गुलज़ार यांनी लिहिलेल्या ‘मिर्झा ग़ालिब’ या चरित्रपर पुस्तकाचा मराठी अनुवाद अंबरीश मिश्र यांनी केला आहे. गुलज़ार यांच्या ८१ व्या वाढदिवशी- म्हणजे १८ ऑगस्ट रोजी हे पुस्तक ऋतुरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. अंबरिश मिश्र यांनी त्यात लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही संपादित अंश..
मिर्झा ग़ालिब आपल्यावर पाळत ठेवतो. वेदनेचा ठणका देतो आपल्याला. दुबळं मन असेल तर ग़ालिबच्या वाटेला न गेलेलं बरं. कारण आरती प्रभुंनी म्हटल्याप्रमाणे :
..तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म.
आहे तयारी?..
ग़ालिबला समजून घेण्यासाठी आधी तयारी करावी लागते.
ग़ालिब आधुनिक आहे. प्रतिमासृष्टी, शब्दकळा, आशयसूत्रं या सगळ्याबाबतीत तो समकालीन वाटतो. त्याच्या रचनांना काळाच्या सुरकुत्या पडलेल्या नाहीत. तो ‘आज’चा वाटतो. अन् म्हणून आपला वाटतो.
‘उग रहा है दरो-दीवारसे सबज़ा, ग़ालिब/ हम बयाबां में है और घर में बहार आई है’ (माझ्या घराची रया गेलीय, बघा. उजाड घरातल्या िभती-दारांवर हिरवंगार गवत उगवलंय. मी अरण्यातून, वाळवंटातून भटकतोय आणि माझ्या घरात वसंत वस्तीला आलाय.) असं म्हणणारा ग़ालिब जिण्याच्या जात्यात भरडून निघालाय. ते आयुष्य १८६९ मध्ये संपलं. मात्र, त्याच्या गज़्ाला वासंतिक वाऱ्याप्रमाणे भारतीय उपखंडात आजदेखील फिरताहेत. हा आनंद फार मोठा आहे.
जगण्यानं ग़ालिबला छळलं. ‘मारा ज़्ामाने ने असदुल्लाह खान तुम्हे’ असं तो म्हणतो. कवितेनं त्याला मुक्ती दिली. निर्भय केलं. कणा मजबूत केला पोलादासारखा. त्याचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. आपण कुठं उभे आहोत हे त्याला ठाऊक होतं. आपल्यापर्यंत कुणी पोहोचू शकत नाही याची जाणीव त्याला होती. आपल्या सर्जनशीलतेवर त्याचा प्रचंड विश्वास होता. म्हणूनच तो म्हणू शकला- ‘घर में क्या था कि तेरा ग़म उसे गारत करता/ वो जो रखते थे हम इक हसरत-ए-तामीर, सो है’ (तू मला सोडून गेलीस. तुला वाटलं, माझं घर आता लयास जाणार. परंतु नाश पावण्यासारखं काही नव्हतं माझ्या घरात. आहे ती सर्जनाची प्रबळ इच्छा! ती अक्षय आहे.)
सच्च्या कलावंताला एक धुंदी जडते. त्याचा एक इगो असतो. तो निर्मितीच्या ध्यासातून येतो अन् म्हणून तो ‘इगो’ निर्मळ असतो. तो मीरेकडे होता. ती एका विलक्षण धुंदीतच म्हणते, ‘मेरे तो गिरीधर गोपाल, दुजा न कोई।’ ‘हमन का यार है दिल में, हमन को बेक़रारी क्या?’ असं म्हणणाऱ्या कबीराची धुंदी कधी उतरलीच नाही. आता ग़ालिबचं ऐका :
या रब जमाना मुझको मिटाता है किस लिए?
लौह-ए-जहां पे हर्फे-एक-मुकर्रर नहीं हूँ मं
(मी म्हणजे पुन:पुन्हा लिहिता येईल असं अक्षर नाही. मग हे जग मला पुसून टाकण्याची खटपट का करतेय?)
ग़ालिबच्या ‘इगो’ला नमस्कार.
आयुष्याशी टक्कर घेता घेता ग़ालिब एकदम सगळ्यांतून सुटतो अन् निर्मनुष्य होतो. आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे हा क्षण असतो. अशा क्षणांतून ग़ालिबच्या गज़्ालांचे स्फोट झाले.
तुकारामाचंदेखील असंच आहे. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ असं म्हणताना तो आत्मसाक्षात्कारासाठी हाडाची काडं करतो. तो टप्पा गाठता गाठता तुकाराम आणि ग़ालिब सगळ्या पाशांतून मुक्त होतात. आणि जगाच्या खेळाकडे मौजेनं पाहू लागतात. ‘तुका म्हणे आम्ही या जनाविरहित/ होउनि नििश्चत क्रीडा करू’ असं म्हणणाऱ्या तुकारामाला ‘बाज़्ाीचा-ए-अत्फाल है दुनिया मेरे आगे/ होता है शब-ओ-रोज़्ा तमाशा मेरे आगे’ (हे जग म्हणजे लहान मुलांचा खेळ आहे. दिवस-रात्र हा तमाशा माझ्या डोळ्यांदेखत सुरू असतो.) हा ग़ालिबचा शेर आवडला असता. दोघे थोर. तुकाराम आणि ग़ालिब. दोघांची आत्मसाधना थोर. दोघांची प्रतिभा उभाट.
ग़ालिबची मूळ प्रेरणा लोकशाहीवादी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर तो दिल्लीच्या सरंजामी संस्कृतीत जगला. दिल्ली दरबारचं त्याला मोठं अप्रूप वाटायचं. दरबारी मानपान, आदब, प्रतिष्ठा, तनखे, बक्षीस या गोष्टींचं त्याला आकर्षण होतं. आपल्या खानदानाचा, आपल्या फारसीच्या व्यासंगाचा अभिमान होता. असं असूनही त्याचं लिखाण अभिजनवादी नाही. यात विरोधाभास नाही. शेक्सपीअरच्या नाटकांत सरदार-दरकदारांचं कथानक असतं. परंतु शेक्सपीअर मानवी मनाचा तळ गाठतो आणि एक रसरशीत जीवनानुभव घेऊन ‘मॅकबेथ’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लीअर’ आपल्यासमोर येतात. ही प्रेरणा मानवतावादी, लोकशाहीवादी आहे. ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:’ असं म्हणणारा ऋग्वेद आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असं म्हणणारे ज्ञानेश्वर लोकशाही मूल्यांचाच पुरस्कार करत असतात.
एक राजकीय विचारसरणी म्हणून, शासनपद्धती म्हणून विसाव्या शतकात लोकशाहीचा प्रसार आणि स्वीकार झाला. त्यासाठी जमीन तयार करण्याचं काम ग़ालिबनं एकोणिसाव्या शतकात केलं. साधारण माणसाला त्यानं साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं. दरबारी फारसीचा त्याग करून तो उर्दूत लिहू लागला. ही फार मोठी सांस्कृतिक घटना होती. उर्दूमुळे तो लोकांपर्यंत पोहोचला. एक भाषा म्हणून उर्दूच्या सगळ्या शक्यता त्यानं धुंडाळल्या. तो मोठा झाला. उर्दूला त्यानं मोठं केलं. उर्दूवर त्यानं मोत्यांचे दागिने चढवले. ग़ालिबच्या काव्यात भारतीय विचारपरंपरेतलं शहाणपण उतरलंय. त्यावर कैक पिढय़ांचं वैचारिक पोषण झालं. ग़ालिब नावाचा दिवा समोर ठेवून त्याच्यानंतर आलेल्या कवींनी कागदाला पेन लावलं. ग़ालिबच्या अनेक काव्यपंक्तींना वाक्प्रचार आणि म्हणींचा दर्जा मिळाला. उर्दूला कडेवर घेऊन ग़ालिब लोकसंस्कृतीच्या गंगेत उतरला. दोघं पावन झाले. अन् भारतदेखील. आजसुद्धा ग़ालिबचा विषय निघाला की उर्दूला पान्हा फुटतो.
ग़ालिब आणि दिल्लीचं प्रेमप्रकरण अगदी जोरात सुरू होतं. त्यात १८५७ च्या बंडानं बिब्बा घातला. नंतर ग़ालिब खचला. बंडाचे चार महिने दिल्ली जळत होती. खूप िहसाचार झाला. ग़ालिबचे आप्तस्वकीय, परिचित भरडून निघाले. अनेकजण मरण पावले. अनेकांना फाशी झाली. काही गाव सोडून गेले. ग़ालिबचा सख्खा धाकटा भाऊ त्या वर्दळीच्या काळात वारला. सगळीकडे अंदाधुंदी माजलेली. भावाच्या दफनविधीची सोय लावता लावता ग़ालिब बेजार झाला. दिल्लीचा विध्वंस ग़ालिबच्या डोळ्यांदेखत झाला. तो म्हणाला :
मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्यूं रातभर नहीं आती
मोगल साम्राज्याची अखेर होणारच होती. त्यावेळची एकूण परिस्थितीच तशी होती. परंतु मोगल साम्राज्याबरोबर मोगल संस्कृतीही लयास गेली. इंग्रजांनी सगळं रीतसर केलं. ग़ालिबचं दु:ख हे होतं.
जुनी व्यवस्था मोडकळीस येते आणि तिच्या जागी नवी व्यवस्था येते, हा निसर्गाचा नियम आहे. दिल्लीत हेच घडलं. परंतु स्थित्यंतराच्या त्या काळात इंग्रज भलेपणानं वागले नाहीत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यांनी जेत्याच्या गुर्मीत सगळं केलं. पुढे फाळणीच्या वेळीदेखील इंग्रज असेच हडेलहप्पी वागले. बंड मोडून काढताना इंग्रजांनी कमालीचा निर्दयपणा दाखवला. राजघराण्यातल्या २१ राजपुत्रांना एका दिवसात फासावर लटकवण्यात आलं. नवी मांडणी करताना इंग्रजांनी धूर्तपणा दाखवला. त्यांनी दिल्लीची सूत्रं लालामंडळींच्या आणि सावकारांच्या हाती दिली. हे केवळ सामाजिक-राजकीय परिवर्तन नव्हतं. भारताची सांस्कृतिक मूल्यं पायदळी तुडवण्याचा हा पाशवी प्रकार होता. ग़ालिबचं दु:ख हे होतं.
मोगल संस्कृतीत भारताचं सांस्कृतिक-सामाजिक ऐक्य घडून आलं. त्यामागे फार मोठी अन् उज्ज्वल परंपरा होती. स्थानिक िहदूंना त्रास देऊन तुम्हाला राज्य करता येणार नाही, ही बाबरची सूचना त्याच्या वंशजांनी निष्ठेनं पाळली. त्यामुळे िहदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. शाहजहानचा मुलगा दारा शिकोह वेदांचा अभ्यास करायचा. िहदू प्रजेनं अकबर बादशाहला ‘महाबली’ ही पदवी दिली होती. मुसलमान संतांच्या चौदास दग्र्यावर िहदू भाविक माथा टेकत. ग़ालिबचा पट्टशिष्य हरगोपाल ‘त़फ्ता’ हा कायस्थ होता. रामलीलेची मिरवणूक महालावरून गेली पाहिजे अशी ‘जफर’ बादशाहाची सूचना होती.
या सरंजामशाहीच्या काळात ग़ालिब, मीर तक़ी मीर (हा थोडा अगोदरच्या काळातला), ज़्ाौक, अझुर्दा, मोमिन असे श्रेष्ठ शायर झाले. त्यांनी उर्दूचं उत्तम संवर्धन केलं. उर्दू ही संपर्कभाषा म्हणून भराभराटीस आली. उर्दू काव्याचा अभ्यास असणं, गज़्ाल-शेर तोंडपाठ असणं, संभाषणात उर्दू काव्यपंक्ती खुबीने पेरणं, किस्से सांगणं (दास्तांगोई), कवितेला योग्य त्या ठिकाणी दाद देणं, ही रसिकतेची, सुसंस्कृतपणाची लक्षणं मानली जायची. काव्यानंदाची धुंदी मुसलमानांना चढत असे, तशीच िहदूंनादेखील.
त्या काळातली शायर मंडळी संघटित धर्माशी फटकून वागत. यात ग़ालिब आघाडीवर होता. त्यानं मुल्ला-मौलवींची भरपूर थट्टा केलीय. पण म्हणून कुणाच्या भावना दुखावत नसत. कारण दुखावलेल्या भावना गोंजारण्यासाठी आजचे राजकारणी तयार असतात. तेव्हाचं िहदू-मुस्लीम ऐक्य राजकारणावर आधारलेलं नव्हतं, ना मतांसाठी होतं. आपण एक आहोत, ही भावना लोकांत अतिशय खोल रुजली होती. लोकसंस्कृतीत, रोजच्या जगण्यात, सामाजिक व्यवहारात ऐक्याचं दर्शन घडत असे. तो केवळ विद्यापीठीय परिसंवादाचा विषय नव्हता.
त्या काळात मुसलमान विद्वान धर्मावर विस्तृत आणि सांगोपांग चर्चा करत. निषेधाला वाव होता. प्रतिपक्षाच्या मताची बूज राखण्याची उदारता वैचारिक क्षेत्रात होती. संघटित धर्मापेक्षासुद्धा परंपरेतून आलेले शहाणपण सांगणारा अवलिया-फकीर लोकांना आपला वाटायचा. ग़ालिब या अपूर्व अशा गंगा-जमनी संस्कृतीचा आणि सूफी परंपरेचा राजदूत होता. हे समृद्ध सांस्कृतिक संचित ब्रिटिशांनी मोडीत काढावं याचं त्याला अतोनात दु:ख झालं.
ग़ालिबनं १८६९ साली या जगाचा निरोप घेतला. त्याची अखेरची र्वष निराशेत गेली. आधी निराश होता. मग आस्ते आस्ते नि:संग झाला. निर्मनुष्य.
नव्या राजवटीशी जुळवून घेण्याचे प्रयत्न त्यानं अध्र्यामुध्र्या मनानं केले. पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर रॉबर्ट मॉन्टगोमेरी याला त्यानं एक ‘कसीदा’ (प्रशंसागीत) लिहून धाडला. लेफ्टनंट गव्हर्नरच्या उत्तराच्या पत्रात ग़ालिबचा ‘खानसाहेब’ असा उल्लेख होता. ब्रिटिशांनी ग़ालिबचं पेन्शनचं प्रकरण सामोपचारानं मिटवलं. त्याचे सगळे पसे चुकते केले. तरीही, ‘संपत आला खेळ, दिव्याचे संपुन गेले तेल’ अशी ग़ालिबची अवस्था झाली.
‘ऐहिक कटकटींवर एकच रामबाण उपाय म्हणजे मरण’ असं त्यानं एका गज़्ालमध्ये म्हटलंय. ती ओळ अशी- ‘ग़म-ए-हस्ती का ‘असद’ किससे हो जुज़्ा मर्ग इलाज.’
ग़ालिब बोलला तसा वागला.
० ० ०
गुरूचं मोठेपण शिष्यामुळे सिद्ध होतं असं म्हणतात. हरगोपाल ‘त़फ्ता’, हाली हे ग़ालिबचे त्याच्या हयातीतले शिष्य. इतरही असतील. एकविसाव्या शतकातला ग़ालिबचा एकमेव, एकमेवाद्वितीय आणि तेजस्वी शिष्य म्हणजे गुलज़ारजी. गुलज़ारजींना आजवर अनेक मानसन्मान मिळाले. यापुढेही अनेक मिळतील. परंतु ग़ालिबचा शिष्य हा त्यांचा सगळ्यांत मोठा सन्मान आहे.
ग़ालिबला आपण पाहिलं नाहीय. परंतु गुलज़ारजींमध्ये तो अधनंमधनं दिसतो. सौम्य, स्निग्ध वृत्ती. तेच खोल पाण्यातलं गहिरेपण. शांत चित्त. करारी बाणा. उत्तम लिखाण. उत्तम संभाषणचातुर्य. तीक्ष्ण विनोदबुद्धी.
गुलज़ारजींच्या वांद्रय़ाच्या घरी ग़ालिबचा एक अर्धपुतळा आहे. बठकीच्या खोलीत तो बसवलाय. आता असं आहे, की पुतळ्यातला असला म्हणून काय झालं? ग़ालिब शेवटी ग़ालिब आहे. तो संगमरवरी दगडातून बाहेर येत असणार. घरभर फिरत असणार. निवांत वेळी गुलज़ारजींशी गप्पा मारत असणार. कला-साहित्यावर दोघांची चर्चा रंगत असणार. तो आपल्याला दिसत नाही, ऐकू येत नाही. गुलज़ारजींना दिसतो, ऐकू येतो. मनस्वी कवीलाच हे शक्य आहे. म्हणतात ना, ‘जे न देखे रवि, ते देखे कवि.’
ग़ालिबचं सांस्कृतिक संचित गुलज़ारजींच्या हाती सुरक्षित आहे. हे संचित म्हणजे संस्कृतीचा व्यापक, बहुआयामी विचार. गुलज़ारजींच्या साहित्यात, त्यांच्या रूपेरी कलाकृतींमध्ये या विचाराचं अतिशय सुभग असं दर्शन घडतं. ग़ालिबचा हा धागा कधी तुटणार नाही. कारण वस्त्र विणायला गुलज़ारजी बसले आहेत.
‘मिर्झा ग़ालिब’ लिहून गुलज़ारजींनी आपल्या गुरूचं ऋण अंशत: का होईना, फेडलंय. हा लौकिक अर्थानं चरित्रग्रंथ नाही. हा बडा खयाल नाही. ही ठुमरी आहे. ठुमरीच्या आसपास बरंच काही घडत असतं. अनेक प्रकाशकण तिच्याभोवती जमा होतात अन् ठुमरी उजळून निघते. या पुस्तकाचं असंच आहे. ग़ालिबचं आयुष्य, त्याचं सुख-दु:ख, त्याच्या अवतीभवतीची माणसं, त्यावेळचा दिल्लीचा दरबार, त्याचे मित्र आणि समकालीन कवी, त्याचे नातलग.. असे छोटे छोटे, लुकलुकणारे असंख्य ठिपके जोडून गुलज़ारजी ग़ालिबचं चित्र तयार करतात. ते हृद्य आणि अविस्मरणीय आहे. या पुस्तकातला ग़ालिब स्थिती-गती, सुख-दु:ख, जन्म-मरण, पाप-पुण्य या सगळ्यांच्या पलीकडे गेलाय. अथांगापलीकडच्या गावात उभा आहे. ‘कधी गूढगंभीर आत्मप्रकाशी/ कधी गर्जतो सागराच्या बळानें/ कधी कापतो बोलता आपणाशी’, असा. असा ग़ालिब शब्दांत मांडणे हीच एक किमया. ती केवळ गुलज़ारजीच करू शकतात.
गुलज़ारजींच्या चित्रमय भाषाशैलीमुळे ‘मिर्झा ग़ालिब’च्या सौंदर्यात भर पडलीय. छोटय़ा छोटय़ा आणि अर्थगर्भ वाक्यांतून, संवादांतून ग़ालिब समग्रपणे वाचकासमोर उभा राहतो.
गेल्या वर्षी गुलज़ारजींच्या ‘डय़ोढी’चा मराठी अनुवाद करण्याचं भाग्य मला लाभलं. ‘मिर्झा ग़ालिब’चं काम मी करावं अशी काही दिवसांनी गुलज़ारजींची आज्ञा झाली. ती मी शिरसावंद्य मानली. ‘डय़ोढी’मध्ये गुलज़ारजींनी मानवी स्वभावाचं दर्शन घडवणाऱ्या, छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून फुलत जाणाऱ्या कथा लिहिल्या आहेत. ‘डय़ोढी’त मनोज्ञ रेखाटनं आहेत. ‘मिर्झा ग़ालिब’ हे भव्य पोट्र्रेट आहे. ग़ालिब आणि गुलज़ारजींच्या मागे तंबोरा घेऊन मी बसलो. ‘मिर्झा ग़ालिब’च्या संदर्भात हीच माझी भूमिका आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा