वृद्धांचे प्रश्न हा आज जगभरात एक चिंतेचा विषय आहे. देशोदेशी भटकताना तेथील तरुण तसेच वृद्धांशी मी या समस्येबद्दल आवर्जून चर्चा करतो. त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता अमेरिकेतल्या विविध वृद्धाश्रमांना मी भेट दिली. पंचतारांकित ते सामान्य वृद्धाश्रमांपर्यंत! आपले घरदार विकून कॅरॅव्हॅनमध्येच (फिरत्या घरात) उरलेले आयुष्य काढणाऱ्यांशीही गप्पागोष्टी केल्या. घराबाहेर पडता येत नसल्याने ‘ऑन व्हिल’ अन्न व औषधे मागवणाऱ्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. त्यातून अमेरिकन लोक आपल्या वार्धक्यातील आयुष्याची आखणी कशी करतात, याची माहिती मिळाली. अमेरिकेत वृद्धांच्या समस्येला व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रश्नाचीही जोड आहे. तिथे विशी ओलांडली की मुलं-मुली घराबाहेर पडून स्वतंत्र राहू लागतात. वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करायचा, ही कल्पनाच तिथे अस्तित्वात नाही. विकलांग वृद्धही मुलांकडे राहू इच्छित नाहीत. ‘त्यांच्यासोबत राहिले तर माझ्या स्वातंत्र्याचे काय?,’ असा प्रश्न नव्वदीतली वृद्धाही विचारते.
लुसिला आणि वॉर्नर या अमेरिकन दाम्पत्याकडे राहण्याची व त्यांच्याबरोबर ४० दिवस भटकण्याची संधी योगायोगाने मला मिळाली. लुसिला मूळची अर्जेटिनाची. बहुराष्ट्रीय कंपनीत बडय़ा पगारावर काम करणाऱ्या एका अमेरिकन विधुराशी वयाच्या १८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. त्यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते. लुसिला ६० वर्षांची असताना तिच्या पतीचे निधन झाले. नंतर ती वॉर्नर या दुसऱ्या अमेरिकन माणसाबरोबर विवाहबद्ध झाली. आज वॉर्नरचे वय ७६, तर लुसिलाचे ७५ आहे. या जगात त्यांना एकमेकांशिवाय दुसरे कोणीही नाही. नोकरीनिमित्त लुसिलाने ४२ देशांमध्ये काम केले. तिला भटकंतीची खूप आवड!  निवृत्तीनंतर खूप भटकंती करायची तिने ठरवले होते. वॉर्नर मात्र तिच्या मानाने अगदीच डावा! त्यांचे जुळले, कारण त्यालाही फिरण्याची आवड. आणि लुसिलामुळे आपल्या जीवनाला नवी दिशा मिळाली, हा त्याचा विश्वास!
लुसिलाला निवृत्तीनंतर पेन्शन सुरू झाली. तिच्या निधन पावलेल्या पतीचीही पेन्शन तिला मिळू लागली. वॉर्नरची पेन्शन त्यामानाने तुटपुंजी होती. त्यामुळे तिने आणखी चार-पाच वर्षे एका मोठय़ा स्टोअर्समध्ये काम केले. त्यातून तिला चांगली रक्कम साठवता आली. साठलेले पैसे व पेन्शन यात फिरण्याची हौस व भविष्याची चांगली तरतूद होईल अशी आखणी तिने केली. साठीपर्यंत ती न्यूयॉर्क, डलास या शहरांत राहत होती. सेवानिवृत्तीनंतरच्या वास्तव्यासाठी तिने बरीच माहिती मिळवून डलासपासून ३५० मैलांवर असलेले अ‍ॅबिलीन हे छोटे गाव निवडले. गाव निवडताना तिने ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्यात एक म्हणजे अ‍ॅबिलीनमध्ये करांचे प्रमाण खूपच कमी होते. पवनचक्कीपासून मिळणारी वीजही उपलब्ध होती. इथे बरीच स्वस्ताई होती. त्यामुळे अमेरिकेतील इतर शहरे व इथल्या राहणीमानात तब्बल २५ ते ३० टक्क्यांचा फरक पडणार होता. वृद्धत्वात सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे वैद्यकीय मदत! त्यादृष्टीने अ‍ॅबिलीनमध्ये उत्तम सोयी होत्या. तशीच वेळ पडली तर तिथून डलासला हवाईमार्गे नेण्याची वैद्यकीय तजवीज होती. याचबरोबर आणखी एक व्यवस्था अ‍ॅबिलीनमध्ये असल्याची खात्री तिने करून घेतली. ती म्हणजे वृद्धाश्रमाची! आज लुसिलाचे स्वत:चे घर आहे. पण उद्या या घराचा मेंटेनन्स परवडला नाही, किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे तिथे राहणे शक्य झाले नाही तर जवळच वृद्धाश्रम हवा. तोही परवडणारा! या सर्व गोष्टी तिने बारकाईने विचारात घेतल्या.
‘‘रॉयल इस्टेट्स ऑफ अ‍ॅबिलीन’ या वृद्धाश्रमाने आपल्याला उद्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे..’ अ‍ॅबिलीनमधील वास्तव्यात लुसिलाने हे सांगितले तेव्हा खूपच आनंद झाला. वृद्धाश्रम पाहण्याबरोबरच तिथल्या वृद्धांशी गप्पा मारणेही यामुळे शक्य होणार होते. लुसिला या वृद्धाश्रमाची सदस्य होती. अ‍ॅबिलीन शहरापासून थोडय़ा अंतरावर रॉयल इस्टेट्स संस्थेची इमारत आहे. लांबून पाहिली तरी ती नजरेत भरते. समोरच स्वागतकक्ष होते. तिथल्या स्वागतिकेने आमचे स्वागत केले. लुसिला व वॉर्नरना ती ओळखत होतीच. संस्थेची माहिती देणारी पत्रके देऊन तिने आम्हाला बसावयास सांगितले. तेवढय़ात संस्थेचे एक अधिकारी तिथे आले. त्यांनी सांगितले, ‘जेवणाची वेळ झाली आहे. तेव्हा तुम्ही प्रथम जेवून घ्या. मग मी तुम्हाला वृद्धाश्रम दाखवीन.’ समोरच्या एका भव्य दालनात आम्ही गेलो. २०-२५ वृद्ध स्त्री-पुरुष तिथे जेवत होते. मेनू होता- ओव्हन रोस्टेड चिकन, पोल्ट्री ग्रेव्ही (अंडय़ाचे कालवण), ग्रील्ड टिलापिया (मासा), स्वीट पोटॅटोज्, हॉट रोल. बरोबर चिकन किंवा गार्डन व्हेजिटेबल सूप व साइड सलाड. इथे नाश्ता-जेवण आहारतज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे बनवण्यात येते. काही वृद्धांना काटय़ा-चमच्याने किंवा हातानेही खाता येत नव्हते. शेजारच्या टेबलावरील आजींचे हाल पाहवत नव्हते. अर्धागवायूने त्यांचे शरीर लुळेपांगळे झाले होते. एक मुलगी त्यांना चमच्याने भरवत होती. अंगावरच्या एप्रनवर अन्न पडले तर ते पुसण्याची तत्परता दाखवत होती. सगळी सेवा ममत्वाने केली जात होती.
जेवणानंतर आम्हाला वृद्धाश्रम दाखवायला नेण्यात आले. इमारत तीनमजली व भव्य होती. कॉरिडॉरमध्ये सुंदर झाडे. भिंतींना दोन्ही बाजूंना कठडे- ज्यांचा आधार घेऊन वृद्धांना चालता येईल. वृद्धाश्रमाची विभागणी दोन भागांत- १) असिस्टेड लिव्हिंग- म्हणजे ज्यांना साहाय्यकाच्या मदतीने राहावे लागते, अशांच्या खोल्या. २) इण्डिपेंडंट लिव्हिंग- वृद्ध स्वतंत्रपणे अपार्टमेंटमध्ये राहू शकतात. एका खोलीत दोघेच राहू शकतात. हा नियम दोन्हीला लागू. आधी असिस्टेड रूम्स पाहायला गेलो. ३८८ चौ. फुटांच्या स्टुडिओपासून ५८८ चौ. फूटांच्या एक बेडरूम्सच्या खोल्या यात येतात. खोलीचा आकार व मजला यावर त्याचे भाडे  ठरते. ३८८ चौ. फुटांच्या स्टुडिओसाठी महिन्याला दोन हजार डॉलर्स. त्याच खोलीत आणखीन एक व्यक्ती राहणार असेल तर तिचे जादा सहाशे डॉलर्स. म्हणजे दोन माणसांसाठी २६०० डॉलर्स महिन्याचे भाडे! ५८८ चौ. फुटांच्या पहिल्या मजल्यावरील ब्लॉकसाठी दोघांना ३२०० डॉलर्स खर्च येतो. असिस्टेड रूमच्या भाडय़ात दिवसातून तीन वेळा विविध ताज्या पदार्थाचे जेवण. प्रत्येक दिवसाचा मेनू निराळा. दिवसभरात कधीही व कितीही वेळा स्नॅक्स व पेय. दर आठवडय़ाला खोलीची स्वच्छता व लॉण्ड्री. करमणुकीची तसेच विविध खेळांची सोय. तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची २४ तास उपलब्धता. केबल टी. व्ही. व थोडे जास्त पैसे भरले तर ब्युटीपार्लरचीही व्यवस्था. विम्याच्या साहाय्याने सर्व प्रकारची वैद्यकीय मदत. अस्टिस्टेट रूम्समध्ये प्रत्येक खोलीत ‘इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम’ बसवली होती. प्रवेशद्वारावर एक छोटे यंत्र होते. त्यातल्या कॅमेऱ्यातून खोलीतील व्यक्तीची प्रत्येक हालचाल चित्रित होते व वृद्धाश्रमाच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षात ती सतत दिसते. त्यामुळे एखाद्या खोलीतील व्यक्ती पडली, वा उठू शकत नसेल तर तिला त्वरित मदत मिळते.  प्रशिक्षित नर्सेसही मदतीला आहेत.
‘इण्डिपेंडंट लिव्हिंग’मध्ये दोन प्रकारची अपार्टमेंट्स होती. ५८८ आणि ६२९ चौ. फूटांचे. त्यासाठी १८५० व २१०० डॉलर्स मासिक भाडे होते. खोलीत आणखी एक व्यक्ती असेल तर ५०० डॉलर्स जादा. या खोल्यांत चांगली सजावट व उत्तम फर्निचर होते. यात दिवसातून तीन जेवणांचा समावेश असला तरी हौस असेल तर खोलीत स्वतंत्रपणे स्वयंपाक करण्याचीही सोय होती. या अपार्टमेंटमधील काही सवलतींमुळे अमेरिकन वृद्घ कमालीचे खूश दिसले. एकतर २५० डॉलर्स अनामत रक्कम भरून तुम्ही तुमच्या कुत्र्याला बाळगू शकता. (अमेरिकनांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहेच!) महिन्याला आणखी तीस डॉलर्स भरलेत तर मोटारीसाठी पार्किंग मिळू शकते. तुम्हाला भेटायला कोणी नातेवाईक, पाहुणे आले तर त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांना दिवसाला ७५ डॉलर्समध्ये एकाचे संपूर्ण जेवण व निवास उपलब्ध होते. आठवडय़ातून ठरावीक दिवशी दुकानातून सामान आणण्यासाठी तसेच डॉक्टरांकडे जाण्याकरता मोफत वाहतुकीची सोयही आहे.
दोन्ही वर्गातील खोल्यांतली स्वच्छता व सोयी उत्तम दर्जाच्या होत्या. वाचनालय, बिलिअर्डचे टेबल, वृद्धांचे नानाविध खेळ इत्यादी व्यवस्थाही होती. वृद्धांच्या बुद्धीला सतत चालना मिळावी म्हणून काही अनोखे उपक्रम राबवले जातात. दर बुधवारी ‘हॅपी अवर’ असतो. त्यावेळी नाममात्र दरात वाइन मिळते. लुसिलाच्या मते, अमेरिकेतील मध्यमवर्गीय वृद्ध कुटुंबांना परवडेल असा हा वृद्धाश्रम आहे.
अ‍ॅबिलीनमधील आणखीन एका वृद्धाश्रमात लुसिला आम्हाला घेऊन गेली. वृद्धाश्रम कसला? पंचतारांकित हॉटेलच होते ते! महिन्याचे कमीत कमी भाडे चार हजार डॉलर्स! मासिक सहा हजार भाडय़ाच्या वर्गात जागा मिळण्यासाठी ‘वेटिंग लिस्ट’ होती. व्हीलचेअरवर बसलेल्या, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आजींचा ‘मेकअप’ करण्यासाठी एक दिवसाआड ब्युटिशिअन येते. सारा श्रीमंती थाटमाट!
रॉयल इस्टेट्समधील वृद्धांशी गप्पा मारताना मजा आली. प्रत्येकाची कथा निराळी. एक भारतीय दाम्पत्य आपल्या अमेरिकन मित्रांसोबत वृद्धाश्रम पाहायला आले आहे याचे त्यांना नवल वाटत होते. ‘तुम्ही अमेरिकेत स्थायिक आहात का? पुढे या वृद्धाश्रमात येण्याची ही तयारी आहे का?’ हाच प्रत्येकाचा पहिला प्रश्न होता. त्यावर मी त्यांना भारतातील एकत्र कुटुंबपद्धती व वार्धक्यात त्याचे होणारे फायदे कथन केले. ‘तुम्हाला ही पद्धत कशी वाटते?’ असे विचारल्यावर त्यांची मते व शंका ऐकण्यासारख्या होत्या. मुलामुलींचा आधार वगैरे ठीक आहे; पण त्यांच्याबरोबर एकत्र राहण्याची कल्पनाच अमेरिकन आजी-आजोबांना मान्य नव्हती. ‘एकत्र राहिले तर आमच्या स्वातंत्र्याचे काय? मुलांनी, त्यांच्या मुलांनी आमच्यावर जबरदस्ती केली तर? आणि आमच्या कुत्र्या-मांजरांचे काय? त्यापेक्षा शक्यतोवर आम्ही आमच्याच घरात राहू. नाताळ, वाढदिवशी मुलं-नातवंडे भेटायला येतातच. पुढे अगदीच अशक्य झाले तर हे वृद्धाश्रम आहेतच. वैद्यकीय मदतीच्या बाबतीत अमेरिकेत अजिबात काळजी नाही. अनेक औषधे फुकट किंवा नाममात्र किमतीत मिळतात. ‘शुगर’ तपासण्याची किंवा अन्य काही वैद्यकयंत्रे सरकारतर्फे मोफत देण्यात येतात. वैद्यकीय इमर्जन्सीला फोन केला की सर्व मदत त्वरित मिळते. हे सर्व आम्हाला पुरेसे वाटते,’ असे त्यांचे म्हणणे. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, अमेरिकेत वृद्धाश्रमातले आजी-आजोबाही जीवनाचा आनंद उपभोगण्याचीच वृत्ती बाळगतात. नैराश्यवाद त्यांच्या स्वप्नातही नसतो.
