हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

‘‘राष्ट्रे ही त्याच्या रसरशीत वर्तमानात जगण्यापेक्षा गर्द-धुकट भूतकाळात का रमत असावीत?’’ असा सवाल राज्यशास्त्राचे विख्यात अभ्यासक, तत्त्वज्ञ बेनेडिक्ट अ‍ॅण्डरसन यांनी एके ठिकाणी केला होता. बेनेडिक्ट अ‍ॅण्डरसन हे राष्ट्रराज्य प्रणालीचे महत्त्वाचे अभ्यासक. राष्ट्रराज्य संकल्पना आधुनिक कालातीत राष्ट्रवादाच्या कल्पनांतून कशारीतीने आकाराला येत गेली व तिचे आयाम कसे घडत गेले यावर त्यांनी केलेलं लिखाण अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. एकमेकांना कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या- पण प्रादेशिक, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक इत्यादी अनुबंधांद्वारे जोडली जाऊन त्यातून विशिष्ट  सामूहिक अस्मिता व एकसमूहत्त्वाच्या कल्पना मूळ धरू लागतात व  त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय व्यवस्थांच्या चौकटी राष्ट्रराज्यांच्या रूपात आकाराला येतात. अ‍ॅण्डरसन यांनी राष्ट्रवादाच्या बहुपदरी धाग्यांनी एकत्र येणाऱ्या समूहांना इमॅजिण्ड कम्युनिटी असे संबोधले आहे. या शब्दप्रयोगातून त्यांना राष्ट्रराज्य ही चौकट काल्पनिक असल्याचे त्यांना म्हणायचे नसून वर नमूद केलेल्या अनुबंधातून वाढीस लागणारी एकत्वाची कल्पना व त्या कल्पनेमागील मापदंड विशिष्ट मर्यादेत काल्पनिक असतात असे त्यांनी नमूद केले आहे.

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
lokmanas
लोकमानस: हा तर श्रद्धेचा राजकारणासाठी वापर
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ

आधुनिक भारतीयत्वाच्या आपल्या व्यापक अशा संकल्पना ज्या वेगवेगळ्या अनुबंधांच्या गाठींनी बांधल्या गेल्या आहेत त्यातील ‘सांस्कृतिक जाणिवा व अस्मिता’ ही महत्त्वाची अशी गाठ. या सांस्कृतिक जाणिवा/ संवेदना उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळ्या क्षेत्रांत तत्कालीन अभ्यासक-चिंतक-ऋषी-महर्षी- तत्त्वज्ञ- श्रमण- आचार्यादी मंडळींच्या त्या त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या कामांशी संबंधित असल्याचे बहुधा नेहमीच दिसून येते. या संवेदनांच्या मुळाशी अमुक प्रदेशाविषयी जन्माधारित, निवासदृष्टय़ा, सांस्कृतिकदृष्टय़ा किंवा धार्मिक अनुबंधांशी जोडलेले स्वत:चे परिकल्पित नाते व त्या प्रदेशातील राष्ट्रवादी धारणांविषयीच्या जाणिवा यांचा भक्कम पाया उभा असतो. या परिकल्पित धारणांसमोर आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानप्रवण समाजातील गतिमानतेमुळे व संशोधनपर भूमिकांमुळे अनेक आव्हाने किंवा प्रश्नचिन्हे उभी राहतात. त्या आव्हानपर प्रश्नचिन्हांना प्रत्युत्तर देताना अनेकदा आधुनिक काळाविषयीच्या कल्पित प्रमाणित विचारव्यूहाला अनुरूप अशा चौकटीत संबंधित धारणांना बसवण्याचे (ंस्र्स्र्१स्र्१्रं३ी करण्याचे) प्रयत्न होतात. प्राचीन काळातील धार्मिक समजुती, धारणा यांच्यासोबतच प्राचीन काळात झालेल्या मानवी व्यवहारांसाठी किंवा धार्मिक व अन्य व्यवहारांसाठी त्यांच्या विवक्षित मर्यादेत आवश्यक तेवढे उपयुक्त तंत्र, वैद्यकशास्त्र, विज्ञानविषयक सिद्धांत निर्माण झाल्याचे संदर्भ देशोदेशीच्या प्राचीन इतिहासात आपल्याला दिसून येतात. या ज्ञानशाखा व त्यांतील संशोधन- शोध हे तत्कालीन मानवी जीवन सुखकर व्हावे या अगदी स्वाभाविक प्राथमिक प्रेरणेतून विकसित झाले. त्यामागे कुठल्या विशिष्ट समाजाच्या अभिमानातून आलेल्या अस्मितांऐवजी त्यांना अभिप्रेत असलेल्या, त्यांच्या ज्ञानकक्षेत असलेल्या जगातले व्यवहार सुकर व्हावे व त्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी भावना दिसते. अर्थात, या कामाच्या नोंदी करताना त्यांची लिखित खडर्य़ामध्ये या ज्ञानव्यवहार करणाऱ्या मंडळींच्या सामाजिक, सांस्कृतिक भवतालाचा प्रभाव, उल्लेख दिसून येतो हे निश्चित. वास्तवात उपखंडातील ज्ञानपरंपरांच्या संदर्भात खंडनमंडन पद्धतीने वैचारिक, तात्त्विक किंवा अन्य अभ्यासक्षेत्रात वाद-प्रतिवादाची मालिका दिसून येते. अर्थात त्या काळात आधुनिक विज्ञान व त्यातून आलेल्या शोधांना बुद्धिप्रामाण्यवादी-वस्तुनिष्ठप्रमाणांची पुष्टी देणारी परंपरा तितकी प्रबल नव्हती. या प्राचीन धर्म-तत्त्वज्ञानविषयक धारणांची वैज्ञानिक स्तरावरून चिकित्सा पौर्वात्य समाजात वासाहतिक काळात आधुनिक पाश्चत्त्य शिक्षण व्यवस्थेसोबत रुजली. आणि ब्रिटिश सत्तेच्या अमलासोबतच भौगोलिक सर्वेक्षणे, जमिनींची शास्त्रशुद्ध मोजणी, जनगणना करायची पद्धत व शास्त्र, खाणकाम, लोहमार्ग, वैद्यकीय आणि स्वच्छताविषयक नियम व पद्धतींचा प्रसार-प्रचार मोठय़ा प्रमाणात झाला. या व अन्य तत्सम क्षेत्रांत सुरू झालेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर वैज्ञानिक पद्धतींचे वाहक बनल्या. याच वेळी एकीकडे भारतात परकीय सत्तेच्या जोखडाविरोधात राष्ट्रवादी भावनांनी हळूहळू आकार घ्यायला सुरुवात केली होती. या दोन व्यवस्थांच्या विकसनाच्या काळात त्यांच्या प्रभाव-मिलाफातून राष्ट्रवादी धारणांना अनुकूल अशा पारंपरिक मूल्ये, ज्ञानव्यवस्था व संस्कृतीतील घटकांना स्वीकारून आणि आधुनिक काळात जगण्यासाठी अनुकूल अशा पाश्चात्त्य तंत्रज्ञान-विचारव्यूहांचा अंगीकार समाजात होऊ लागला. यातूनच राष्ट्रवादाला आणि सामूहिक सांस्कृतिक धारणांच्या दृष्टीने आदर्श अशा कल्पित प्राचीन सुवर्णयुगातील महत्त्वाच्या ग्रंथांत आधुनिक तंत्रे, विज्ञानमूल्ये आणि शोध यांची मुळे शोधायची ऊर्मी समाजातील विशिष्ट शिक्षित अभिजन वर्गात वाढीला लागली. याच काळात आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांसारख्या संस्थांतून अंधश्रद्धा, चमत्कार किंवा बळी-सतीसारख्या परंपरांना नाकारून आदर्श हिंदू परंपरा मांडणाऱ्या संस्थांचा उदय झाला. विख्यात इतिहासकार ज्ञान प्रकाश यांनी आपल्या एका लेखात या समूहांच्या उदयासोबत निर्माण होणाऱ्या समाजातील प्रतिक्रियांविषयी एक गमतीदार तपशील नमूद केला आहे. आर्य समाजाचे एक सदस्य आणि एक कर्मठ हिंदू मनुष्य यांच्यातील एका केसची ही हकीकत. वझीराबाद शहरात १८९५ साली पितरांच्या पूजेवरून एक कडवट वाद झाला. आर्य समाजातील तत्कालीन धारणांनुसार पितरांची पूजा किंवा अन्य श्रद्धाविषयक धारणांना नेहमी विरोध होत असे. हा वाद सरकारी कोर्टात गेल्यावर पंडित गणेश दत्त शास्त्री यांनी कर्मठ पक्षाची बाजू मांडली. हा वाद लाहौर येथून ‘शास्त्रार्थ बीच आर्य समाज और पंडित गणेश दत्त शास्त्री’ अशा नावाने प्रकाशित झाला आहे. या वादात स्थानिक न्यायमूर्तीनी दिलेला निवाडा उभय पक्षांना पसंत न पडल्याने वादाचे तपशील इंग्लंडमध्ये मॅक्स म्युलर यांना पाठवण्यात आले. त्यावर प्राचीन आर्य व अनार्य धर्मात नैसर्गिक ऊर्मीनुसार आपल्या जवळच्या किंवा आपल्या स्मृतीतील प्रिय व्यक्तींसाठी काही त्याग-बळी-नैवेद्य अर्पण करणे या धारणेतून हा विधी निर्माण झाला आहे अशी म्युलर साहेबांनी प्रतिक्रिया दिल्यावर संबंधित निवाडा कर्मठ पक्षाच्या बाजूने गेला. त्यावर आर्य समाजाच्या लोकांनी ढोल वाजवून म्युलर साहेबांचे पत्र नकली असल्याच्या दवंडय़ा पिटत मिरवणूक काढली. आर्य समाजात पितृपूजा किंवा अन्य कर्माना विरोध होत असला तरी दुसरीकडे आर्य समाजाचे संस्थापक असलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी मात्र आपल्या ‘सत्यार्थप्रकाश’ या ग्रंथात मात्र यज्ञविधीद्वारे वातावरणशुद्धी होत असल्याचे प्रतिपादन हिरिरीने केले आहे.

