडिशन्सबद्दल काहीच पत्ता नव्हता. तेव्हा मी त्यासाठी अर्ज करण्याचा तर प्रश्नच नव्हता. ‘जाऊन तर पाहा..’ आईने सल्ला दिला- ‘नाही तरी संध्याकाळी थोडाच अभ्यास करणार आहेस तू?’ पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सेंट्रल ऑफिसच्या दगडी इमारतीत दाखल झाले. डय़ुटी ऑफिसरने माझ्या हातात एक छापील कागद दिला आणि ‘लाल दिवा लागला की वाचा..’ अशी सूचना देऊन मला एका स्टुडिओत बंद केलं. कागदावर दैनंदिन निवेदनाच्या विविध पंक्ती होत्या. अंगी बऱ्यापकी नाटय़गुण असल्यामुळे मी त्या पंक्ती योग्य लटके देऊन थाटात वाचल्या. अधेमधे काही बोजड वाक्ये होती. त्यातले एक आठवते- ‘ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल.’ मला लहानपणापासून संस्कृत श्लोक आणि सुभाषिते मुखोद्गत होती. ‘धगधगध्धगज्वलल्लाटपट्टपावके’ इ. रावणस्तोत्र मी घडाघड म्हणत असे. तेव्हा या ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या थमानाला न घाबरता मी निवेदन पार पाडले. लाल दिवा बंद झाला. मी स्टुडिओचे अवजड दार उघडले. डय़ुटी ऑफिसर दाराबाहेरच उभे होते. ‘उद्यापासून कामावर रुजू व्हायचं,’ ते म्हणाले. मी बी. ए.च्या परीक्षेची माझी अडचण सांगून दिलगिरी व्यक्त केली आणि रेडिओ स्टेशनच्या दालनातून जड अंत:करणाने बाहेर पडले. सेंट्रल ऑफिसच्या फाटकापर्यंत मी पोचते, तोच एक शिपाई पळत आला. ‘तुम्हाला परत बोलावलं आहे,’ म्हणाला. आता इंग्रजी स्थानिक समाचाराचा कागद माझ्या हाती आला. हा समाचार रोज संध्याकाळी सहा वाजता- फक्त पाच मिनिटांपुरता असे. मग पुन्हा स्टुडिओ, लाल दिवा आणि दारात डय़ुटी ऑफिसर. निर्वाळा तोच.. ‘उद्यापासून कामावर यायचं.’ खुद्द केंद्रावर निवेदनासकटची १५ मिनिटं आणि डेक्कन जिमखाना ते सेंट्रल ऑफिस अशी जायची सायकल रपेट हिशोबी धरून एकूण दीड तास काय तो खर्ची पडणार होता. मी आनंदाने कामावर जाऊ लागले. महिना पगार रु. ५०! अगदी त्यावेळच्या मानानेदेखील ही रक्कम अगदी नगण्यच होती. पण पसा, पगार अशा गोष्टींची आमच्या घरी चिकित्सा होत नसे. रेडिओ निवेदिका म्हणून मित्रमत्रिणींच्यात, सगेसोयऱ्यांमध्ये आणि शेजारीपाजारी माझा भाव प्रचंड वधारला. शिवाय या नव्या नादात मी अगदी रंगून गेले. खूप मजा यायची. म्हणूनच की काय, आपणच या सौद्यामध्ये आकाशवाणीला बनवलं, अशी माझी मनोमन समजूत झाली. एवढी विलक्षण संधी आणि वर पॉकेटमनी! नव्या नोकरीवर मी तद्दन खूश होते. बी. ए.ची परीक्षा संपली आणि इंग्रजी बातम्यांच्या जोडीला मी मराठी निवेदिका म्हणून काम करूलागले. टेलिव्हिजनची जादूची पेटी अवतरण्यापूर्वीचा तो काळ होता. लोकांना रेडिओच्या खोक्याचे त्याकाळी अप्रूप वाटे. त्यावर आपल्या आवाजाच्या सामर्थ्यांने किमया करणारे गुणी कलावंत- गायक, गायिका, श्रुतिकांमधून चमकणारे नट-नटय़ा, निवेदक, निवेदिका, इ. हे तेव्हाचे लोकप्रिय सितारे होते. स्टार्स! नीलम प्रभू, लीला भागवत, सुधा मल्होत्रा, गजानन वाटवे, मालती पांडे.. अशी अनेक नावे मोठय़ा आदराने घेतली जात. सुधा भिडे ही पुणे केंद्राची पट्टनिवेदिका. सुसंस्कृत आणि शुद्ध वाणीने केलेल्या तिच्या घोषणा दर्जेदार असत. ‘आकाशवाणी, पुणे केंद्र’मधला ‘आ’ ती जरा लांबवत असे. आम्ही नवसेगवशे तिचा कित्ता गिरवीत असू. पुरुषोत्तम जोशींचा घनगंभीर आवाज रेडिओवर निनादला, की लोक हातातले काम टाकून कान टवकारीत असत. त्यांचं निवेदन असलं, की कार्यक्रमापेक्षा निवेदनच श्रोते मन लावून ऐकत. उमेदवारीच्या त्या काळात खूप नाती जुळली. रजनी मुथा मराठी, िहदी निवेदन करी. घरची बिकट परिस्थिती आणि शिक्षण जवळजवळ नाहीच- असे असूनही तिने आपल्या कलागुणांच्या आणि मधुर आवाजाच्या जोरावर ध्वनिलहरींवर साम्राज्य केलं. मिठ्ठास आवाज आणि तितकाच मिठ्ठास स्वभाव. दिसायची पण छान. शेलाटी. तिची माझी मत्री जमली. तिने आधी सिनेमात आणि मग नाटकांत कामे केली. पण आकाशवाणी हे तिचे खरे कार्यक्षेत्र. पुढे निळू फुले यांच्याशी तिने लग्न केले. दोन-तीन वर्षांपूर्वी ती कॅन्सरला शरण गेली.
जी. सी. अवस्थी हे तेव्हा पुणे केंद्राचे ‘पेक्स’ (प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह) होते. सर्व कारभार अत्यंत कुशलतेने ते चालवीत. खूप लठ्ठ, पण विलक्षण तेजस्वी, देखणा चेहरा, लोभस व्यक्तिमत्त्व आणि मिठ्ठास वाणी यामुळे ते अगदी उठून दिसत. ते स्टाफमध्ये फार लोकप्रिय होते. मध्यंतरी त्यांचा पगार वाढला, तेव्हा त्यांनी घरी बायकोला सांगितलं नाही. कारण या पगारवाढीतून स्टाफमधल्या गरीब, गरजू इसमांची केमिस्टकडची दवापाण्याची बिले भागत असत. त्यांच्या चातुर्याबद्दलच्या अनेक कथा आहेत. त्यांचा एक मजेदार किस्सा आता आकाशवाणीच्या खास आख्यायिकांमध्ये जमा झाला आहे. पुण्याच्या आधी अवस्थीसाब कुठल्याशा लहान केंद्रात केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत होते. गावात फार मोठी दंगल उसळली होती. प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याच्या उद्देशाने बंडखोरांच्या म्होरक्याचेच भाषण रेडिओवरून योजावे, असा आदेश ‘वरून’ आला. अवस्थींनी त्या म्होरक्याला पाचारण केले. जहाल आणि प्रक्षोभक भाषणाबद्दल त्या पुढाऱ्याची ख्याती होती. एका अटीवर भाषण देण्याचे त्याने मान्य केले. भाषण जसेच्या तसे ‘एक शब्दही न छाटता’ प्रसारित झाले पाहिजे. अन्यथा दंगा अधिकच उफाळण्याची शक्यता होती. अवस्थींनी अट मान्य केली. आणि भाषण रेकॉर्ड झाले. दोन-तीन ठिकाणी नेत्याने शेलक्या शब्दांत सरकारची निर्भर्त्सना केली होती. ‘मी माझ्या घरी साथीदारांबरोबर भाषण ऐकतो आहे. एकही शब्द गाळता कामा नये,’ असे बजावून तो पुढारी निघून गेला. आता काय करणार? इकडे आड अन् तिकडे विहीर! सरकारी माध्यमावरूनच सरकारची िनदा ऐकवणे, हे संभवत नव्हते. पण त्याचबरोबर भाषण ‘एडिट’ केले तर आगीत तेल ओतल्याचे पाप ओढवणार! अवस्थीसाबनी नामी शक्कल योजली. मातब्बर ध्वनि-इंजिनीअर साथीला घेऊन त्यांनी वातावरणातले ‘स्टॅटिक’- ‘घरघर’ रेकॉर्ड केली. फर्र्र, ढर्र्र, खर्र्र असे नाना खरखरीचे प्रकार टेपवर नोंदवून त्यांनी भाषण पुन:ध्वनिमुद्रित केले आणि हव्या त्या ठिकाणी- किंवा खरं तर नको त्या ठिकाणी- ते चपखल ‘पेरले’! अर्थातच या घरघरीपायी त्या पुढाऱ्याचे आक्षेपार्ह शब्द ऐकू आले नाहीत. पण नंतर लगेच भाषण मात्र रीतसर चालूच राहिले. ती मखलाशी केलेली टेपच अर्थात रेडिओवरून प्रसारित झाली. पुढाऱ्याला ऐकवण्यासाठी मूळ प्रत जशीच्या तशी जपून ठेवली होती. तो मूग गिळून स्वस्थ बसला. काहीही करू शकला नाही. वातावरणातच अडथळा निर्माण झाला, त्याला कोण काय करणार?
आकाशवाणीवरच्या त्या मंतरलेल्या कालखंडात अनेक मजेदार अनुभव आले. एक प्रसंग ठळकपणे आठवतो. माझी रात्रीची पाळी होती. शेवटचा कार्यक्रम होता- ‘आपली आवड’. ‘धुंद येथ मी, स्वैर झोकितो, मद्याचे प्याले’ या ग. दि. माडगूळकरांच्या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणि श्रोत्यांना ‘उद्या भेटण्याचे’ आश्वासन देऊन मी फेडर खाली केला. रात्री डय़ुटीवर असलेल्या स्त्रियांना घरी जायला ऑफिसची गाडी मिळत असे. याच गाडीने काही थोडे इतर अधिकारीदेखील जात असत. दुकान बंद करीत असलेल्या सहकाऱ्यांची वाट पाहत मी व्हरांडय़ामधल्या वेताच्या खुर्चीवर विसावले. तेवढय़ात एक टॅक्सी येऊन थांबली आणि उंची कपडे केलेला एक इसम खाली उतरला. तो प्यायलेला आहे हे माझ्या (तेव्हाच्या) अनभिज्ञ नजरेलादेखील जाणवलं. ‘हे आता तुम्ही जे मद्यप्याचं गाणं लावलंत, ते मला पुन्हा ऐकवा. ती माझीच जीवनकथा आहे,’ असं सांगून तो ओक्साबोक्शी रडू लागला. सगळ्यांनी त्याला नाना प्रकारे समजावलं; पण गाणं ऐकल्याखेरीज तो हटायला तयार नव्हता. अखेर डय़ुटीवरच्या वरिष्ठ इंजिनीअरना त्याची कणव आली. त्यांनी पुन्हा कंट्रोल रूम उघडलं आणि रात्री ११ वाजता त्याला टेप ऐकवली.
माझे भाग्य असे, की ‘गीतरामायण’चा सुवर्णकाळ माझ्या डोळ्यांदेखत घडला. ग. दि. माडगूळकरांची अप्रतिम गीते, सुधीर फडके यांचे संगीत आणि पुरुषोत्तम जोशी यांचे निवेदन- यांच्या संगमाने नटलेल्या या कार्यक्रमाने अवघा परिसर दुमदुमून जाई. प्रत्येक नवीन गाण्याची लोक अधाशीपणे वाट बघत. या कार्यक्रमाच्या तालमी आणि त्याचे ध्वनिमुद्रण मला पाहायला मिळाले, हे खरोखरच माझे अहोभाग्य! वर्षांतून एकदा आकाशवाणी सप्ताह होत असे. त्या प्रसंगी  रेडिओ हा नुसताच ‘श्राव्य’ न राहता ‘दृश्य’ होत असे. निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत निवडक बहारदार कार्यक्रम होत. नाटके, मुलांचे कार्यक्रम, मान्यवर कलाकारांचे गायन, वादन, इ. दर्शक आणि श्रोते दोघे एकाच वेळी या कार्यक्रमाचा आनंद लुटत असत. श्रोत्यांची दाद, टाळ्या, हशा यांची भर पडून कार्यक्रमाला अधिकच रंगत येई. सेंट्रल बििल्डगच्या आवारात मंडप आणि तात्पुरता मंच उभारला होता. विठाबाई नारायणगावकर यांच्या लावणीनृत्याचा कार्यक्रम ठरला होता. बाई साठीच्या जवळपास होत्या. पण जवानीचा जोश, नखरा, ठसका अद्याप कायम होता. निवेदिकेचा- म्हणजे माझा टेबल- खुर्ची- माइक हा सरंजाम स्टेजवरच समोर कोपऱ्यात मांडला होता. कार्यक्रम सुरू झाला. बाईंची ओळख, लावणीची थोडी पाश्र्वभूमी, लावणीच्या पंक्ती, साथीदारांची नावे इत्यादी माहिती निवेदनातून दिली की लावणी पेश होत असे. मग पुन्हा निवेदन, पुन्हा लावणी असा क्रम सुरूझाला. एका लावणीच्या संदर्भात माझे वाक्य होते- आणि का कोण जाणे, प्रियतमेवर अचानक कान्हा रुसला.. गंमत म्हणजे यानंतरच्या लावणीत बाईंनी चक्क मला ‘कान्हा’ बनवले. सगळा शृंगारिक आविर्भाव त्या माझ्याकडे बघून करू लागल्या. मला उद्देशून गाऊ लागल्या. लाडिक हावभाव, मुरके, लटके, झटके.. सगळे काही माझ्यावर कुर्बान. दोन्ही हात ओवाळून त्यांनी माझी दृष्टही काढली. माझ्यावर रंगाची काल्पनिक पिचकारी उडवली.. एक ना दोन. प्रेक्षक हसू लागले. आणि गंमत म्हणजे लागण व्हावी तशागत मलाही हसू आवरेना. छातीत धडधड, घशाला कोरड आणि तरीही हसण्याच्या उकळ्यावर उकळ्या असा विचित्र प्रकार मी अनुभवला. गाणे संपले. गंभीर राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत, पण हसू फुटत फुटत मी कशीबशी अनाऊन्समेंट केली. नंतर खूप दिवस आकाशवाणीला श्रोत्यांची पत्रे येत राहिली.. निवेदिका का हसत होती?