सलील वाघ
गेल्या अर्धशतकाहून जास्त काळ मानवाचं तत्त्वज्ञान आणि जीवनव्यवहार ज्या एका मोठय़ा घटकाभोवती अप्रत्यक्षपणे केंद्रित झालेले आहेत, तो घटक म्हणजे पर्यावरण आणि पर्यावरणीय परिप्रेक्ष्यातला मानव. गेल्या शतकाच्या प्रारंभी जगभरात समाजवाद हा जिज्ञासू बुद्धिमंतांच्या आणि स्वातंत्र्यप्रेमी प्रतिभावंतांच्या चर्चेचे (किंवा आकर्षणाचे) केंद्र होता. तसा आज पर्यावरणवाद हा जगभरच्या सुजाण नागरिकांच्या चिंतनाचा (आणि चिंतेचाही) विषय झालेला असताना याविषयीचं दर्जेदार संदर्भवाङ्मय निर्माण होणं अत्यावश्यक ठरलं आहे. मराठीत काही सन्मान्य अपवाद वगळता सखोल आणि दणदणीत असे पर्यावरणविषयक लेखन नाहीच. ही मराठीतली मोठी उणीव भरून काढणारा, वर्षां गजेंद्रगडकर यांचा मोठय़ा आकारातला सुमारे सव्वापाचशे पानांचा आणि एक हजाराहून जास्त अशा निसर्ग-पर्यावरणाच्या संज्ञा-संकल्पनांच्या नोंदी असलेला, त्या संकल्पनांचा सुयोग्य परिचय करून देणारा संदर्भग्रंथ ‘पर्यावरणाच्या परिघात’ या शीर्षकाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला आहे.
लेखिका स्वत: पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक आहेतच; शिवाय त्यांच्या शास्त्राभ्यासाला स्वयंसेवी उपक्रमांच्या स्वसहभागाची आणि निसर्गास्थेची जोड असल्याने या विषयाच्या तांत्रिक बाजूंची वैचारिक स्पष्टताही चोख असणे ही फार मोठी जमेची बाजू या अभ्यासाला लाभलेली आहे. तीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या जीवसृष्टीच्या प्रवासात जिवाला होणारं जगाचं ज्ञान आणि नंतरच्या टप्प्यांवर आजपासून दोन लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेलं त्या ज्ञानाचं मानवी भान हा सृष्टीविकासाच्या प्रत्येक टप्प्यावरचा एक महत्त्वाचा उत्प्रेरक घटक आहे. पर्यावरणाचा विचार हा केवळ समस्यांचा आणि उपाययोजनांचा विचार नसतो, तर त्यात मानवी तत्त्वज्ञानाचा विचारही अंतर्निहित असतो. माणसाचं पर्यावरणविषयक तत्त्वज्ञान हे त्याच्या जीवनदृष्टीतून प्रत्ययाला येतं आणि सृष्टीविषयीचा सम्यक विचार आकाराला येतो. लेखकाकडे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि ‘आज’च्या मुद्दय़ांची स्पष्टता असेल तर तो स्वत:चे पर्यावरणविषयक तत्त्वज्ञान (किंवा जीवनदृष्टी) अशा प्रकल्पांतून साकार करताना दिसतो. वर्षां गजेंद्रगडकर या गेली चारहून अधिक दशकं स्वत:ला भावलेल्या पर्यावरण-तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने पर्यावरणविषयक विचारांची मांडणी करताना, तर कधी त्यासंबंधीच्या कृती-प्रकल्पांमधे सक्रियतेने उतरून काम करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या आजवरच्या वाटचालीच्या प्रकाशात हा पूर्ण प्रकल्प एकहाती उभा केलेला आहे.
पर्यावरणशास्त्र ही अगदी अलीकडे (चार-पाच दशकांत) बहराला आलेली विद्याशाखा असल्याने त्याविषयीचे संदर्भसाहित्य मराठीत कमी प्रमाणात उपलब्ध आहे यात नवल नाही. त्यातून पुन्हा देशी भाषांतले पर्यावरणविषयक लेखन हे मोठय़ा प्रमाणात संकुचिततेने बाधित असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे राजकीयता, वैचारिक अभिनिवेश आणि तात्कालिकता यांच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्यांची मोठीच चणचण मराठीसारख्या भाषांना भासते. ती उणीव भरून काढण्याचे काम ज्या सकस संदर्भसाहित्याने होऊ शकते त्या साहित्यापैकी एक महत्त्वाचा असा पारिभाषिक संकल्पनांच्या नोंदींचा हा संदर्भग्रंथ आहे. चौकस वाचकाला वारंवार सामोरे जावे लागते अशा संकल्पना इथे पुरेशा नेमकेपणाने आणि तरीही वाचनीयतेने शब्दांकित केल्याने ‘पर्यावरणाच्या परिघात’ हा उद्दिष्टलक्ष्यी वाचनाचा किंवा तसेच निर्हेतुकपणे सहज चाळण्याचाही ग्रंथ झालेला आहे.
मुळात भाषेच्या वापरकर्त्यांना डोळय़ापुढे ठेवून रचलेला हा कोशसदृश संदर्भग्रंथ किंबहुना डिरेक्टरी अथवा संकल्पनासंग्रह किंवा निर्देशिका अशा स्वरूपाचा हा प्रकल्प आहे. मराठी वाचक, विद्यार्थी, कार्यकर्ते, पर्यावरण पत्रकारितेतले वाचक-लेखक, भाषाअभ्यासक असा मोठा वाचकवर्ग अर्थातच या संग्रहाचा लाभार्थी ठरणार आहे. याशिवाय अनेक कॉर्पोरेट संस्थांना ( CSR) सीएसआर उपक्रमांसाठी, सरकारी आस्थापनांना- विभागांना कार्यालयीन लेखनासाठी- सूचना, पत्राचारादी आदानप्रदानासाठीही या संग्रहाचा मोठा उपयोग होऊ शकतो. लेखिकेने याला विश्लेषणात्मक कोश असे म्हटले असले तरी बव्हंशी हा स्पष्टीकरणात्मक कोश आहे. विश्लेषण येथे येते ते केवळ विषयसौंदर्याच्या अनुषंगाने. त्यामुळे अर्थातच तो विश्लेषणप्रचुर होऊन क्लिष्ट झालेला नाही. या कोशातल्या नोंदी केवळ कोरडय़ा तपशिलांच्या नसून त्यातून उभे राहिलेले प्रतिपादन माहितीची अचूकता आणि नेमकेपणा, तटस्थता आणि अभिनिवेशविरहित भूमिका यांनी युक्त असल्याने त्यांना आपोआपच ज्ञानवाङ्मयाचा स्तर प्राप्त झालेला आहे.
हरित राजकारणापासून (राजकीय) ते नरवाल (प्रशासकीय), प्रवाळ आणि प्रवाळ बेटांच्या संकल्पनांपासून (भूजीवशास्त्रीय) ते परिसंस्था असंतुलित करणारा टप्पा -डिस्ट्रिब्युशन थ्रेशोल्ड (पर्यावरणविज्ञान) पर्यंत, पर्यावरण संरक्षणासाठी कर्जमाफी – Debt for nature swap (अर्थशास्त्रीय)पासून ते दूरस्थ सक्रियता- clicktivism पर्यावरणप्रश्नांशी तटस्थ नाते (पारिभाषिक), चेर्नोबिल (आंतरराष्ट्रीय अणुकारण) पासून ते सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको (सामाजिक) आंदोलनापर्यंत अनेक विद्याशाखांमधला लेखिकेचा असलेला वावर या प्रकल्पाला उपयोजित संदर्भाचे मूल्य प्रदान करतो. नोंदींचा आंतरविद्याक्षेत्रीय माग आणि विवरण हे या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. या प्रकारचे विद्यासंकर मराठीसारख्या संस्कृतीला आजघडीला अत्यावश्यक आहेत. संदर्भग्रंथातल्या काही नोंदी गरजेनुसार दीर्घही झालेल्या आहेत, तर काही बहुपरिचित नोंदींची दखल थोडक्यात घेतली गेली आहे. हायबरनेशनला लेखिकेने शीतनिद्रा असा समर्पक आणि नावीन्यपूर्ण शब्द वापरलेला आहे. अशा प्रसंगी लेखिकेची प्रतिशब्दांची चोख निवड स्तिमित करते. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे मुख्य नोंदीत आवश्यक त्या ठिकाणी दिलेल्या सहनोंदी. उदाहरणार्थ ‘कोनेट वॉटर’च्या नोंदीतच ‘फॉसिल वॉटर’ हाही शब्द दिलेला आहे तर क्लिक्टिव्हिझमसोबत स्लॅक्टिव्हिझम या शब्दाचीही नोंद याविषयीच्या टिपणात घेतली आहे. अशा सहनोंदींनी या कोशाला संप्तृक्तता आलेली आहे. फूड वेब आणि फूड चेन या जवळपासच्या भासू शकणाऱ्या संकल्पनांचे पृथकत्व दाखवून देणाऱ्या भिन्न नोंदी या ग्रंथात आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी चित्रे आणि आकृत्यांचाही वापर केलेला आहे. अर्थात चित्रे, छायाचित्रे, आकृत्या यांचा वापर आणखी सढळपणे झाला असता तर त्याला अजून जास्त रंजकता आली असती. पुढच्या आवृत्तीच्या वेळी या सूचनेचा अवश्य विचार केला जावा असे वाटते.
पर्यावरणशाखीय संज्ञापन या विषयात मराठीत काही मोजके मान्यवर लेखक-पत्रकार वगळता किमान जागरूकतासुद्धा नाही. मराठीत वैश्विक पातळीवरचेच नव्हे, तर आपल्या दैनंदिन जिव्हाळय़ाचे विषय मातृभाषेतून वाचायचे, समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी बुद्धिमंतांनी विशेष प्रयत्न करायला हवे आहेत. यावर बहुतेक सुजाण नागरिकांचं एकमत असतं. मात्र स्वत: खपून त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्यांची आपल्याकडे वानवा असते. वर्षां गजेंद्रगडकर यांनी अतिशय मेहनतीने संकल्पना ते ध्येयसिद्धी असा या संदर्भनोंदींच्या प्रकल्पाचा प्रवास करून मराठी वाचकांपुढे सादर केलेला आहे. संकल्पनांच्या नेमकेपणाला भाषेच्या लालित्याची आणि सुगमतेची जोड असल्याने हा ग्रंथ वाचनीय होण्याला मोठीच मदत झालेली आहे. एकंदरीत बहुशाखीय, आंतरविद्याशाखीय, व्यापक विषयविस्तार असलेला, तरी सोपा आणि वाचकसुलभ, देखणा असा नोंदीग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला आहे. हा दणकट ग्रंथ पर्यावरण-संज्ञापनाची निकड असणाऱ्या अभ्यासकांना अन सर्वसामान्य मराठी वाचकांना तर उपयोगी पडेलच, शिवाय लेखिकेच्या अन् प्रकाशकांच्या कीर्तीला चार चांद लावणारा ठरेल. लेखिकेने हा ग्रंथ पुढेमागे अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादून नेण्याचाही प्रयत्न करावा अशी सूचना शेवटी हे टिपण संपवताना करावीशी वाटते.
‘पर्यावरणाच्या परिघात’,-
वर्षां गजेंद्रगडकर, साहित्य संस्कृती मंडळ,
पाने – ५१२, किंमत – २५६रुपये.