यासोबतच गुरुत्वाकर्षण, पायथागोरस सिद्धांत, भूमितीविषयक, रसायनशास्त्रविषयक सिद्धांत किंवा अन्य शास्त्रांतील सिद्धांतांचे प्राचीन मूळ सांगण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झाल्याचे दिसते. यापैकी बरेचसे सिद्धांत कल्पनाबीजांच्या रूपात किंवा उपयोजनापुरत्या उपयुक्त अशा सूत्र-तंत्ररूपात प्राचीन ग्रंथात प्रतिपादित केले गेले आहेत हे खरे आहे. मात्र आधुनिक जगातील वैज्ञानिक पद्धतीमध्ये प्रयोगशाळांमधील प्रयोग, त्यांचे विस्तृत शास्त्रशुद्ध विवेचन-सिद्धांतन व वस्तुनिष्ठ दाखल्यांच्या आधारावर प्रत्यक्ष प्रमाणित तत्त्वाला सत्य मानते. त्यादृष्टीने आपल्याकडे हिंदू वैज्ञानिक परंपरांचा इतिहास लिहिणारे डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांच्यासारखे अभ्यासक उदयाला येईपर्यंत भरतीय प्राचीन वैदिक विज्ञानविषयक धारणा किंवा प्रयोगशीलता हा विषय वसाहतपूर्व भारतीय समाजात किती महत्त्वाचा व अभ्यासनीय मानला जात होता, हा प्रश्न नकारार्थी उत्तरेच घेऊन येईल. तात्पर्य असे की, वसाहतकाळामध्ये पाश्चात्त्य तंत्र-शासनव्यवस्था आणि शिक्षणपद्धती येईपर्यंत आपल्याकडे विज्ञानवादी दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता यांचा प्रभाव व्हावा यासाठी प्रभावीपणे व संघटितरीत्या चळवळ किंवा वैयक्तिक प्रयत्न झाल्याची उदाहरणे तुरळक दिसून येतात. अर्थात असे विधान करताना गणित, ज्योतिर्विज्ञान वगैरे विद्यांसंदर्भात भारतीय उपखंडात झालेले उल्लेखनीय काम आणि त्यांचा विदेशात वेगवेगळ्या भाषांतून झालेला प्रसार हे भारतीयांचे योगदान नाकारणे हा करंटेपणा ठरेल यात शंका नाही.

बेनेडिक्ट अ‍ॅण्डरसन यांनी सांगितल्यानुसार, प्राचीन प्रथा-परंपरा व समूहांच्या उदयाचा-विकसनाचा इतिहास व अनादी असलेली समूहाची मुळे आणि भविष्यातील दीर्घ अशा अनंत काळातील गौरवान्वित भविष्याच्या कल्पना  राष्ट्रबांधणी आणि समूहबांधणीच्या कामात नेहमीच मोलाची भूमिका बजावत आले आहेत. आज राष्ट्रराज्यादी व्यवस्था मानवी समाजातील नागरी व्यवस्थांचे प्रमाणित चौकट बनल्यावर संबंधित देशांच्या राजकीय, साम्राज्यवादी, आर्थिक महत्त्वाकांक्षा या संशोधन प्रक्रियांमागील मुख्य प्रेरणा झाल्या आहेत. वाढती स्पर्धा, सामूहिक अस्मितांचे संघर्ष इत्यादींसंदर्भात प्राचीन परंपरांचे आणि ज्ञानव्यवस्थांचे गौरवशाली इतिहास संबंधित राष्ट्रांच्या अस्मितांच्या कोंदणात अडकून पडल्याने विज्ञान-ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियादेखील काही समाज, राष्ट्रवाद यांच्या अस्मितांचे विषय होऊन बसले. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या उदयासोबत संस्कृती-परंपरेतील गूढ, धार्मिक गोष्टींना वैज्ञानिक चौकटीत बसवायच्या अट्टहासातून छद्म विज्ञान नामक नवीन क्षेत्र माजू लागल्याचे आपण पाहात असतो. उदाहरण द्यायचे झाले वराह अवतारात भगवान वराहांनी पृथ्वी आपल्या अर्धवर्तुळाकार सुळ्यांवर तोलली अशी कथा सांगत पृथ्वीचा आकार गोल आहे हे परंपरेला ज्ञात होते असे सांगताना प्राचीन शिल्पे, चित्रे इत्यादींमध्ये मात्र वराहाने उद्धारलेली पृथ्वी ही भू-गोलस्वरूपात नसून भूमाता/ भूदेवी स्वरूपातील स्त्रीप्रतिमा आहे, हे वास्तव मात्र प्राचीन विज्ञानाचा प्रसार करणारी मंडळी सोयीस्करपणे विसरतात किंवा अनभिज्ञ राहतात.

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्यानुसार, जगातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या ज्ञानशाखांत काम करणाऱ्या प्राचीन व मध्ययुगीन अभ्यासक-संशोधकांनी ज्ञाननिर्मितीविषयीच्या, प्रयोगशीलतेच्या आणि जिज्ञासेतून आलेल्या ध्यासाने भारले जाऊन आपापल्या क्षेत्रांत सकस अशी ज्ञाननिर्मिती करून ठेवली. ही प्रयोगशीलता किंवा ज्ञाननिर्मिती धर्म-प्रदेश, राष्ट्र, जात, भाषाविषयक ऊर्मीमुळे त्यांनी बाणवली असे मात्र आपल्याला त्यांच्या उपलब्ध चरित्रांतून दिसत नाही. आपल्याकडे विज्ञान, गणित, भाषा, इतिहास इत्यादी विद्यांना सामावून घेणाऱ्या ज्ञानशाखेला मानव्यविद्या असे म्हटले जाते. कारण या  विद्याशाखांतून निर्माण झालेले काम कुठल्याही एका देश-समूह-जात-धर्मापुरते मर्यादित न राहता ते अखिल मानवजातीला उपकारक ठरत असते. विज्ञान-आधुनिकता, परंपरा यांचा विवेक बाणवताना हे सत्य मनात कायम जागते ठेवणे या मानव्यमूल्यांच्या औचित्याच्या दृष्टीने गरजेचे ठरते.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

Story img Loader