‘झाडीबोली’ ही मराठीतील एक बोली असली तरी ती वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध आहे. प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांतील काही शब्द नेमके उलट अर्थाने वापरले जातात, तर काही शब्दांचा उच्चारही वेगळा केला जातो. या बोलीत काही शब्दांच्या बाबतीत असलेले वैविध्य प्रमाण मराठी भाषेमध्येही आढळत नाही.
भं डारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखला जातो. ‘लीळाचरित्र’कालीन प्राचीन मराठी वाङ्मयात या भूभागाचा उल्लेख ‘झाडीमंडळ’ असा करण्यात आलेला आहे. घनदाट अरण्ये आणि पाण्याने तुडुंब भरलेले तलाव यांचे वरदान या प्रदेशाला लाभले आहे. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला असलेला हा भूप्रदेश आपल्या अनेक वैशिष्टय़ांसह स्वत:ची वेगळी बोली राखून आहे. ही बोली ‘झाडीबोली’ म्हणून ओळखली जाते.
ही प्रमाण मराठीचीच उपबोली असली तरी अनेक बाबतीत ती मराठीहून वेगळी आहे. अगदी वर्णाचा विचार करता मराठीतील ‘ण, छ, श, ष आणि ळ’ ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. ‘छ, ष आणि श’ या तीन व्यंजनांऐवजी ‘स’ हे एकच अक्षर वापरले जाते. म्हणजे ‘छगन’, ‘छत’ हे शब्द ‘सगन’, ‘सत’ असे उच्चारले जातात. तर ‘शीत’, ‘शेर’ हे शब्द ‘सीत’, ‘सेर’ असे उच्चारले जातात. या बोलीत ‘ण’चा उच्चार ‘न’ असा केला जातो. ‘बाण’, ‘आण’ हे शब्द ‘बान’, ‘आन’ असे उच्चारले जातात. या बोलीत ‘ळ’ऐवजी ‘र’ वापरला जातो. म्हणजे ‘काळा कावळा’ हे शब्द झाडीबोलीत ‘कारा कावरा’ असे उच्चारले जातात. ‘चांगला’, ‘चोर’, ‘जातो’, ‘जमले’ हे शब्द ग्रामीण झाडीभाषकाकडून ‘च्यांगला’, ‘च्योर’, ‘ज्यातो’, ‘ज्यमले’ असे उच्चारले जातात.
झाडीबोलीत नपुंसकिलग नाही. या बोलीचा संसार केवळ पुल्िंलग व स्त्रीिलग या दोनच िलगांवर चालतो. त्यातही नामांना कोणत्या लिंगात वापरावे याचे या बोलीचे स्वत:चे असे तंत्र आहे. प्रमाण मराठीतील ‘नाटक, पुस्तक’ ही नपुंसकिलगी नामे झाडीबोलीत स्त्रीिलगी वापरली जातात. तसेच ‘घर, चित्र’ ही नपुंसकिलगी नामे झाडीबोलीत पुल्लिंगी वापरली जातात. आकारांत नामे पुल्िंलगी समजावीत असा सरसकट नियम दिसतो. त्यामुळे ‘जागा, हवा’ ही प्रमाण मराठीतील स्त्रीिलगी नामे झाडीबोलीत पुल्िंलगी स्वरूपात वापरली जातात. विशेषत: त्यांचे सामान्यरूप करताना हे स्पष्टपणे लक्षात येते. येथे ‘जागेवर’, ‘हवेचा’ असे न म्हणता झाडीबोलीत ‘जाग्यावर’, ‘हव्याचा’ असे पुल्िंलगी नामाप्रमाणे त्यांचे रूप होताना दिसते. इकारान्त पुिल्लगी नामाचे सामान्यरूप करताना यकारान्त करावे, हा मराठीतील नियम झाडीबोलीत अशा सर्वच नामांकरिता सरसकट वापरण्यात येतो. त्यामुळे ‘हत्ती’ आणि ‘नंदी’ यासारख्या शब्दांचे उच्चार ‘हत्त्या’ आणि ‘नंद्या’ असे केले जातात. अनेकवचन करतानाही झाडीबोली काहीएक वेगळेपण सांभाळते. ‘केस’, ‘वावर’, ‘पापड’ या पुिल्लगी शब्दांचे अनेकवचन ‘केसा’, ‘वावरा’, ‘पापडा’ असे केले जाते.
विशेषणांच्या बाबतीत झाडीबोलीची स्वत:ची अशी लकब दिसून येते. रंगांचा गडदपणा सांगण्यासाठी ‘पिवरालट, काराघोर’ अशी विशेषणे वापरली जातात. मराठीत केवळ आकारांत विशेषणांचे सामान्यरूप होते. झाडीबोलीत सर्वच विशेषणांचे तसे होते. उदाहरणार्थ : ‘पाच- पाचा बोटायना’, ‘जूग- जुगा दिसाना’, ‘लोबी- लोब्या मानसाचा’.. इत्यादी. मासोळीच्या गंधाकरिता ‘इसडय़ान’, कुबट वासाकरिता ‘घुटऱ्यान’, मोहाच्या वासाकरिता ‘मोयान’ अशी वेगळी विशेषणे या बोलीने निर्माण केलेली आहेत. पाचक (म्हणजे पाच), बाराक (म्हणजे बारा) असे संख्यांचे उच्चार केले जातात.
‘करीत आहे’ असे न म्हणता ‘करून रायलू’ असे म्हटले जाते. संयुक्त वाक्याची वेगळी रचना झाडीबोलीत वापरली जाते. ‘मी गेलो आणि तेव्हाच ती मेली’ हे प्रमाण मराठीतील वाक्य झाडीबोलीत ‘मी जावासीन ना ते मरावासीन’ अशा प्रकारे म्हटले जाते. हे या बोलीचे वेगळेपण म्हणावे लागेल. या व्याकरणिक ‘अर्थ’व्यवहारास मी ‘संयोगार्थ’ असे नाव दिले आहे. झाडीबोलीत विपुल प्रयोजक क्रियापदे प्रचारात असून या बोलीने ‘इदरना- इदरावना, डकर-डकरावना’ यांसारखी ‘आव’ प्रत्यय असलेली तसेच ‘खलना- खलारना, डकरना- डकरावना’ अशी स्वत:ची वेगळी प्रयोजक रूपे निर्माण केली आहेत. एरव्ही नेहमी प्रयोजक रूप होत असताना वर्णवृद्धी होते. पण झाडीबोलीत ‘कोंडारना- कोंडना’ हे रूप उलट प्रकारे झाले आहे. म्हणजे येथे वर्णवृद्धी न होता वर्णलोप झालेला आहे. केवळ ‘गाडणे’ हे प्रयोजक क्रियापद प्रमाण मराठीत ऐकायला मिळत असले तरी त्याच्या ‘गडना’ या मूळ रूपासह ‘गडना-गाडना’ ही दोन्ही रूपे झाडीबोलीत प्रचलित आहेत.
झाडीबोलीत क्रियाविशेषण अव्ययांचे भांडार विशाल असून त्यात अभ्यस्त शब्दांचे आधिक्य आहे. ‘उलूउलू, घडीघडी’ अशी अनेक क्रियाविशेषणे या बोलीत आहेत. अभ्यस्ततेचा उपयोग ही बोली स्वत:च्या पद्धतीने करताना दिसते. ‘पटपट, खटखट’ या प्रमाण मराठीतील शब्दांकरिता ‘पटोपटो, खटोखटो’ अशी ओकारान्त रूपे ही बोली स्वीकारतेच; शिवाय ‘पटना, खटना’ अशी ‘ना’ प्रत्यय असलेली आणि ‘पटनारी, खटनारी’ अशी ‘नारी’ प्रत्यय असलेली वेगळी क्रियाविशेषणेसुद्धा ही बोली निर्माण करते. म्हणजेच प्रमाण मराठीतील एका क्रियाविशेषण अव्ययाकरिता हा बोली आणखीन तीन पर्याय देते. अशी ही शब्दश्रीमंत बोली आहे.
उभयान्वयी अव्ययांच्या संदर्भात ‘आणि’ या अर्थाने ‘ना/ अना’; तसेच ‘किंवा’ या अर्थाने ‘नाईतं’ हे उभयान्वयी अव्यय झाडीबोलीत वापरले जाते. प्रमाण मराठीतील ‘इश्श’ या प्रख्यात केवलप्रयोगी अव्ययाऐवजी ‘आमीनाईजा’ हे वेगळे केवलप्रयोगी अव्यय झाडीबोलीत वापरले जाते. या बोलीत ‘मस्त’ या अव्ययाला वेगवेगळ्या अर्थछटा असून त्याचा ‘छान, खूप, फार’ अशा भिन्न भिन्न अर्थाने वापर केला जातो. शिवाय ‘बापा’सारखे शब्द फक्त याच बोलीत सहजगत्या वापरले जाऊ शकतात.
नातेविषयक शब्दांच्या बाबतीत झाडीबोली प्रमाण मराठीपेक्षा कितीतरी पुढे आहे. मोठय़ा दीराला प्रमाण मराठीत वेगळे नाव नाही. झाडीबोलीत त्यास ‘भासरा’ असे म्हणतात. तसेच वडिलांच्या मोठय़ा भावाला प्रमाण मराठीत वेगळा शब्द नाही. त्यास ‘माहालपा’ आणि त्याच्या बायकोस ‘माहालपी’ असे झाडीबोलीत म्हणतात. नवऱ्याच्या लहान व मोठय़ा बहिणीला प्रमाण मराठीत ‘नणंद’ या एकाच नावात गोवण्यात आले आहे. इथे नवऱ्याच्या मोठय़ा बहिणीला ‘आक्सू’ असे म्हटले जाते. ‘भारतीय भाषाकोश’ धुंडाळला असता भारतातल्या कोणत्याच भाषेत नवऱ्याच्या मोठय़ा बहिणीला असे वेगळे नाव दिल्याचे आढळत नाही. शिवाय झाडीबोली नणंदेच्या नवऱ्याला ‘नंदवा’ आणि आक्सूच्या नवऱ्याला ‘आक्सवा’ ही वेगळी नावे वापरून प्रमाण मराठीवर कुरघोडी करताना दिसते.
प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांच्या संदर्भात काही शब्द उलट अर्थाने वापरले जातात. ‘अवगत’ या प्रमाण मराठीतील शब्दाचा अर्थविपर्यास करून झाडीबोलीने त्याचा ‘उपेक्षा’ हा अर्थ घेतला आहे. तसेच प्रमाण मराठीतील गाण्याशी संबंधित ‘गायकी’ हा शब्द ‘गाई राखणारा’ या अर्थाने झाडीबोली वापरते. ‘हाकलणे’ हे क्रियापद प्रमाण मराठीप्रमाणे ‘बाहेर घालवणे’ या अर्थाने न वापरता झाडीबोली अगदी त्याच्या विरुद्ध म्हणजे ‘बोलावणे’ या अर्थाने वापरते. अर्थात संत तुकारामांनीदेखील आपल्या अभंगात हे क्रियापद या अर्थाने वापरले आहे याची इथे आठवण व्हावी.
मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत ‘विवेकसिंधू’मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातील चक्रधरांना आवडती असलेली ‘भेली’ ही ‘गूळ’ या अर्थाने आजही येथे वापरली जाते. महदाइसेने उल्लेखिलेला आणि तिला अर्थ न कळलेला ‘आहाता’ हा धिरडय़ाच्या जमातीतला चविष्ट पदार्थ नावासह आजही झाडीपट्टीतील भोजनपटूंच्या जिभेचे चोचले पुरवीत आहे. ‘र’ आणि ‘रव’ यांच्यामुळे संपादकांच्या डोक्यात शब्दभ्रम निर्माण करणारा ज्ञानेश्वरीतील ‘सुरवाड’ हा शब्द आजही इथे सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देणाऱ्या मातेच्या तोंडात ‘सुकासुरवाडा’ असा ऐकायला मिळतो. अशा प्रकारे विद्वानांनाही न कळणारे आणि केवळ शब्दकोशात लपून असलेले आपल्या जुन्या ग्रंथांतील अनेक शब्द झाडीबोली आजही आपल्या दैनंदिन व्यवहारात सहज वापरताना दिसते. झाडीपट्टीत वृक्षांचे वैपुल्य आहे. त्यांना दिलेली नावेही विचित्र व वेगळी आहेत. ‘छिद्र’ या शब्दाचे विभाजन करून ‘सेद’ व ‘दर’ हे दोन पर्याय निर्माण केले आहेत. शिवाय आणखी सोळा वेगवेगळे पर्याय निर्माण करून झाडीबोलीने आपली अभूतपूर्व प्रसवक्षमता सिद्ध केली आहे. कुंभाराने घडवलेली मडकी आणि बुरडाने तयार केलेल्या वस्तू यांची पन्नासाच्या वर नावे या बोलीत आहेत. हे सारे शब्दभांडार स्वीकारून मराठीने आपली शब्दसंपदा वृिद्धगत केली तर मराठी भाषेला इंग्रजी शब्दांचा आधार घ्यावा लागणार नाही. आणि अमुक इंग्रजी शब्दाला समर्पक मराठी पर्याय नाही अशी तक्रार करण्याचीही गरज भासणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा