प्रमोद मुनघाटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल साबळे यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या संग्रहातील कथांचे वर्णन ‘रानशिवारातील गोष्टी’ याच शब्दांत करावे लागेल. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या आठ कथांचा हा संग्रह ‘पपायरस’ या प्रकाशन संस्थेने देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केलेला आहे. जंगल, शेतशिवार आणि रानातील जीवसृष्टी असा अनुभवांचा ऐवज असलेले कथात्म किंवा ललित साहित्य मराठीत विपुल आहे; परंतु अनिल साबळे यांच्या लेखनाची जातकुळी त्यापेक्षा वेगळी आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांमधला शहरी निवेदक हा नागर दृष्टीतून जंगलाचे चित्रण करतो. श्रीनिवास विनायक कुलकर्णी आपल्या ललित लेखनाला आधिभौतिक व काहीशी गूढतेची डूब देतात. मात्र, अनिल साबळे यांच्या सगळ्या कथांचा निवेदक यांच्यापेक्षा काहीसा वेगळा आहे. तो बारा-चौदा वर्षांचा मुलगा असून त्याचं प्रथमपुरुषी निवेदन आहे. जी. ए. कुलकर्णीच्या काही कथांचा नायक निवेदक असाच आहे. पण त्या निवेदकावर लेखकाचे ओझे दिसून येते. परिणामी जीएंच्या कुटुंबकथांचे केंद्र असलेले प्रौढ मध्यमवर्गीय हळवेपण निवेदकाचे स्वाभाविक कोवळेपण संपवून टाकते. या पार्श्वभूमीवर अनिल साबळे यांच्या कथांमधील किशोरवयीन मुलगा हा अधिक हाडामांसाचा वाटतो.

‘पिवळा पिवळा पाचोळा’मधील कथांचे संभाषित त्या किशोरवयीन मुलाचे स्वत:चे केवळ भावजीवन नाही, तर त्याच्या भोवतालची सृष्टी आहे. या सृष्टीत त्याचे आईवडील, भावंडं, मित्र, आजी-आजोबा, काका-मावशी यांच्यासह रानातील डोंगर, झाडी, विविध पक्षी, कीटक, मधमाशा, गुरे, मेंढय़ा-बकऱ्या, घोरपड-सरडय़ासारखे जीवजंतू आहेत. या सगळ्यांचे ‘जगणे’ हाच या कथांचा मुख्य विषय आहे. या कथांचा संपूर्ण अवकाश त्या ‘जगण्याने’ व्यापला आहे. भोवतालचा निसर्ग, रानातील आणि शेतशिवारातील प्राणिसृष्टी, माणसे यांच्या दैनंदिन जगरहाटीचे कथन म्हणजे या कथा होत. एखादे चित्र जसे अनेक रेषा, आकार आणि रंगांच्या रेखाटनातून ‘संवेदनलक्ष्यी’ असावे, तशी अनिल साबळे यांच्या कथांची जातकुळी आहे. या कथांत घटना आहेत, व्यक्तिचित्रणेही आहेत; पण ती ओघाओघात येतात. या कथा व्यक्ती/ घटनाप्रधान नाहीत. मराठी नवकथेत (गाडगीळ-गोखले) वस्तुवर्णनाची सूक्ष्म शैली प्रचलित होती. कथेतील व्यक्तींच्या मनोव्यापाराचे विश्लेषण होते. ते अनिल साबळेंच्या कथेत नाही. कथनाच्या ओघात मुख्य गोष्टीच्या बहिर्वर्तुळातील अनेक आठवणी निवेदक सांगतो. त्या आठवणींचे कथन सूक्ष्म तपशिलांच्या वर्णनात जाणारे नाही. ते फार प्रवाही आहे. बऱ्याचदा ते संज्ञाप्रवाहात्मक होते. त्यातून निवेदक नायकाचे व्यक्तित्व अधिक उलगडत जाते.

निवेदकाने स्वत:ला किंवा जीवलगाला गोष्ट सांगावी तशी या कथांची कथनशैली आहे. चालू वर्तमानातील जगण्याच्या प्रवाहातील स्थळ-काळ निवेदक कथन करीत जातो, ते अत्यंत स्वाभाविक आहे. या कथांमध्ये झाडांवरील पक्षी, सरडे, तलावातील मासे, मधाचे मोहोळ, बिळातील घोरपड, शेतात काम करणारे शेतकरी, धनगर, मेंढय़ांचा कळप, शाळा, शाळेतील सवंगडी, त्यांची शाळा सोडून भटकंती, जंगलातील दुपारचे, रात्रीचे जीवन येत राहते. भोवतालच्या अभिन्न सृष्टीतील पक्षी-प्राणी किंवा व्यक्तींच्या आठवणीही येतात. कधी कधी कथा स्मरणरंजनाच्या वळणाने जाते असे वाटत असतानाच लेखक निवेदकाला परत चालू वर्तमानात आणतो.

या जिवंत व स्वाभाविक वर्णनांत तेथील माणसांची दु:खेही आहेतच, पण ती उघडपणे येत नाहीत. निवेदकाच्या किशोरवयीन चिकित्सक निरीक्षणशक्तीतून वरवर सपाट वाटणाऱ्या निवेदनातून भोवतालच्या माणसांची दु:खे प्रकट होतात. जमिनीखालून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याची अदृश्य जाणीव व्हावी, तसे वाचकाला ते जाणवत राहते. ‘पिवळा पिवळा पाचोळा’ ही शीर्षककथा संग्रहाच्या अखेरीस आहे. यातला कथानायक निवेदक नववीच्या परीक्षेत नापास होतो. निकालाच्या दिवशी तो सैरभैर होऊन घरी न जाता भटकत राहतो. त्या निवेदनात कथाकार म्हणून लेखकाचे वेगळेपण जाणवते.

मराठी नवकथेचा कालखंड ओसरल्यानंतर मराठीत आधुनिकतावादी प्रवाह आला. वास्तववाद, सामाजिक बांधिलकी, विद्रोह असे काही मूल्यव्यूह साठनंतरच्या मराठी कथेची वैशिष्टय़े म्हणून सांगितली जातात. यात दलित-ग्रामीणपासून महानगरी-जीए अशा कलावादी प्रेरणांचाही समावेश करता येईल. पण या मूल्यनिष्ठा आणि प्रभाव पचवून जीवनाकडे उत्तरआधुनिकतावादी दृष्टीतून पाहणारी कथा मराठीत अगदी अलीकडे निर्माण होत आहे असे म्हणता येईल. ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. या कथांतील रानशिवारात घडणाऱ्या घटनांकडे रानातल्या नियमांनुसारच पाहिले पाहिजे अशी निकड या कथा निर्माण करतात. मानवी सामाजिक जीवनाच्या पलीकडे आपली मूल्यव्यवस्था नि:संदर्भ ठरते ही जाणीव या कथांतून होते.

‘घोरपड’ कथेत घोरपडी मारण्याचे, ‘गळ’ कथेत मासे पकडण्याचे, ‘मोहोळ’मध्ये मधाचे पोळे उतरवण्याचे, तर ‘हिरव्या चुडय़ाआड बुडालेलं’ या कथेत सरडे मारण्याच्या गोष्टी येतात. दिवसभर रानावनात भटकणारी मुले जंगलाचाच एक भाग बनून जातात. कथेचा निवेदक ज्या सामाजिक वातावरणात जगतो, तिथे घोरपड पकडणे, तिचे मांस खाणे आणि चामडय़ाचा वाद्यांसाठी वापर करणे या गोष्टी स्वाभाविक वाटतात. बालवयात पक्षी-कीटकांना पकडून त्यांचा छळ करणे या वृत्तीचा मानसशास्त्रीय अन्वयार्थ काहीही असो; या कथांमध्ये फार सहजभावाने त्या घटना येतात. ‘हिरव्या चुडय़ाआड बुडालेलं’ या कथेत तर सरडे मारण्याच्या जणू मोहिमाच अमलात आणल्याचे दिसते. या कथेत निवेदक म्हणतो, ‘‘आमच्या चौथीच्या वर्गातील मुसलमानांची मुलं म्हणायची एक सरडा मारल्यावर आपली सात पापं माफ होतात. मी बोटावर सहज हिशेब करून आपण किती सरडे मारले याचा हिशोब करू लागलो.’’ पुढे शेतकरी उकळत्या तेलात जिवंत सरडय़ाला बुडवून ते तेल बैलाच्या रोगावर उपचार म्हणून लावतात. ते दृश्य बघून आपलंच काळीज उकळत्या तेलात पडलं आहे असे निवेदकाला वाटते व तो सरडे मारण्याची काठी दूर फेकून देतो. ‘पिवळा पिवळा पाचोळा’मधील कथांचे केंद्र रान आणि जंगलशिवार हेच आहे. जंगलातील जीवन हेच या कथेचे मुख्य ‘संभाषित’ आहे. अनिल साबळे यांच्या कथांतील शब्द न् शब्द रानावनातील रंग-गंध-स्पर्श अशा संवेदनांनी भारित झाले आहेत.

थोडक्यात, या कथांत जीवनाचा रसरशीत अनुभव आहे. तो मानवी जीवनापलीकडील विशाल सृष्टीचा भाग वाटतो. म्हणून या कथांतील निवेदकाच्या जीवजंतूविषयीच्या भावना शुद्ध संवेदनेकडे जाणाऱ्या वाटतात. त्यामुळे मनुष्य, निसर्ग व अन्य जीवसृष्टीच्या वेगवेगळ्या अस्तित्वाची जाणीवच इथे उरत नाही. मराठी वाचकांना अशी अत्यंत स्वाभाविक शैली आणि अनुभवांची अमर्याद खोली नवी आहे. त्यामुळे कोणत्याही पूर्वसुरींचे संस्कार नसलेल्या अनिल साबळे यांच्या कथा कमालीच्या ताज्या आणि रसरशीत वाटतात. पुस्तकाची एकूणच निर्मिती, मुखपृष्ठ, रेखाटणे, मांडणी आणि संपादन कथांचा अनुभव अधिक अर्थपूर्ण करणारे आहे.

‘पिवळा पिवळा पाचोळा’- अनिल साबळे, पपायरस प्रकाशन, कल्याण,

पाने- १९५, किंमत- ३०० रुपये.

pramodmunghate304@gmail.com