नुकतेच अकाली निधन पावलेले प्रयोगशील अन् तरल संवेदनेचे चित्रपट दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्या कारकीर्दीचं विश्लेषण करणारा लेख..
प्रिय ऋतुपर्णो,
तू अचानक निघून गेलास. एखादा सिनेमा उत्कट क्षणापाशी आलेला असतानाच रिळं तुटून रंगाचा बेरंग व्हावा तसंच काहीसं झालंय तुझ्या जाण्यानं! तू अकाली गेलास आणि तुझ्याकडून काळाच्या पुढचे सिनेमे पाहण्याची सवय लागलेलं मन अस्वस्थ झालं. तुझ्या प्रत्येक सिनेमाबरोबर दृढ होत जाणाऱ्या आपल्या कलावंत व रसिक या नात्याला आता कायमची निरगाठ बसलीय.
तुझी पहिली ओळख झाली ती ‘तितली’मुळे! ‘तितली’चं विलोभनीय चित्रण, कर्णमधुर संगीत, मितभाषी, परंतु प्रभावी संवाद यामुळे तुझी ‘तितली’ लक्षात राहिलीच; पण त्याहीपेक्षा मनावर कोरला गेला तो वाढत्या वयानुसार प्रगल्भ होत जाणारा प्रेमाचा उत्कट आविष्कार! सिनेमातील व्यक्तिरेखांच्या मानसिकतेनुसार तू त्याचा अवकाश निवडायचास. ‘उन्नीषे एप्रिल’, ‘बारीवाली’ या सिनेमांतील व्यक्तिरेखांची मानसिक घुसमट व्यक्त करताना तू कोंदट, धुरकट अवकाशाची योजना केली होतीस. त्याच्या अगदी विरुद्ध ‘तितली’ची कथा सांगण्यासाठी तू दार्जििलगच्या निसर्गरम्य प्रदेशाची निवड केलीस. अर्थात् धक्कादायक वळणं घेणाऱ्या घटनांची जंत्री असणाऱ्या कथा सिनेमातून सांगण्यापेक्षा मानवी नातेसंबंधांच्या व्यामिश्रतेवर भाष्य करण्याचा तुला अधिक सोस होता.. जो तू कसोशीने सांभाळलास. व्यक्तिरेखांच्या कृतीपेक्षा प्रतिक्रियांवर तू नेहमीच अधिक भर दिलास. सिनेमा हा कवितेइतकाच तरल असू शकतो याची जाणीव तुझ्या ‘तितली’ने दिली. त्यानंतर तू पडद्यावर लिहिलेल्या कवितांचा आस्वाद घेण्याचा छंदच जडला.
ज्या सिनेमासृष्टीत तू वीस-बावीस र्वष वावरलास, त्या सिनेमासृष्टीचं अंतरंगही तू उलगडून दाखवलंस. त्यातील पोकळ संवेदनशीलता आणि बेगडी निष्ठा यांनाही तू सिनेमाच्या माध्यमातून उघडय़ावर आणलंस. ‘बारीवाली’तल्या बनलताचा आपला सिनेमा पूर्ण करण्यासाठी उपयोग करून घेणारा दिग्दर्शक चितारताना आपणही वास्तव जीवनात एखाद्या सिनेमाचं दिग्दर्शन करताना असंच वागत नाही ना, अशी बोच तुला लागली होती, हे तुझ्यातील माणूसपणाचं लक्षण होतं!
तुझे सिनेमे स्त्रीवादी असतात, अशी चर्चा बऱ्याचदा होते. पण मला वाटतं, स्त्री-पुरुष या भेदापेक्षाही दोन भिन्न विचारसरणीच्या किंवा स्तरांतल्या व्यक्तींमधील वैयक्तिक संघर्षांचं चित्रण तुझे सिनेमे करतात. तुझ्यातील सर्जकाला परकायाप्रवेशाची किमया किती सहजसाध्य होती!
असामान्य प्रतिभेचा कलावंत- मग तो सिनेमासृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेता असो वा कवी- आणि त्याच्या आसपासची माणसं यांच्यातील परस्परसंबंधांचा धांडोळा तू नेहमी घेतलास. ‘द लास्ट लियर’, ‘सोब चरित्रो काल्पोनिक’, ‘चित्रंगदा’, ‘जस्ट अनदर लव्हस्टोरी’ या सिनेमांत हा धांडोळा घेताना तू त्या असामान्य कलावंतांना केन्द्रस्थानी न ठेवता सामान्य वकूब असलेल्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून हा शोध घेतलास. कलावंत आणि त्याच्या आसपासची माणसं यांच्यातील व्यक्तिगत संबंध हे कधी आदरयुक्त भावनेचे, कधी कुतूहलाने भरलेले, कधी द्वेषाची छटा असणारे, कधी स्पष्टपणे व्यक्त करता येणार नाहीत असे, तर कधी शारीर पातळीवरचे!
तुला मानवी मनाचा तळ शोधण्याचं वेड होतं. तुझी हुकूमत असलेल्या सिनेमा माध्यमातून ते वेड तू पूर्ण केलंस. बंगालच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं, सत्यजित राय, मृणाल सेन यांसारख्या तुझ्या आधीच्या पिढीतल्या दिग्दर्शकांचं ऋणही तू मान्य करायचास. मात्र, तू त्यांच्या प्रभावाखाली राहिला नाहीस. ‘बारीवाली’शी मृणाल सेन यांच्या ‘खंडहर’चं असलेलं साम्य हे त्यातील एकटेपणातून आलेल्या अपेक्षा एवढय़ा सूत्रापुरतंच मर्यादित होतं. पुढे तू स्वत:चा मार्ग शोधलास. तू ज्या समाजात वावरत होतास तिथे बहुआयामी जीवन जगणाऱ्या माणसांचं चित्रण केलंस. सिनेमातून प्रबोधन वगैरे करण्याच्या फंदात तू पडला नाहीस. तुझे सिनेमे व्यक्तिसापेक्ष होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन, सौमित्र चटर्जी यांच्यासारख्या बुजुर्ग अभिनेत्यांना तुझ्याबरोबर काम करण्यात धन्यता वाटायची यातच तुझी सिनेमा माध्यमावरची हुकूमत लक्षात येते. तुझी कथनशैली आकर्षक होती. परंतु क्लिष्टसुद्धा!
तू स्वत: माणूस म्हणूनही क्लिष्टच होतास. त्यामुळेच तुझ्या कलाकृतींपेक्षाही तुझ्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा अधिक झाली. कलावंताची कलाकृती आणि वैयक्तिक आयुष्य यांची गल्लत करणाऱ्या समाजात आपण राहतोय, हे आपलं दुर्दैव! कलाकृतीचं मूल्यमापन करताना ती निर्माण करणाऱ्या कलावंताच्या खाजगी आयुष्यावर बोट ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही, हे सत्य जागतिक सिनेमा पाहून प्रगल्भ (!) झालेले रसिकही जिथे समजू शकत नाहीत, तिथे सर्वसामान्य प्रेक्षकाची काय कथा? तुझ्या सिनेमातील आशयमूल्यांपेक्षा तू परिधान केलेले कपडे, तुझी देहबोली आणि तुझी लंगिकतेबद्दलची बिनधास्त मतं याबद्दल सिनेमासृष्टीत जास्त बोललं जायचं.
तू सिनेमा माध्यमाशी प्रामाणिक राहून काम करत राहिलास. दिग्दर्शन करता करता इतर दिग्दर्शकांच्या हाताखाली अभिनयदेखील केलास. चेतन दातारच्या ‘एक, माधवबाग’ या दीर्घाकाशी साम्य असणाऱ्या कथेवरील ‘मेमरीज् इन मार्च’ या इंग्रजी चित्रपटात गे व्यक्तिरेखा तू नि:संकोचपणे अभिनित केलीस. आपण ज्या माध्यमात काम करतो त्या माध्यमाचा वापर करून स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करण्याचं धाडस तू केलंस आणि भारतीय चित्रपटसृष्टीला दोन पावलं पुढं नेलंस. ‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’ (‘जस्ट अनदर लव्हस्टोरी’) हा सिनेमा तुझ्या कारकीर्दीतील मलाचा दगड ठरावा. चपल भादुरी या जात्रामधून स्त्रीपार्टीचं काम करणाऱ्या अभिनेत्यावर माहितीपट निर्माण करता करता अभिरूप या स्त्रण भावना असणाऱ्या पुरुष दिग्दर्शकाने ‘स्व’चा घेतलेला शोध चित्रित करणाऱ्या या सिनेमाने कलावंत व प्रेक्षक यांमधील संबंधांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. तुझ्या लंगिक धारणांमुळे समाजात निर्माण झालेली तुझी प्रतिमा, त्या प्रतिमांना जोपासत तू निर्माण केलेल्या ‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’ व ‘चित्रंगदा’सारख्या कलाकृती यामुळे खऱ्या अर्थाने कला व कलावंत यांच्यातील अद्वैताचं दर्शन भारतीय चित्रपटसृष्टीला झालं. अशा प्रकारचं प्रामाणिक जगणं व त्यातून निर्माण होणारे पेच तू पडद्यावर आणत असतानाच मृत्यूने तुला गाठलं. मृत्यूने निर्माण केलेला हा पेच आता कसा सुटणार ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा