||अतुल देऊळगावकर
‘‘माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्याचं निसर्गाशी युद्ध हे अटळपणे स्वत:च्याच विरोधातील आहे.’’ – राशेल कार्सन
ऑस्ट्रेलियातील पर्यावरणाचे तत्त्वज्ञ व ‘शाश्वातता’ या आंतरज्ञानशाखीय विषयाचे प्रो. ग्लेन अलब्रेख्त हे सध्या शेती व चिंतनास वेळ देत आहेत. (याआधी ते सिडनी विद्यापीठात भूविज्ञान विभागाचे संचालक होते.) ते दक्षिण ऑस्ट्रेलियातील अपर हंटर व्हॅली या निसर्गाने नटलेल्या नयनरम्य भागात राहतात. या भागात कोळसा असल्याचं लक्षात आल्यावर तिथे एकापाठोपाठ एक जमिनीवरील खुल्या खाणीसुरू झाल्या. अवाढव्य यंत्रांनी विशाल वृक्ष जमीनदोस्त करत सफाई होऊ लागली. खोदकाम करण्यासाठी तिथल्या आदिवासींना (वोनरुआ) न कळवता दिवसातून कधीही सुरुंग लावले जाऊ लागले. त्या शक्तिशाली स्फोटांनी त्यांची घरे हादरून जाऊ लागली. त्या परिसरात सुमारे दहा कोटी टन कोळसा असल्यामुळे असे जबरदस्त धक्के मग वारंवारच बसू लागले. भल्यामोठ्या वाहनांची वर्दळ सुरू झाली. एकेकाळचा निरव शांततेचा हा प्रदेश कानठळ्या बसवणाऱ्या गोंगाटाचा झाला आणि आदिवासी भयग्रस्त झाले. ‘नैसर्गिक संपदा ही त्या भागासाठी शाप असते’ ही भीषण उक्ती ते क्षणोक्षणी भोगू लागले. प्रो. अलब्रेख्त हे काही हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणारे लेखक नव्हेत. त्यांचं निसर्ग व माणसांवर मन:पूर्वक प्रेम आहे. करुणा हा त्यांच्या संशोधन व कृतिशीलतेचा गाभा आहे. त्यांनी निसर्गाचा विनाश करणाऱ्या कोळशाच्या खाणींच्या विरोधात मोहीम उघडली. अनेक निवेदनं दिली, लेख लिहिले, न्यायालयात दाद मागितली. इतर कुठल्याही सरकारांप्रमाणेच ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आपल्यासाठी एक उच्चशिक्षित गृहस्थ जिवाचा आटापिटा करतोय, हे पाहून आदिवासी त्यांच्याशी मनमोकळेपणी संवाद करू लागले. या आकलनातून त्यांनी ‘मेंदूमानववंशशास्त्र’ (न्यूरोआंथ्रॉपॉलॉजी) ही नवी ज्ञानशाखा विकसित केली. (आपल्याकडे महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांतील कोळशाच्या खाणींच्या परिसरातील आदिवासींची अवस्था अगदी अशीच आहे. चंद्रपूरजवळील रहिवाशांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आदिवासींचं वास्तव्य असतं ते जंगलात. आणि निसर्गसंपन्न व जलसमृद्ध जंगलातच खनिजांचे विपुल साठे असतात. त्यामुळे कारखानदार अशा भागांचा ताबा घेत आहेत. साहजिकपणेच आदिवासी देशोधडीला लागत आहेत. आपल्या देशातील सुमारे १२ कोटी आदिवासींची मनोवस्था समजून घेण्याचे कष्ट घेतले तर ती ऑस्ट्रेलियातील वोनरुआंसारखीच असेल.)
२००२ साली प्रो. अलब्रेख्त यांना आदिवासींचे अतिशय घाबरेघुबरे होऊन फोन येऊ लागले. अनेक आदिवासी स्त्री-पुरुषांशी सविस्तर चर्चा केल्यावर ते त्यामागील कारणांच्या खोलात गेले. अलब्रेख्त म्हणतात, ‘‘आपल्या रोजच्या जगण्यात आपलं मन हे ताणरहित सहजता अनुभवत असतं. आपल्या वहिवाटीचा परिसर हा आपल्याला पोषक व आल्हाददायक वातावरण देत असतो. आपलं काहीतरी हरवतंय, या भावनेनं हे आदिवासी कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यांचा बदलत चाललेला भोवताल त्यांना उपरा वाटू लागल्यामुळे ते भयभीत झाले होते. आपल्याच भूमीपासून परके होत जाण्याच्या भावनेतून येणाऱ्या मानसिक तणावाच्या अवस्थेला (एलिएनेशन- परात्मभाव या भावनेशी साधम्र्य) मला संज्ञा देता आली- ‘सोलॅस्टॅल्जिया’! (लॅटिन भाषेत ‘सोलॅसियम’ म्हणजे दु:खदायक व ग्रीक भाषेतील ‘अल्जिया’चा अर्थ ‘वेदना’ असा होतो.) एका अजस्र सत्तेसमोर शक्तिहीन, हतबुद्ध, दुर्बळ झाल्याची भावना दाटून येण्याचा ताण त्यातून व्यक्त होतो.’’
तसं पाहता १९९२ सालीच डॉ. थिओडोर रोझेक (‘पर्यायी संस्कृती- काऊंटर कल्चर’ या संज्ञेचे निर्माते) यांनी ‘व्हॉइस ऑफ अर्थ : अॅन एक्स्प्लोरेशन ऑफ इकॉसायकॉलॉजी’ या पुस्तकात ‘आधुनिक मानसशास्त्राने मन आणि निसर्ग यांचा एकत्र विचार न करण्याचा मोठा गुन्हा केला आहे. पर्यावरण व मानसशास्त्र या दोन्हींना एकमेकांची गरज आहे,’ असं मत मांडलं होतं. त्यांनी माणूस व निसर्ग यांच्यातील अतूट नातं व्यक्त करताना ‘निसर्ग ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. ती अबोध मनात दडलेलीच असते,’ असं सागून ठेवलं होतं. डॉ. रोझेक यांनीच ‘पर्यावरणीय अबोध मन’ (इकॉलॉजिकल अनकॉन्शस) ही संकल्पना मांडली. तसंच पर्यावरणाचा माणसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करताना ‘पर्यावरणीय मानसशास्त्र’ (इकॉसायकॉलॉजी) ही संज्ञा वापरली होती. पर्यावरण विनाश व हवामान- बदलामुळे मानवावर होणाऱ्या परिणामांचं संशोधन करणाऱ्या प्रो. अलब्रेख्त यांनी ‘पर्यावरणीय अबोध मन’ या संकल्पनेला विराट रूप दिलं आहे. त्यांची ‘सोलॅस्टॅल्जिया’ ही संकल्पना तातडीनं जागतिक पातळीवर स्वीकारली गेली व तिचा वापरही झपाट्यानं वाढत गेला. त्यावर अनेक शोधनिबंध व लेख लिहून आले. परंतु तेवढ्यावरच प्रो. अलब्रेख्त समाधानी होऊन थांबले नाहीत. निसर्गाचं आरोग्य व मानसिक आरोग्य यासंबंधीच्या तात्त्विक प्रश्नांनी ते अस्वस्थ झाले. ते माणूस व निसर्ग यांच्या नात्याच्या अधिकाधिक खोलात जाऊ लागले. ही भावना केवळ निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासींचीच नाही, तर खेड्यांपासून महानगरांपर्यंत कुठेही राहणाऱ्या नागरिकांना निसर्गापासून वंचित होण्याची भावना दाटून येते. आताशा चिमण्या, फुलपाखरे, गोगलगाई, बेडूक, भुंगे गायब झाले आहेत. काही वर्षांपूर्वी असलेले ओढे, नाले, तळी, तलाव हद्दपार झाले आहेत. निसर्ग आणि माणूस यांच्यातील फारकत वरचेवर तीव्र होत चालली आहे. हे बदल आपल्याला विलक्षण त्रासदायक असून त्याचे खोल परिणाम आपल्या मनावर व शरीरावर होत आहेत. पर्यावरण विनाशामुळे अबोध मन ग्रासून जात आहे. हे आपल्या लक्षातच येत नाही. कित्येक व्यक्तींना बदललेल्या पर्यावरणामुळे भयगंड (इकॉलॉजिकल फोबिया) होत आहे. प्रो. अलब्रेख्त यांचा, ‘‘पृथ्वीतलावरील पर्यावरण व्यवस्था झपाट्यानं बदलत आहे. हा बदलाचा वेग आणि बदल दोन्ही पचवणं आपल्याला कठीण जात आहे. हवामान अनागोंदीच्या काळात पृथ्वीवरील बदलाचे मानवी मनावर (सायकोटेरॅटिक) आणि शरीरावर (सोमॅटेरॅटिक) होणाऱ्या परिणामांवर
सखोल संशोधन होणं आवश्यक आहे.’’ असा आग्रह आहे.
निसर्गाला खरवडण्याच्या (एक्स्ट्रक्टिव्हिझम) प्रतापांमुळे अनेक संशोधक हादरून जात आहेत. प्रो. अलब्रेख्त व अनेक संशोधक अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, चेतासंस्थाशास्त्र यांसारख्या विविध ज्ञानशाखांचा संगम घडवत नवनव्या संकल्पनांची मांडणी करीत आहेत. हवामानबदल हा केवळ वातावरणाशी संबंधित नाही, तर त्यामुळे संपूर्ण जग अंतर्बाह्य बदलून जात आहे. मानवजातीला अतोनात मानसिक यातना सहन कराव्या लागत आहेत. अशा अरिष्टांतून जाताना नवीन जग घडविण्यासाठी नव्या संकल्पना, नवा शब्दसाठा निर्माण करावा लागणार आहे. त्याकरिता त्यांनी २०१९ साली पृथ्वीच्या भावना समजून घेणारं ‘अर्थ इमोशन्स : न्यू वडर्स फॉर ए न्यू वल्र्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. एका शास्त्रज्ञ-तत्त्वज्ञाने पृथ्वीच्या भावना समजून घेण्यासाठी चालवलेल्या पराकाष्ठेतून प्रकटलेलं हे चिंतन आहे. विख्यात समाजजीवशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड विल्सन यांनी माणसाला जीवसृष्टीविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला ‘जिवाकर्षण’ (बायोफिलिया) म्हटलं होतं. अलब्रेख्त यांच्या मते, माणसाला केवळ स्वत:च्या परिसराविषयीच नव्हे, तर सजीव-निर्जीवांसकट असलेल्या व्यापक विश्वाविषयीचा जिव्हाळा व आकर्षण असतं व ते वाढलं पाहिजे. या समग्र विचाराला तै‘विश्वाकर्षण’ (सोलीफिलिया) म्हणतात.
पृथ्वीला संजीवनी देण्यासाठी आपण कसा विचार करावा, हे स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘‘शेतीचा शोध लागल्यापासून आजपर्यंत (सुमारे १२ हजार वर्षे) निसर्गात बदल घडवणाऱ्या काळाला ‘मानवनिर्मित युग’ (आंन्थ्रोपोसिन) म्हटलं जातं. या जीवसृष्टीचा मीच एकमेव उपभोक्ता व मीच मालक या मानवी दृष्टिकोनाने निसर्गाचा वेगवान विनाश केला. या विचारसरणीमुळे जीवसृष्टीच्या समूळ उच्चाटनाकडे वाटचाल सुरू झाली. हे दुष्परिणाम लक्षात घेऊन शहाणपणानं वागलं तरच जग वाचवता येईल. आपलं मन व पर्यावरण यांतील वाढतं अंतर हे आपलाच त्रास वाढवीत आहे. स्थानिक ते जागतिक अशा सर्व पातळ्यांवर आपण निसर्गाच्या सहवासातच राहत असतो. हे जाणून आपण व निसर्ग यांतील विरोध व द्वैत मिटून एकात्मता निर्माण झाली व आंतरिक संबंध वाढत गेले तर ते निसर्गासोबतचं सहजीवन (सिम्बायोसिस) होईल. संपूर्ण जग हे सहजीवननिर्मित युगात (सिम्बायोसिन) गेल्यास सर्व सजीव-निर्जीव अशा व्यापक यंत्रणेत सगळेजण परस्परावलंबनाने राहतील. त्यासाठी सहकार्य व साहचर्याचे काही नियम करावे लागतील. यातून एक सहजीवन यंत्रणा (सिम्बायोक्रसी) तयार होऊन परस्परसंबंध उदार होतील. सध्याच्या सार्वत्रिक विनाशी वृत्तीने नकारात्मक भावाचं जागतिकीकरण झालं आहे. आता सकारात्मक भाव आणण्यासाठी मानवनिर्मित विध्वंसक विचारांना नाहीसं करावं लागेल.’’
संशोधक, अभिकल्पक (डिझाइनर), फ्युचरॉलॉजिस्ट व विचारवंत रिचर्ड बकमिन्स्टर फुलर (१८९५-१९८३) हेदेखील असेच संपूर्ण जग अधिक सुंदर करण्यासाठी कृतिआराखडा देत असत. पृथ्वी ही अवकाशातील नौका (स्पेसशिप अर्थ) असून आपण सारे त्यातील प्रवासी आहोत. संपूर्ण जगाचं नियोजन ही काळाची गरज आहे, असं सांगून त्यांनी वीज व पाणी यांचं जागतिक जाळं करण्यासाठी अभिकल्प तयार केला होता. जिओडेसिक डोम, सिनर्जी, सिंट्रॉपी या त्यांच्या संकल्पना होत्या. नॅनोकार्बनचा ू ६० रेणू फुलरीन हा त्यांच्या संकल्पनेचा विस्तार आहे. त्यांच्या नवकल्पनांसाठी ते नवीन संज्ञा तयार करत. त्याप्रमाणे अलब्रेख्त यांना नवीन शब्दप्रयोग घडवावे लागतात. ‘जग हे विलक्षण वेगानं बदलत आहे. आपल्यासमोर संस्कृती बदलून जग अधिक सुसंस्कृत करण्याचं आव्हान आहे. त्यासाठी नवे शब्द व नवी भाषा घडवावी लागेल,’’ असं ते म्हणत.
जगभरातील संत, कवी, तत्त्वज्ञ यांनी प्राचीन काळापासून ‘वनस्पती व प्राणिमात्रांतही जीव आहे, त्यामुळे त्यांना जपण्याचा करुणा भाव आपल्या मनात असला पाहिजे,’ असं सांगितलं आहे. त्या तात्त्विक व नैतिक भूमिकेला वैज्ञानिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत. रोझेक, विल्सन यांनी रुजविलेल्या संकल्पनांचा विस्तार अलब्रेख्त यांनी केला व त्यांच्या पुढील पिढी अजून पुढची मजल गाठत आहे. निसर्गाचं विनाशापासून संरक्षण करून तिला पुन्हा आधीच्या अवस्थेप्रत नेणे ही प्रक्रिया युरोपात वेगाने पसरत आहे. निसर्गाची पुनस्र्थापना (रीविल्डिंग) करण्यासाठी जगभर छोटे-मोठे प्रयत्न चालू आहेत.
हवामानबदलाचा धोका हा अदृश्य व प्राणघातक विषाणूंएवढाच भयंकर असून, मानवी अस्तित्वासमोरच त्याने आव्हान निर्माण केलेलं आहे. परंतु करोना हे हिमनगाचं टोक आहे. जागतिक बँकेचे माजी प्रमुख सर निकोलस स्टर्न म्हणतात, ‘‘बाजारपेठ आपल्याला हवामानबदलापासून वाचवू शकत नाही. परंतु हवामानबदल मात्र बाजारपेठा व आपलं सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त करू शकतो, हे समजून घेऊन पृथ्वी सावरण्यासाठी निकराचा लढा आवश्यक आहे.’’ याची प्रखर जाणीव करोनाकाळात होत आहे. २०२० नं संपूर्ण जगाला खाडकन् भानावर आणलं आहे. करोनोत्तर जग हे पूर्णपणे वेगळं असणार असल्याची जाणीव सर्वांना झाली आहे. आता करोनावरील लस हाती येत आहे. काही काळात करोना बाजूला पडेल. परंतु हवामानबदलावर अशी काही जादुई लस असणार नाही.
एकंदरीत सर्व सुज्ञांना जाणवतंय की मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे आणि ते आत्मघातकी आहे. प्रक्षुब्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे. पाणथळ जागा संपत चालल्या असून वाळवंटे वाढत आहेत. अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे. दहा लाख प्रजातींना समूळ उच्चाटनाचा धोका आहे. समुद्रातून अतीव मासेमारी होत आहे. सर्व महासागर प्लॅस्टिकने प्रदूषित होत आहेत. आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. हवा प्रदूषणात दरवर्षी करोनापेक्षाही अधिक- म्हणजे नऊ कोटी लोक बळी जात आहेत. सध्या जग कडेलोटाच्या निर्णायक बिंदूला (टिपिंग पॉइंट) येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत. याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे. आता निसर्गाशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वंकष बदल आवश्यक आहेत. अशाच बदलांची निकड लक्षात घेऊन १९०१ साली केशवसुतांनी मराठी साहित्याला आधुनिक करणारी ‘तुतारी’ फुंकली होती.
‘जुने जाउं द्या मरणालागुनी,
जाळुनि किंवा पुरूनी टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका,
खांद्यास चला खांदा भिडवुनि!’
त्यांनी ‘नवा विश्वाव्यापी विचार करून नवीन जग घडविण्यासाठी एकत्र या,’ अशी हाक तेव्हाच दिली होती. ते आवाहन आजही तेवढंच काळानुरूप वाटतं. इथून पुढे आपल्याला औद्योगिक क्रांतीपासून जगावर साम्राज्य असणाऱ्या कर्बयुक्त इंधनाला गाडून नवी, स्वच्छ ऊर्जा सर्वदूर पसरावी लागणार आहे. पृथ्वीच्या असंख्य गंभीर जखमांवर तातडीचे उपचार करणे गरजेचे आहे. अत्यवस्थ पृथ्वीला सावरण्याचं आव्हान घेऊन आपण २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश करीत असल्याची जाणीव समाजात तळागाळापर्यंत न्यावी लागेल.
‘संसर्गजन्य आशावादाचे प्रसारक’ अशी ख्याती लाभलेल्या प्रो. अलब्रेख्त यांनी पृथ्वीसाठी नवा विचार व नवी कृती सांगणारा जाहीरनामा सादर केला आहे. येत्या दशकात सौरऊर्जा इतकी स्वस्त होत जाईल, की कोळसा व तेल ही इंधने बाजूला पडतील. हायड्रोजनचा वापर सुरू होईल. कार्यक्षमता व किफायतशीरता वाढल्याने दुचाकी ते हवाई असा सर्वच प्रवास विजेवर होईल. कर्बवायू शोषणाचे अनेक पर्याय समोर येतील. करोनानंतर येऊ घातलेली अनेक विषाणूसंकटे रोखण्यासाठी निसर्ग संवर्धनास प्राधान्य येईल. परंतु हे सर्व बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला हातभार लावावा लागेल. वैयक्तिक व सामूहिक शक्तींसाठी हे आव्हान आहे. आपल्याकडील केशवसुत असोत वा तिकडचे शास्त्रज्ञ- सर्वांनाच वैयक्तिक व सामुदायिक बदलांची निकड वाटते. याच दशकात व शतकात ते वास्तवात आणणं अनिवार्य आहे.
प्रसार माध्यमांची जबाबदारी लक्षात घेऊन ‘द गार्डियन’ने सरत्या वर्षात पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर तब्बल तीन हजार लेख प्रसिद्ध केले असून, त्यांना जगभरातून दहा कोटी वाचक लाभले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानप्रमुख ख्रिस्तिना फिगरर्स म्हणातात, ‘‘हवामानबदलाचं गांभीर्य समजून देण्यात ‘द गार्डियन’ची साथ नसती तर पॅरिस कराराची पुढील वाटचाल अशक्य होती. विज्ञानाबद्दलची अनास्था व असत्य वार्तांचा सुळसुळाट असणाऱ्या या काळात ‘द गार्डियन’ हा आशादायी दीप आहे.’’ ‘द गार्डियन’नं स्वत:च्या देशातील नेत्यांपासून ते जाहिरात देणाऱ्या उद्योगसम्राटांपर्यंत कोणाचीही पर्वा केली नाही. प्रदूषण करणाऱ्या प्रत्येकाला वठणीवर आणण्यासाठी अनेक पद्धतीने प्रहार करताना विविध ज्ञानशाखांमधील विद्वानांकडून ज्ञान-विज्ञान ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिले. हे जाणणारे सुजाण वाचक वर्गणी व देणग्या देऊन ‘द गार्डियन’ला हातभार लावत आहेत. त्यामुळे हा दीप तेवता राहिला आहे. गौतम बुद्धांचा ‘तुझा दीप तूच हो’ हा मंत्र स्वीकारून असे अनेक दीप ठिकठिकाणी उजळवले तर नव्या दशकात जीवसृष्टीला संजीवनी मिळेल आणि समस्त सजीवांचं निवासस्थान असलेली आपली पृथ्वी लख्ख प्रकाशमान होईल.
(समाप्त)
atul.deulgaonkar@gmail.com