हा कोऽण.. हा कोऽण.. हा कोऽण.. सांप्रती आला
नव तारा.. अवचित उदयाला..
जिंकित विश्व निघाला..
तरुणांचे काळीज बनला..
(हा कोऽण.. हा कोऽण..).. कोऽऽऽऽऽणऽ
– असे गात अवतरणाऱ्या दोन्ही विद्याथीगटांच्या प्रवेशाने..
एक गट मार्क्सवादी विचारसरणीचा..
रिव्होल्युशन.. रिव्होल्युशन.. रिव्होल्युशन
नव्या क्रांतीचे प्रेषित आम्ही.. फुलवू नवी पहाट
वर्गलढय़ाचे शिंग फुंकुनी.. घडवू नवा समाज
अशा पाश्चात्त्य वृन्दगान शैलीतल्या गाण्यातून व्यक्त होणारा.. तर दुसरा गट
राष्ट्रभक्तीची ऊर्मी अमुची.. भारतवीर आम्ही तेजस्वी
शक्तिसंचय करूनी वाहू.. निष्ठा भारतमातेशी
बलवान बनू.. धनवान बनू.. आर्यसंस्कृतीचा अभिमान धरू..
असं प्रभात फेरीतल्या गाण्यांच्या शैलीत गाताना प्रखर संस्कृतीसंरक्षक विचारसरणीने प्रेरित.. प्रवीणच्या आगमनाची दोन्ही गटांनी घेतलेली दखल.. त्याला आपल्या गटात ओढण्याचे त्यांचे प्रयत्न.. हे त्यांच्या गाण्यातून, संवादातून प्रकट होतात. दरम्यानच्या काळात प्रोफेसर हर्षे निवडणुकीला उभे. त्यांच्या प्रचाराची धुळवड.. त्यांचं निवडून येऊन शिक्षणमंत्रीपदी विराजमान होणे.. यापाठोपाठ प्रवीणचा नवा विद्यार्थीनेता म्हणून उदय.. विद्यार्थी संघर्ष समितीची स्थापना.. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकरिता-
चला बंधूंनो.. रस्त्यावरती.. नव्या युगाची एकच नीती
चुकार पोलीस शासन आणि.. भणंग नेते राजकारणी
आणू त्यांना ताळ्यावरती..
(या गाण्यासाठी मी नखरेबाज हार्मोनियम व डफ/ ढोलकीचा प्रयोग केला.)
असे मोठय़ा जोशात गाण्यातून, पथनाटय़ातून व्यक्त होत अखेरीस प्रचंड मोर्चातून मंत्रालयात प्रवेशत प्रवीण आणि विद्यार्थी प्रतिनिधी (गाणं- ‘जरा समजून घ्या सर’) यांची शिक्षणमंत्री प्राध्यापक हर्षे (गाणं- ‘म्हणे समजून घ्या सर’) यांच्याबरोबर होणारी नाटय़पूर्ण संगीत खडाजंगी.. त्यापाठोपाठ विद्यापीठात मंत्रिमहोदय प्रा. हर्षे यांना राज्यपालांच्या हस्ते सन्माननीय डी. लीट्. प्रदान करण्याचा समारंभ उधळून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांची-
सांगाडे सांगाडे.. विद्यापीठाच्या उंच उंच भिंतींमध्ये सांगाडे
लागेबांधे लागेबांधे.. कॉलेजाच्या लांब लांब.. कक्षांमध्ये काळे धंदे
लागेबांधे लागेबांधे.. वर्तुळाचे लागेबांधे
घोटाळे घोटाळे.. विद्यापीठाच्या खोल खोल.. पोटामध्ये घोटाळे
विद्यापीठाच्या लांब लांब रस्त्यावरती
पोलिसांची तुंबळ दाटीऽऽ
लाठय़ाकाठय़ा.. लाठय़ाकाठय़ा न् अश्रुधूर
दगड-विटांचा एकच पूर..
अशी परिणीती होते.
(हा सारा प्रसंग सर्व युवा रंगकर्मी अशा काही जोशात आणि प्रचंड ऊर्जेने सादर करीत, की पोलीस-विद्यार्थ्यांमधला संघर्ष प्रेक्षकांना खराच वाटून सारे श्वास रोखून पाहताना प्रवेशाच्या उत्कर्षबिंदूला होणाऱ्या काळोखात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत दाद देत. यात गाण्याच्या चालीचा.. ब्रास सेक्शन, व्हायोलिन सेक्शन, इलेक्ट्रिक गिटार, बेस गिटार आणि ड्रम्स अशा जोशिल्या वाद्यमेळाचा.. कलाकारांच्या जबरदस्त गायनातून, देहबोलीतून ओसंडणाऱ्या ऊर्जेचा फार मोठा वाटा होता.)
यातून प्रवीण पुढारी बनतो. अंजू आणि सुनीता या दोघींबरोबर प्रेमाचा त्रिकोण रंगत असताना प्रवीणचे पुढारीपणही प्रस्थापित होत राहते..
मुलांचा कोरस-
प्रवीण आमुचा पुढारी बनला ।।धृ।।
कधी मुलांच्या जहाल चळवळी.. कधी भाषण, मोर्चे, दमबाजी
कधी तडजोड, कधी गुंडगिरी.. जनसेवेसाठी शर्थ करी..
यावर संस्कृतीसंरक्षक गट आणि मार्क्सवादी गटाची नाराजी व्यक्त होताना सत्ताधारी मंडळी मात्र ‘अरे, हा तर हुशार झाला हुशार झाला.. आपल्यात आला’ असे गात प्रवीणला दाद देतात. आणि प्रवीण इलेक्शनला उभा. सारी विद्यार्थी संघटना प्रचाराला. बंडखोर प्रमोद हर्षे (मंत्रिमहोदय प्रा. हर्षे यांचा पुत्र) त्याच्या विद्यार्थीमित्रांसह प्रवीणच्या प्रचारात गर्क. प्रवीणने लिहिलेल्या गाण्याचे-
एक नंबर.. महाबिलंदर.. पुढारी सारे.. थोर निरंतर
जनसेवेचे वाण शिरावर.. राजनीतीचे जंतरमंतर
कष्ट अमाप अन् जीवन खडतर.. फळ सत्तेचे मिळेल नंतर
नसते ग्वाही.. युद्ध निरंतर..
(अत्यंत जलद लयीत आणि व्हायोलिन/ ब्रास सेक्शन आणि इलेक्ट्रिक गिटार्सच्या जोशिल्या साथीत हे रॉक स्टाईल गाणे सारेच खूप मजा घेत गात.)
नाटय़पूर्ण सादरीकरण करताना, पोटदुखीने त्रस्त मंत्र्याच्या पोटाचे ऑपरेशन करताना साखर.. सिमेंट तसेच काळा पैसे अशा गोष्टी बाहेर येतात आणि समस्त नाटय़गृह हास्यकल्लोळात बुडून जाते.. या अनपेक्षित दर्शनाने आतून कुठेतरी हललेला प्रवीण मग-
नव्हते व्हायचे.. पण झालो पुढारी.. पडले ओझे शिरावरी
अशा निराशेतून बाहेर पडत-
‘पुन्हा दाटते अपार ऊर्मी.. खरोखरी राज्य करावे जगावरी..
मिरवावे यश शिरावरी’
असा प्रेरित होतो.
(या गाण्यासाठी पूर्वार्धात संथ लयीत व्हायोलिन-चेलोयुक्त स्ट्रिंग सेक्शन आणि इलेक्ट्रिक गिटारवर वाजणाऱ्या संवादी स्वरावलींनी गीतातले भाव गडद होत; तर शेवटच्या अंतऱ्यापूर्वीच्या चैतन्यमय स्वरावली, ड्रमवर वाजणारा स्फूर्तिदायक ताल त्याच्या मनाची उभारी अधोरेखित करी.)
एवढय़ात अंजूच्या आत्महत्येची बातमी येते आणि प्रवीण तिच्या अंत्ययात्रेचा (‘प्रेम करावे कुणी कुणावर’ हे मारवा रागात बांधलेले गाणं नरेंद्र कुलकर्णी, अनुपमा ढमढेरे यांच्यासह युवावृंद गाताना साथीतल्या व्हायोलिन्स- चेलोवरल्या सुरावटी टीम्पनीच्या आघातासह प्रसंगातली व्याकुळता वाढवीत.) आणि शोकसभेचाही स्वप्रसिद्धीकरिता वापर करायला विसरत नाही. त्याचवेळी अचानक निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर उसळलेल्या दंगली.. त्या आटोक्यात आणायला चक्क लष्कराला पाचारण.. प्रवीणचे अनपेक्षितपणे बेपत्ता होणे.. प्रेक्षकांना कमिशनर भाव्यांऐवजी ब्रिगेडियर बर्वे (पुन्हा श्रीरंग गोडबोलेच!) सांगतात.. आणि प्रवीण नेर्लेकरचा शोधू चालू असल्याचंही.
रंगमंचावर अंधार.. आकाशवाणीतून ‘प्रवीण तू कुठायेस? कुठायेस तू प्रवीण..’ अशा पृच्छेसह साऱ्या युवावर्गाकडून गायल्या जाणाऱ्या..
हे लाडक्या विघ्नेश्वरा.. तूच रे त्राता खरा..
तुझ्या प्रगल्भ बुद्धीचा आस घेते आसरा..
पखवाज, व्हायोलिन्स, चेलोज्च्या जोशपूर्ण साथीत भिन्न षड्ज या रागात मी बांधलेल्या प्रार्थनेच्या अंती ‘यदा यदा हि धर्मस्य’ या श्लोकाच्या पाश्र्वभूमीवर रंगमंचावर धूसर प्रकाशात प्रवीण अवतरतो. आणि भगवान श्रीकृष्णाच्या आविर्भावात दुष्टांच्या निर्दालनासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि समस्त प्राणिमात्रांना सुखी करण्यासाठी आपला अवतार असल्याचे बजावत जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेऊ लागतो तेव्हा धक्का बसून भ्रमनिरास झालेले प्रमोद हर्षेसह सारे युवा तेथून निघून जातात. नाटकाअखेरीस व्हटकर, जाधव आणि देशपांडे हे तिघे सूत्रधार कम् गुप्त पोलीस पुन्हा एकदा विद्यापीठातल्या बागेत एका मैत्रिणीबरोबर संवाद करणाऱ्या प्रमोद हर्षेवर नजर ठेवून बसलेले दिसतात. आणि पुन्हा सारी युवाशक्ती गाऊ लागते..
रूपरंग बदलून टाकू.. आम्हीच या जगाचे
समूळ खांब खांब उखडू.. किल्ले विद्यापीठाचे
..असंतोषाच्या नव्या युद्धाचे पडघम घुमू लागतात.
खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे मराठी रंगभूमीवरचे हे युवानाटय़ साकारताना सुमारे सव्वा वर्ष अतिशय एकतानतेने रोज संध्याकाळी सात ते रात्री एक-दीड वाजेपर्यंत तालमी करणारी अशी तरुणाई त्यापूर्वी आणि नंतरही कधी मी पाहिली नाही. या नाटकाकरता संगीत संयोजक म्हणून लिओन डीसूझा आणि आजचे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी मला फार मोलाचे साहाय्य केले.
‘पडघम’करिता मी छोटी-मोठी मिळून सुमारे ३०-३५ गाणी-गाणुली संगीतबद्ध केली. १९८३ सालाच्या अखेरीस आणि १९८४ च्या पूर्वार्धात मुंबईतल्या रेडीओजेम्स रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रक झुबेरीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ध्वनिमुद्रणावर सर्व गाण्यांचे अनेकानेक वाद्यांच्या अप्रतिम वादनाने नटलेले म्युझिक ट्रॅक्स जेव्हा तालमीत वाजू लागले तेव्हा सगळ्या कलाकारांना वेगळेच स्फुरण चढले. हे त्यांनी कधी कल्पिलेच नव्हते. चित्रपट गीतातल्यासारख्या अप्रतिम वाद्यवृंदाच्या साथीने गाणे हे त्यांना अत्यंत आवडलं. सर्व मुलामुलींचे ‘पडघम’मधल्या सर्व गाण्यांचे म्युझिक ट्रॅक्स इतके तोंडपाठ होते, की काही गाण्यांमधल्या तालाशिवाय मुक्तपणे गायच्या ओळीही ते अगदी सहजतेने बिनचूक म्हणत. मुंबईतल्या पहिल्या प्रयोगाला उपस्थित असलेला ज्येष्ठ अभिनेता- दिग्दर्शक कै. दिलीप कुळकर्णी प्रयोगानंतर कौतुकानं म्हणाला, ‘हे असलं अद्भुत केवळ तुम्ही थिएटर अकॅडमीची मंडळीच करू शकता. कमाल आहे यार. कुणीही मायक्रोफोन उचलतो आणि पूर्वध्वनिमुद्रित संगीताच्या साथीने बिन्धास गायला लागतो. अरे, इतकी गाणारी मंडळी तुम्ही मिळवलीत कुठून?’ दिलीपची ही दाद प्रातिनिधिक तर होतीच; पण तिने ‘पडघम’च्या दिवसांतल्या साऱ्या मेहनतीची फलश्रुती लाभल्याचे समाधान आम्हाला मिळालं.(उत्तरार्ध)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा