आनंद करंदीकर anandkarandikar49@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकीकडे सरकार लाखो बेरोजगारांना नोकऱ्या दिल्याचे दावे करीत असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र त्यापासून कित्येक योजने दूर आहे. ही वस्तुस्थिती रोज येणाऱ्या तरुणांतील बेरोजगारीसंबंधीच्या बातम्यांतून दिसून येते. सरकारी नोकरीच्या मृगजळामागे लागणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वर्षांनुवर्षे कमी न होता उलट वाढतेच आहे. यामागे या तरुणाईची नेमकी काय मानसिकता आहे? बेरोजगारीच्या समस्येचा ऊहापोह करणारा लेख..
जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या विचारवेध संमेलनाचा विषय ‘बेरोजगारीसंबंधी’ असावा असे ठरले. त्यावर लगेचच चच्रेत सहभागी असलेले उत्साही तरुण म्हणाले की, या विषयावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगारांच्या मुलाखतींचा व्हिडीओ आपण बनवू आणि तो आपल्या यूटय़ूब चॅनेलवर पूर्वप्रसिद्धीसाठी ठेवू. सगळ्यांनाच हे पटले आणि ते कामाला लागले. त्यांनी पुण्यामध्ये सात-आठ बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखती एका बागेत घेतल्या. मी तो व्हिडीओ पाहिला आणि मला खूप अस्वस्थता आली. या अस्वस्थतेचे एक कारण उघड होते- हे तरुण-तरुणी सांगत होते ते अनुभव अस्वस्थ करणारेच होते. उदाहरणार्थ- एक तरुणी म्हणाली, ‘‘मुलीला शिकवून उपयोग काय, असे माझे नातेवाईक घरच्यांना विचारत आहेत. मी काहीच यश न मिळवता लग्नाला उभी राहिले तर नातेवाईकांच्या म्हणण्याला दुजोराच मिळेल. मग माझ्या धाकटय़ा बहिणीचे शिक्षण दहावीनंतर बंद होईल.’’ दुसरा म्हणाला, ‘‘गावाकडे ‘शून्य’ आहे. आता शून्यात परत जावे लागणार!’’ पण मला हे जाणवत होते की, माझ्या अस्वस्थतेमागे या बेरोजगार तरुण-तरुणींचे प्रश्न एवढेच एक कारण नाहीए; पण जास्तीचे काय कारण आहे, हे तेव्हा मला उमजले नाही.
मनातली अस्वस्थता कायम होती. या वर्षीच्या विचारवेध संमेलनाचे वक्ते ठरवायचे होते. मग मी विषयावर नव्याने विशेष वाचन सुरू केले आणि माझ्या अस्वस्थतेत अजूनच भर पडली. कारण बेरोजगारांच्या आकडेवारीबद्दल गेल्या चार-पाच वर्षांत केंद्र सरकारने एवढी धूळफेक चालवली आहे, की वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे कळणे आज कठीण झाले आहे. याबरोबरीनेच बेरोजगारांची परिस्थिती काय आहे याबद्दल जवळपास काहीच माहिती किंवा अभ्यास उपलब्ध नाहीत असेही लक्षात आले. एमपीएससीला किती विद्यार्थी बसतात याचे आकडे तीन लाख ते सात लाख या मर्यादेत सहजपणे फिरत असतात! याबाबत कोणी शहाणा असेही म्हणेल की, ‘‘त्या वर्षी जर परीक्षा होऊन नेमणुका झाल्याच तर त्या चारशेपेक्षा जास्त नसतात. म्हणजे एमपीएससीमधून नोकरी लागण्याची शक्यता ही हजारातून एक यापेक्षाही कमी आहे. परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या कळली तर यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे की फार फार फार कमी आहे हे कळेल. ते नाही कळले तर काय बिघडते?’’ बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू पाहणाऱ्या अशा शहाण्यांचे प्रमाण मोठे आहे. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी खर्च किती येतो? ते एमपीएससीची परीक्षा किती काळ देतात? परीक्षेत परत परत अपयशी ठरल्यानंतर ते काय करतात? यांसारख्या प्रश्नांची उत्तरेही उपलब्ध नाहीत, हे ओघाने आलेच. या परिस्थितीत आम्ही काही विचारवेधींनी ठरवले की, आपणच एक लहान अभ्यास करून काही उत्तरे शोधण्याची सुरुवात करू या. आम्ही पुण्यातील एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १०२ तरुण-तरुणींची नमुना पाहणी केली. प्रस्तुत लेख या पाहणीतून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.
पुणे हे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे सर्वात मोठे केंद्र आहे. पुण्यात अंदाजे एक लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात. यापैकी ९० हजारांहून जास्त तरुण-तरुणी हे बाहेरगावाहून, विशेषत: खेडेगावांतून पुण्यात परीक्षेची तयारी करायला येतात. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा पुरवण्याचा मोठा व्यवसाय पुण्यामध्ये चालतो. त्यात क्लासवाले ते चहावाले, डबेवाले ते औषधवाले या सगळ्यांचा समावेश होतो. या सगळ्या व्यवसायांची उलाढाल अंदाजे दरवर्षी सहाशे कोटी रुपयांहून जास्त आहे.
यापैकी ४० टक्के परीक्षार्थी प्राथमिक शिक्षण खेडेगावांतून झालेले आहेत. खेडेगावात आपले भविष्य शून्य आहे, पुण्यात स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून एमपीएससीत यश मिळण्याची शक्यता जास्त आहे, आणि एकदा का सरकारी नोकरी लागली की स्वत:चे, कुटुंबाचे आणि भावकीतील सर्वाचे भवितव्य उज्ज्वल होईल, या आशेने हे तरुण-तरुणी निष्ठेने आणि खूप कष्टपूर्वक अभ्यास करतात. बरेचसे विद्यार्थी भाडय़ाने खोली घेऊन राहतात. एकेका खोलीत सरासरी सहा विद्यार्थी वास्तव्य करतात. ते खाणावळीत जेवतात किंवा डबा लावतात. थोडे जण स्वत: स्वयंपाक करून जेवतात. एमपीएससीची तयारी करताना आपली तब्येत खालावली, असे सर्वेक्षणातील ३४ टक्के तरुण-तरुणींनी सांगितले.
पुण्यात शिकणाऱ्यांपैकी दहा हजारांहून जास्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलामुलीच्या एमपीएससीच्या तयारीसाठी गावाकडे सावकाराचे कर्ज काढले आहे. दोन हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी स्वत: कर्ज काढले आहे. ४० टक्के विद्यार्थी क्लास लावतात. त्यावर सरासरी चाळीस हजार रुपये खर्च करतात. ६० टक्के विद्यार्थी अभ्यासिकेत नाव नोंदवतात. अभ्यासिकेत जाऊन ते रोज दहा तास अभ्यास करतात. ‘एमपीएससीचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला आहे,’ असे बहुतेक सर्व एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे मत आहे. ९० टक्क्यांहून जास्त एमपीएससीचा अभ्यास करणारे ठामपणे असे सांगतात, की एमपीएससीचा अभ्यास केल्याने त्यांची विचार करण्याची शक्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली, त्यांच्याकडील उपयोगी माहितीचा साठा वाढला. त्यांचे संभाषण कौशल्य वाढले. त्यांच्या लिखाणात सफाई आली. आणि विशेष म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बळावला. ७० टक्के विद्यार्थी असेही सांगतात, की एमपीएससीचा अभ्यास केल्याने त्यांची मन:स्थिती सुधारली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात १५ वर्षे घालवून झाल्यावर आणि एमपीएससीचा अभ्यास सुरू करून सहाच महिने झालेले हे सांगतात. आणि दुसरे काहीही न करता चार ते पाच वर्षे फक्त एमपीएससीचा अभ्यास करणारेसुद्धा हेच सांगतात. हे फार आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ असा करायचा का, की शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण या विद्यार्थ्यांना पंधरा वर्षांत जे देऊ शकले नाही, ते एमपीएससीचा अभ्यास केल्याने त्यांना सहा महिन्यांत मिळते? आपण कितीही चांगला अभ्यास केला तरी सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नगण्य आहे, हे संख्याशास्त्रीय सत्य समोर दिसत असूनही या तरुण-तरुणींची मन:स्थिती सुधारते, हे कसे? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे तर अजूनही काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे.
तुम्हाला सरकारी नोकरी का करायची आहे, या प्रश्नाला सर्वात अधिकतम वेळा उत्तर- ‘मला सरकारी नोकरी करून समाजसेवा करायची आहे,’ असे हे तरुण-तरुणी देतात. तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असताना तुम्ही वर्षांनुवर्षे एमपीएससीची परीक्षा का देत राहता, या प्रश्नाला- ‘सरकारी नोकऱ्या कितीही कमी असल्या तरी जोपर्यंत एक तरी नोकरी आहे, तोपर्यंत ती माझ्यासाठीच आहे असे मानून मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहीन,’ असे त्यांच्याकडून उत्तर येते. हे उत्तर क्लासवाले प्रवेश घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनेक वेळा सांगतात. एमपीएससीची तयारी कशासाठी? सरकारी नोकरी कशासाठी? याची हे तरुण देत असलेली उत्तरे ही त्यांनी पाठ केली आहेत; एवढेच नव्हे तर मनोमनी स्वीकारली आहेत असे दिसते. असे वाटते याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा त्यांना प्रश्न त्यांच्या स्वत:बद्दल न विचारता इतर विद्यार्थ्यांबद्दल विचारले तेव्हा मात्र दखलपात्र विद्यार्थ्यांनी- ‘हे विद्यार्थी टाइमपास म्हणून एमपीएससी करतात’, ‘घरच्यांना बरे वाटावे म्हणून ते एमपीएससी करतात,’ असे उत्तर दिले. इतर एमपीएससीवाल्यांसाठी वेगळी परिस्थिती, वेगळी कारणे; माझ्यासाठी वेगळी परिस्थिती, वेगळी कारणे अशी ही मानसिकता आहे. ही मानसिकता स्वीकारली की वर्षांनुवर्षे दुसरे काहीही न करता निर्वेधपणे एमपीएससीचा अभ्यास करूत राहता येते.
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे..
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला।
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्।।
..आशा नामक एक विचित्र आणि आश्चर्यकारक शृंखला आहे. या आशेच्या शंृखलेमध्ये जो बांधलेला आहे, तो इथे-तिथे पळत राहतो आणि या शृंखलेतून मुक्त झालं तर तो पंगू बनतो!
आधीच्या तीन वर्षांत एमपीएससीची परीक्षा झालीच नाही. त्यामुळे एमपीएससीमध्ये निवड होण्याची आमची शक्यता कमी झाली. तेव्हा आमच्यासाठी एमपीएससीची वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. एका विशेष परिस्थितीत आपल्यावर झालेला हा अन्याय दूर व्हावा म्हणून ही तात्पुरती मागणी विद्यार्थ्यांनी केली. तर २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खुल्या गटातील सर्वासाठी एमपीएससीची वयोमर्यादा अजून वाढवली. महाराष्ट्रातील तरुणांच्या पायातील एमपीएससीच्या शृंखला जास्तीत जास्त काळ बांधून ठेवायच्या म्हणजे त्या जेव्हा काढल्या जातील तेव्हा हे तरुण पंगू बनलेले असतील, मग ते सरकारकडे रोजगाराची किंवा रोजगारनिर्मितीचे धोरण राबवण्याची मागणी आग्रहाने करणार नाहीत.. असे हे राजकारण आहे.
ही पाहणी करताना अजूनही एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली. यात मुलाखत द्यायला नकार देणारे तरुण-तरुणी मोठय़ा प्रमाणावर होते. मी गेली ३० वर्षे अनेक प्रकारच्या सामाजिक पाहण्या केल्या. त्यातील काही नाजूक खासगी विषयांसंबंधी होत्या. पण मुलाखत द्यायला नकार देणाऱ्यांचे आणि मुलाखत द्यायला तयार झाल्यावर विशिष्ट प्रश्नांना उत्तरे न देणाऱ्यांचे एवढे मोठे प्रमाण मी याआधी कधी पाहिले नव्हते. एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये एक भीती मोठय़ा प्रमाणावर जाणवली. मी दिलेले उत्तर सरकारी अधिकाऱ्यांना कळले आणि माझे उत्तर सरकारला योग्य वाटले नाही, तर आपली एमपीएससीमध्ये निवड होण्याची शक्यता कमी होईल, त्यापेक्षा न बोललेलेच बरे.. अशी त्यांची मानसिकता होती. तरुणांना पंगू बनवण्याच्या राजकारणाचा हा परिपाक आहे काय?
विचारवेधच्या तरुण गटाने बनवलेल्या व्हिडीओमध्ये बेरोजगार तरुण-तरुणी ज्या परिस्थितीचे वर्णन करीत होते ती परिस्थिती विदारक होती. पण त्यांची देहबोली मात्र त्या परिस्थितीशी विसंगत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख नव्हते, राग नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम चिकटवलेले हास्य होते. मी या विसंगतीने जास्त अस्वस्थ झालो होतो, हे आता मला लक्षात येते. एमपीएससीची ‘अफूची गोळी’ खाऊन गुंग असलेले तरुण मी पाहत होतो!
ज्या तरुण-तरुणींनी पूर्ण मुलाखती दिल्या त्यांनी अजूनही एक मत अनेकदा व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्याबद्दल असे प्रश्न अजूनपर्यंत कोणी कधी विचारले नव्हते. या प्रश्नांवर आम्हीही आधी कधी विचार केला नव्हता. बरे झाले, तुम्ही विचारले आणि आम्ही त्यावर विचार करायला लागलो.’’ एमपीएससीचा अभ्यास करून आमची विचारशक्ती वाढली, असे म्हणणाऱ्या तरुण-तरुणींनी हे सांगितले हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे? यातून काही नेमक्या सूचना पुढे आल्या. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या बहुसंख्य तरुण-तरुणींनी पुढील सूचनांना मोठा पाठिंबा व्यक्त केला..
एक : नेमल्या जाणाऱ्या सरकारी नोकरांना सध्या आहे त्यापेक्षा निम्मा पगार द्यावा. मात्र, सरकारने दरवर्षी ठरलेल्यापेक्षा दुप्पट नोकरभरती करावी.
दोन : पुढील पाच वर्षांत कमाल वयोमर्यादा दरवर्षी एक वर्षांने कमी करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना ‘पास झालो तर आत्ताच!’ अशी भावना निर्माण होईल आणि एका मर्यादेच्या पलीकडे आशेच्या शृंखला पायात आहेत म्हणून धावत राहण्याचा मोह होणार नाही.
तीन : विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे मार्गदर्शन अत्यंत कमी खर्चात एमपीएससीने सर्वत्र- निदान तालुक्याच्या ठिकाणापर्यंत- उपलब्ध करून दिले पाहिजे. एका बाजूला विद्यार्थ्यांचा खर्च कमी होईल आणि दुसऱ्या बाजूला गुणी गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांना सरकारी अधिकारी बनण्याची संधी अधिक प्रमाणात प्राप्त होईल.
चार : एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना त्याचवेळी दुसरे काम वा उद्योग करायला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्यासाठी जे एमपीएससीचे इच्छुक दुसरे कमावते काम किंवा शिक्षण करत असतील त्यांना जास्तीचे मार्क अदा केले पाहिजेत.
एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या बहुसंख्य तरुण-तरुणींनी या बदलांना मोठा पािठबा व्यक्त केला. त्यावरून स्वतंत्र विचार करण्याची त्यांची ताकद अजूनही शाबूत आहे हे लक्षात येते.