अमेरिकन वृद्धांमध्ये आणखीन एक जीवनपद्धती लोकप्रिय आहे. ती म्हणजे कॅरॅव्हॅनमध्ये (चारचाकी फिरत्या घरात) उर्वरित आयुष्य घालवण्याची! लुसिलाची एक मैत्रीण अ‍ॅने ही टेक्सासमधील सॅन अँटोनियोला राहते. तेथील मुक्कामात लुसिनाने तिच्याशी आमची गाठ घालून दिली. म्हणजे तिला भेटण्यासाठी आम्ही शहराजवळच्या एका कॅरॅव्हॅन कॅम्पमध्ये गेलो. अ‍ॅने एकटीच आहे. तिच्याप्रमाणेच कॅरॅव्हॅनमध्ये राहणाऱ्या आणखी चार कुटुंबांनाही तिने बोलावले होते. सर्वाची कहाणी सारखीच! अ‍ॅने खासगी कंपनीत कामाला होती. आज तिचे वय सत्तरीच्या घरात. नवरा तीन-चार वर्षांपूर्वी वारला. आर्थिक स्थिती मध्यम. तिचा छोटा बंगला होता. पण त्याचा मेंटेनन्स परवडणारा नव्हता. त्यात तिला भटकण्याची खूप आवड. म्हणून तिने घर विकण्याचा निर्णय घेतला. घर विकून एक सेकंडहँड कॅरॅव्हॅन घेतली. संसार अगदी मोजका ठेवला आणि तो या चारचाकी फिरत्या घरात हलवला. एक छोटी लिव्हिंग-रूम, किचन, बेडरूम, स्टोअर रूम अशी कॅरॅव्हॅनची रचना होती. त्यात टीव्ही, बाथरूमचीही सोय होती. पुढच्या बाजूला ड्रायव्हिंग सीट! अ‍ॅने कधी एकटय़ाने, कधी इतरांबरोबर भटकंती करते. संध्याकाळी कॅम्पमध्ये कॅरॅव्हॅन लावते. नाममात्र भाडे दिले की तिथे वीज व अन्य सोयी उपलब्ध होतात. बाथरूमची व्यवस्था असते. कधी एखाद्या कॅम्पमध्ये ती १५-२० दिवस मुक्कामही करते. तेव्हाचा तिचा दिनक्रम असतो : सकाळी लवकर उठून पायी फिरायचे. आंघोळ, खाणे झाले की कॅरॅव्हॅनबाहेर खुर्ची टाकून वाचन वा आजूबाजूच्या लोकांबरोबर गप्पा! संध्याकाळी थोडा स्वयंपाक, टीव्ही पाहणे, नकाशावरून पुढील प्रवासाची आखणी.. आणि रात्री कॅरॅव्हॅनमध्ये झोपून जाणे!
अमेरिकेत अ‍ॅनेप्रमाणे कॅरॅव्हॅनमध्ये राहणारे खूप वृद्ध आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. कारण कोणतेही बंधन नाही. ताप नाही. घराचा कर भरा, निगा व स्वच्छता राखा, लॉन लावा, झाडांचे पाहा- हे काही नाही. कधीही, कोठेही भटकता येते. फिशिंग, ट्रेकिंग, स्कीइंग वगैरे छंद जोपासता येतात. वैद्यकीय विमा असतोच. त्यामुळे कोठेही वैद्यकीय मदत मिळते. दोघांनी वा अगदी एकटय़ाने फिरण्यासाठीही अमेरिका सुरक्षित आहे. सगळेजण एकमेकांना मदत करतात. त्यामुळे बरेच लोक हे असं स्वच्छंदी जीवन मस्त उपभोगताना दिसतात.
हे चित्र आर्थिक व शारीरिकदृष्टय़ा ठाकठीक असलेल्यांचं झालं. पण अगदी गरीब व अनेक आजारांनी जर्जर असलेल्या, उठता-बसताही न येणाऱ्या वृद्धांचं काय? त्यांच्यासाठी ‘ऑन व्हील’ अन्नव वैद्यकीय मदतीची सोय अमेरिकेत उपलब्ध आहे. अनेक सामाजिक संघटना ही जबाबदारी उचलतात. जनतेकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. ज्यांना घराबाहेर पडणे अशक्य आहे, ते या संस्थांशी संपर्क साधतात. दिवसातून एक-दोन वेळा घरी येऊन त्यांना अन्न दिले जाते. औषधे पुरवली जातात. वैद्यकीय सेवाशुश्रुषाही केली जाते. अनेक दुर्दैवी वृद्ध स्त्री-पुरुष या सेवेचा लाभ घेतात.
अमेरिकेत वृद्धांकडे समाज आदराने व आस्थेने पाहतो. त्यांना सरकारी साहाय्य तर मिळतेच; पण सर्व नागरिक कर्तव्यभावनेने त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात. बस वा गाडीत चढता-उतरताना त्यांना धक्काबुक्की होत नाही. सर्वत्र अग्रक्रम देऊन मदत केली जाते. ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना सन्मानाने वागवले जाते. म्हणूनच वृद्धत्वात मुलांकडे राहण्याची पद्धत त्यांना रुचत व शक्यही नसली तरी समाज त्यांच्याबरोबर असतो आणि त्याचाच मोठा आधार त्यांना वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा