मी ‘सत्यकथा’ वाचत होतो. तिथं इंदिरा संतांची कविता असायची. ‘स्त्री’ मासिकात आणि कुठं कुठं त्यांची कविता भेटायची. आणि मग दिवस आनंदाचा होऊन जायचा. त्यांची कविता साधेसुधेपणानं येते आणि सखोल होत जाते असं वाटायचं. पुढे त्यांच्याशी परिचय झाला. स्नेह निर्माण झाला. त्यातून मग पत्रव्यवहारही सुरू झाला. इंदिराबाईंच्या पत्रांत कधी ज्येष्ठपणाची, प्रेमाची धमकी असे. कधी माझ्या लेखनाविषयीची प्रतिक्रिया असे. कधी थट्टा करत लिहिलेली एखादी गोष्ट असे.
तर कधीतरी एखादं विनोदानं लिहिलेलं गंभीर तत्त्व असे. असं काहीही रंगबावरं असे.
इं दिराबाई संत औदुंबरला आल्या होत्या. आमच्या औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाचे मकरसंक्रांतीचं १९५७ सालचे स्नेहसंमेलन होते. पां. वा. गाडगीळ संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना भेटण्यासाठी इंदिराबाई आल्या होत्या. त्यांच्यासमवेत इंदुमतीबाई नंदगडकर होत्या.
त्या दोघी त्यांच्या बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन किलरेस्करवाडीला आल्या होत्या. इंदिराबाई कॉलेजच्या प्राचार्य आणि नंदगडकरबाई उपप्राचार्य. औदुंबरला गाडगीळ आल्याचे ऐकून त्या आल्या होत्या. विद्यार्थी किलरेस्करवाडीतच थांबले होते.
कवी सुधांशूंकडे गाडगीळ थांबले होते. तिथे इंदिराबाई आल्याचं मला कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. त्यांना बघायला मिळणार.. शक्य झालं तर त्यांच्याशी दोन शब्द बोलायला मिळणार, याचा आनंद होता.
मी सुधांशूंकडे गेलो. पां. वा. गाडगीळ यांची आणि इंदिराबाईंची चर्चा चालली होती. इंदिराबाई सौम्य, सुंदर, पण स्पष्ट बोलत होत्या. त्यांचं रूप सुंदर कविता लिहिणाराला शोभावं असंच दिसत होतं. मी त्यांच्या कविता वाचत होतो आणि हरखत होतो.
आला कुण्या देशाहून काळ्या पाखरांचा थवा..
विसावला तारेवर, निळे पाणी निळी हवा..
आणि काय काय..! मी ‘सत्यकथा’ वाचत होतो. तिथं त्यांची कविता असायची. ‘स्त्री’ मासिकात आणि कुठं कुठं त्यांची कविता भेटायची. आणि मग दिवस आनंदाचा होऊन जायचा. त्यांची कविता साधेसुधेपणानं येते आणि सखोल होत जाते, असं वाटायचं. सोपेपणातून येत खोलात जाणं सोपं नाही, याची विलक्षण जाणीव होत राहायची.
इंदिराबाईंशी बोलताना पां. वा गाडगीळ म्हणाले, ‘‘तुमच्या कवितेतलं उत्कट दु:ख सहन होत नाही. ते थोडं कमी करा.’’ म्हणजे काय? गतवर्षी आमच्या औदुंबरच्या संमेलनाला वि. स. खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेही इंदिराबाईंच्या कवितेविषयी असंच बोलले होते, ते आठवलं. ही मोठी माणसं असं काय बोलतात?
गाडगीळांच्या बरोबरचं इंदिराबाईंचं बोलणं संपत आलं. दोघींनी काही थोडं खायला घेतलं. चहा घेतला. मग त्या जायला उठल्या. म्हणाल्या, ‘‘मुलं वाटत बघत बसली असतील आमची.’’
पलीकडे भुवनेश्वरीवाडीत गाडी उभी करून त्या नावेनं आल्या होत्या.
त्या झपाटय़ानं नावेकडं निघाल्या. पण नाव नदीपलीकडं उभी होती. ती यायला अलीकडं थोडा वेळ लागला असता. त्यांच्याबरोबर सुधांशू, म. भा. भोसले आणि आणखीही दोघं-तिघं होते.
