रघुनंदन गोखले
अलौकिक बुद्धिमत्ता ही उपजत नसते, तर ती लहान मुलांमध्ये पद्धतशीर जोपासता येऊ शकते यावर ठाम विश्वास असणाऱ्या लाझलो आणि क्लारा पोलगार या हंगेरियन दाम्पत्याची सुसान ही पहिली कन्या.. अकराव्या वर्षांपासून तिने या खेळातील चुणूक दाखवायला सुरुवात केली. कठोर संघर्ष करीत यशाच्या एकेक पायऱ्या चढत या खेळाची ती सम्राज्ञी बनली. आधीच्या यशशिखरांना मागे टाकत नवे विक्रमच तिने केले नाहीत, तर या विषयावरची पुस्तकेही लहिली..
विचार करा, तुमची एक नागरिक तुमच्या देशात, तुमच्या मदतीशिवाय जागतिक क्रमांक एकवर पोहोचते. तुम्ही तिला कशी वागणूक द्याल? तुमचे उत्तर असेल- ‘आम्ही तिला डोक्यावर घेऊ, तिला हव्या त्या सुविधा देऊ.’ पण जगात अहंकार आणि दुस्वास या गोष्टी कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या मनात उपजत असतात असे सुसान पोलगारच्या आयुष्यावरून आपल्या लक्षात येईल.
अलौकिक बुद्धिमत्ता ही उपजत नसते, तर ती लहान मुलांमध्ये पद्धतशीर जोपासता येऊ शकते यावर ठाम विश्वास असणाऱ्या लाझलो आणि क्लारा पोलगार या हंगेरियन दाम्पत्याची सुसान ही पहिली कन्या! सुसाननं वयाच्या चौथ्या वर्षी हंगेरीची राजधानी बुडापेस्टचं ११ वर्षांखालील मुलींचे अजिंक्यपद जिंकलं आणि तेही १० पैकी १० डाव जिंकून!! एका देदीप्यमान कारकिर्दीची ही एक सुरुवात होती.
वडील लाझलो गणिताचे शिक्षक आणि आई क्लारा विविध भाषा शिकवणारी शिक्षिका! सुसाननं लहानपणीच वडिलांकडून बुद्धिबळाचे धडे गिरवले. त्या वेळी हंगेरी देश सोव्हिएत संघराज्याचा मांडलिक होता. सगळे काही सरकारच्या आधिपत्याखाली असायचे. अशा परिस्थितीत पोलगार दाम्पत्यानं सरकारकडे अर्ज केला की आमच्या मुलीला- सुसानला आम्ही शाळेत न पाठवता घरीच शिकवू. त्यासाठी आम्हाला परवानगी द्या! झालं! सरकारनं लाझलोला अटक करण्यासाठी (आणि इतरांवर दहशत बसवण्यासाठी) गनमशीनधारी सैनिकांची तुकडी त्यांच्या घरी पाठवली. परंतु लाझलो डगमगला नाही. त्यांनी आपली बाजू सरकारला पटवून दिली आणि अखेर सरकार नमलं. शाळेमध्ये फक्त परीक्षा देण्यासाठी सुसानला पाठवण्याची परवानगी देण्यात आली. आता सुसानचा दिवस बुद्धिबळ, भाषा आणि शालेय अभ्यास यामध्ये जाऊ लागला.
‘‘बुद्धिबळाची निवड तुम्ही का केली?’’ या प्रश्नाला उत्तर देताना लाझलो म्हणाला की, बुद्धिबळ हे निव्वळ विज्ञान नसून ती एक कलाही आहे. ते नियमानुसार खेळलं जातं, पण तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे हे नियम वाकवून विजय मिळवू शकता. सुसानला हंगेरीच्या सरकारनं खूप अडथळे निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. वयाच्या १२ व्या वर्षी १६ वर्षांखालील मुलींची जागतिक विजेती झालेल्या सुसानला परदेशात खेळण्याची परवानगी देण्यात आली नाही. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ हंगेरीत पुरुषांमध्ये खेळून वयाच्या १५ व्या वर्षी सुसान जागतिक महिला क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आली. लहानपणापासून अन्यायाची शिकार बनलेल्या सुसानला कोणकोणत्या दडपशाहीला तोंड द्यावं लागलं याची एक यादीच आहे. हंगेरीच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून जागतिक पुरुषांच्या स्पर्धेसाठी निवड होऊनही तिला जागतिक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलं नाही. कारण देण्यात आलं की या स्पर्धेचं नाव होतं- जागतिक पुरुषांची अजिंक्यपद स्पर्धा!
सुसानचा पहिला क्रमांक सगळय़ांच्या नजरेत खुपत होता. जागतिक संघटनेनं सोव्हिएत संघराज्याचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी अचानक सर्व महिलांच्या रेटिंगमध्ये १०० गुणांची भर टाकली- पण सुसान वगळता!! कारण ती फक्त पुरुषांच्या स्पर्धा खेळते असं कारण देण्यात आलं. अचानक सुसान तिसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली.
१९८८ साल आलं आणि सर्व चित्र बदलून गेलं. हंगेरीच्या महिलांच्या क्रमवारीत पहिल्या ३ क्रमांकावर होत्या सुसान, सोफीया आणि ज्युडिथ या पोलगार भगिनी! साम्यवादाकडून लोकशाहीकडे झुकू लागलेल्या सत्तेनं तीन पोलगार भगिनी आणि १९८६ ची जागतिक ज्युनियर मुलींची विजेती इलडिको माडल या संघाला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खेळायची परवानगी दिली.
ग्रीसमधील सलोनीकी या एजियन समुद्राच्या किनाऱ्यावरील रम्य ठिकाणी भरलेल्या ऑलिम्पियाडमध्ये पोलगार भगिनी खेळणार म्हटल्यावर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, पण या किशोरवयीन मुलींच्या संघाला कोणीही जास्त किंमत देत नव्हते. कारण त्यांच्या विरुद्ध होता सोव्हिएत संघराज्याचा आतापर्यंतचा अपराजित संघ.
पहिल्या पटावर एकही डाव न गमावता सुसाननं खंबीर खेळ केला तर लहानग्या ज्युडिथनं १३ पैकी १२ डाव जिंकले आणि एक बरोबरीत सोडवला. (बुद्धिबळ सम्राज्ञी ज्युडिथविषयी पुन्हा कधी तरी) या झंझावातामुळे आतापर्यंत एकही ऑलिम्पियाड सुवर्ण न गमावलेल्या सोव्हिएत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
परत आल्यावर पोलगार भगिनींचं बुडापेस्टमध्ये जंगी स्वागत झालं. सुसान म्हणते, ‘जादूची कांडी फिरल्यासारखं सगळंच बदलून गेलं. हंगेरीच्या सरकारनं त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानही दिला. कारण आतापर्यंत बलाढय़ समजल्या जाणाऱ्या सोव्हिएत संघराज्याला त्यांनी पटावर का होईना, मात दिली होती.’’
जागतिक बुद्धिबळ संघटनेनंही आपलं महिलाविरोधी धोरण बदलून पुरुषांच्या जगज्जेतेपदाचं नाव ‘जागतिक पुरुष अजिंक्यपद स्पर्धा’ बदलून ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धा’ केलं.
जानेवारी १९९१ला आपले सर्व नॉर्म पूर्ण करून सुसान पुरुषांची ग्रँडमास्टर झाली. हा मान मिळवणारी ती तिसरी महिला होती आणि सर्वात लहानही! लवकरच तिच्या लहान बहिणीनं- ज्युडिथनं तिला मागे टाकलं. यथावकाश सुसान महिलांची जगज्जेतीही झाली.
तिनं अमेरिकन संगणकतज्ज्ञ जेकब शुट्झमन याच्याशी विवाह केल्यावर बुद्धिबळ प्रसारासाठी आपलं जीवन वाहून घेतलं. अमेरिकेलाही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिनं पदकं मिळवून दिलीच. सुसाननं आपल्या आयुष्यात ऑलिम्पियाडमध्ये एकही डाव न हरता आपल्या हंगेरी आणि अमेरिकन संघांना एकूण ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकं मिळवून दिली.
अमेरिकेत आल्यावर मुळात हुशार असणाऱ्या सुसाननं पहिल्यांदा आपली अमेरिकी बुद्धिबळपटू म्हणून ओळख निर्माण केली. २००४ च्या ऑलिम्पियाडमध्ये ती अमेरिकी संघाची कर्णधार तर होतीच, पण तिनं त्या संघाला प्रशिक्षणसुद्धा देऊन अमेरिकी संघाला रौप्य पदक जिंकून दिलं. तिला स्वत:ला वैयक्तिक सुवर्ण पदक मिळालं ते वेगळंच!
अमेरिकन बुद्धिबळ संघटनेनं सुसानचा २००३ साली ‘ग्रँडमास्टर ऑफ द इयर’ हा किताब देऊन गौरव केला होता. कारण अमेरिकेची विद्युतगती २००३ ची अजिंक्यपद स्पर्धा जिंकून तिनं पुरुषांची मक्तेदारी संपवली होती. ही स्पर्धा तिनं २००५ आणि २००६ सालीही जिंकली. परंतु तिनं गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवलं ते वेगळय़ाच कारणानं- एका वेळी अनेकांशी खेळून!
मागे मी उल्लेख केलाच होता की, सुसान पोलगारनं ३२६ जणांशी एकाच वेळी खेळून पाम बीच येथे जुलै २००५ला विश्वविक्रम नोंदवला होता. त्यानंतर ३ महिन्यांनी रशियाचे माजी अध्यक्ष आणि माजी विश्वविजेता अनातोली (Anatoli ) कार्पोव यांच्या अमेरिका भेटीच्या निमित्तानं ‘शांततेसाठी बुद्धिबळ’
(Chess For Peace) या समारंभासाठीही तिला बोलावण्यात आलं होतं. त्या वेळी कार्पोवशी तिनं एक प्रदर्शनीय सामना खेळला.
लहानपणापासून चांगले संस्कार झालेल्या सुसाननं स्वार्थ आणि परमार्थ यांची छान सांगड घातली आणि तिला मानद डॉक्टरेट देणाऱ्या टेक्सास टेक विश्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तिनं SPICE ( Susan Polgar Institute for Chess Excellence ची स्थापना केली. एका संस्थेनं तिला २ कोटी ६० लाख रुपयांची देणगी दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेत होणारी SPICE चषक स्पर्धा ही मानाची समजली जाते.
सुसान एवढय़ावरच थांबली नाही. एकापेक्षा एक सुंदर पुस्तकं लिहून तिनं बुद्धिबळ शिकणाऱ्यांचं (आणि शिकवणाऱ्यांचे) काम सोपं केलं. तिचे स्तंभ अनेक बुद्धिबळविषयक मासिकांमध्ये प्रकाशित होत असतात. बुद्धिबळ शिकणाऱ्यांसाठी तिचे व्हिडीओही लोकप्रिय आहेत.
सुसानची कीर्ती इतकी वाढली की तिला अमेरिकन बुद्धिबळ संघटनेच्या चेअरमनपदी विराजमान होता आलं, पण संकुचित मनोवृत्तीच्या लोकांची अमेरिकेतही कमी नाही. तिच्याविरुद्ध कोर्टात दाद मागण्यात आली आणि जरी न्यायालयानं तिच्या बाजूनं निर्णय दिला तरीही वैतागलेल्या सुसाननं अमेरिकन बुद्धिबळ सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा हंगेरीच्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुसाननं असंख्य स्पर्धा सुरू केल्या आणि त्यामधील यशस्वी बुद्धिबळपटूंना घसघशीत शिष्यवृत्तीही दिली जाते. अनेक भारतीय खेळाडू याचे लाभार्थी आहेत. त्यांना अमेरिकेत शिक्षणही घेता येतं आणि बुद्धिबळाची कलाही जोपासता येते.
आयुष्यभर संघर्ष करावा लागूनही मनात जराही कटुता न बाळगणाऱ्या सुसानचं बुद्धिबळ प्रेम किती आहे याचं मी अनुभवलेलं एक उदाहरण देतो. ‘‘सतत बुद्धिबळ खेळून, अभ्यास करून तुला कंटाळा किंवा थकवा येत नाही का?’’ अशी एक मूलभूत शंका मी तिला विचारली.
‘‘येतो तर!’’ तिचं उत्तर आलं.
मी पुढे विचारलं, ‘‘मग त्यावर तू काय करतेस?’’ यावर तिनं मिश्कीलपणे हसत उत्तर दिलं, ‘‘बुद्धिबळ खेळते!’’
gokhale.chess@gmail.com