मराठी मनाच्या कोपऱ्यात सदैव स्थान मिळवलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेल्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाचे महाराष्ट्रभर प्रचंड स्वागत झाले. वाचकांच्या मागणीवरून या विशेषांकाची दुसरी आवृत्ती येत्या १६ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार असून, त्यानिमित्त मुंबईत एका वेगळ्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. पुलंच्या प्रत्येक कलाकृतीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी ‘अप्रकाशित पु. ल.’मधील वेगळ्याच विषयावरील पुलंचे लेख आवडल्याचे कळवले आणि या अंकाच्या आणखी प्रती मिळण्याची मागणीही केली.
‘गंगेचे सांध्यदर्शन’ या लेखातील त्यांचे विचार, ‘साने गुरुजी.. माऊली’मध्ये पुलंना दिसलेले साने गुरुजींचे आईपण किंवा ‘पुरोगामी की परंपरावादी’मधील कठोर विचारदर्शन, पुलंची पत्रे असा अनेक गुणवैशिष्टय़ांचा समावेश असलेला हा अंक आता पुन्हा वाचकांच्या भेटीला येत आहे.
‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त, येत्या १६ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कलावंत चंद्रकांत काळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
लेखनाबरोबरच पुलंनी चिंतनात्मक, गंभीर स्वरूपाचे, तरल काव्यात्मक, रसरशीत प्रवास वर्णनात्मक लेखनही केले आहे. ‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमात पुलंच्या विनोदाबरोबरच अशाच काही लेखनाचं दर्शनही रसिकांना घडेल. पुलंच्या काही कविताही या वेळी गीत स्वरूपात सादर होणार आहेत.
चंद्रकांत काळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमात ते स्वत:, अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांनी संगीत संयोजन केले असून दीप्ती कुलकर्णी (हार्मोनिअम) आणि अक्षय शेवडे (तबला) हे साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणार असून, तो सर्वासाठी खुला आहे.
ज्यांची ओळन्ओळ ऐकावीशी-वाचावीशी वाटते, त्यातून पुन:पुन्हा आनंद घ्यावासा वाटतो, अशांपैकी पुलं एक आहेत. त्यांची आठवण अशी पुस्तकरूपात जपणं ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. यातील सानेगुरुजींवरील अथवा ‘उंबरठा’ सिनेमावरील पुलंची भाषणं असोत किंवा त्यांचे चिंतनलेख असोत; त्यातून पुलंचं भाषाप्रभुत्व, त्यांची भूमिका दिसून येते. शिवाय ग. दि. माडगूळकर, नरहर कुरुंदकर, विंदा करंदीकर अशा दिग्गज मंडळींबरोबरचा पुलंचा पत्रव्यवहारही मला फार महत्त्वाचा वाटतो. त्यांत नुसती ख्यालीखुशाली नाही, तर जगण्याचं आणि भवतालच्या पर्यावरणाचं भानही उमटलं आहे. एकुणात, ‘अप्रकाशित पु. ल.’ हे पुलंविषयीचं कुतूहल आणखी वाढवणारं आहे.
– चंद्रकांत कुलकर्णी, सिने-नाटय़ दिग्दर्शक
‘अप्रकाशित पु. ल.’ हा विशेषांक मांडणी, रचना आणि मजकुरातील आशयासह आवडला. या अंकातून पुलंचे वेगळे पैलू वाचायला आणि अनुभवावयास मिळतात. माझे काका आणि ज्येष्ठ साहित्यिक- विचारवंत डॉ. स. ह. देशपांडे यांना पुलंनी लिहिलेले पत्र विशेषांकात समाविष्ट आहे. ते पाहून मला आनंद झाला.
– पं. सत्यशील देशपांडे, गायक
पुलंच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या अप्रकाशित साहित्याचा शोध घेणं हे एक प्रकारचं संशोधनच आहे. पुलंचं व्यक्तिमत्त्व इतक्या बहुरूपांनी बाहेर आलेलं आहे, हे ध्यानात घेता त्यांचं अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणं ही एक कसरतच ठरावी. पण या अंकात समाविष्ट झालेल्या पुलंच्या लेखांचा दर्जा पुलंची प्रतिमा आणि त्यांच्या इतर महत्त्वाच्या लिखाणाला साजेसाच आहे. शिवाय मं. वि. राजाध्यक्ष आणि श्रीकांत मोघे यांचे लेखही उत्तम आहेत.
– मोनिका गजेंद्रगडकर, लेखिका आणि संपादक (‘मौज’)
‘अप्रकाशित पु. ल.’ हा अंक अप्रतिम आहे. अनेक दुर्मीळ गोष्टी पाहायला आणि वाचायला मिळाल्या. उदा. अंमळनेरला साने गुरुजींच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पुलंनी केलेले भाषण, व्हिक्टोरिया किंवा ट्रामची आठवण काढत झपाटय़ाने बदलणाऱ्या मुंबईबद्दल, तसेच शहरे आणि माणसांची वेगळी रूपे दाखवणारे त्यांचे लेखन वाचायला मिळणे हा अनुभव आनंदाचाच आहे. प्रत्येकाने जपून ठेवावा असाच हा अंक आहे.
– सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध निवेदक