सिमल्याला शेरगिल कुटुंबाचं पूर्वापार घर होतं, आसपासच्या पहाडी, कांग्रा लघुचित्रशैलींची चित्रं त्यामुळे पाहाण्यात आली होती. मात्र खरा फरक पडला अजिंठ्याला जाऊन आल्यावर. नेमका हा काळ ‘श्रेष्ठ भारतीय कले’च्या पुनरुत्थानाचा चंग अनेकांनी बांधलेला असतानाचा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुलगी झाली हो…’ या मुक्तनाट्याचा प्रत्येक प्रयोग ‘करू पहिलं नमन जोतिबाला, ज्यानं स्त्रीमुक्तीला जन्म दिला’ या गाण्यानं सुरू व्हायचा. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि आचरणामुळे स्त्रीचं स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्व मान्य व्हायला मदत झाली, याची आठवण प्रेक्षकांना दिली जायची. त्या गाण्यानंतर सादर होणाऱ्या प्रयोगातून, स्त्रियांच्या ‘व्यक्ती’पणाची जाणीव प्रत्येक प्रेक्षकाला व्हावी अशी तडफ दिसायची. पण दुसऱ्या बाजूनं असंही म्हणता येईल की, नाटक या माध्यमातून ४०-४५ वर्षांपूर्वीसुद्धा हे करावं लागायचं. त्याआधी मामा वरेरकरांच्या नाटकांमधल्या स्त्रीपात्रांनी खरं तर स्त्रीचं ‘व्यक्ति’त्व दाखवून दिलं होतं. पण त्याचा परिणाम काही गावोगावच्या मराठी प्रेक्षकांवर झालेला नाही, ही परिस्थिती असल्यामुळेच तर ‘मुलगी झाली हो…’ सारखा प्रयोग करावा लागला.

अमृता शेरगिलबद्दल लिहिताना हे सगळं आठवतंय. आधुनिक भारतीय दृश्यकलेतल्या स्त्रिया हा विषय सुरू करताना अमृता शेरगिलबद्दलच पहिल्यांदा लिहायचं, असा प्रघातच पडून गेलेला आहे. जणू पहिलं नमन अमृताला… पण अमृता शेरगिल जिवंत असताना भारतातल्या काहीजणींवर/ काहीजणांवर तिच्या चित्रांचा परिणाम झाला असं नाही दिसलेलं. तिच्या जगण्याबद्दल ती जिवंत असतानाही बोललं/ लिहिलं गेलं, हे जगणं निराळं आहे याची दखल घेतली गेली, म्हणून त्या जगण्याचा प्रभाव त्या काळात कुणावर पडला असं काही झालं नाही. तिच्याकडे नेहमी अद्वितीय म्हणूनच पाहिलं गेलं. ते खरंही होतं म्हणा. शीख राजघराण्याशी दूरचा संबंध असलेले उमरावसिंग शेरगिल आणि हंगेरीत जन्मलेल्या मारी आंत्वानेत गोटेस्मान- एर्दोबाक्ते या दाम्पत्याची अमृता ही दुसरी मुलगी. १९१३ ते १९४१ एवढीच तिची हयात. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर (१९२१) आईवडिलांसह लहानगी अमृता पहिल्यांदा भारतात आली आणि दुसऱ्या महायुद्धाआधी (१९३४) पुन्हा आली. मधल्या काळात हंगेरी आणि फ्रान्स तसेच युरोपात कुठे कुठे राहिली. पॅरिसमध्ये तिनं कलाशिक्षण घेतलं. उमरावसिंग संस्कृतचे जाणकार आणि फोटोग्राफीचा छंद जोपासणारे. आईला नाट्यकला आणि गाण्याची आवड. या कुटुंबाचे भरपूर फोटो पुढल्या काळात- विशेषत: १९९७ नंतर प्रदर्शित झालेले आहेत आणि त्यापैकी अनेक फोटोंमध्ये हे कुटुंब निरनिराळ्या वेषभूषांमध्ये दिसतंय!

‘निरनिराळ्या वेषभूषांमध्ये’ या तपशिलाबद्दल पुढे थोडा विस्तार होईलच, पण ‘१९९७ नंतरच अमृता शेरगिलकडे विशेष लक्ष का गेलं?’ याबद्दल आधी. आपल्या देशानं १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला, तेव्हा देश म्हणून आपण कायकाय कमावलं यावरल्या चर्चा चित्रकलेबद्दलही झाल्या. दिल्लीच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’त (एनजीएमए) अमृता शेरगिलच्या कलाकृती कैक वर्षांपासून होत्याच, पण आधुनिक चित्रकलेत भारतीयता आणणाऱ्यांमध्ये तिचं स्थान मोठं आहे, या अभ्यासकांच्या मताची उजळणी १९९७ मध्ये झाली. अबनीन्द्रनाथ टागोर, अब्दुररहमान चुगताई, जामिनी राय, दक्षिणेकडचे वेंकटप्पा या चित्रकारांनी विसाव्या शतकातल्या भारतीय चित्रकलेला पाश्चात्त्यांच्या अनुकरणापासून दूर नेण्याचं मोठं काम आधीच केलेलं असूनही यासंदर्भात अमृता शेरगिलचं नाव घेतलं जातं, हे विशेष आहे. तिनं नेमकं काय केलं?

यथातथ्यवादी पाश्चात्त्य चित्रणात १८७२ पासूनच मोठे बदल घडत होते. व्यक्तिवादाला बहर आलेला होताच आणि त्यातून चित्रकारदेखील ‘इम्प्रेशनिझम’ पासून नवनव्या शैली शोधण्याची असोशी दाखवू लागले होते. हा काळ भरात असताना, १९३०च्या दशकापासून पॅरिसमध्ये अमृता शेरगिल यांचं कलाशिक्षण सुरू होतं. पोस्ट-इम्प्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव या शिक्षणामुळे त्यांच्यावर होता. पण त्या काळी गाजलेल्या पॉल गोगँ यांच्या ‘ताहिती बेटावरल्या चित्रां’चं मोठं आकर्षण अमृता यांना वाटलं. यातूनच ‘सेल्फ पोर्ट्रेट अॅज ताहितियन’ हे आत्म-चित्र त्यांनी केलं, त्यावरचा गोगँचा प्रभाव वेषभूषेतून थेटच दिसतो. गोगँच्या ताहिती-चित्रांमध्ये पुढल्या काळात सपाट रंगलेपन दिसू लागलं होतं, त्याआधी मात्र गोलाई दाखवण्यासाठी रंगांचा आणि ब्रशच्या फटकाऱ्यांचा मुक्त वापर तो करत असे. त्याचा परिणाम अमृता शेरगिल यांच्या या चित्रावर अधिक आहे.

शेरगिल यांच्याही चित्रांतल्या रंगलेपनात सपाटपणा आला. पण तो पॅरिसच्या शिक्षणानंतर भारतात परतल्यानंतर. सिमल्याला या कुटुंबाचं पूर्वापार घर होतं, आसपासच्या पहाडी, कांग्रा लघुचित्रशैलींची चित्रं त्यामुळे पाहाण्यात आली होती. मात्र खरा फरक पडला अजिंठ्याला जाऊन आल्यावर. नेमका हा काळ ‘श्रेष्ठ भारतीय कले’च्या पुनरुत्थानाचा चंग अनेकांनी बांधलेला असतानाचा… आनंद कुमारस्वामींचे लेख वाचून, कार्ल खंडालवाला यांच्याशी पत्रव्यवहारातून अमृता शेरगिल यांचा ‘भारतीयतेचा शोध’ पुढे गेलेला असल्याचं एकंदर अमृता शेरगिल यांच्या पत्रव्यवहाराचे दोन खंड सांगतात. पण त्याहीपेक्षा उपयोगी पडतील ती अजिंठ्यामध्ये अमृता यांनी केलेली रेखाटनं. मूळ आकृतीपासून ते ‘आजच्या भारतीय’ आकृतीपर्यंतचा प्रवास या रेखाटनांनी केला आहे. ‘ब्रह्मचारीज’, ‘ब्राइड्स टॉयलेट’ ही अमृता शेरगिल यांची गाजलेली चित्रं आहेत (त्याच्या प्रिंट्स मुंबईतही ‘एनजीएमए’त मिळतात), या चित्रांमधल्या आकृतींचा लयदारपणा, रंगलेपनातला सपाटपणा हे सारं अजिंठ्यातून आलेलं आहे. हा प्रवास टप्प्याटप्प्यानं झाला, हेही बाकीच्या चित्रांमधून दिसू शकतं. आकृती हळूहळू लयदार होत गेल्या, रंग सावकाश सपाट झाले. ही चित्रं पाहात असताना आणखी एक लक्षात येतं की, या चित्रांमध्ये भावदर्शनही येऊ लागलं होतं. वास्तविक, भारतीय विषयांकडे निव्वळ शैलीला वाव मिळण्यापुरतंच शेरगिल यांनी पाहिलं असतं, तरी त्यांचं स्थान इतिहासात पक्कं झालंच असतं. पण कदाचित दृश्यकला आणि नाट्यकला या दोन्हींचा संस्कार झाल्यामुळेही असेल, अमृता यांनी त्यापुढे जाण्याचा प्रयत्न केला. यातून स्त्रियांकडे पाहाण्याची त्यांची दृष्टीसुद्धा व्यक्त झाली.

हेही वाचा

अमृता शेरगिल पुन्हा (१९३८) युरोपात गेल्या. त्यांना तिथं ‘भारतीय चित्रकार’ म्हणून प्रसिद्धीही मिळाली. ‘ल इलस्त्रास्याँ’ या पॅरिसमधल्या नियतकालिकानं १९३८ सालच्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर साडी नेसलेल्या अमृता यांचा फोटो छापला. त्याआधी १९३७ सालच्या जानेवारीतच आपल्याकडल्या ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’नं असाच साडीधारी फोटो छापला होता. एकंदर ‘नायकवादा’पासून त्या काही फार दूर नव्हत्या आणि घराण्यामुळे असेल, लहानपणापासून सतत महत्त्व मिळत गेल्यामुळे असेल, पण प्रसिद्धी त्यांनी कधीही नाकारली नाही. निरनिराळ्या पोषाखांत (आता वेषभूषा नाही, पोषाखच) स्वत:ची छायाचित्रं काढून घेणं हे तरुणपणातही थांबलं नाही. पण पॅरिसमध्ये साडी नेसणं हा पोषाखाच्या पसंतीचा भाग होता की भारतीयत्व अधोरेखित करण्याचा, यावर दुमत असू शकतं. या एकदोन वर्षांत युरोपमधल्या हिवाळ्याची त्यांनी केलेली चित्रं सपाट रंगलेपनाची आहेत, त्यांमध्ये माणसं नाहीत. जणू युरोपची नीरसताच त्या दाखवून देत आहेत. यानंतर भारतात परतल्या तेव्हा फाळणीपूर्वीच्या लाहोरमध्ये व्हिक्टर या सहचरासह स्थायिक होण्याचं ठरवून त्यांनी भारतप्रेम दाखवून दिलं होतं. पण १९४१ मध्ये तिशीसुद्धा न गाठता त्यांचा मृत्यू झाला.

इथं अमृता शेरगिल यांच्या जीवन-कार्याचं वर्णन आपल्यापुरतं संपतं. इथून पुढे आपल्याला फक्त चित्रचौकटींमधूनच दिसणारी, ती अमृता उरते. ती जगली असती तर तिची स्त्रीचित्रं कुठे गेली असती? नंतरच्या काळात बी. प्रभा यांनी या चित्रांमधल्या आकृतींची आठवण येईल अशी चित्रं जरूर केली, पण ती रचनाचित्रंच ठरली, असं आज खेदानं म्हणावं लागतं. कदाचित, अमृताच्या चित्रांमधलं- स्त्रीचित्रांमधलं- भावदर्शन आणखी पुढं गेलं असतं. त्या काळातल्या भारतीय स्त्रीचा क्लान्तपणा, निमूटपणा, क्वचित बिचारेपणा आणि या भारतीय महिलांचं आपल्या आपल्यात रमणं हे अमृता शेरगिलच्या चित्रांमधून आज वाचता येतं… पण हा काळ अमृतानं १९४१ पर्यंतच थांबवलाय. पुढे १९६० नंतरचा टप्पा पाहायला ती हवी होती. १९८० नंतरच्या जाणिवा तिला तिच्या वयाच्या सत्तरी-पंच्याहत्तरीत भिडायला हव्या होत्या. किंवा आत्मचित्रांची आवड असलेल्या अमृतानं, पन्नाशीनंतरचं आत्मचित्र करायला हवं होतं… ही चित्रं झाली असती तर त्यातून स्त्रीवादी जाणीव दिसली असती आणि निव्वळ ‘शैली’साठी आठवली जाणारी अमृताची चित्रं कदाचित स्त्रीकडे पाहाण्याचा भारतीय दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत करू शकली असती. साधारण तिच्याच आगेमागे पण मेक्सिकोत जगणारी फ्रीडा काहलो. नायकत्ववाद ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी, या त्या काळातल्या मग्रूर भावनेशी फ्रीडानं थेट सामना केला. नवऱ्यापुढे (चित्रकार दिएगो रिव्हेरा) शरीरानं दुर्बळच होती ती, तरीही चित्रांमधून ती ठाम उभी राहिली. हे असे संघर्षाचे प्रसंग, तिशीपस्तिशीतल्या अमृतानंच निभावले असते.

या अपेक्षा जास्तही आहेत आणि अनाठायीसुद्धा. अमृता जगली नाही हेच खरं आहे. जाता जाता तिनं एक मात्र केलं- भारतीय महिलासुद्धा पूर्णवेळ चित्रकार म्हणून करिअर घडवू शकतात, हा संदेश स्वत:च्या जगण्यातून दिला. पुढे कधीतरी १९६० च्या दशकात ‘ईव्हज वीकली’ का कुठल्याशा नियतकालिकात, त्या वेळी तरुण असलेल्या नलिनी मलानी सांगत होत्या- मी पूर्णवेळ चित्रकार आहे!

एकंदरीत, अमृताच्या नसण्यामुळे काही अडलं नाही. तिच्या असण्यामुळे मात्र मोठा फरक पडला. ‘तिनं आणखी जगायला हवं होतं’ हे चुटपुट मानवी पातळीवर राहातेच, पण कलेच्या इतिहासाचा विचार केला तर या शब्दांपुढे एक प्रश्नचिन्ह उमटतं. ते तिथंच राहातं.