अरुणा अन्तरकर
चेहरा हे सिनेसृष्टीत नायिकेचं सौभाग्य वरदान मानलं जातं. पण तोच चेहरा सुलोचना दीदींच्या बाबतीत अडसर ठरत गेला. इच्छा आणि आवाका असूनही कौटुंबिक, सोज्वळ भूमिकांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र याच प्रतिभेनं त्यांना स्थैर्य दिलं. प्रचंड आणि दीर्घकालीन लोकप्रियता मिळवून दिली. तरुण नायिकेपेक्षा प्रौढ, चरित्र भूमिकांची त्यांची ‘सेकंड इनिंग’ अधिक यशस्वी ठरली. पाच-सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मराठी व हिंदी मिळून दीदींनी ५०० चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी जेमतेम १०० भूमिका नायिकेच्या होत्या, इतर चरित्र भूमिका..
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा(च) सुंदर, असा अनुभव पत्रकारितेच्या निमित्तानं चित्रपटसृष्टीत मुशाफिरी करताना बऱ्याचदा येतो. देव शब्दांत दिसतात, पडद्यावरचा पुरुषोत्तम पडद्यामागे गब्बर सिंगपेक्षा क्रूर खलनायक असल्याचं आढळतं, तर पडद्यावरचा गब्बर सिंग माणसाचं काळीज घेऊन जगताना दिसतो.
प्रत्यक्ष आणि प्रतिमा गुण्यागोविंदानं नांदताना सहसा दिसत नाहीत. तशी अपेक्षा करणंही रास्त नाही. कारण ते व्यवहार्य नाही. पण इथेही अपवाद आढळतात. याचं सुखद उदाहरण म्हणजे सुलोचनादीदी. त्यांना हे लाडकं उपनाम मिळावं हे आश्चर्यच आहे. त्यांना सुलोचनाताई म्हणणं योग्य ठरलं असतं. त्यांना आई किंवा दीदी म्हणणं हे फक्त कौतुक आणि प्रेम नव्हतं. ते त्यांचं वर्णन होतं. ती त्यांची ओळख होती. सुलोचना हे त्यांना मिळालेलं रुपेरी नाव जेवढं सार्थ होतं, तेवढंच हे नाव सार्थ ठरलं असतं.
पण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असा दुर्मीळ ‘कॉम्बो’ असलेले शेक्सपिअरसाहेब लाखमोलाचं सत्य सांगून गेले आहेत- गुलाबाच्या फुलाला गुलाब न म्हणता दुसरं कोणतंही नाव दिलं म्हणून काय फरक पडतो? दीदी की आई याला महत्त्व नाही. त्या नावाशी नव्हे, नात्याशी निगडित असलेली माया चेहऱ्यावर घेऊन दीदींनी जन्म घेतला होता. त्यांच्या अस्सल घरंदाज सौंदर्याचा तो खास विशेष होता. तो त्यांच्या कारकीर्दीला साधक ठरला आणि बाधकसुद्धा! बाधक अशासाठी की जेव्हा दीदींनी प्रतिमेबाहेर जाऊन चौकट मोडण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मान्य आहे की ‘तारका’मधली फॅशनेबल तरुणी आणि ओवाळणी’मधली नर्तकी त्यांच्याकरता नव्हत्याच. आवाक्यामुळे नव्हे, तर त्यांच्या शालिन, सात्त्विक आणि घरगुती वर्गातल्या सौंदर्यामुळे. अमाप रूपसंपदा होती त्यांची. डोळे तर पाणीदार आणि विलक्षण सुंदर होते. आणि माफ करा, हसू नका, पण त्यांच्याइतकं सुंदर नाक आजतागायत बघितलं नाही. वाजवीपेक्षा किंचितही लांब नाही, रुंद नाही, पसरट नाही असं. जणू काळजीपूर्वक तासून-घासून नेमकं प्रमाणबद्ध, अगदी सरळ, तरीही टोचावं असं तीक्ष्ण धारदार नाही. दीदींचं नाक त्यांच्या नाकासारखं अगदी सरळ. चाफेकळी नाक म्हणतात ते बहुधा त्यांचंच असावं. नाकाला नाजूकपणे नासिका म्हणावं तसं फक्त अशा नाकाला!
मुळात दीदींचा चेहरा अतीव सुंदर होता, पण त्यात नायिकेच्या चेहऱ्याला लागणारी मादकता, नखरा नव्हता. मराठीत त्यांनी साकारलेल्या नायिका तारुण्यसुलभ, अल्लडपणा, अवखळपणा आणि मुक्त प्रणय करणाऱ्या नव्हत्या. गृहिणी म्हणून किंवा समंजस, शहाणी तरुणी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलणाऱ्या अडचणीत असलेली घरं सावरण्याकरता दु:खाचे, कष्टाचे डोंगर उपसणं हे त्यांचं इतिकर्तव्य होतं.
चेहरा हे सिनेसृष्टीत नायिकेचं सौभाग्य वरदान मानलं जातं. पण तोच चेहरा दीदी (आणि इतरही काही) अभिनेत्रींच्या बाबतीत अडसर ठरत गेला. इच्छा आणि आवाका असूनही त्यांना कौटुंबिक, सोज्वळ भूमिकांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र याच प्रतिभेनं त्यांना स्थैर्य दिलं. प्रचंड आणि दीर्घकालीन लोकप्रियता मिळवून दिली. तरुण नायिकेपेक्षा प्रौढ, चरित्र भूमिकांची त्यांची ‘सेकंड इनिंग’ अधिक यशस्वी ठरली. पाच-सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मराठी आणि हिंदी मिळून दिदींनी (अंदाजे) ५०० चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी जेमतेम १०० भूमिका नायिकेच्या होत्या आणि बाकी सगळय़ा चरित्र भूमिका होत्या.
या बाबतीत दीदींना त्यांचं व्यक्तिमत्त्व जसं उपयोगी पडलं, तसा ललिता पवार या थोर अभिनेत्रीनं दिलेला परखड सल्लाही! ‘सुजाता’साठी बिमल रॉयनी निमंत्रण दिलं तेव्हा दीदी ३१ वर्षांच्या होत्या. मराठीत नायिका म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान होतं. मग हिंदीत दुय्यम किंवा प्रौढ भूमिका स्वीकारायच्या का, असा पेच त्यांना पडला. दुसरीकडे बिमल रॉयसारखा परिसस्पर्शी दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी त्यांना सोडायची नव्हती. आपल्या मनातील घालमेल दीदींनी ललिताबाईंपाशी बोलून दाखवली तेव्हा त्या म्हणाल्या, काय करायचं ते तूच ठरव, पण एक लक्षात ठेव- नायिका होशीलही, पण आणखी फार तर पाच वर्ष तशी कामं मिळतील. चरित्र भूमिका घेतल्यास तर पंचवीस वर्षे काम करशील!
दीदींना हा सल्ला पटला. आणि त्यांनी तो अमलात आणला. त्या काळात त्या अन् ललिताबाई धरून आणखी तीन मराठी अभिनेत्री हिंदीचं चरित्र नायिकांचं व्यासपीठ गाजवत होत्या- दुर्गा खोटे, लीला चिटणीस आणि शशिकला! या पाचजणी त्या क्षेत्रात राज्यच करत होत्या म्हणा ना. अर्थात चरित्र अभिनेत्री प्रौढ वयाच्या असल्या तरी त्यांनी सुस्वरूप असणं आवश्यक नव्हे; बंधनकारक असतं. ही अट पूर्ण करणारा निर्दोष देखणा चेहरा दीदींपाशी होता.
विशेष म्हणजे हिंदीतल्या सुगीच्या काळात त्या मराठी चित्रपटाला विसरल्या नाहीत. हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटात मिळणारा मोबदला म्हणजे चणेफुटाणे होते. पण त्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही. मराठीतही ‘मोलकरीण’ आणि ‘एकटी’ या चित्रपटांमधल्या चरित्र भूमिकांनी त्यांची कीर्ती, त्यांची लोकप्रियता कळसाला पोहोचवली. ‘महाराष्ट्रभूषण’ पासून ‘पद्मश्री’पर्यंत आणि तिथपासून तो फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारापर्यंत सगळय़ा मानमरातबांचे हारतुरे त्यांच्या गळय़ात पडले. त्या सुखद ओझ्यानं दीदी वाकल्या- अधिक नम्र झाल्या. त्यांच्या वागण्या- बोलण्यात कधीही ‘मी’पणा आला नाही. तोरा, अहंकार, दाखवेगिरी हे शब्दही त्यांच्या आसपास फिरू धजावले नाहीत.
इथेच त्यांच्या अस्तित्वात गुण्या-गोविंदानं नांदणाऱ्या प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यातलं सख्य दिसून येतं. पडद्यावर सदैव कौटुंबिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या दीदी वर्षांनुवर्षे ती भूमिका पडद्यामागे तशाच- तितक्याच कर्तबगारीनं पार पाडत होत्या. पिता आणि पती यांच्यानंतर भला मोठा कुटुंबकबिला त्या चालवत होत्या. पण त्यांचं कुटुंब प्रभादेवी इथल्या त्यांच्या फ्लॅटपुरतं मर्यादित नव्हतं. सगळय़ा मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत ते विस्तारित होतं. सर्वाकडे त्यांचं लक्ष होतं आणि सर्वाची काळजी त्या घेत होत्या. वृद्धापकाळामुळे कमाई नसलेल्या कलाकारांना पैसे देऊनच त्या थांबल्या नाहीत. त्यांच्यापैकी एका बेघर कलाकाराला त्यांनी स्वत:च्या घरात ठेवून घेऊन कितीतरी वर्ष सांभाळलं. लीला गांधींचा साठावा वाढदिवस त्यांनी पुढाकार घेऊन साजरा केला.
दोन फ्लॅट्सचा ऐवज म्हणावा असा त्यांचा ऐसपैस फ्लॅट महाग इंटेरिअल डेकोरेशननं सजला नव्हता. तिथल्या भिंती अन् कपाटं दीदींच्या फोटोंनी आणि ट्रॉफ्यांनी भारावले नव्हते. फिल्मीपणा राहोच, तिथे कोणताही डामडौल नव्हता. कर्तबगारीनं कमावलेली माया छानछौकीवर न घालवता दीदी ही कमाई परिचित गरजू माणसांबरोबर अनेक सामाजिक संस्थांना आणि कार्याना वाटून टाकत होत्या. पानशेत धरणग्रस्तांपासून कोयना भूकंपग्रस्तांना सढळ आर्थिक मदत करीत होत्या. भारत-चीन युद्धकाळात तर त्यांनी पंतप्रधान निधीमध्ये दागिन्यांची भर घातली.
निवृत्तीकाळातला त्यांचा जीवनक्रम कोणत्याही मध्यमवर्गीय माणसापेक्षा वेगळा नव्हता. वागण्या- बोलण्यात तोरा राहिला दूर, त्या कधीही आमच्यावेळी.. आमच्या काळात.. असली पालुपदं लावून सल्ले किंवा उपदेश देऊन त्यांनी कुणाला बोअर केलं नाही. जुनं तेच सोनं, आमचं तेच खरं आणि बरं, अशीही त्यांची नकारात्मक भूमिका कधी नसायची.
त्यांच्याशी खूप भेटीगाठी झाल्या, गप्पाटप्पा अन् मुलाखतीही झाल्या. या दीर्घ काळात त्यांच्या तोडून कुणाहीबद्दल एकही तक्रारीचा वा नाराजीचा शब्द ऐकला नाही. त्यामागे धोरण नव्हतं. ती त्यांची वृत्तीच नव्हती. खमंग, खळबळ उडवणाऱ्या मुलाखती त्यांनी कधीच दिल्या नाहीत. आडवळणानं त्यांनी कधी कुणावर टीका केली नाही. कधीही बोलणं थांबवलं की त्यांच्या खालच्या ओठाची मंद स्मितदर्शक हालचाल व्हायची. ते हास्य हा पूर्णविराम असायचा. पडद्यावर गंभीर, सोशीक, दु:खी-कष्टी भूमिका करणाऱ्या दीदी पडद्यामागे नेहमी हसऱ्या, प्रसन्न आणि तृप्त दिसायच्या. lokrang@expressindia.com