मकरंद देशपांडे
जेव्हा कुणी म्हणतं की, अमुक एक व्यक्ती खानदानी आहे किंवा ‘इनके खानदान में ही हैं!’- याचा अर्थ असा लावता येईल की, त्यांच्या कुटुंबातल्या काही परंपरा किंवा काही गुण या त्या कुटुंबाचे ‘विशेष’आहेत किंवा त्यांची ‘ओळख’ आहे. मला असं वाटलं की, रंगमंचावर असं एखादं खानदान आणायला हवं. पण त्याचबरोबर हेही वाटलं की, त्यांचा रंगमंचाशी संबंध असावा. खरं तर अशी कुटुंबं संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला, शिवणकला, पाककला किंवा अगदी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेल्या सनिकांत आहेतच, पण रंगमंचासाठी असं समर्पण मी पाहिलं नासिरुद्दीन शाह यांचं.
एके दिवशी मी काही कारणास्तव त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा घरी दिना पाठक (रत्ना पाठकांच्या आई), रत्ना पाठक, नसीर, इमाद, विवान आणि हिबा ही त्यांची मुलं अभिनयाबद्दल चर्चा करत होती. मला गहिवरून आलं. एखादं अख्खं कुटुंबच काल झालेल्या नाटकाबद्दल घरी बोलत आहे; आणि असंही नाही की, ते फक्त आपल्या नाटकाबद्दलच बोलत आहेत, तर दुसऱ्या नाटकाचा प्रयोगसुद्धा डायिनग टेबलवर विस्तारपूर्वक चर्चिला जातोय.
मला अशा कुटुंबाबद्दल एवढी उत्सुकता आहे, की समीक्षक, प्रेक्षकसुद्धा घरीच.. नाही का? आणि त्यापेक्षा एक नट म्हणून होणारी प्रगती ही घरातल्या भिंतीसारखी घरात राहणाऱ्या कलावंत मंडळींच्या डोळ्याखालून जाते. समजा, कुणाला आजार झाला आणि त्याला घरात झोपून राहायल सांगितलं तर त्याच्या मनोरंजनासाठी भाऊ, बहीण, आई, बाबा आहेतच. कधी नाटकातला एखादा उतारा, एखादी कविता किंवा अगदी धार्मिक ग्रंथ नट जेव्हा वाचतो, तेव्हा त्यातला अर्थ समोरच्यापर्यंत पोहचतो. त्यातून समजा, कुटुंबातला नट गाणारा असेल तर नाटकातील पदंसुद्धा ऐकायला मिळतील.
विचार केला तर अगदी दिवसाची सुरुवात ओमकाराने, शरीराच्या व्यायामाबरोबर आवाजाचे व्यायाम, मुद्राभिनयाचे व्यायाम आणि मग नाश्ता. त्यानंतर अंघोळ वगैरे करून नाटकाचं स्क्रिप्ट वाचन. त्यात न कळलेल्या गोष्टींच्या प्रश्नांची नोंद करणं, मग जेवण, पुन्हा स्क्रिप्ट वाचणं. त्यात पुन्हा तेच प्रश्न समोर उभे राहिले तर संध्याकाळच्या तालमीत लेखक किंवा दिग्दर्शकाला विचारायचे. नाहीतर तालमीनंतर घरी डायिनग टेबलवर जेवणाच्या पदार्थाबरोबर लोणचं म्हणून हेच प्रश्न- ज्यांची उत्तरं द्यायला घरातीलच सगळी अनुभवी किंवा अननुभवी मंडळी! पण दिवसाच्या शेवटी झोपताना तेच प्रश्न पुन्हा नाहीत. तुम्हाला असं वाटलं असेल ना, की हा असा दिवस आपल्या आयुष्यात आला तर? म्हणून की काय मी ‘खानदानी अॅक्टर ’ असं नाटक लिहिलं. ज्याचं नाव खरं तर ‘खानदान ही अॅक्टर’ असं पाहिजे होतं.
या नाटकात जरी एका कुटुंबातले सगळे नट असले तरी मला साधारण घडामोडी लिहायच्या नव्हत्या. काहीतरी अतक्र्य असं लिहायचं होतं. कारण लेखक म्हणून मला नेहमी असं वाटतं की, जीवन आणि रंगमंच यामधलं अंतर लेखक म्हणून लावलेल्या अर्थानं असावं आणि त्यातून मनोरंजनसुद्धा व्हावं.
सकाळी सकाळी आपल्या नाटकाच्या कुटुंबातले सगळेच- म्हणजे आई, मोठी बहीण, छोटी बहीण आपापल्या कामाला (शुटिंगला) निघायच्या तयारीत असतात. आजोबा शांतपणे पुस्तक वाचत असतात आणि घरातला दोन बहिणींमधला मुलगा (नातू) दारूच्या नशेत घरी येतो. त्याला बघून त्याचे वडील खूप चिडतात. कारण तो नशेत घरातल्या सगळ्यांवर मूल्यांच्या अध:पतनाचे आरोप लावतो. आई आणि दोघी बहिणी रंगमंच सोडून मालिकांमध्ये काम करतात. वडील नुसतं घरात बसून खातात- अॅक्टिंग ब्लॉक आल्यामुळे की प्रेक्षकांनी त्यांना खराब अॅक्टर म्हटल्यामुळे- कारण काहीही असो, पण रंगभूमीवर आजोबांनी जे नाव कमावलं ते सगळे खराब करत आहेत. त्याच्या या पाच मिनिटांच्या स्वगतामुळे घरातल्या उत्साहाच्या सकाळला गळून गेल्यासारखं वाटतं. अचानक घरातलं वातावरण वास्तवाच्या पलीकडे मेलोड्रॅमॅटिक होतं; ज्यातून सत्य समोर उभं राहतं आणि ते ऐकताना त्याची घृणा वाटते. आजोबा काहीही सारवासारव न करता या सगळ्याची जबाबदारी स्वत:वर घेतात. कारण नातवाला त्यांनी लाडावलेलं असतं, पण नट म्हणून त्याला सत्याच्या शोधात राहायलाही सांगितलेलं असतं.
आता त्याला दारुडा तळीराम करायचा असतो म्हणून तो दारू पिऊन आलेला असतो. खरं तर ‘एकच प्याला’ मधला तळीराम हा दारूच्या आहारी जाऊन, दारूसाठी स्वत:ची दारुण स्थिती घडवून आणतो. पण तो काही महत्त्वाच्या गोष्टी बोलतो. त्याला जरी नशेतलं सत्य म्हटलं तरी ते सत्य कबूल करावं लागतं. घरात नातवानं नेमकं तेच केलेलं असतं. वडिलांनी अॅक्टिंग करणं बंद केलं, कारण त्यांना वाटायला लागलं की आता बदलणाऱ्या काळातील अॅक्टिंग त्यांना जमण्यासारखी नाही. पण आजोबा अगदी पुढारलेल्या विचारांचे. त्यांचं म्हणणं पडतं की, आजच्या काळात कुटुंब नाटक करून घर चालवू शकणार नाही, तेव्हा सीरिअल चित्रपट करावेत, नाहीतर शिक्षक व्हावं. पण वडील हे हाडामांसाचाचे नट असल्यामुळे अभिनयाचे अनुभव सांगणं आणि अभिनय शिकवणं यातलं अंतर त्यांना माहिती असतं.
दारू उतरल्यावर जेव्हा नातवाला सांगितलं जातं की, त्यांने काय काय केलंय, तेव्हा त्याला लाज वाटते. पण त्याच्यातल्या नटाचा वेडेपणा जात नाही. त्याला जेव्हा एका चित्रपटामध्ये गॅंगस्टरच्या भूमिकेसाठी घेतलं जातं तेव्हा तो मुलाखतीत खऱ्या गँगस्टरचे नाव घेतो आणि आपण ही भूमिका त्याच्यावर आधारित करू असे म्हणतो. त्याला धमकीचे फोन येतात. निर्माता घाबरून फिल्म बंद करतो. नटाच्या वेडेपणामुळे निर्मात्याला त्रास झाला अशी बातमी पसरते. त्यामुळे अचानक घरी भीतीचं वातावरण निर्माण होतं. एक हवालदार दिवसा घराबाहेर पहाऱ्यासाठी असतो. पण नातवाला खूप राग आलेला असतो. तो आपल्या आजोबांना एवढंच सांगतो की, जर हा गँगस्टर स्वत:ला वेडा समजत असेल. तर एक नट त्यापेक्षा जास्त वेडा आहे आणि तो त्याला घाबरून गप्प बसणार नाही.
आजोबा तात्काळ डायिनग टेबलवर एक घोषणा करतात की, आपण एका संगीत नाटकाची निर्मिती करणार आहोत. त्याचं लिखाण मी आणि नातू करणार आहोत. त्यात घरातल्या सगळ्यांनी अभिनय करायचा आहे. त्याच्या तालमी घरीच होणार आहेत. ही West Side Story या क्लासिक Broadway नाटकासारखं संगीत नाटक- ज्यात त्याची आई, बाबा, बहिणी, आजोबा आणि त्याचे मित्र अभिनय करणार असतात, पण नेमकी ही बातमी बाहेर पसरते आणि पुन्हा धमक्या यायला लागतात. आता मात्र वडील मुलाखत देऊन ठणकावून सांगतात की, गुंडांनी गुंडगिरी करून पैसे कमवावे आणि कुणी नाटक करण्यासाठी स्वत:च्या पदरचे पैसे त्यात घालत असेल तर त्यावरही बंदी घालावी, हे कोणतं स्वातंत्र्य? वडिलांचा आत्मविश्वास परत आलेला पाहून सगळ्यांना आनंद होतो. जोरदार तालमी सुरू होतात.
‘एका नाटककाराच्या कुटुंबानं एका माफिया कुटुंबाला आव्हान दिलं.’.. प्रसिद्धी माध्यमं कळस गाठतात. नेमकं त्याचवेळी आजोबांना टी.बी. होतो. महिनाभरात प्रयोग होणार असतो, पण आता आजोबांच्या आजाराची लागण इतरांना होऊ नये म्हणून त्यांना कोपऱ्याच्या खोलीत बंद केलं जातं.. त्यांच्याच सांगण्यावरून. नातवाला खूप दु:ख होतं. हळूहळू आजोबांचा खोकला जास्त आणि बोलणं कमी होतं. आजोबांच्या बोलण्याबरोबर घरातलं संभाषण कमी होत जातं. आजोबांना हा प्रयोग कसाही करून करायचा असतो, पण मुलगा, वडील, आई, बहिणी यांना अचानक रंगमंचावरच्या नाटकापेक्षा जीवन मेलोड्रॅमॅटिक वाटतं. घरात शोकांतिका शांततेचं रूप घेते. हळूहळू नाटकातलं संभाषण मूकाभिनय शैलीत सुरू होतं. आजोबांच्या सांगण्यावरून माफियाच्या माणसांना घरी बोलावून नाटकाची तालीम दाखवली जाते. ज्यात शेवट ट्र्रेल्लॠ (मूकाभिनय) ने होतो आणि अचानक खोलीतून आजोबा बोलायला लागतात. त्यांच्या खोकल्याच्या उबळीतून ते नट आणि त्याच्या वेडाविषयी बोलतात तेव्हा गुंडांना स्वत:ची शरम वाटते. आजोबांच्या तोंडातून रक्त बाहेर पडतं. अखेर पडदा पडतो.
हे नाटक गद्यात लिहिलं गेलं, पण यात बरेच प्रसंग इम्प्रोव्हायझेशनसाठी सोडले गेले. काही गाणी आणि नृत्यसुद्धा तालमीत उस्फूर्तपणे करायची ठरवली.
पंडित सत्यदेव दुबे (बऱ्याच रंगकर्मीचे गुरू) यांनी आजोबांची भूमिका करायचं स्वत:च ठरवलं आणि त्यासाठी त्यांचं चार पानांचं स्वगत त्यांनी आधीच माझ्याकडून घेतलं आणि म्हणाले, ‘मी हे आधी पाठ करतो.’ पण मध्येच त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर ते हॉस्पिटलमधून बाहेर आले आणि म्हणाले की, मी ते स्वगत पाठ करतो. पण मग पुन्हा तब्येत खालावली आणि सगळंच राहून गेलं. पुढे एक दिवस ते सेमी कोमात गेले आणि ते नाटक कायमचंच राहून गेलं. जर कधी केलं तर ते फक्त त्यांच्यासाठीच करीन! पण त्यांच्यासारखे नटांचे आजोबा मिळणार कुठून?
जय दुबेजी! जय नट!
जय नाटक! जय वेडेपण!
mvd248@gmail.com