प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रा. प्रल्हाद अनंत धोंड हे जे.जे. स्कूलचा चालताबोलता इतिहास समजले जात. जे.जे.चं मोठेपण ज्या काही लोकांवरून ओळखलं जातं त्यापैकी धोंड मास्तर अथवा सर्वाच्या प्रेमाचे नाव ‘भाई’ हे त्यातील एक महत्त्वाचे नाव. कोकणातील निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या धोंड मास्तरांना तेथील नयनरम्य निसर्ग नेहमीच मोहवीत असे. त्यांचे व्यक्तिचित्रण, कॉम्पोझिशन विषय तितकेच समर्थ होते, पण निसर्गचित्रांनी त्यांना जास्त मोहविले. विशेषत: जलरंगावर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. कोकणातील कोळी जमात, उसळलेला सागर, समुद्रकिनारा, कोळय़ांचे मचवे हे त्यांचे आवडते विषय. आपल्या आरंभीच्या काळात ते शांतिनिकेतनमध्ये डेप्युटेशनवर गेले होते. त्यामुळे त्यांची आरंभीची निसर्गचित्रे ही संपूर्ण बारकावे दाखवीत केलेली दिसतात; पण त्यानंतर मात्र त्यांनी आपले तंत्र बदलले व लॅंडस्केप-सीस्केपसाठी स्पंजचा वापर करू लागले व त्याच्या आधारे ते असा काही परिणाम साधत, की त्यांच्या या कौशल्याला सातवळेकरांसारखे वास्तववादी कलाकारही मन:पूर्वक दाद देत. असे हे धोंड मास्तर आरंभीच्या काळात स्थळावर जाऊन चित्रण करीत असत; पण नंतर धोंडांनी पुढे जागेवर जाऊन चित्रण करण्याचे थांबवले. तेथे ते आपल्या स्केचबुकमध्ये लहान लहान स्केचेस करून नंतर त्याचे निसर्गचित्रांत रूपांतरित करीत. गंमत म्हणजे हे निसर्गचित्रण करण्यासाठी धोंड मास्तर विशेष कधी फिरले नाहीत. विदेशातही कधी गेले नाहीत. भारतातही फारसे नाहीत. मात्र नॅशनल जिओग्राफिक वा अन्य वाहिनीवरील निसर्ग त्यांना भावला, की तो भाईंच्या स्मरणातील कप्प्यामध्ये बसायचा व नंतर चित्रांतून कागदावर एक नवं रूप घेऊन अवतारायचा. या स्पंजच्या शैलीवर त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्यावर त्यांचा हात इतका बसला की, केवळ स्पंजच्या साहाय्याने रंगांच्या कमीअधिक छटा, पाण्याचा नेमका वापर त्यांना अचूकपणे जमत असे. आकाश, जमीन यांमध्ये दिसणारी किंचितशी बारीक रेषा तसेच काळवंडलेल्या ढगातून बाहेर पडणारा उजेड पाहून आपण अचंबित होतो. त्यामुळेच धोंड मास्तर हे निसर्गचित्राचे बादशहा म्हणून ओळखले जात.
धोंड मास्तरांनी केवळ नोकरी म्हणून स्कूल ऑफ आर्टमध्ये काम केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या पिढय़ा घडवणारे ते एक आदर्श गुरू होते. धोंड मास्तरांकडे अगदी बालपणापासूनचे अनेक किस्से होते आणि त्यासोबत लाभलेली तल्लख अशी स्मरणशक्ती. त्यातून धोंड हे एक गोष्टीवेल्हाळ व्यक्तिमत्त्व! त्यातही त्यांच्या बोलण्याला एक विनोदी झालर असायची. सोबत ऐकणाऱ्यांना खास असे मालवणी चिमटे काढण्याची सवय अन् मनात आठवणींचा प्रचंड असा साठा. हा सर्व खजिना धोंड मास्तर संधी मिळेल तेव्हा रिता करीत असत. त्यातही खास करून जे.जे.ची स्टाफ रूम ही महत्त्वाची जागा. जेवणाच्या मधल्या सुट्टीत तेथे धोंड मास्तरांच्या गप्पांची बैठक भरली जायची. संभाजी कदम, सोलापूरकर, वसंत परब, गजानन भागवत, पळशीकर, मांजरेकर, संघवई, बाबूराव सडवेलकर असे तोलामोलाचे अध्यापक कलाकार त्यामध्ये सामील असत. या गप्पामध्ये जे.जे.चे अनेक शिक्षक धोंडांच्या विनोदाचे विषय व्हायचे. त्यातही एखाद्या शिक्षकावर जर धोंडांनी विनोद केला नाही, तर आपली मन:पूर्वक थट्टामस्करी करावी इतकी आपुलकी त्यांना आपल्याबद्दल वाटत नाही, असे समजून तो शिक्षक जरा नाराज होत असे; पण लवकरच त्याच्याकडेही धोंड मास्तरांचा मोर्चा वळत असे आणि तोही मग दिलखुलासपणे त्यात सामील होत असे. आपल्या या गप्पांना धोंड मास्तर ‘धुरांडे’ म्हणत असत.
स्टाफ रूममध्ये चालणारे हे जिवंत सहजनाटय़ संपूर्ण जे.जे.ला प्रसन्न अन् खळाळते ठेवत असे. यामध्ये कलाविश्वातील वातावरण धोंड मास्तर तंतोतंत उभे करीत असत. जसे त्यामध्ये पूर्वीचे शिक्षक, विद्यार्थी, प्रदर्शने, त्या काळातील कलावंत यांचा समावेश असे. तसाच त्यांच्या मालवण गावचे व त्या परिसरातील अनेक व्यक्ती व निसर्ग यांचाही सहभाग असे. त्यातूनही एखाद्या व्यक्तीविषयी सांगायचे असेल तर स्वत: उभे राहून, हावभाव करून, हातवारे करीत फिरून त्याची नक्कल करीत असत आणि ऐकणारे हसून हसून गडाबडा लोळत असत. यासाठी त्यांना लहानपणी केलेल्या गावातील नाटकात व पुढे कॉलेजजीवनातील नाटकातील अभिनयाची जोड मिळत असे. कधी इरसाल बोलण्याची लहर आली की स्टाफ रूमच्या बाहेरून कोणी ऐकू नये म्हणून दरवाजा बंद करून घ्यायला ते विसरत नसत. या त्यांच्या गप्पांचा आस्वाद घेण्यासाठी धोपेश्वरकर अन् गोंधळेकर यांसारखे बुजुर्ग शिक्षकही आपले जेवण घाईघाईने आटोपून स्टाफ रूमकडे धाव घेत.
हळूहळू या गप्पांना बाहेरच्या जगातदेखील प्रसिद्धी मिळू लागली आणि श्री. ना. पेंडसे यांच्यासारखे मातब्बर त्या ऐकण्यासाठी हजेरी लावू लागले. सोबत चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू), वसंत सावंत यांच्यासारखे कवीही तेथे येऊ लागले. त्यात मग भर पडली ती नटवर्य नाना पळशीकर, ‘सत्यकथे’चे राम पटवर्धन यांची. सर्वच त्यात रमू लागले. धोंड सर जेव्हा त्यांच्या विद्यार्थिदशेतील शिक्षकांच्या गोष्टी सांगू लागत, तेव्हा इतरांना त्या आपण ऐकत बसलो आहोत असे न वाटता तेदेखील त्या काळात जाऊन पोहोचत. यात काही महान कलाकारांचे असलेले एकमेकांशी हेवेदावे, राजकारण, त्यांचा रुबाब, शिल्पकार राव बहादूर म्हात्रे, तसेच त्यांचा वारसा पुढे चालवणारे नानासाहेब करमरकर, जे.जे.च्या अस्तित्वाची लढाई लढताना जे.जे.साठी विद्यार्थिदशेत केलेला संप, कॅ. ग्ल्यॅडस्टन सॉलोमन, जेरार्ड- त्यांचे मोठेपण, ती जुनी माणसे आपल्या रुसव्याफुगव्यासह, सुखदु:खासह आपणाशी संवाद साधत आहेत ही पुरेपूर जाणीव त्यांना होत असे. या गप्पांच्या मैफली झडत असतानाच त्यामधील साहित्यिक मूल्यांची जाणीव सर्वानाच होऊ लागली. धोंड मास्तर या गोष्टी सांगत नसून आपण त्या भूतकाळातील व्यक्तींबरोबर बोलत आहोत, असेच सर्वाना भासू लागले आणि यातून एक कल्पना जन्माला आली ती म्हणजे धोंड सरांच्या या सर्व आठवणी लिहून काढाव्यात. यामधून गेल्या पन्नास वर्षांतील कलाविश्वाच्या अन् जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या आठवणी, माहिती संकलित होईल; पण धोंड सरांना हे सांगताच त्यांनी त्याला ठाम नकार दिला. ‘‘नाही रे! माझं आपलं हे धुरांडं आहे. त्यात वाङ्मय वगैरे काही नाही. मी काय साहित्यिक थोडाच आहे!’’ हे त्यांचे उद्गार. पण नंतर त्यांनाच जाणवले की, या शिक्षकांचा आग्रह ही केवळ थट्टा नाही. ते मनापासून बोलत आहेत. दरम्यान काही सहाध्यापक राम पटवर्धन व श्री. पु. भागवत यांच्याकडे या आठवणी लिहिण्याबाबत बोलले. त्या दोघांनीही ही अनोखी कल्पना उचलून धरली.
१९६६ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे पूर्वीचे डायरेक्टर कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन हे वारल्याची बातमी आली. त्यांच्यावर ‘सत्यकथे’साठी लेख लिहिण्याची विनंती राम पटवर्धनांनी प्रा. संभाजी कदम यांना केली. प्रा. कदमांनी धोंडांना सांगितले की, सॉलोमनवर लेख लिहिण्याचा अधिकार केवळ तुम्हाला आहे. तुम्ही बोलत चला, मी लिहीत जातो. आणि येथूनच खरा या आठवणींना पुस्तकाचे रूप देण्याचा प्रवास सुरू झाला. १९६६ पासून लिहावयास आरंभ झालेल्या या पुस्तकाचा अखेर होईपर्यंत १९७९ साल उजाडले अन् या पुस्तकाचे नाव ठरले ‘रापण’. रापण हे नाव धोंड सरांना कोकणातल्या गाबितांच्या रापणीवरून सुचले. प्रचंड असे लांबलचक जाळे समुद्रात दूरवर पसरले जाते. त्यामध्ये मासे अडकले की ते जाळे वीस-वीस माणसे खेचून किनाऱ्याला आणतात. त्या जाळय़ात मोरी, इसवण, रावस, दाडा इत्यादी मोठे मासे व बांगडे, पेडवे, शेतके, मुडदुश्या असे लहान प्रकारचे मासे असतात. या सर्व माशांचे जेवढे जाळे ओढणारे लोक असतात तेवढे वाटे किनाऱ्यावर घालतात. शिवाय एक वाटा जास्तीचा असतो. तो देवाचा वाटा. त्यातील हवे ते व हवे तेवढे मासे कुणीही फुकट नेऊ शकतात. धोंड सरांनी त्यांच्या मते आपल्या आठवणींच्या ‘रापणी’तील या पुस्तकात देवाचा वाटा ठेवला आहे. कोणीही या वाटय़ातील आवडेल ते घेऊन जावे.
प्रा. संभाजी कदमांनी धोंडांच्या आठवणी ऐकून त्या लिहिण्यास प्रारंभ केला. दिवाळीच्या व उन्हाळय़ाच्या सुट्टीत ते जे.जे.मध्ये येऊन बसत, तेही धोंड सरांचा केव्हा सूर लागेल याची वाट पाहत. कधी लहान मुलासारखे सबबी सांगायचे. मध्ये तर एकदा ते कदमांशी भांडलेही; पण दुसऱ्या दिवशी कदम दत्त म्हणून त्यांच्यापुढे उभे राहिले व म्हणाले, ‘‘आपण एकमेकांशी जरी भांडलो तरी पुस्तकाचे काम थांबणार नाही.’’ पुढे धोंड सर निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या हिंदूू कॉलनीमधील घरी काही काळ व पुढे त्यांच्या कलानगरमधील बंगल्यात येऊनही कदमांनी लिखाण केले आहे. काही गोष्टींची पुनरावृत्ती झाल्यास ती काढणे, लेखात सातत्य राखणे या बाबी कदम सर जातीने लक्ष देऊन पार पाडीत असत. यातील काही व्यक्तिचित्रे ‘सत्यकथा’ मधून आधीच प्रकाशित झाली होती. ‘मौज प्रकाशन’ने आपला नेहमीचा सुबकपणा व नीटनेटकेपणा राखून हे पुस्तक मार्च १९७९ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकाला केवळ कला क्षेत्रातूनच नव्हे, तर सर्वच स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाय त्या वर्षीचा राज्य पुरस्कारदेखील त्याला मिळाला आणि याच्या प्रती त्या काळात हातोहात संपल्या. बरेच दिवस लोकांची मागणी होत होती; पण पुस्तक उपलब्ध नव्हते.
आजच्या पिढीतील लोकांना केवळ ज्यांची नावेच माहिती आहेत अशा उत्तुंग कलाकारांची केवळ ओळखच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र उलगडणारे रापण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट व तिच्या अनुषंगाने येणारी अनेक भारतीय तशीच पाश्चात्त्य व्यक्तिमत्त्वे दाखवून जाते. धोंड सरांच्या आठवणींच्या कप्प्यातून कोण नाही उतरले? यात जे.जे.चे सॉलोमन-जेरार्डसारखे संचालक आहेत. फाइन आर्ट व उपयोजित कलेतील स्पर्धा घडवणारे अडुरकर -आडारकर आहेत. मुंबईचे कलाविश्व आपल्याभोवती फिरवणारा वॉल्टर लॅंगहॅमर आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पहिल्या प्रदर्शनाची माहिती आहे. जणू रापण वाचताना जाणवते की ते आपण बाजूला उभे राहून या सर्व गोष्टी आपल्या डोळय़ांनी न्याहाळत आहोत. आज कित्येक जण रापणचा संदर्भासाठी, माहितीसाठी उपयोग करून घेतात.
कोकणच्या निसर्गाने भारलेले धोंड मास्तर केरळच्या ओढीने तळमळत होते. कधी संधी मिळाली तर केरळचे निसर्गदर्शन, विशेषत: तेथील ‘बॅकवॉटर’ त्यांना आपल्या कलेद्वारे रसिकांना दाखवायचे होते. वयाची ८५ वर्षे उलटली तरी त्यांचा उत्साह मात्र जबरदस्त होता. त्यांचे जावई किसन कामत त्यांना विमानाने केरळला घेऊन गेले. कोची येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. सकाळी उठल्यावर ते बाहेर पडले तेच बॅकवॉटरला पोहोचले. तेथील सर्व निसर्गसौंदर्य त्यांनी जसे डोळय़ात साठवले तसेच आपल्या स्केचबुकमध्ये उतरवले. मग मात्र बाहेर कोठे फिरणे नाहीत वा खरेदी नाही. हॉटेलवर पोहोचताच त्यातील काही स्केचेस त्यांनी निसर्गचित्रात रूपांतरित केली. सकाळी उठल्यावर ते जावयाला म्हणाले, ‘‘आता मुंबईला परतू या.’’ कामतांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला अजून केरळ पाहायचा नाही का?’’ तेव्हा भाईंचे त्यावर उत्तर होते, ‘‘अरे, माझे कोकण यापेक्षा काय वेगळे आहे? लहानपणापासून माझ्या उरात भरले आहे तेच येथे दिसले आहे. फक्त बॅकवॉटर पाहायचं होतं ते पाहून झालं.’’ अन् मुंबईला पोहोचल्यानंतर धोंड सरांनी केरळची चित्रे करण्यास आरंभ केला. काही मोजकीच चित्रे तयार झाली अन् त्यांना कॅन्सर या दुर्धर रोगाने गाठले. केरळची निसर्गचित्र मालिका त्यांना पूर्ण करायची होती. त्यासाठी ते तळमळत होते अन् त्यांनी कामाला जोर लावला. ‘‘आता मला धुंदी यायला लागली आहे. मला मी पाहिलेले केरळ दाखवायचे आहे. त्यासाठी देवाने मला दोनच वर्षे आयुष्य द्यायला हवे,’’ असे ते म्हणत. त्यांच्या या चित्रांमधून कोकणातल्या निसर्गापेक्षा वेगळेपणा दिसू लागला; पण.. पण पुढच्याच वर्षी २१ एप्रिल २००१ या दिवशी वयाच्या ९३ व्या वर्षी धोंड मास्तरांनी- सर्वाच्या लाडक्या भाईंनी या जगाचा निरोप घेतला. अशा या धोंड मास्तरांनी आपल्या आयुष्यात कागदाला कधी पिन टोचली नाही. आपल्या मुलाला त्याची आई जितक्या प्रेमभराने भरवते, तितक्याच हळुवारपणे बोर्ड मांडीवर घेऊन त्यांचे चित्रण चालू असे. त्यानंतर त्यांच्या ‘रापण’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्याच दिमाखात ‘मौज प्रकाशना’ने प्रकाशित केली. आज भाई धोंड आपणात नाहीत, पण जे. जे.च्या भिंती, तेथील स्टुडिओ, तेथील वृक्षवल्ली या सर्वासहितच ‘रापण’मधील त्यांच्या धुरांडय़ातील अनेक आठवणी आजही आपणास जिवंत दिसतात. त्यातील व्यक्तिरेखा आपणाशी गप्पांच्या रूपाने संवाद साधतात आणि विशेष म्हणजे यातून दिसते ते जे.जे.ची स्टाफ रूम, तेथील गप्पा ऐकायला जमलेले शिक्षक व त्यांना आपल्या एकपात्री प्रयोगानिशी जे.जे.चे वातावरणनिर्मिती करणारे धोंड मास्तर अर्थात आपले भाई!
wrajapost@gmail.com