आता इंदिराबाईंशी आपल्याला बोलता येणार नाही, त्या घाईत आहेत, असं माझ्या लक्षात आलं. मी हिय्या करून सुधांशूंना म्हटलं, ‘‘माझी इंदिराबाईंशी ओळख करून द्या. मला त्यांच्याशी बोलायचं आहे.’’
सुधांशूंनी माझी ओळख करून दिली- ‘‘ हा कविता वाचतो. याला तुमच्याशी बोलायचं आहे.’’
इंदिराबाईंनी माझ्याकडं बघितलं. माझी चौकशी केली. म्हणाल्या, ‘‘काय बोलायचं आहे?’’ मी म्हटलं, ‘‘मी तुमच्या कविता वाचतो. तुमच्या कविता मला फार आवडतात.’’
‘‘माझ्या कोणत्या कविता तुम्हाला आवडतात?’’
‘मेंदी भरल्या नखानखांचे आलें चालत पिवळे पाऊल
बांधावरल्या बाळतणाला हळूच लागे नवखी चाहुल..’ इथंपासून मी त्यांना त्यांच्या तीन-चार कविता म्हणून दाखवल्या. ‘आलें मी कुठून कशी/ आलें मी हेच फक्त..’ पर्यंत.
क्षणभर त्या स्तब्ध झाल्या. मग म्हणाल्या, ‘‘या कविता तुम्हाला कुठून मिळाल्या?’’
मी म्हटलं, ‘‘मी ‘मेंदी’ कवितासंग्रह विकत घेतला आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘चांगली कविता मिळेल तिथून वाचा. चांगलं वाचन करा. मला पुन्हा कधीतरी भेटा.’’
त्यांच्या भेटीनं मला खूप हुरूप वाटला.
नंतर थोडय़ा वर्षांनी प्रकाश संत कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजमध्ये भूगर्भशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक म्हणून आले. त्यांचा स्नेह ही अपूर्व संधी होती. आणि त्यानिमित्तानं इंदिराबाईंच्या वारंवार भेटी होऊ लागल्या.
प्रकाश संतांना सोमवार पेठेत सुभाषराव जोशी यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांची जागा मिळाली होती. ती संतांना फार आवडे. ते तिथून दिसणाऱ्या दूरवर पसरलेल्या परिसराची रंगीत चित्रं काढत. व्हायोलिन वाजवत. लेखन करत. वाचन करत. आणि खूप बोलत राहत. कॉलेज सुटलं की ते खोलीवर येऊन सुंदर चहा करत. मग आम्ही फिरायला बाहेर पडत असू. सुभाषरावांच्या आई त्यांच्याशी ममतेनं वागत. प्रकाशच्या व्यक्तिमत्त्वाचं मोल त्यांना कळलेलं असावं. कधी प्रकाश बेळगावहून आले की येताना गुळाच्या पोळ्या घेऊन येत. मग त्या आम्ही गच्चीच्या पत्र्यावर बसून खात असू. कधी संध्याकाळी मी संतांना घेऊन आमच्याकडं जेवायला नेत असे.
या जागेत इंदिराबाई पहिल्यांदा आल्या. त्या, रवी आणि पुष्पा असे तिघेजण आले. क ऱ्हाड स्टेशनवर संध्याकाळी पाच वाजता त्यांची गाडी आली. त्यांना घेऊन यायचं काम माझ्यावर प्रकाशनी सोपवलं होतं. आभाळ भरून आलेलं. कुंद गारठा. टांग्यातून आम्ही निघालो आणि अतोनात पाऊस सुरू झाला. पावसातनं समोरचं काही दिसत नव्हतं. इंदिराबाईंना तो दांडगाई करत आलेला पाऊस फार आवडला. कसेबसे चिंब होऊन प्रकाशाकडे पोचलो. इंदिराबाईंची कविता आठवत होती..
‘तव आवडता बघ आला वर्षांकाळ
किती कुंद गारठा भरून ये आभाळ..’
त्या कवितेतला अनुभव साक्षात् अनुभवत होतो. दुसऱ्या दिवशी त्यांना व पुष्पाला क ऱ्हाड स्टेशनजवळचा ओगले काच कारखाना पाहायचा होता. मी त्यांना तो दाखवला. त्यांना कारखाना खूप आवडला. ‘‘काचेचं तांब्या-भांडं पुष्कळ दिवसांनी बघितलं,’’ असं इंदिराबाई म्हणाल्या. ‘‘पूर्वी प्रत्येक स्त्री गौरीच्या आराशीसाठी हे तांब्या-भांडं घ्यायची. माझ्या आईनंसुद्धा हे तांब्या-भांडं घेतलं होतं,’’ त्या म्हणाल्या. त्यावेळी त्यांनी प्रकाशकडं बराच मुक्काम केला. एक दिवस कोयना धरणही ते बघून आले. नंतर कोयनेच्या पावसाचा अनुभव सांगणारं इंदिराबाईंचं मला मोठं पत्र आलं बेळगावहून. त्यांचं मला आलेलं ते पहिलं सुंदर पत्र.
क ऱ्हाडला इंदिराबाई आल्या की त्या आमच्याकडेही येत. खूप बोलत. आमच्या आईनं किंवा बहिणींनी केलेल्या खाण्याच्या पदार्थाची वाहवा करत. त्यांना खाण्याच्या विविध पदार्थाविषयी, त्यांच्या कृतींविषयी खूपच स्वारस्य होतं. जिथं जातील तिथं स्वाद घेतलेल्या नव्या पदार्थाची कृती त्या विचारून वहीत उतरून घेत. त्यांच्या पाककृती उतरलेल्या अशा खूप वह्य़ा झालेल्या होत्या. मी त्या एकदा बघायला मागितल्या. महाकोशच तो! प्रत्येक पदार्थाची वेगळी वही होती. उदाहरणार्थ- हरभराडाळ, तूरडाळीपासून होणारे अनेक पदार्थ एका वहीत. मग त्या वह्य़ा ‘मौज’चे केटरिंगमधले तज्ज्ञ श्रीरंग भागवत यांच्याकडे दिल्या.
एकदा कोकणात कोळथर इथं चार दिवस मनोहर यांच्याकडं राहण्याचा योग आला. त्यांची आंब्याची राई पाहायला आम्ही गेलो. ती दाखवायला भांबेड नावाचा एक कामगार सोबत आला होता. तो म्हणाला, ‘‘झाडातसुद्धा जातपात आसती. हे बघा, ही हिकडं हापुसाची कलमी झाडं हाएत. त्यांना लागून ही गावठी आंब्याची झाडं हाएत. कलमी झाडं गावठी आंब्यांच्या विरोधी दिशेला वळलीत. कलमी झाडं त्या गरीब झाडांना आपल्यात मिसळून घेत न्हाईत.’’ खरंच, ती झाडं उलटय़ा दिशेनं वळलेली होती. रात्री मुठीएवढे काजवे अंधारात चमकत राहायचे. स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा दिवसा-रात्री चमचमायचा. आणि भुलवून टाकणारी ती झाडांची राई.. मी हे सगळं इंदिराबाईंना लिहिलं. त्यावर इंदिराबाईंचं मला पत्र आलं.. ‘तुम्ही हे मला पत्रात लिहिलंय. पण त्यावर तुम्ही लेख लिहा. छान होईल. नाही लिहिलात तर तुम्ही मला लिहिलेलं हे पत्रच मी श्रीपुंच्याकडे पाठवेन आणि (लेख समजून) छापायला सुचवेन.’
इंदिराबाईंच्या पत्रात कधी अशी ज्येष्ठपणाची, प्रेमाची धमकी असे. कधी एखादी माझ्या लेखनाविषयीची प्रतिक्रिया असे. कधी थट्टा करत लिहिलेली एखादी गोष्ट असे. कधीतरी एखादं विनोदानं लिहिलेलं गंभीर तत्त्व असे. काहीही रंगबावरं असे. मला त्यांनी पत्रात लिहिलं, ‘का कुणास ठाऊक! तुमचं लेखन वाचताना शरच्चंद्रांची आठवण येते आणि डोळ्यांना पाणी येतं.’ माझी सत्यकथेत आलेली एक कविता त्यांना आवडली. त्यावर त्यांनी मला लिहिलं, ‘पु. शि. रेग्यांची आठवण आली.’ माझ्या आणि प्रकाशच्या मैत्रीबद्दल त्यांनी मजेदार निष्कर्ष पत्रातून काढला. त्यावेळी प्रकाशचं विशेष लेखन होत नसे. लंपनचं भरधाव लेखन चालू झालेलं नव्हतं. मी तर क्वचितच लेखन करत होतो. इंदिराबाई नेहमी, प्रकाश आणि मी लेखन करावं, असा आग्रह करत आणि आमच्याकडून ते होत नसे. एकदा त्यांनी पत्रात लिहिलं, ‘‘तुमचा आणि चंदूचा (म्हणजे प्रकाशचा!) इतका स्नेह कसा, याचं रहस्य माझ्या लक्षात आलं. तुम्हा दोघांत साम्य कोणतं, तर तुम्ही दोघंही लेखन करत नाही.’’
बोलता बोलता इंदिराबाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही का लिहीत नाही? लिहिता; पण अगदी थोडं.’’ मी म्हटलं, ‘‘खरं सांगू का? लिहिताना माझी फार ऊर्जा संपते. लिहिताना क्षीण वाटतं.’’ अचानक त्या म्हणाल्या, ‘‘नाही तरी त्या ऊर्जेचं काय करणार आहात? संपेना ती.’’
इंदिराबाई एकदा आल्या. मी कागद, पेन घेऊन बसलो होतो. म्हणाल्या, ‘‘शांत का?’’
मी म्हटलं, ‘‘एक लेखन करत होतो. पण शेवटाला अडलंय.’’
‘‘काय लेखन आहे?’’
‘‘ललिताची एक मैत्रीण आहे. तिला ओळीनं सात मुली झाल्या.’’
‘‘छान आहे की! पर्ल बकची एक कथा आहे. त्या कथेतल्या बाईला अशाच ओळीनं सात मुली होतात. नवऱ्याला मुली आवडतात, पण बाईला मुलगा हवा असतो.’’
इंदिराबाई पुढं म्हणाल्या, ‘‘पुढं काय झालं?’’
‘‘त्या बाईची सासू मरते. तिलाच मुलगा हवा असतो.’’
‘‘मग?’’
‘‘सासूच्या पिंडाला कावळा शिवत नाही. शेवटी या सात मुलींच्या आईच्या दंडाला धरून तिला तिचा नवरा म्हणतो- ‘म्हण, मला मुलगा नाही झाला, तर मी दुसऱ्या लग्नाची परवानगी लिहून देईन.’ आणि नवऱ्याच्या आईच्या पिंडाला कावळा शिवला. इथं माझं लेखन अडलंय.’’
इंदिराबाई म्हणाल्या, ‘‘एवढंच ना? मी सांगते लेखनाचा शेवट. त्या सात मुलींच्या आईचंच दुसऱ्या पुरुषाशी लग्न लावून द्या.’’
इंदिराबाई असं अकस्मात बोलून जात.
ललितावर आक्कांचा जीव जडलेला. ती मुलींच्या शाळेत नोकरी करत होती. तिला सुट्टी लागल्यावर तिला, लहानग्या उदयनला आणि मला त्यांनी सुट्टीसाठी चार दिवस बेळगावला बोलावलं. ते त्यांच्याकडले चार दिवस मोठय़ाच आनंदाचे होते. तिथं रवी, वीणा, निरंजन, रमा होते. त्यांचं झाडीनं वेढलेलं, आर्किटेक्ट रवीनं डिझाइन केलेलं सुंदर घर होतं. अंगणात निरंजनची गवतात लपलेली पिवळीधमक धामीण होती. दांडगा कुत्रा होता. स्वयंपाकघरात वीणा म्हणे तो- सासरा असलेला संबा नावाचा बोका होता.
इंदिराबाईंना घरी सगळे ‘आक्का’ म्हणत.
आम्हीही त्यांना ‘आक्का’ म्हणू लागलो.
आक्का आम्हाला थोडं थोडं बेळगाव दाखवत होत्या. रवींनी बांधलेले पाटलांचे ओळीनं उभे असलेले भव्य बंगले दाखवले. एक दिवस डॉ. याळगींच्या घरी त्या आम्हाला घेऊन गेल्या. परतताना जवळकर बंधूंच्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेल्या. जवळकर काऊंटरला उभे होते. त्यांना त्यांनी आपण सांगितलेलं पुस्तक आलंय का, विचारलं. जवळकर म्हणाले, ‘‘तुम्ही ते माझ्या बंधूंना सांगितलं असेल. विचारतो.’’ जवळकर आपल्या बंधूंना घेऊन आले. ते दोघे जुळे भाऊ होते. आणि इतके दिसायला सारखे होते, की त्यातला कोण, ते ओळखणं अशक्य होतं. आक्का म्हणाल्या, ‘‘माझी नेहमी फसगंमत होते.’’ परतताना त्यांनी ललिताला एक सुंदर साडी घेतली. म्हणाल्या, ‘‘ही माहेरवाशिणीची साडी.’’
खूप पाऊस पडत होता. आणि शेजारी एक बांधकाम चाललेलं होतं. तिथनं एका कुत्र्याच्या पिलाचं ओरडणं ऐकू येत होतं. रमा सारखी आक्कांच्या मागं लागली होती- ‘ते पिल्लूू घरी घेऊन येऊ या.’ आक्का म्हणाल्या, ‘‘पाऊस थांबल्यावर त्या पिलाला बघून या. पण घरी आणू नका. तुझे आई-बाबा येऊदेत. मग त्यांना विचारून काय ते करा.’’ पाऊस ओसरल्यावर रमाबरोबर मी ते पिल्लू बघायला गेलो. एवढंसं गोंडस पिल्लूू होतं. ते घरी न्यायचं तिच्या फार मनात होतं. भिजून चिंब झालं होतं. काकडत होतं. मग तिनं घरातनं एका बाटलीतनं दूध घेतलं. पुसायला स्वच्छ फडकं घेतलं. पिलासाठी रमा सारखी कळवळत होती.
संत मंडळींना पशुपक्ष्यांचं खूपच वेड होतं. क ऱ्हाडला आमच्याकडं एक ‘पिंगल’ नावाचा बोका होता. तो आमच्यात राही, पण आम्हाला हात मात्र लावू देत नसे. पण तेच प्रकाश आमच्याकडे आले, की लगेचच त्यांच्या मांडीवर जाऊन बसे. उमाकडं तो सहजासहजी जाई. पिंगल हे त्याचं उमानंच ठेवलेलं नाव होतं. त्यांच्याकडं ‘रस्टी’ नावाचा कुत्रा होता. तोही असाच. अनीचं त्याचं सख्य होतं. डॉ. सुधाबाई सुरुवातीला या पशु-पक्ष्यांपासून काहीशा अलिप्त असत. पण पुढं त्यांच्यात त्या मिसळून गेल्या. आक्का आमच्याकडं आल्या की पिंगल तसाच त्यांच्याकडं जाई आणि माया करून घेई. आक्का म्हणत, ‘‘प्राण्यांना आपल्यावर कोण प्रेम करतं, ते सहज समजतं.’’
माझे इस्लामपूरचे लेखकमित्र मधु कुळकर्णी शिराळा कॉलेजचे प्राचार्य होते. ‘वळण’, ‘यात्रा’, ‘ते दहा दिवस’ असे त्यांचे काही प्रसिद्ध कथासंग्रह. आपल्या कॉलेजच्या पाहुण्या म्हणून इंदिराबाईंनी यावं असं त्यांच्या मनात होतं. मी त्यांना म्हटलं, ‘‘क ऱ्हाडला त्या येतील त्यावेळी त्यांना आपण विनंती करू या. त्या येतील तेव्हा तुम्ही क ऱ्हाडला या.’’
तसे ते आले. प्रकाशकडे आम्ही दोघेजण गेलो. इंदिराबाई त्यांना ओळखत होत्या. प्रकाश आणि मधु कुळकर्णी फग्र्युसनचे समकालीन. ‘साहित्य सहकार’मध्येही त्यांची भेट होत असे. इंदिराबाई त्यांच्या कॉलेजला येईन म्हणाल्या. मग त्यांनी मधु कुळकर्णी यांना म्हटलं, ‘‘तुमचं पत्र मिळालं. पण तुमची कॉलेजकाळातली लेटरहेड्स अजून संपली नाहीत का?’’
कुळकर्णी त्या प्रश्नानं थोडे वेंधळले. इंदिराबाई मला म्हणाल्या, ‘‘अहो, गुलाबी लेटरहेडवर कुळकर्णीनी मला पत्र लिहिलंय.’’ कुळकर्णीनी ते तसं अनवधानानं लिहिलं असणार; पण इंदिराबाई म्हणत होत्या ते थोडंसं गमतीनंच.
पुष्कळ वर्षांनी इंदिराबाईंनी साप्ताहिक ‘सकाळ’मधून ललितलेखन करायला सुरुवात केली ती विजय कुवळेकर यांच्या आग्रहामुळे. त्या लेखांचं मेहता प्रकाशन ‘मृद्गंध’ या त्या सदराच्या नावानंच पुस्तक प्रसिद्ध करणार होते. त्यावेळी इंदिराबाईंना अचानक हृदयाचा त्रास होऊ लागला आणि त्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल केले गेले. त्याचवेळी त्यांची नात- प्रकाश आणि सुधाबाई यांची कन्या उमा हिचा विवाह घरच्या घरी होणार होता. उमानं तिच्या शाळेच्या नियतकालिकात पूर्वी इंदिराबाईंवर एक छान लेख लिहिला होता. त्यात तिनं लिहिलं होतं- ‘‘आक्काचं आमच्यापेक्षा आमच्या पाणी तापवायच्या बंबावरच अधिक प्रेम. त्याच्यासाठी ती कागदांचे चिटोरे, कायबाय साठवून ठेवत असते.’’ उमाचं लग्न ठरल्याप्रमाणं झालं. इंदिराबाईंना बरं वाटत होतं. त्यांनी डॉक्टरांची परवानगी काढून मला आयसीयूत बोलावलं. ‘मृद्गंध’ला प्रास्ताविक लिहायचं राहिलं होतं. त्याचा आशय त्यांनी मला सांगितला. म्हणाल्या, ‘‘या आशयाचं लिहून ते तुम्ही प्रकाशकांकडं द्या. तेवढय़ासाठी पुस्तक अडून राहायला नको.’’ मी त्यांना ते लिहून काढून वाचून दाखवलं.
आक्कांना मी म्हटलं होतं- ‘‘मृद्गंध’ नावाचा विंदा करंदीकरांचा कवितासंग्रह आहे. तेच नाव तुमच्या पुस्तकाला कशाला?’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘असू दे.’’ त्यावर प्रकाशनी म्हटलं, ‘‘आक्का ऐकणार नाही. तिनं ठरवलं ते ती तडीला नेणारच.’’ नंतर इंदिराबाई कऱ्हाडला असताना एकदा विंदा करंदीकर आले होते. ते म्हणाले, ‘‘इंदिराबाईंना भेटून येऊ.’’ आम्ही त्यांच्याकडे गेलो. बोलता बोलता करंदीकर म्हणाले, ‘‘इंदिराबाई, तुम्ही तुमच्या संग्रहाला ‘मृद्गंध’ नाव दिल्यापासून माझा एक फायदा झाला.’’
‘‘कोणता?’’
‘‘अहो, वाचकानं ‘मृद्गंध’ आहे का, असं विचारल्यावर कौंटरवरचा माणूस माझा कवितासंग्रह ‘मृद्गंध’ काढून द्यायला लागला. त्याची किंमतही कमी आहे. तेव्हापासून माझ्या संग्रहाची आवृत्ती संपत आलीय.’’
इंदिराबाई आमच्याकडं आल्या असता आलोक काही लिहीत असलेलं त्यांनी बघितलं. तो स्वत:च्या कविता वहीत उतरवत होता. त्या कविता त्यांनी बघितल्या. मला त्यांनी त्या उतरून पाठवायला सांगितल्या. आणि एक दिवस त्या कवितांवरचा ‘खाणीतील आंतरहिरा’ हा आक्कांनी लिहिलेला लेख वाचायला मिळाला. तो त्यांच्या ‘फुलवेल’ या पुस्तकात समाविष्ट आहे. आलोक आणि उदयनवर त्यांची प्रेमाची दृष्टी असे.
‘मृद्गंध’ या त्यांच्या संग्रहातले काही लेख आक्कांनी कऱ्हाडला लिहिले. ते लिहायच्या आधी प्रकाशबरोबर लेखाची चर्चा होई. डॉ. सुधाबाईंनी- प्रकाशच्या पत्नींनी आक्कांच्या लेखनासाठी सुंदर मांडणी करून ठेवलेली असे.
बेळगावला झाडांनी, वेलींनी गच्च झालेल्या जागी त्यांचा आवडता झोपाळा होता. त्या तिथं तासन् तास बसून झुलत राहत. गप्पा मारत. वीणाबाई- रवीच्या पत्नी- त्यांना हवं नको ते पाहत.
हळूहळू आक्का थकत चालल्या. हृदयविकारानं त्यांना धरलं होतं. त्यात विस्मरणाचं वरदान आलं. रमाच्या जागी त्यांना रमवायला नातीच्या जागी पणती आली. आभा. निरंजन-आसावरी यांची मुलगी.
वसंत बापट इंदिराबाईंना बघायला म्हणून पुण्याहून क ऱ्हाडला आले. मला बरोबर घेऊन गेले. इंदिराबाई ओळखता येत नव्हत्या इतक्या बारीक झाल्या होत्या. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांच्या शेजारी पाटी-पेन्सिल ठेवलेली. लिहूनच एकमेकांशी संवाद साधायचा. गलबलून येत होतं. ‘कधीं कधीं न बोलणार..’ अशी त्यांची एक कविता होती. तीच ओळ सजीव होऊन समोर आली.
काही दिवसांनी श्री. पु. भागवत यांचा सांगलीहून फोन आला. ते आपली पुतणी डॉ. मालती घारपुरे आणि जामात प्रा. अशोक घारपुरे यांच्याकडे आले होते. म्हणाले, ‘‘इंदिराबाईंना भेटावं वाटतंय. त्या फारशा बऱ्या नाहीत. इकडे या. बेळगावला मिळून जाऊ.’’
बेळगावला गेलो तेव्हा वीणाबाईच सामोऱ्या आल्या. म्हणाल्या, ‘‘या. आज सकाळीच आक्कांचं थांबलेलं हृदय रिव्हाइव्ह केलं. आणि आता त्या सतत असंबद्ध बोलत राहिल्यात.’’
आम्ही आक्कांच्या जवळ जाऊन उभे राहिलो. त्यांचा असंबद्ध आवाज ऐकू येत होता.
श्री. पुं. ना. मी म्हटलं, ‘‘इंदिराबाई नाही आहेत, पण त्यांचा प्राणच आपण ऐकतोय.’’
‘‘होय.’’ भागवत म्हणाले.
आम्ही वरती झोपलो होतो.
दीड वाजता निरंजन वरती आला. म्हणाला, ‘‘आक्का गेली. आताच.’’ आम्ही खाली गेलो.
प्रकाशनी आणि रवीनं आक्कांच्या देहाला अग्नी दिला. प्रकाश चितेपासून दूरच्या कोपऱ्यात जाऊन उभा होता. मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. श्रीपु पाठोपाठ आले. त्यांनी प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवला. प्रकाशच्या डोळ्यांतून नि:शब्द अश्रू घळाघळा वाहत होते.
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
मी ‘सत्यकथा’ वाचत होतो. तिथं इंदिरा संतांची कविता असायची. ‘स्त्री’ मासिकात आणि कुठं कुठं त्यांची कविता भेटायची. आणि मग दिवस आनंदाचा होऊन जायचा. त्यांची कविता साधेसुधेपणानं येते आणि सखोल होत जाते असं वाटायचं.
आणखी वाचा
First published on: 09-09-2012 at 03:39 IST
मराठीतील सर्व अनामिक बहर हा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anamik bahar ha indira santa