अरुंधती देवस्थळे

कलाकारांच्या वाटय़ाला येणारी प्रतिकूलता, विशेषत: शे-दीडशे वर्षांपूर्वीच्या अमेरिकेतला वर्णद्वेष हे इतिहासातलं एक अतिशय दुर्दैवी प्रकरण होतं. मरणानंतर ११५ वर्षांनी अचानक चर्चेत आलेल्या कृष्णवर्णीय-अमेरिकन शिल्पकार एडमोनीया लुईच्या ( Edmonia Lewis १८४४ -१९०७) बाबतीत हे सगळं प्रकर्षांने पुढे येण्याचं कारण म्हणजे या वर्षी जानेवारीत तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ अमेरिकन पोस्ट विभागाने एक खास डाक तिकीट (Forever Stamp)  जे एक आऊन्स वजनाच्या पाकिटासाठी कधीही चालू शकतं) जारी केलं आहे. तिला दीडशे वर्षांपूर्वी अतिशय अपमानास्पदरीत्या कॉलेजमधून काढून टाकणाऱ्या ओबर्लिन कॉलेजने तिचा अपूर्ण राहिलेला डिप्लोमा देऊन जूनमध्ये गौरवित केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, आज आपल्या दर्जेदार शिल्पांमधून विशेषत: गुलामगिरीविरुद्धच्या शिल्पांमधून सामाजिक इतिहासाची आठवण जागवणाऱ्या, आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय स्त्री शिल्पकार एडमोनिया लुईची, तिने कधीही न नाकारलेला देश क्षमा मागतोय. 

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके

हेही वाचा >>>अभिजात : अमूर्तामागचं तर्कशास्त्र : पीट मोन्द्रिआन

झालं असं की, २०१९ मध्ये ‘दी डेथ ऑफ क्लिओपात्रा’(१८७२-७६) या एडमोनियाने निओक्लासिकल शैलीत केलेल्या अतिशय देखण्या संगमरवरी पुतळय़ाचा अगदी योगायोगाने शोध लागला. तो शिकागो शॉपिंग सेंटरमधल्या कोणा तळघरात, उतरवलेल्या सजावटीच्या अडगळीत खितपत पडलेला होता. या कमालीच्या  सुंदर शिल्पाचा माग काढून ते लोकांसमोर आणण्याचं श्रेय कला इतिहासतज्ज्ञ क्यूरेटर मेरिलिन रिचर्डसन यांचं. हे जवळजवळ साडेपाच फुटी, दोन टन वजनाचं श्वेत संगमरवरातलं शिल्प, एडमोनियाने १८७६ च्या फिलाडेल्फीयाच्या कला प्रदर्शनासाठी बनवलं असावं असं दिसतं. कर्तृत्ववान महाराणीचं एकलेपण दाखवणाऱ्या या शिल्पावर रोममध्ये  तिने ४ वर्ष काम केलं होतं. ते कृष्णवर्णीय स्त्रीच्या कलेचं लक्षणीय प्रतीक! त्या काळात रोममधून फिलाडेल्फियाला पाठवायला तिला किती अडथळे आले असतील आणि निर्मितीसाठी किती श्रम आणि पैसा लागला असेल याची कल्पनासुद्धा अशक्य! एडमोनियाने क्लिओपात्राला आफ्रिकन चेहरेपट्टी दिली आहे. हे शिल्प करण्याआधी तिने व्हॅटिकनला जाऊन बराच अभ्यास केला होता. तिथे नाण्यांवर राणीच्या जिवंत असताना कोरलेल्या प्रतिमा बारकाईने पाहिल्या होत्या. तिने क्लिओपात्राला दिलेलं रूप हा तिचा वैयक्तिक निर्णय असला तरी, सिंहासनावर शेवटचा श्वास घेणारी महाराणी क्लिओपात्रा निश्चेष्ट अवस्थेतही किती नखशिखांत सुंदर दिसते आहे! त्यानंतर हे शिल्प १८७८च्या शिकागो प्रदर्शनात मांडण्यात आलं होतं. त्यावर बरंच काही स्तुतिपर छापूनही आलं होतं. असं असूनही या अद्वितीय शिल्पाच्या नशिबी उपेक्षा का आली असावी हे कळत नाही. ते खरीदण्यासाठी कोणी मिळेना. ते तसंच शिकागोत सोडून ती युरोपात परतली आणि वेगवेगळय़ा देशांत काम मिळवत राहिली आणि शेवटी लंडनमध्ये वारली, एवढंच तिच्याबद्दल ज्ञात आहे. आयुष्यभर या ना त्या कारणानं संघर्ष करत राहणं आणि  तिचं एकटं असणंही करुणच आहे. हा पुतळा सापडल्यावर अमेरिकेने एडमोनियावर स्तुतिसुमनांचा वर्षांव सुरू केला आणि आता हे आणि ‘ओल्ड अ‍ॅरो मेकर’ ही तिची दोन्ही शिल्पं स्मिथसोनीयन अमेरिकन आर्ट म्युझिअम, वॉशिंग्टन डी. सी.मध्ये आहेत. दुर्लक्षित शिल्पाची झालेली पडझड कौशल्याने दुरुस्त करायला स्मिथसोनीयनला हजारो डॉलर्स खर्च आला. गेल्या काही वर्षांत तिने केलेले १४-१५ पुतळे समोर आलेले आहेत. आता त्यातले काही अमेरिकन, फ्रेंच आणि इंग्लिश म्युझियम्समध्ये आहेत, पण प्रतिकूलतेच्या भोवऱ्यात हरवले किती याचा अंदाज नाही.

हेही वाचा >>>अभिजात : व्हर्जिनिया वूल्फ ‘दी मंक्स हाऊस’

त्याकाळात ९०% कृष्णवर्णीय लोकसंख्या गुलामीत असल्याने, वर्णभेदाच्या शृंखला तोडून शिक्षण घेऊ पाहणाऱ्या मूठभरांच्या, त्यातूनही मुलींच्या वाटय़ाला अनेक प्रकारचे अन्याय आणि अपमान येत. आई-वडील लवकर वारल्याने तिची आणि मोठा भाऊ सॅम्युएलची जबाबदारी एका मावशीवर पडली. आई सुंदर विणकाम, भरतकाम करत असे. नायगाराजवळ राहणारी मावशी आणि तिचं कुटुंब, धबधबा पाहायला येणाऱ्या प्रवाशांना पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू, भरतकामाचे कपडे, रुमाल आणि मण्यांच्या माळा विकून घरखर्च चालवत. एडमोनियाही त्यांच्यात असे. पण तिला जंगलात भटकत राहणं आवडायचं. तिने इटलीच्या डायरीत लिहिलंय, There is nothing so beautiful as the free forest.  To catch a fish when you are hungry,  cut the boughs of a tree,  make a fire to roast it,  and eat it in the open air,  is the greatest of all luxuries. I would not stay a week pent up in cities if it were not for my passion for art. लहानपणापासून हूड असल्याने घरीदारी तिला ‘वाइल्ड फायर’ म्हणत. ती तीन वर्ष कॉलेजमध्ये चित्रकला शिकली, १००० मुलांपैकी फक्त ३० अश्वेतवर्णीय होती. इथे वर्णद्वेषी जमावाकडून मारहाण आणि बलात्काराचे प्रसंग आले आणि शेवटी तर धडधडीत अन्यायानं, रंगकामाच्या न केलेल्या चोरीची शिक्षा म्हणून तिला कॉलेज शिक्षणास मुकावं लागलं. मोठय़ा भावाच्या मदतीनं ती बोस्टनच्या एका शिल्पकाराकडे जाऊन शिल्पकला शिकू लागली आणि इथे सुरवंटाचा गुदमरून टाकणारा कोष गळून पडला आणि फुलपाखराला त्याचे पंख गवसले.  इथे तिने केलेले रॉबर्ट गोल्ड शॉ आणि कर्नल जॉन ब्राऊन यांचे उत्कृष्ट बस्ट्स तिला नाव आणि पैसे मिळवून देणारे ठरले, इतके की ती कला शिक्षणासाठी १८६५ मध्ये रोमला जाऊ शकली. एके ठिकाणी, ती म्हणते : I was practically driven to Rome to obtain the opportunities for art culture, and to find a social atmosphere where I was not constantly reminded of my color.  The land of liberty had no room for a colored sculptor.  (पासपोर्टवर तिची उंची चार फूट नोंदलेली होती) इथे तिला कलेच्या कौतुकाबरोबर सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, जे वर्णभेदी अमेरिकेत नव्हतं. ती लंडन पॅरिस आणि फ्लोरेन्सलाही जाऊन तिथली प्रसिद्ध शिल्पं पाहून आली. रोममध्ये अमेरिकन कलावर्तुळाने तिला पाठबळ दिलं आणि संगमरवर हे तिचं माध्यम बनलं. कोणाचीही मदत न घेता प्लास्टिकमध्ये साचा बनवून अवजड शिल्पं ती स्वत: कोरत असे. लग्न आणि मातृत्व दोन्ही नाकारल्याने समकालीन सवर्ण पुरुष कलाकारांना ती थट्टेचा विषय वाटे. इथे तिने ‘दी फ्रीड वूमन अँड हर चाइल्ड’ (१८६६) आणि  ‘मॉर्निग ऑफ लिबर्टी किंवा फॉरेव्हर फ्री’ (१८६७) ही संगमरवरातली  शिल्पं केली. अमेरिकेत कृष्णवर्णीयांची गुलामी संपवणारा कायदा आल्यानंतर दोन वर्षांनी जन्मलेल्या ‘फॉरेव्हर फ्री’ ( ९४१ X २२ . ५ X१२. ६ ह्णह्ण ) मध्ये एक कृष्णवर्णीय पुरुष बेडी तोडून ताठ उभा आहे आणि धीट निर्धाराचं प्रतीक म्हणून त्याची एक मूठ हवेत उंचावली आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या स्त्रीत मात्र हा आत्मविश्वास अजून जागायचाय, पण त्याचा एक हात आश्वासकपणे तिच्या खांद्यावर आहे. हे शिल्प आता न्यू यॉर्कच्या मेट म्युझियममध्ये आहे. अमेरिकन आदिवासींवर केलेल्या तिच्या शिल्पांमध्ये तिने हेन्री लॉंगफेलोच्या ‘दि सॉंग ऑफ हायवाथा’ या दीर्घ कवितेवर आधारित ‘दी मॅरेज ऑफ हायवाथा’ ( (१८६८)आणि त्याच मालिकेत आणखीही काही पात्रांची  शिल्पं बनवली. तिने बाल्टिमोरमधल्या चॅपेल ऑफ सेंट मेरीसाठी केलेलं ‘अ‍ॅडोरेशन ऑफ दी माजाय’ ( १८८६) हे तिचं शेवटल्या कामांपैकी एक. हे एक मोठं अर्धगोलाकार संगमरवरी शिल्पं आहे. यात बायबलमधले तीन ज्ञानी पुरुष उजवीकडून नवजात जीजसकडे बघताना दिसतात. १९४७ मध्ये चर्चला लागलेल्या भयानक आगीत ते वाचलं की नाही हे निश्चित कळत नाही, पण त्याची कृष्णधवल छायाचित्रं मात्र उपलब्ध आहेत. तिने केलेले गुलामगिरीचा अंत करण्यासाठीच्या चळवळीतले नेते विल्यम लॉईड गॅरीसन आणि अब्राहम लिंकन ( १८८१) हे दोन बस्ट्स चांगलेच नावाजले गेले आहेत.

हेही वाचा >>>अभिजात : डेव्हिड काकाबत्झ स्वयंसिद्ध चित्रकार

तिचा शोध घेणारे अभ्यासक एवढंच म्हणतात की, ती एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होतं. आयुष्यात बरंच काही सहन करून स्वत:ची सर्जनशीलता दृढ निर्धाराने पुढे नेत राहणं आणि कलेसाठीच जगणं हे कठीणच असणार. अमेरिकेत असो व युरोपात तिला तिच्या वर्णामुळे एक उपरी व्यक्ती म्हणूनच वागवलं गेलं. तरीही ती म्हणायची, ‘‘ Some praise me because I am a colored girl  and I don’ t want that kind of praise. I had  rather you would point out my defects,  for that will teach me something’’

ती लंडनला १९०१ मध्ये गेली, तिथे तिने आणखी काही काम केलं का? हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. मृत्यूच्या दाखल्यावरून ती मूत्रिपडाच्या विकाराने ग्रस्त होती, एका हॉस्पिटलमध्येच तिने शेवटचा श्वास घेतला. मृत्युपत्रात तिने स्वत:बद्दल ‘एक अविवाहित शिल्पकार’ एवढंच लिहिलं होतं आणि एवढंच म्हटलं होतं की तिची शवपेटिका डार्क चेस्टनटच्या रंगाची असावी. बाकी राहिलेले पैसे तिने चर्चला दान केले होते इतकंच काय ते कळतं. सत्य हे आहे की तिच्या हॅरो रोडवरील अगदी साध्या कबरीचा शोधसुद्धा इंटरनेटमुळे शक्य झाला. तिच्या चरित्रकार मेरिलिन रिचर्डसननी शोधाशोध केली तेव्हा लंडनच्या ‘ब्रिटिश रोमन कॅथॉलिक टॅबलेट’मध्ये तिच्या निधनाची त्रोटक नोंद मिळाली, ती अमेरिकेत एरव्ही पोहोचणं कठीणच होतं. अमेरिकन कला इतिहासतज्ज्ञ बॉबी रेनो यांनी पैसे जमवून तिच्या कबरीवर नावाची सुबकशी पाटी बनवून लावली. उशीर खूप झाला हे खरंच, पण ‘नाही चिरा नाही पणती’चं पर्व अंशत: संपलं एवढंच.

arundhati.deosthale@gmail.com

Story img Loader