अरुंधती घोष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘चारचौघी’ नाटकातली विनी जेव्हा एकाच वेळेस दोघांवर प्रेम करू पाहते तेव्हा बंडखोर, विचित्र किंवा हास्यास्पद ठरते. तिच्या भावना कुणीच समजू शकत नाही; तेव्हाही आणि आजही. परंतु अशा इच्छा असणारी, कुणावरही अन्याय होऊ न देता त्या अमलात आणणारे लोक होते, आहेत, असतील. प्रेम आणि आकर्षणाच्या दुनियेतले अरुंधती घोषचे हे अनुभव.

एकाच वेळेस एकाहून अधिक व्यक्तींसोबत रोमॅंटिक प्रेमाचं नातं असणं म्हणजे पॉलिअ‍ॅमरी. सध्या मौजूद असलेल्या सर्व टॅबू गोष्टींमधली आजही ‘टॅबू’च राहिलेली कदाचित ही एकमेव गोष्ट असेल. स्त्री-पुरुष समानता, समलैंगिकता, ट्रान्स व्यक्तींचे हक्क, मूल दत्तक घेणं, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह आणि अशा अनेक गोष्टी काही अंशी तरी स्वीकारल्या गेल्या आहेत; परंतु अतिशय सुधारक विचारांच्या व्यक्तीसुद्धा प्रेमातल्या एकमेवत्वाचा सवाल येताच अडखळतात. आपल्या कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी, नाटकं, चित्रपट या सगळय़ामधून ‘त्या एकमेव’ खऱ्या प्रेमातली उत्कंठा, हुरहुर, विरह, प्रेमभंग – असे सगळे सोहळे साजरे केले जातात. ‘मोहब्बत एक से होती है, हजारों से नही’ हे ठासून सांगितलं जातं. प्रेमातल्या एकमेवत्वावरचा हा जणू सामाजिक शिक्काच!

माझं वय पन्नास. आजवर मी एकाच वेळेस दोन ते चार पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे. ही गोष्ट कुणाहीपासून कधीही न लपवता, त्या सगळय़ांच्या संमतीने. पण माझं निरीक्षण असं की, आमच्या या पॉलिअ‍ॅमरीबाबत कुणाशी काही बोलणं हे उगाच त्रासदायक आणि लाजिरवाणं बनून जातं. पॉलिअ‍ॅमरी ही आपल्या रूढ कुटुंबव्यवस्थेशी फटकून वागणारी आहे म्हणून असं होत असेल का? का शासनाला यावर काही नियंत्रण आणणं शक्य नाही म्हणून? एका आईमध्ये आपल्या सर्व अपत्यांवर समरसून प्रेम करण्याची क्षमता असते हे सहज स्वीकारलं जातं. नव्हे, तिचं ते कर्तव्यच मानलं जातं आणि हक्कसुद्धा! पण एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक व्यक्तींवर एकाच वेळेस निस्सीम प्रेम करता येतं आणि ते निभावताही येतं याबाबतीत मात्र गंभीर प्रश्नचिन्हं उभी राहतात.

इस प्यार को क्या नाम दूँ

माझ्यामध्ये एका वेळेस एकाहून अधिक व्यक्तींवर प्रेम करायची इच्छा आणि क्षमता आहे या गोष्टीची मला फार लवकर जाणीव झाली. दीर्घकाळ टिकणारी अशी अनेक नाती मला जोपासायची होती; पण या सगळय़ा गोष्टींची फार माहितीही नव्हती आणि खात्रीही. तेव्हा मी कौशिक नावाच्या मित्राशी या विषयावर पहिल्यांदा मोकळेपणी चर्चा केली.

कौशिक अगदी उघडपणे पॉलिअ‍ॅमरस होता. त्याने मला ‘द एथिकल स्लट’ हे पुस्तक वाचायला दिलं. हे पुस्तक म्हणजे एकाच वेळेस अनेक व्यक्तींशी नैतिक आणि भावनिकदृष्टय़ा सुदृढ संबंध कसे प्रस्थापित करावेत याबद्दलचं गाईड होतं. सिंगल व्यक्ती आणि जोडपी – सर्वासाठी उपयुक्त. तो अमेरिकेत राहत होता. त्याच्या ओळखीत तीन ते चार पार्टनर्स असलेली अशी काही कुटुंबं होती, जी एकमेकांच्या रोमॅंटिक व शारीरिक गरजा भागवत होती आणि पालकत्वासारख्या काही जबाबदाऱ्याही वाटून घेत होती.      

शेवटी अनेक पुस्तकांच्या वाचनानंतर आणि काही जवळच्या व्यक्तींशी केलेल्या अनेक चर्चानंतर मी स्वत:ला, स्वत:च्या या ‘जगावेगळय़ा’ गरजांना स्वीकारू शकले आणि त्याबद्दल उघडपणे बोलणं मला शक्य होऊ लागलं.

पॉलिअ‍ॅमरीचे अनेक प्रकार आहेत. एक बाई-अनेक पुरुष. एक पुरुष-अनेक बाया. अनेक पुरुष-अनेक बाया. विविध जेंडर आयडेंटिटी असलेल्या अनेक व्यक्ती. या सगळय़ांचं एकमेकांशी प्रेमाचं नातं असू शकतं किंवा नसूही शकतं; पण प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या अस्तित्वाबद्दल आणि स्थानाबद्दल पूर्ण माहिती असते आणि त्यांची या प्रत्येक नात्याला मान्यताही असते. काही लोक या संबंधांना शॉर्टकटमध्ये नुसतंच ‘पॉलि’ म्हणतात. याचा अर्थ ‘अनेक’. पण ‘अ‍ॅमरी’ म्हणजे ‘प्रेम’ कुठे गेलं? माझ्या मते, पॉलिअ‍ॅमरी ही एक जीवनशैली आहे – जिच्याद्वारे अनेकांशी रोमॅंटिक प्रेमाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्यात प्रत्यक्ष सेक्स असेल किंवा नसेल, पण प्रेम आणि त्याला सर्वाची संमती, मान्यता या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. हे असे संबंध शॉर्ट टर्म किंवा कायमस्वरूपी कसेही असू शकतात. पॉलिअ‍ॅमरीला एक बंगाली शब्द मला सुचतो तो म्हणजे ‘बहुमोनोरथ’ म्हणजे अगणित आकांक्षा. मला हा शब्द भारी वाटतो. (मराठीत एखादा शब्द सुचतोय का तुम्हाला?)

गैरसमजांची बजबजपुरी

कौशिक मला एकदा म्हणाला की, पॉलिअ‍ॅमरीबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज हा आहे की, जीवनात एकदाच जडणाऱ्या एकुलत्या एक, खऱ्या प्रेमाला मुकल्यामुळे किंवा लग्न जमत नसल्यामुळे पॉलिअ‍ॅमरी एक पर्याय म्हणून, एक प्रतिक्रिया म्हणून अंगीकारली जाते. एक सापडत नाहीये? मग अनेकांचा पाठपुरावा करा! ऐकतानाच त्यातला फोलपणा जाणवतो की नाही. हे म्हणजे एखाद्या लेस्बियन स्त्रीबद्दल तिला पुरुष न मिळाल्यामुळे ती ‘तशी’ झाली असं म्हणण्यासारखं आहे. माझ्याबाबतीत सांगायचं तर ‘आपल्या सर्व गरजा एकच व्यक्ती पुरवू शकत नाही’ किंवा ‘एका माणसाचा लवकर कंटाळा येऊ शकतो’ अशा कारणांसाठी मी पॉलिअ‍ॅमरीत पडले नाही. मला काही काही व्यक्तींमध्ये मनापासून गुंतावंसं वाटतं, त्यांच्या-माझ्या नात्यात मला सौंदर्य, जिद्द, तळमळ, सचोटी आणि सहवेदना दिसते- जी मला त्यांच्या अधिकच प्रेमात पाडते. म्हणजे ज्या गोष्टींमुळे कुठलीही व्यक्ती कुठल्या तरी ‘एका’ व्यक्तीच्या प्रेमात पडते तीच ही सगळी कारणं झाली की! आपलं माणूस भेटलं, आता फुलस्टॉप! एक आयुष्य, एक प्रेम! आपला कोटा संपला असं मुळी मी मानतच नाही. मी सतत प्रेमात पडत असते; पण म्हणून आधीच्या जोडीदारांकडे पाठ फिरवत नाही.

अजून एक गैरसमज म्हणजे पॉलिअ‍ॅमरस लोक कुणाहीसोबत सेक्स करू शकतात! ज्यांना कुणाहीसोबत सेक्स करायला आवडतं अशा व्यक्तींबद्दल मला काहीच म्हणायचं नाही; पण पॉलिअ‍ॅमरस लोकांना तसं करणं आवडतं हे गृहीत धरणं योग्य नाही. कारण मग इथे त्यांच्या ‘संमती’चा मुद्दाच गौण ठरतो. वेश्या आणि पॉलिअ‍ॅमरस व्यक्ती यांच्याकडून लोकांना नकाराची अपेक्षा नसते. ऊठसूट कुणाहीवर प्रेम बसणं किंवा त्यांच्याशी सेक्स करावा अशी इच्छा होणं आम्हाला कसं शक्य नाही हे मग अशा लोकांना सतत समजावून सांगावं लागतं. हे आपली कसोटी पाहणारं, प्रसंगी वीट आणणारं असतं; पण ते करावंच लागतं. एका किंवा अनेक व्यक्तींवर प्रेम जडणं या दोन्ही गोष्टी कुणी ठरवून करत नसतं – त्या आपसूक घडत असतात; पण अनेक वर्षांच्या संस्कारांमुळे आपल्याला पहिली गोष्ट नैसर्गिक वाटते आणि दुसरी अनैसर्गिक.  

मला एक प्रश्न पडतो. एका वेळेस एकाच व्यक्तीवर जडलेलं प्रेम तरी निर्दोष, निष्पाप असतं का? अनेक प्रकारची एकनिष्ठ जोडपी मी पाहते – आनंदी, समाधानी, झगडणारी, जगण्यातल्या स्खलनशीलतेने थकून गेलेली. अनेकांचे विवाहबाह्य संबंध असतात. त्यांच्या जोडीदारांना माहीत असलेले आणि नसलेले. जीवन जटिल आहे, कठीण आहे. पॉलिअ‍ॅमरस असल्यामुळे शरीर आणि मनाच्या गरजा मला सखोलपणे समजू शकतात. त्यामुळेच लोक भरकटतात, वाहवत जातात यात मला फार आश्चर्य वाटत नाही; परंतु जोडपं असण्याच्या, विवाहित असण्याच्या स्थितीला जो पवित्र दर्जा दिला जातो, त्याचा जो उदोउदो केला जातो, आणि आपसूकच या चौकटीत न बसणाऱ्यांना ज्या प्रकारे तुच्छ लेखलं जातं ते मला पटत नाही. या ‘पावन’ दुनियेत पॉलिअ‍ॅमरस लोकांना कायम ‘पतित’ किंवा ‘पाखंडी’ बनून राहावं लागतं.

को-लव्हर्स बनून जगताना

पॉलिअ‍ॅमरस नाती निभावणं सरळ आणि सहज नसलं तरी अशक्य नक्कीच नाही. कधी कधी ही नाती दुसऱ्या शहरांमधल्या, गावातल्या लोकांसोबत असतात आणि अगदी एकाच शहरात असलो तरी अचानक, एका फोन कॉलवर धावत येणं, आधीपासून न ठरवता वीकएंड एकत्र साजरा करणं शक्य होतंच असं नाही, कारण एखाद्याचे त्यांच्या इतर जोडीदारांसोबत आधीपासून ठरलेले प्लॅन्स असू शकतात. त्यामुळे प्रत्येक जोडीदाराची इच्छा, मर्यादा, उपलब्धता आणि खुलेपणा याची कायम जाण ठेवावी लागते.

पण यात काही जमेच्या बाजूही आहेत. बरेच जोडीदार असल्यामुळे एखाद्यासोबत नाटक पाहणं, प्रदर्शनाला जाणं अशा सांस्कृतिक गोष्टी मी करू शकते आणि दुसऱ्यासोबत एखाद्या अ‍ॅडव्हेंचर ट्रिपवर जाऊ शकते. अशा प्रकारे प्रत्येकाची आवड आणि वेळा सांभाळल्या जाऊ शकतात. 

‘‘तुम्ही कधीच जेलस होत नाही का?’’ नेहमी विचारला जाणारा हा अजून एक प्रश्न. आपला जोडीदार इतर कुणाशी रोमॅंटिक किंवा शारीरिक पातळीवर रममाण होताना पाहून असूया, दु:ख किंवा संताप या भावना का निर्माण होतात, हा प्रश्न अनेक विचारवंतांनी आणि मानसोपचारतज्ज्ञांनी तपासून पाहिलाय. मला माझ्यापुरती दोन उत्तरं मिळाली. पहिलं म्हणजे, आपण आपल्या जोडीदाराकडे आपल्या मालकीची वस्तू म्हणून पाहतो. ‘तू माझा, तुझी मी झाले’, ‘माझा होशील का’, ‘तुम मेरे हो’ अशा अनेक गाण्यांमधून हा मालकी हक्क आणि इतरांना मज्जाव करणारे नियम तयार झालेत. आपल्या मालकीच्या प्रॉपर्टीवर जसे आपले कायदेशीर अधिकार असतात, तसेच आपल्या मालकीच्या जोडीदारावर आपल्या एकनिष्ठतेचे अधिकार प्रस्थापित होतात.  

दुसरं म्हणजे जोडीदाराकडे नेहमी आपलीच छबी म्हणून पाहिलं जातं. दोघांचं ‘अद्वैत’ दाखवणारी गाणीही लोकप्रिय आहेतच. अशा परिस्थितीत दुसऱ्याशी रममाण होणं म्हणजे तो एक प्रकारे स्वत:च्याच इच्छेविरुद्ध घडलेला अपराध ठरतो. आपल्यावरचे शेकडो वर्षांचे संस्कार हे असेच आहेत. आपली मतं, आपल्या भावना, आपल्या कृती, त्यातला आपण करत असलेला न्याय-निवाडा यावर त्यांचाच पगडा असतो. आपली इच्छा असेल तर त्यात बदल करणं अशक्य नाही; पण त्यासाठी भरपूर वेळ मोजावा लागतो आणि कष्ट झेलावे लागतात.     

Compersion – असूयेच्या उलट भावना

मलाही असूया वाटलेली आहे. माझाही जळफळाट झालाय; पण जेलसीच्या थेट उलट अशी कुठली भावना असते का याच्या शोधात निघाले आणि  compersion या शब्दाशी माझी गाठ पडली. आपल्या जोडीदाराला कुणा तरीकडून प्रेम आणि सुख लाभतंय या जाणिवेने मनाला होणारा आनंद म्हणजे  compersion. ही भावना म्हणजे पॉलिअ‍ॅमरीचा पायाच आहे. तुमच्या जोडीदाराचा जोडीदार म्हणजे तुमचा  co- lover. हा अजून एक शब्द मी शिकले.  Co- lovers ना येणारे दोन प्रश्न मी पाहिलेत. बायकांच्या बाबतीत पॉलिअ‍ॅमरीला इतिहासात अनेक दाखले आहेत. एका राजाच्या अनेक राण्या किंवा एका पुरुषाच्या अनेक बायका. बऱ्याच ठिकाणी या बायकांच्या राज्यात मैत्री, सलोखाही होता. तरीही आपल्या पुरुषासोबत कोणाला जास्तीत जास्त रात्री घालवायला मिळतात यावरून होणारे वाद, स्पर्धा, असूया, राजकारण या सगळय़ातली पुरुषप्रधान व्यवस्था आणि ती मनसोक्त वापरून घेणारे पुरुष आणि स्त्रिया – यांच्या कहाण्या आपण ऐकलेल्याच आहेत.  

पुरुषांच्या बाबतीत मात्र पॉलिअ‍ॅमरीला आपल्या नजीकच्या इतिहासात काही स्थान नाही. त्यामुळे पुरुषांसाठी आपल्या जोडीदाराच्या इतर बॉयफ्रेंड्सशी (किंवा बॉयफ्रेंड्सशी) जुळवून घेणं ही खूपच नवीन गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. त्यांना हे अगदी नव्याने शिकावं लागणार आहे; पण सेक्सची इच्छा भागवण्यासाठी आपण पॉलिअ‍ॅमरस आहोत, असं उगाच सांगणारे पुरुषही मी पाहिलेत. मला वाटतं की, आपली एकंदर पुरुषप्रधान व्यवस्था पाहता, पॉलिअ‍ॅमरीमध्येही बायकांना पुरुषांपेक्षा अधिक खबरदार राहणं गरजेचं आहे. 

पॉलिअ‍ॅमरीमध्ये अशा स्पर्धेला खरं तर जागाच नाही, नसावी; परंतु दक्षता न घेतल्यास आपण त्या गर्तेत सहज अडकू शकतो. माझ्या जोडीदारांच्या इतर बॉयफ्रेंड्सच्या तुलनेत स्वत:ला कमी लेखून मी अनेक वेळा दिवसेंदिवस कष्टी झालेले आहे.

मला अजूनही बऱ्याच वेळेस जेलसी वाटत राहते; पण मी नेहमी स्वत:ला  compersion ची आठवण करून देते. माझ्या जेलसीची कारणं शोधायला मी माझ्या जोडीदारांसोबत चर्चा करते. ज्यांना खरंच अशा चर्चेत रस असतो, अशाच जोडीदारांशी. आपण पॉलिअ‍ॅमरस का आहोत, त्यात किती सुख आहे याची माझी मलाच पुन:पुन्हा आठवण करून देते आणि खरोखरीच, हा आनंद अद्भूत असतो. या सलत राहणाऱ्या, क्षुल्लक त्रासाच्या तुलनेत तर खूपच जास्त. तरीही मला वाटतं की पॉलिअ‍ॅमरस लोक जेलसीबद्दल जास्त बोलत नाहीत. त्यांनी बोललं पाहिजे. त्यामुळे आम्हीही जगावेगळे, विचित्र, विक्षिप्त नसून रोजच्या रोज चाचपडणाऱ्या चारचौघांसारखेच साधे, सामान्य, स्खलनशील आहोत हे सिद्ध होईल.

अनेक वर्ष विविध  co- lovers शी संबंध ठेवल्यावर मला असं वाटतं की, एखाद्या व्यक्तीवर निखालस प्रेम करणं खरंच शक्य आहे. असं प्रेम जे आपण एखाद्या कवितेतल्या शब्दांवर किंवा समुद्राच्या लाटांवर करू शकतो. त्यासाठी ती कविता किंवा तो समुद्र आपल्या मालकीचा असण्याची गरज नसते. उलट, इतर लोकांनी त्या गोष्टींचा आस्वाद घेतला, त्यांची स्तुती केली की आपल्याला अजूनच छान वाटतं.

काही प्रमाणात,  co- lovers शी प्रेमाने वागणं म्हणजे पती-पत्नी और ‘वो’मधल्या त्या ‘वो’ला समजून घेणं, तिला स्वीकारणं आणि तिचा सन्मान करणंच आहे.   

कठीण की सोपं?

एकल नात्यांच्या ( monogamy) गर्तेत अडकलेल्या माझ्या काही मित्रांना वाटतं की, पॉलिअ‍ॅमरी सोपी आहे. मी दोन्ही अनुभवलंय आणि त्यावरून सांगायचं तर सोपं काहीच नसतं. दोन्ही पद्धतींचे स्वत:चे असे झगडे आहेत. पॉलिअ‍ॅमरीचा विचार करता, वर्षांनुवर्ष पाहत आलेली साचेबद्ध एकल प्रेमं आणि कुटुंबव्यवस्था नाकारणं मुळात कठीण आहे. पॉलिअ‍ॅमरीमध्ये एकात एक गुंतलेले अनेक स्तर असतात आणि एकाबद्दल घेतलेला निर्णय इतरांवर परिणाम करू शकतो. शिवाय, लोकांना आमच्याबद्दल काहीही वाटत असलं तरी पॉलिअ‍ॅमरीमध्ये निष्ठा निभावणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि या निष्ठा अनेकांबद्दल असल्यामुळे त्या निभावताना कुणीच दुखावलं जाणार नाही याबद्दल सजग राहणं भाग असतं.   

एकल नात्यात गुंतलेली मिमी नावाची माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते की, आपण स्वत: निवडलेल्या मार्गाने चालताना आयुष्यात जी किंमत मोजतो ती एकाच वेळेस आपला कस पाहणारी आणि आपल्याला समृद्ध करणारी असते. मग भले हा मार्ग तिने निवडल्याप्रमाणे सरधोपट असेल किंवा माझ्यासारखा अनवट! मी पुढे जाऊन असं म्हणेन की, पॉलिअ‍ॅमरी हा भित्र्या लोकांचा मार्ग नव्हे. आपल्या जोडीदाराच्या नजरेआड, त्यांच्या संमतीशिवाय करायची तर ही गोष्टच नाही. प्रामाणिकपणा आणि संमती या दोन्ही गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत. लपवाछपवी केली तर सगळंच संपलं. मला एखादा पुरुष जेव्हा आवडतो, तेव्हा मी पहिल्याच भेटीत माझ्या पॉलिअ‍ॅमरस असण्याबद्दल सांगून टाकते. ही नाजूक गोष्ट सांगायची योग्य वेळ कुठली बरे? आता सांगू की नंतर, असा विचार करत बसत नाही. थेट सांगून मोकळी होते आणि त्यांनीही स्वत:बद्दल मोकळेपणी सांगावं, ही माझी अपेक्षा बोलून दाखवते आणि तरीही माझ्या वाटय़ाला काही कटू प्रसंग आलेले आहेत. 

दीपा ही माझी पॉलिअ‍ॅमरस मैत्रीण सांगते की, ती अनेकांशी नाती जुळवून असली तरी बऱ्याचदा तिला अनेक गोष्टी एकटीने, तिच्या तिलाच कराव्या लागतात. पॉलिअ‍ॅमरस असण्यातली ही अजून एक बाब. जोडीदार अनेक असले तरी नेमक्या वेळेस त्यांना वेळ असेलच याची खात्री कोण देणार? अशा वेळेस जेव्हा कुणीच उपलब्ध होत नाही तेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल शंका येऊ शकते; पण ती नेहमीच रास्त असते असं नाही. एकल नात्यातली जी जोडपी असतात त्यांच्याकडून समाजाचीच अपेक्षा असते की, त्यांनी गोष्टी जोडीने कराव्यात आणि ते तशा करतातही – आवडीने, सवयीचा भाग म्हणून किंवा जगाला दाखवण्यासाठी. 

पण माझा प्रश्न वेगळाच आहे. माझ्या आवडीचं माणूस मला हवं तेव्हा उपलब्ध नसतं या गोष्टीचा खरोखरीच आमच्या नात्यावर काही विपरीत परिणाम होतो की नुसतंच मी दुखावली जाते? काही काळापुरतं वाईट वाटणं आणि नात्यावरचा दूरगामी परिणाम या दोन्हीकडे आपण वेगवेगळं पाहू शकतो का? माझ्या अपेक्षांचे तक्ते बनवून ते माझ्या जोडीदारांसोबत शेअर करायला मला आवडतं. त्यामुळे आमच्यासाठी सगळय़ात उत्तम पर्याय काय याचा विचार करता येतो. सगळय़ांना समान कामं, समान जबाबदाऱ्या असं काटेकोर मोजायला हे काही गणित नव्हे. सगळय़ांची सोय आणि संमती जास्त महत्त्वाची. जर यात काही बदल झाले तर त्यांच्याशी जुळवून घेण्याचीही तयारी असावी लागते. हा संयम, हे जुळवून घेणं याने माणूस थकून जाऊ शकतो.

अजून एक मुद्दा म्हणजे किती शेअर करायचं याचं भान असण्याचा. प्रामाणिकपणा हा जरी पॉलिअ‍ॅमरीचा पाया असला तरी याचा अर्थ सगळय़ा गोष्टी सगळय़ांना सांगून टाकायच्या असा होत नाही. प्रत्येक नात्यात आपल्या कुठल्या गोष्टी, किती प्रमाणात इतरांना सांगाव्यात याचे काही नियम असतात. पॉलिअ‍ॅमरीमध्ये याला अजून एक आयाम मिळतो. इतर जोडीदारांबद्दल किती ऐकायचं आहे याचा. प्रत्येक नात्याचं एक खासगीपण असतं. शिवाय एखाद्या जोडीदाराबरोबर असताना दुसऱ्याचं किती कौतुक करावं, एखादा अनुभव घेताना हाच अनुभव त्या अमक्याबरोबर किती वेगळा आणि सुंदर होता हे सांगणं यालाही काही मर्यादा असणं जरुरी आहे. सांगणाऱ्याचा तसा हेतू नसला तरीही या गोष्टींमुळे उगाच तुलना, चुरस अशा गोष्टी निर्माण होऊन त्यामुळे सगळीच नाती विखारी बनायची शक्यता असते.  

पॉलिअ‍ॅमरीमध्ये जे अनेक कठीण प्रसंग आले त्यातला एक ठळक म्हणजे, जेव्हा एका जोडीदाराने कुणाच्या तरी प्रेमात पडून मोनोगॅमस बनायचा निर्णय घेतला. हे फक्त त्याला गमावण्याचं दु:ख नव्हतं. तर पॉलिअ‍ॅमरस असण्याचं, राहण्याचं, एक वेगळी दुनिया बनवायचं वचन मोडून तो त्याच चाकोरीत चालला होता – कुठे तरी पॉलिअ‍ॅमरीला नाकारून! हा अपेक्षाभंग मोठा होता.

एकल प्रेम मोडतं तशी आमचीही प्रेमं मोडतात, आटतात, विरतात, संपून जातात. मी माझ्या प्रेमभंगाच्या कहाण्या इतर जोडीदारांना सांगत बसत नाही. त्यांना का उगाच त्रास?

मी स्वत:ला सुदैवी समजते की, मला आतापर्यंत कायमच चांगले जोडीदार मिळत राहिले आहेत आणि तेही माझे मित्र, त्यांचे मित्र, अशा आमच्याच वर्तुळातून. डेटिंग अ‍ॅप्सवर जायचं नवथर वयही राहिलं नाही आणि त्या अर्थी मी फार जुन्या विचारांची आहे असं मला वाटतं; पण माझ्या काही मैत्रिणी, मित्र या अ‍ॅप्सवर आहेत आणि त्यांच्या धैर्याचं मला कौतुक वाटतं.  

अगणित इच्छांच्या या प्रवासात मी आनंदाने बेहोश झाले, प्रफुल्लित झाले; पण तितकीच किंबहुना त्याहून अधिक तुटले, हरले, हताश झाले. काही वेळा तर वेडय़ासारखी मोनोगॅमीच्या दिशेने पळत सुटले – एक हमखास यशाचा मार्ग म्हणून; पण हे दिवसही मागे सरले. याही भावना विरल्या. शेवटी मालकी हक्कविरहित प्रेम जिथे मिळतं ते जगच खरं. पॉलिअ‍ॅमरीमध्ये आजही टिकून राहायला मला प्रोत्साहन आणि बळ मिळत राहतं ते या एकाच गोष्टीचं.

पण मग मी आयुष्यात ‘सेटल’ कधी होणार? माझ्या आईला हा प्रश्न नेहमी पडतो. तिला माझ्या आयुष्यातला हा निर्णय आणि माझे सगळे जोडीदार किंवा तिच्या भाषेत ‘मित्र’ मान्य आहेत तरी मला तो एकच एक, कायमस्वरूपी पुरुष कधी मिळणार असं तिला सारखं वाटत राहतं. अनेकांच्या मते आपण सगळे या शेवटच्या स्टेशनच्या शोधातच तर असतो; पण माझा हा पॉलिअ‍ॅमरस प्रवास मला इतका हवाहवासा वाटतो, की शेवटचं स्टेशन हा विचारच मला अस्वस्थ करतो आणि ‘सेटल’ व्हायला मी काही घरातली धूळ नाही!

आणि म्हणूनच एक काळ होता जेव्हा माझी प्रेमाची व्याख्या त्याच सुरक्षित चौकटीत कैद होती जिथे सगळा कडेकोट बंदोबस्त होता आणि कुठल्याही स्वच्छंदपणाला सक्त मनाई होती.

आज, आयुष्याच्या या माध्यान्ही मी प्रेमाला एका नाजूक, धूसर, उसळत्या, घुसळत्या, वाहत्या रूपात पाहते. जिथे प्रणय, माया, मैत्री, घरगुती नाती, कौटुंबिक संबंध यातल्या सीमारेषा विरून जातात. व्याख्या आणि चौकटींची काही गरजच उरत नाही. मी माझ्या हृदयावर हात ठेवते तेव्हा मला जाणवतं की, निर्वासितांना स्वीकारलं जातं ती भूमी, ते प्रेम आणि ते आयुष्य फार सुंदर आणि समृद्ध असतं.      

अनुवाद : भूषण कोरगांवकर

(मी विषमलैंगिक असल्यामुळे माझे विचार मी त्या अनुभवांतून, त्या अनुषंगाने मांडले आहेत. इतर जेंडर आणि सेक्शुआलिटीच्या लोकांच्या पॉलिअ‍ॅमरीच्या कहाण्या अर्थातच वेगळय़ा असतील.)

‘डेक्कन हेराल्ड’मधून साभार