१९७० च्या दशकात मराठीत अनेक नवे प्रकाशक दिसू लागले. मराठी प्रकाशन क्षेत्रात एक नवी पिढीच उदयाला आली, असे म्हणता येईल. या नव्या प्रकाशकांत ह. अ. भावे यांच्या ‘सरिता’ आणि ‘वरदा’ या दोन प्रकाशन संस्था होत्या. या दोन प्रकाशन संस्थांच्या माध्यमातून भाव्यांनी ग्रंथ प्रकाशनाचे वेगवेगळे प्रयोग केले. अनेक मोठमोठे प्रकाशन प्रकल्प राबवले. मराठी प्रकाशन क्षेत्रात भाव्यांचा एक दबदबा निर्माण झाला. १९७४मध्ये भावे दुर्गाबाई भागवतांना त्यांच्या ‘जातक कथा’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाची परवानगी मागायला भेटले. या भेटीचा परिपाक ‘सिद्धार्थ जातक’ या बहुखंडी ग्रंथाच्या प्रकाशनात झाला. त्यानंतर दुर्गाबाईंचे अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. भाव्यांची ओळख ‘दुर्गाबाईंचे प्रकाशक’ म्हणून होऊ लागली. त्यांच्या प्रकाशन संस्थांना एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यामुळे भावे त्यांच्या सहस्रचंद्र दर्शन समारंभाच्या प्रसंगी जेव्हा ‘मी आत्मचरित्र लिहितो आहे’, असं म्हणाले तेव्हा साहजिकच त्याबद्दल एक कुतूहल वाटू लागलं. दुर्दैवानं या समारंभानंतर काही महिन्यांतच भावे निधन पावले. त्यांचं आत्मचरित्र झाले का नाही असा संदेह वाटू लागला. सुदैवाने त्यांचं आत्मचरित्र पूर्ण झालं होतं आणि त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी ते प्रकाशितही झालं. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेल्या आत्मकथनाला जोडून त्यांच्या पत्नी मंदाकिनी भावे यांचं आत्मकथन समाविष्ट केलेलं एक जोड-आत्मचरित्र पुस्तक रूपात उपलब्ध झालं आहे. येथे हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे की मंदाकिनी भाव्याचं आत्मकथन हे भाव्यांच्या आत्मकथनाला पूरक असलं तरी ते केवळ पुरवणी स्वरूप नाही. अशी जोड आत्मचरित्रं क्वचितच प्रकाशित होत असतील. निदान मराठीत तरी एखाद्या प्रकाशकाचं असं जोड आत्मचरित्र नाही. अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भटांच्या पत्नीचं ‘आम्ही दोघं’ हे आत्मकथन प्रसिद्ध झालं आहे, परंतु त्याशिवाय कोणा मराठी प्रकाशकाच्या पत्नीचं आत्मचरित्र बहुधा प्रकाशित झालेलं नाही. त्या दृष्टीनं हे एक वैशिष्टय़पूर्ण पुस्तक आहे असं म्हणता येईल.
या जोड-आत्मचरित्राच्या शेवटी असलेल्या ५ परिशिष्टांची सुमारे ३० पृष्ठे वगळता हे जोड आत्मचरित्र सुमारे ३०० पृष्ठांचे आहे. त्यातील सुमारे २४० किंवा ८० इतकी पृष्ठे ही भाव्यांच्या आत्मकथनाची आहेत आणि उरलेली पृष्ठे ही मंदाकिनी भाव्यांच्या आत्मकथनाची आहेत.
भाव्यांचं आत्मकथन किंवा ‘प्रकाशनातील भावे प्रयोग’ वाचत असताना असं सतत जाणवत राहतं की कर्ता आणि कर्म या दोघांपैकी एकालाही न अनुसरणारे क्रियापद असलेला व्याकरणातला ‘भावे प्रयोग’ हा नाही. हा पूर्णपणे ह.अ.भावे या व्यक्तीचा कर्तरी प्रयोग आहे. स्वत:च्या कल्पना, स्वत:चे आग्रह, स्वत:ची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं हे आत्मकथन आहे. भाव्यांनी आपल्या आयुष्याची कालक्रमानुसार केलेली मांडणी या पुस्तकात नाही. आपल्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे कालखंड, आपले छंद, आपले मित्र, आपले कर्मचारी, आपले अपयश वगैरे वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येकी सुमारे सात-आठ पानांच्या लेखांचे हे संकलन आहे. या लेखांचा क्रमही काळानुरूप लावलेला नाही. पहिल्या सुमारे १०० पृष्ठांमध्ये १३ लेख आहेत. ते सर्व त्यांच्या प्रकाशन व्यवसायातील कारकिर्दीसंबंधीचे आहेत. त्यांनी धुळ्याहून स्थिरावलेला अभियांत्रिकी व्यवसाय बंद करून प्रकाशन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुण्याला स्थलांतर कसं केलं, यासंबंधी पहिला लेख आहे. यानंतर सर्व लेख व्यवसायातील वेगवेगळे अनुभव व प्रयोग यासंबंधी आहेत. १३वा लेख ‘वानप्रस्थाश्रम?’ हा आहे. तो २००३ साली वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा ठरवूनही ग्रंथ प्रकाशनाच्या ओढीमुळे (व्यसनामुळे) वानप्रस्थाश्रमाचा विचार प्रत्यक्षात न येता नवे नवे प्रकाशन प्रकल्प कसे आकारले हे सांगणारा आहे. या लेखानंतर त्यांचे बालपण, शिक्षण, नोकऱ्या, लग्न इत्यादी प्रकाशन व्यवसाय सुरू करण्यापूर्वीचा काळ व घटना यांबद्दलचे १७ लेख आहेत. त्यानंतर परत तीन लेख प्रकाशन व्यवसायासंबंधी आहेत आणि शेवटचा लेख हा त्यांनी स्वत:वर काहीशा मिश्कीलपणे लिहिलेला मृत्युलेख ‘श्रद्धांजली’ म्हणून आहे. सामान्यत: सर्व लेख खुसखुशीत आहेत. त्यात अनेक नमुनेदार किस्से आहेत आणि त्यामुळे भाव्यांचं आत्मकथन रंजक व वाचनीय झालं आहे. त्यात पुष्कळशा अनेक आत्मचरित्रांतून आढळणारा स्वसमर्थनाचा वा प्रौढीचा सूर कुठेही आठवत नाही. भाव्यांचेच शब्द वापरायचे तर आत्मचरित्र हे बहुधा ‘काय सांगू माझी कमाल!’ या स्वरूपाचं असतं. भाव्यांनी हे जाणीवपूर्वक टाळलेलं दिसतं. भाव्यांना प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून तर पुरस्कार मिळालेच आहेत, पण मराठा चेंबरसारख्या संस्थेकडून ‘उद्योजक’ म्हणूनही पुरस्कार मिळालेला आहे. परंतु ‘मला मिळालेले पुरस्कार’ असं प्रकरण या आत्मकथनात नाही किंवा पुरस्कारांचे फारसे उल्लेखही नाहीत. यातून ह. अ. भाव्यांचा सलग चरित्रपट डोळ्यांसमोर उभा राहत नसला तरी एका जिद्दी, धाडसी, बहुश्रुत, प्रयोगशील, काहीशा मिश्कील अशा नखशिखांत ग्रंथवेडय़ाचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे उभं राहतं.
भाव्यांनी ‘श्रद्धांजली’ या शेवटच्या लेखात म्हटले आहे- ‘संसाराच्या नाण्याला पती व पत्नी अशा दोन बाजू असतात. आत्मचरित्रात नाण्याची एकच बाजू पुढे आली आहे. मंदाकिनी भावे यांनी जर आत्मचरित्र लिहिले तर नाण्याची दुसरी बाजू समजेल.’ ‘पतंगाची दोरी’ ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.
एकमेकांना साथ देत ५५ वर्षांची दीर्घ वाटचाल केल्यानंतर झालेल्या वियोगानंतर आत्मकथन लिहिण्याचा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे निश्चितच कठीण आहे. बहुधा त्यामुळे मंदाकिनी भाव्यांचं आत्मकथन काहीसं त्रोटक झालेलं आहे, परंतु त्यातील प्रांजळ साधेपणा लोभसवाणा आहे. ते वाचत असताना भाव्यांची जिद्द, जाणकारी, बहुश्रुतता याबरोबरच मंदाकिनीबाईंनी दिलेला खंबीर आधार आणि सल्ला यामुळेच ‘सरिता’ आणि ‘वरदा’ या प्रकाशन संस्थांमार्फत मराठीतलं दुर्मीळ अक्षरधन उपलब्ध होऊ शकलं हे लक्षात येतं. भाव्यांनी पहिल्या भेटीतच मंदाकिनीबाईंना सांगितलं होतं, ‘मी महत्त्वाकांक्षी आहे. माझा पतंग आभाळात उंच उडणार. तू पतंगाची दोरी व्हायला हवे. तो भरकटू देता कामा नये.’ मंदाकिनी भाव्यांनी ही भूमिका नेमकी आणि नीटसपणे बजावली आहे, हे ‘पतंगाची दोरी’ वाचताना लक्षात येतं.
‘प्रकाशनातील भावे प्रयोग आणि पतंगाची दोरी’ – ह. अ. भावे, मंदाकिनी भावे, सरिता प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ३३२, मूल्य – ३५० रुपये.