‘‘तुमच्या सिनेमात नाचगाणी का असतात?’’ कुणीही परदेशी माणूस भेटला की आवर्जून हा प्रश्न विचारणार. सुरुवातीला मी एक गमतीदार उत्तर द्यायचो- ‘‘कारण आमच्या देशातील रस्त्यावरच्या फाटक्या माणसापासून ते आमच्या राष्ट्रपतींपर्यंत सर्वांनाच सकाळी अंघोळ करताना मोठमोठ्यानं गायचं असतं आणि तेवढा गाण्यांचा पुरवठा फक्त आमचे चित्रपटच करू शकतात.’’ ते हसायचे. मग मी खरं कारण सांगायचो. युरोपात जन्मलेला सिनेमा सहाच महिन्यांत १८९६ मध्ये मुंबईत – भारतात आला तेव्हा देशभर नाटकं जोरात चालत होती. रात्रभर चालणाऱ्या नाटकात सारखी पदं म्हणजे गाणी चाललेली असायची. त्यामुळे नव्याने आलेल्या सिनेमा माध्यमानेही नाटकाचा हाच फॉर्म स्वत:साठी वापरला. आरंभी मूकपट होते, परंतु १९३१ च्या ‘आलमआरा’ पासून जसा बोलपटाचा काळ सुरू झाला तसा आपला सिनेमा गातच सुटला. त्यातलं डब्ल्यू. एम. खान यांनी गायलेलं ‘दे दे खुदा के नाम गर ताकत है देने की’ थेट रंगूनपर्यंत गाजलं. तिथून जे आपल्या चित्रपटगीतांनी लोकप्रियता गाठली ती अजून बरकरार आहे. १९३२ मध्ये आलेल्या ‘इंद्रसभा’ या हिंदी चित्रपटात तर चक्क ७० गाणी होती. … आणि म्हणून जेव्हा मी माझी पहिली डॉक्युमेण्ट्री करायला घेतली तेव्हा ‘आपल्या सिनेमात नाचगाणी का?’ हाच विषय सूचला आणि डॉक्युमेण्ट्रीचं नावही सुचलं… ‘सिंगिंग इन सिनेमा’.

डॉक्युमेण्ट्री करतानाची पहिली पायरी असते संशोधन! संशोधनाला सुरुवात केली. ते अर्थातच हिंदी चित्रपटांपुरतंच मर्यादित ठेवलं. ‘दे दे खुदा के नाम…’ पासूनची ५०० विविध प्रकारची गाणी निवडली आणि अभ्यासाला सुरुवात केली. सर्वप्रथम लक्षात आलं की, या गाण्यांचे २६ – हो चक्क २६ प्रकार आहेत. मलाही अनेक गाण्यांच्या जन्मकहाण्या माहीत होत्या. त्यामुळे या डॉक्युमेण्ट्रीतून काय आणि कसं सांगायचं हे ठरत चाललं होतं. पटकथा जरी कथापटासारखी बांधीव स्वरूपात नसली, तरी तिचा आराखडा आकाराला येत चालला होता. पण मग निर्मात्याचं काय? त्याचा शोध सुरू केला. कुठेच काही जमलं नाही. थोडा मनस्तापही झाला; परंतु मग मयुर शहा हे माझे मित्र मदतीला आले. त्यांची ‘रिफ्लेशन्स’ नावाची अॅड आणि कॉर्पोरेट फिल्म्स करणारी कंपनी आहे. शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. बाकी रोखीतला सारा खर्च मी करायचा. त्या आघाडीवर बोंबच होती, परंतु जमवलं कसंतरी. कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं होतं हे कळलेलं होतं. मला मग निर्माताही व्हावं लागलं.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पडद्यावरच्या तालमींचा अहवाल

संगीतकार विशाल भारद्वाज, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, डॉ. जब्बार पटेल, आशुतोष गोवारीकर, अभिनेता अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक – अभ्यासक मैथिली राव यांच्या सविस्तर मुलाखती, पोस्टर्स, छायाचित्रं, गाण्यांच्या चोपड्या असं सगळं आर्काइव्हल मटिरिअल, ग्राफिक्स आणि अर्थातच विविध प्रकारची गाणी यांतून डॉक्युमेण्ट्री आकाराला आली आणि ‘तुमच्या सिनेमात नाचगाणी का असतात?’ याचं शास्त्रशुद्ध उत्तरही मला शोधता आलं. देता आलं. याच सुमारास श्रीकांत जोशी हा एक अवलिया गोवेकर भेटला- शंकर-जयकिशनवर अमाप प्रेम करणारा. आपण सर्वचजण गाणी गुणगुणतो. गातो. तोही गातो, पण तो इंट्रोडक्टरी म्युझिक पीस आणि इंटरल्यूड सकट गातो आणि मध्येच थांबत या म्युझिक पीसमध्ये कुठली कुठली वाद्यो वाजलीत, वाजवणारे वादक कोण हेही सांगणार आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी पुन्हा तेवढाच म्युझिक पीस गाऊन दाखवणार.

… तर या श्रीकांतबरोबर शंकर -जयकिशनच्या टीममधले ऱ्हिदम विभाग सांभाळणारे, आपल्या दत्तू ठेक्यासाठी अजरामर झालेले आणि नंतरच्या काळात स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून नावारूपाला आलेले दत्ताराम (वाडकर) आणि भारतीय सिनेसंगीतात अॅरेंजमेंट, ऑर्केस्ट्रेशन आणि कंडक्टिंग या पाश्चात्त्य संगीतातल्या संकल्पना आणून त्याला परिपूर्णता देणारे अँथनी गोन्साल्विस यांच्यावर अनुक्रमे ‘मस्ती भरा है समा’ आणि ‘अँथनी गोन्साल्विस : द म्युझिक लीजंड’ या डॉक्युमेण्ट्रीज करण्याचा योग आला. यानिमित्ताने पं. रामनारायण, संगीतकार खय्याम, प्यारेलाल, अनिल मोहिले, केर्सी लॉर्ड, ‘ओह सजना बरखा बहार आयी’च्या आरंभी ज्यांनी सतार वाजविली ते जयराम आचार्य अशा शास्त्रीय आणि सिनेसंगीतातील दिग्गजांकडून सिनेसंगीत सर्वांगाने समजून घेता आलं. कलानिर्मितीची प्रक्रिया शास्त्रशुद्ध समजून घेताना सिनेमा माध्यमाकडे त्याच नजरेने पाहिलं पाहिजे असा मी कायम आग्रह धरत आलो. सिनेसंगीताबद्दलचाही माझा अभ्यास यानिमित्ताने असा झाला. या तीनही डॉक्युमेण्ट्रीजना जो प्रतिसाद मिळाला त्याविषयी खूप लिहिता येईल. दोनच गोष्टींचा उल्लेख करतो. ‘सिंगिंग इन सिनेमा’ साठी मला अमेरिकेतील ऑस्टिन विद्यापीठातून त्यांच्या इंडियन फिल्म स्टडीज डिपार्टमेंटकडून निमंत्रण आलं. तिथे ही डॉक्युमेण्ट्री दाखवून मी नाचगाणी असलेला जगातला एकमेव सिनेमा अशी ओळख असणाऱ्या भारतीय सिनेमावर सविस्तर बोललो. लॉस एंजेलिस येथील यूसीएलए या विद्यापीठात प्रोफेसर असलेली माझी मैत्रीण त्यांच्या इंडियन फिल्म स्टडीज डिपार्टमेंटमध्ये या तीनही डॉक्युमेण्ट्रीज दाखवते.

मला लोककलांविषयीही कुतूहल आहे. मी कोकणात जन्मलो, वाढलो नसलो तरी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नमन खेळे’ आणि सिंधुदुर्गातील ‘दशावतारा’शी ओळख होती. ‘दशावतार’ म्हणजे धयकालो अशी ओळख असणाऱ्या या अफलातून कलाप्रकाराकडे विनोदी प्रकार म्हणूनच पाहिलं गेलं. तो एक सशक्त नाट्यप्रकार आहे याकडे फारसं कुणाचं लक्षच गेलं नाही. मला ते सतत जाणवत होतं. सलत होतं. म्हणून मी या दोन्ही लोककलांवर माहितीपट बनवायचं ठरवलं. फिल्म्स डिव्हिजनसाठी मी नमन खेळेवर याच नावाने २६ मिनिटांची डॉक्युमेण्ट्री केली- ‘दशावतार : लोककला कोकणची’ साठी पुन्हा मीच निर्माता झालो. माझे परममित्र अशोक तावडे आणि अशोक ठक्कर हे निर्मितीत सहभागी झाले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून ते कर्नाटकातील ‘यक्षगान’, केरळातील ‘कथकली’, प. बंगालमधील ‘जात्रा’ आदी पारंपरिक लोककलांपासून ते स्तानिस्लावस्की ते बर्टोल्ड ब्रेख्तच्या एलिएनेशन या पाश्चिमात्य थिअरीपर्यंत दशावतारला जोडून घेत या नाट्यप्रकाराची उकल केली. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता आणि लोककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. विजयकुमार फातर्फेकर यांची अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि विश्लेषण यांचा मोठा उपयोग झाला. प्रत्यक्ष मोचेमाडकर दशावतार मंडळाबरोबर त्यांचं जत्रेच्या गावात नाटक सादर करायला जाणं, इथपासून ते पहाटे ते संपेपर्यंतचा सारा प्रवास शूट करताना आजच्या कॉर्पोरेट जगात वापरात असलेल्या ग्रुप मीटिंगचाही प्रत्यय त्यात आला.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…

गावातल्या मानकऱ्याने पुराणातल्या अमुक एका कथेवर नाटक करा असं सांगितलं की सर्व कलाकार गोलाकार बसतात. एकजण ग्रुप लीडर होतो आणि त्या रात्री ज्या कथेवर नाटक करायची ती कथा सांगतो. ती केवळ घटनाक्रमानुसार सांगत नाही तर प्रत्येक तपशिलामागचा दृष्टिकोन देत सांगतो. मधूनच कुणी काही विचारलं की ‘रिझल्ट ओरिएंटेड’ परिणाम साधला जावा या हेतूने नीट समजावतो आणि अखेरीस सर्व कलावंतांना भूमिका वाटून देतो.

‘दशावतार’चा एक शो पॅरिसमध्ये लेखक, कलावंतांच्या ग्रुपसाठी केला होता. शो संपताच एका लेखिकेने सांगितलं असाच एक लोककलेचा प्रकार आफ्रिकेत आहे. तिने लगेचच कम्प्युटरवरून एक प्रिंट आऊट काढून माझ्या हाती ठेवला. ‘यक्षगान’ च्या कलाकारांना घेऊन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिक डॉ. शिवराम कारंथ जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले, तेव्हा ब्राझीलमध्ये ‘यक्षगान’ सादर केल्यानंतर तिथला शेतकरी म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणताय ही तुमच्या देशातली लोककला आहे, परंतु हे आमचं आहे.’’

एखादी साहित्यकृती किंवा नाटक – चित्रपटातली एखादी व्यक्तिरेखा कायम आपल्यासह राहते. आपलं वय वाढतं, भोवतालाची समज वाढत जाते तसतशी ती व्यक्तिरेखा नव्याने उलगडत जाते. सत्यजित राय यांच्या ‘अपू ट्रिलोजी’तल्या ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’चा कथानायक अपू हा असाच कायमचा माझ्या सोबतीला आहे. त्यावर ‘बिईंग विथ अपू’ ही ४० मिनिटांची डॉक्युमेण्ट्री मी बनवली. श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, बुद्धदेव दासगुप्ता, समीक बंदोपाध्याय, डॉ. शामला वनारसे, प्रा. जगन्नाथ गुहा यांनी अपूने त्यांना केलेली सोबत याचं अभ्यासपूर्ण विवेचन केलं.

१९५० साली सत्यजित राय यांनी कलकत्त्याजवळच्या ज्या गावातील ज्या घरात ‘पाथेर पांचाली’चं शूटिंग केलं होतं तिथूनच कामाला सुरुवात केली. त्यावेळी पाचेक वर्षांचा असलेल्या सुबीर बॅनर्जी या पहिल्या अपूला सोबत घेऊन अपू – दुर्गाचं गाव पाहिलं. टिपलं. सत्तरीचे बॅनर्जी त्या घराकडे पाहत म्हणाले, ‘‘इथे भिंतीवर मोठं भोक होतं आणि त्यातून अपू आणि दुर्गाने शेताच्या बांधावरून जाणारा मिठाईवाला पाहिला. ती दोघं धावत निघाली. पुढे मिठाईवाला, मागे अपू, दुर्गा आणि त्यांच्यामागे कुत्रा…’’ मी मनाने एडिटिंग टेबलवर पोचलो होतो. मी सिनेमाटोग्राफर अनिकेतला घरासमोरच्या त्याच बांधावर घेऊन गेलो. चित्रपटात ही वरात फ्रेमच्या उजवीकडून डावीकडे चालताना दिसते. मी सुबीर बॅनर्जीला डावीकडून उजवीकडे चालायला लावलं. त्याचं प्रतिबिंब शेतातल्या पाण्यात दिसेल याचीही काळजी घेतली. कारण चित्रपटात त्या चौघांचीही प्रतिबिंबं पाण्यात दिसतात. वर्तमान आणि भूतकाळ एकाच फ्रेममध्ये आणला.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..

असाच अनुभव ‘अपूर संसार’मध्ये तरुण अपू साकार करणाऱ्या सौमित्र चटर्जी यांची मुलाखत चित्रित करताना आला. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘माझा थोरला भाऊ सारखे माझे फोटो काढायचा. मी ओरडायचो ‘नको.’ कारण मला वाटायचं मी मॉन्स्टरसारखा दिसतो…’’ मी पुन्हा एकदा एडिटिंग टेबलावर. सौमित्र यांच्या या शेवटच्या वाक्यावर मी ‘अपूर संसार’ मधला अपू आपल्या मित्राच्या गावी आल्यावर मित्राची मावशी त्याला पाहून जे उद्गार काढते तिथं जोडलं. त्यामुळे सौमित्रच्या ‘मॉन्स्टर’ नंतर मावशीचे शब्द येतात, ‘‘अरे, हा तर माझ्या देव्हाऱ्यातला कृष्ण!’’ डॉक्युमेण्ट्री म्हणजे रूक्ष माध्यम हे मी कधीच मानलं नव्हतं. फादर ऑफ डॉक्युमेण्ट्री अशी ज्याची ओळख आहे त्या रॉबर्ट फ्लेहर्टी यांच्या ‘नानुक ऑफ द नॉर्थ’(१९२१) पासून हेच शिकत आलो.

यानंतर मी ‘संवादिनी साधक : पं. तुळशीदास बोरकर’ ही डॉक्युमेण्ट्री अमेरिकेतला माझा मित्र विवेक खाडिलकर, त्याची पत्नी मंगल आणि नरेश शहा यांच्यासाठी केली. अगदी लहान वयापासून संगीताची आवड असलेल्या बोरकर गुरुजींचा गोव्यातील त्यांच्या बोरी गावापासून सुरू झालेला प्रदीर्घ प्रवास त्यात टिपलाय. ज्यांना संगीत क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी ही डॉक्युमेण्ट्री म्हणजे पाठ्यपुस्तक आहे असा संगीतक्षेत्रातील अनेक मोठ्या कलावंतांनी गौरव केला.

माझं बालपण गिरणगावात गेलं. आधी गुजरातमधील नवसारीत आणि मग मुंबईत. गिरणी कामगारांचं जगणं, त्यांचे संप, लढे, त्यांची फरपट आणि याचबरोबर खेळ, कला, सामाजिक उपक्रम असं त्यांचं सर्वांगीण पर्यावरण पाहत होतो. १९८२ ला डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली अखेरचा संप झाला आणि आमच्या नजरेसमोरच एक वसलेलं सुंदर गाव उद्ध्वस्त होताना पाहिलं. गिरणी कामगारांची, त्यांनी वसवलेल्या गिरणगावाची धानाधिस्पट (संपूर्ण वाट लागणे) पाहिली. प्रचंड अस्वस्थ होत होतो आणि त्याच वेळी, कोवळ्या वयापासून जे पाहत आलो होतो ते सारं गाव पुन:पुन्हा नजरेसमोर येत होतं. त्याचं डॉक्युमेण्टेशन व्हायला पाहिजे असं सतत अगदी १९८२ पासूनच वाटत होतं. डॉक्युमेण्ट्रीचं नाव ‘एक होतं गिरणगाव’ असं ठेवता आलं असतं, पण नाव सुचलं, ‘आणखी एक मोहेंजो दारो’. मोहेंजो दारोत जशी एक प्रगत संस्कृती होती तशीच ही एक गिरणगावाची संस्कृती. मोहेंजो दारो जसं कायमचं गाडलं तीच गत गिरणगावाची झाली.

२०१५ मध्ये अखेर मी ठरवलं की सुरुवात करायची. संकल्पना डोक्यात अगदी स्पष्ट होती. तरीही मी नाटककार, कथालेखक जयंत पवारला भेटलो. डॉक्युमेण्ट्रीची पटकथा तशी लिहिली जात नाही; परंतु आम्ही दोघांनी आपापल्या पटकथा लिहिल्या. कारण जयंतही गिरणगावातच जन्मला होता. काही काळ त्याने गिरणीत नोकरीही केली होती. गोव्यातला माझा मित्र राजेश पेडणेकर निर्माता म्हणून पाठीशी उभा राहिला. अर्धा निर्माता मीही झालो. संशोधक आणि समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीन साळुंखेची मोठी मदत झाली. सिनेमाटोग्राफर अनिकेत खंडागळे, असोसिएट डायरेक्टर चार्ल्स गोम्स, साऊंड डिझायनर केतकी चक्रदेव आणि पोस्ट प्रॉडक्शनसाठी विनामूल्य आपला स्टुडियो उपलब्ध करून देणारा राघवेंद्र हेगडे यांच्यामुळेच हा प्रकल्प मी पूर्ण करू शकलो.

भारतातील फिल्म सोसायटी चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाने चित्रपट संस्कृती प्रसाराचा हा प्रदीर्घ प्रवास पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी डॉक्युमेण्ट्री करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. सध्या मी देशभर हिंडत तिचं शूटिंग करतो आहे. याशिवाय आणखी दोन डॉक्युमेण्ट्रीज पुढल्या वर्षात पूर्ण होतील. त्यांचं संशोधन वगैरे संपूर्ण तयारी झाली आहे. आणि मग आठ तासांची भलाथोरला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अवकाश असणारी डॉक्युमेण्ट्री मला करायची आहे. तिचीही स्पष्ट संकल्पना आणि बरंचसं संशोधन चाललेलंच आहे. ही माझी शेवटची डॉक्युमेण्ट्री असणार आहे!

ashma1895@gmail.com

राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित चित्रपट समीक्षक. देशातील ‘फिल्म सोसायटी चळवळ’ उभारणीत योगदान. ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या डॉक्युमेण्ट्रीला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार. ‘सिनेमा पाहणारा माणूस’ यांसह चित्रपटांवर लिहिलेली पुस्तके लोकप्रिय.