प्रा. विजय तापस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विसाव्या शतकाला अवघं एक वर्ष होता होता यशवंत गोपाळ जोशी यांचा जन्म झाला; आणि १९६३ सालच्या अखेरच्या पर्वात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. १९२९ साली ज्या य. गो. जोशी यांची पहिली कथा ‘एक रुपया दोन आणे’ प्रकाशित झाली होती, त्याच यशवंत गोपाळ जोशी यांनी पुढच्या चौतीस ३४ वर्षांत अत्यंत सत्त्वशील लेखन करून मराठी साहित्याच्या इतिहासात स्वत:ची एक खास जागा निर्माण केली. ‘पांढरपेशा मध्यमवर्गाच्या जीवनकलहात आणि त्याच वर्गाच्या जीवनोत्सवात गुंतून पडलेला लेखक’ अशा खोचक शब्दांचे हार जरी अनेकदा त्यांच्या गळ्यात पडले असले तरी ना त्यांनी त्याची कधी पर्वा केली, ना त्यांच्या वाचकांनी! आपण स्वत: आणि आपण ज्या पांढरपेशी वर्गातून आलो आहोत त्या वर्गाच्या जीवनाचा, या वर्गाच्या जीवनकल्पना व जीवनमूल्यांचा धांडोळा त्यांनी अतिशय समरसतेनं घेतला. आज आपण खूप बारकाईने य. गो. जोशी यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, शेकडो कथा, चित्रपटांच्या पटकथा (यात ‘वहिनीच्या बांगडय़ा’, ‘अन्नपूर्णा’, ‘शेवग्याच्या शेंगा’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होतो.), त्यांनी संपादित केलेली पुस्तकं आणि त्यांची ‘संगीत श्रीमुखात’, ‘संगीत भोळा शंकर’ आणि ‘बोलका सिनेमा’ ही नाटकं पाहिली, तर हा लेखक विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातल्या ‘पांढरपेशी मध्यमवर्गीय’ म्हणवल्या आणि हिणवल्याही गेलेल्या वर्गाचा भाष्यकार, इतिहासकार आणि डॉक्युमेंटॅलिस्ट असल्याचं आपल्याला मान्य करावं लागेल. या ‘पांढरपेशी मध्यमवर्गीय’ समाजाच्या कोतेपणाला आणि त्यांच्या जीवनसमजुतीतल्या अपुरेपणाला सोयीस्कर वळसा न घालता त्याचीही अनेक चित्रं य. गो. जेव्हा उभी करतात, तेव्हा त्यांची ‘ऑथर्स हॉनेस्टी’अधिक लखलखीतपणे आपल्यासमोर येते. ‘मी आणि माझ्यासारखे हजारो लोक जे जीवन जगले, त्या जीवनाच्या शब्दमूर्तीच मी घडवल्या. त्या सुघड असतील तर त्याचं श्रेय त्या जीवनाला आहे. त्या श्रेयात मी वाटेकरी नाही,’ ही त्याची भूमिकाही लक्षात घेण्यासारखी आहे. याच य. गो. जोशी यांनी लिहिलेल्या ‘संगीत भोळा शंकर’ या नाटकाकडे आज पाहावंसं वाटतं.

हे नाटक आहे १९३३ मधलं. ते रंगभूमीवर १९३३ मध्ये आणलं ते नटवर्य रघुवीर सावकार यांनी. नाटकाचा लेखनकाल बहुधा १९३० चा असावा. कारण नाटक रंगभूमीवर अवतरण्यापूर्वी ते तीन-चार कंपन्यांतून फिरून आणि नकार घेऊन आलं होतं,असं खुद्द नाटककारानेच सुचवलं आहे. नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा नाटकाचा प्लॉट अजिबातच नवा नव्हता. भगवान श्रीशंकराच्या चरित्रातली ‘चिलया बाळाची कहाणी’ माहिती नसलेले ज्या काळात कोणीही नव्हते, त्या काळात य. गो. जोशी यांनी हे नाटक सादर केलं. असं करण्यात जी ‘रिस्क’ असते, ती त्यांनी पत्करली. कारण त्यांना त्या कथेत जे कारुण्य आहे, त्या कारुण्यभावानं असं काही झपाटलं की त्यांना नाटक लिहिण्यावाचून जणू पर्यायच उरला नाही. नाटक आहे तीन अंकी आणि तेरा प्रवेशी. यात दहा पात्रं नाटय़गत कथा फुलवतात, विस्तारतात आणि अन्य तीन पात्रं त्यांना तोलामोलाची साथ देतात. नारद, शंकर, पार्वती, पुष्पधन्वा, वीरसेन, कलावती, गुणवती, श्रियाळ, चांगुणा, चिलया ही ती कर्तीसवरती पात्रं आहेत. नाटक ‘संगीत भोळा शंकर’असल्याने अपरिहार्यपणे नाटकात अंकानुसारी ९, ४,  ८ = २१ अशी पदं आहेत. यातली काही पदं चाकोरीबाहेरच्या रागांमधली आहेत. अनेक पदांच्या चाली त्यापूर्वीच्या लोकप्रिय पदांच्याच आहेत. या आनंदपर्यवसानी नाटकाचं भरतवाक्य व्यक्तीसुखाची आकांक्षा न करता भारतवर्षांच्या सुख-समृद्धीची आकांक्षा करणारं आहे. त्या अखेरच्या पदाचे शब्द.. ‘द्या बुद्धिबल ही विजयश्रीला। देई वर हा भारता!॥ ध्रुव॥ क्षुद्र खलमल भेद जावो। धर्मरविचा उदय पावो। ऐक्य बल आनंद नांदो। हाचि वर दे भारता॥’ असे आहेत. १९३३ मध्ये या प्रकारचं पद नाटकात असणं हे ब्रिटिश राजवटीत किती धोक्याचं होतं हे मुद्दाम उलगडून सांगण्याची गरज नाही.

‘संगीत भोळा शंकर’ या नाटकाच्या कथानकाची आपल्याला कल्पना आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर यांच्या ‘शिवलीलामृत’ या धार्मिक आणि अत्यंत लोकप्रिय पोथीत राजा श्रियाळ, त्याची पत्नी चांगुणा आणि त्यांचा मुलगा चिलया यांची अतिशय रंगतदार कथा येते. आपलं परमदैवत असणाऱ्या शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी हा राजा वर्षांनुवर्ष दारी येईल त्याला इच्छाभोजन घालत असतो. त्याच्या या कार्यात त्याला चांगुणेची पूर्ण साथ असते. त्याच्या भक्तीची कसोटी घेण्यासाठी श्री शंकर एका अतिथीचा वेष घेऊन राजा श्रियाळाकडे जातो आणि इच्छाभोजनात नरमांसाची मागणी करतो. राजा श्रियाळ आणि चांगुणा दोघेही आपापले मांस द्यायला तयार होतात. पण ‘राजा हा प्रजेचा पिता आणि राणी ही प्रजेची माता असते. मी तुमच्यापैकी कोणाचंही मांस घेतलं तर प्रजा अनाथ होईल..’ असं म्हणून हा अतिथी त्यांचं मांस नाकारतो. ‘शिवलीलामृता’त स्वत: शंकर कोवळ्या मांसाची मागणी करत पुत्र चिलयाच्या मांसाची मागणी करतो. तिथे त्याची अट आहे ती म्हणजे चिलयाचा वध राजाने करावा आणि राणीने पुत्राचे मांस स्वत: शिजवून पानात वाढावे. नाटकात मात्र चिलयाला मारून त्याचे कोवळे मांस अतिथीला वाढण्याचा पर्याय नाटककाराने चांगुणेच्या तोंडून वदवला आहे. पर्याय देणारी आणि तो अमलात आणणारी मुलाचीच खुद्द आई असल्याने नाटकातलं ‘सिच्युएशनल टेन्शन’ प्रत्येक टप्प्यावर कमालीचं वाढत जाऊन नाटक अधिकाधिक इंटरेिस्टग होत गेलं आहे. ‘शिवलीलामृता’तल्या कथेत जे जे घडतं, ते ते नाटकातही घडत असलं तरी अनेक ठिकाणी नाटककाराने काही प्रसंगांतले ताण इतके प्रभावी, इतके टोकदार आणि धारदार केले आहेत की ते प्रसंग आज नजरेसमोर आणतानाही मन कातर झाल्याशिवाय राहत नाही. भक्ताची परीक्षा घेताना जे एकेक पेच श्री शंकराकडून उभे केले जातात आणि त्या प्रत्येक पेचात राजा श्रियाळ-चांगुणा अफाट व असामान्य मनोबलाने जो संघर्ष करतात, तो नाटककाराने फारच नजाकतीने साकारला आहे. एका बाजूला देवसत्ता आणि दुसऱ्या बाजूला भक्तीची अथांगता यांच्यात अखेरीस भक्ताच्या देवतेवरच्या भक्तीचा विजय होताना दिसतो. राजा-राणीने ज्या चिलया बाळाची हत्या करून, त्याचं शीर उखळात कांडून, त्याचं मांस शिजवून अतिथीसमोर ठेवलं, तो अतिथी ऊर्फ महादेव अखेरीस त्यांना प्रसन्न होऊन त्यांचा मुलगा त्यांना परत देतो. नाटकाची, त्यातल्या घटना-प्रसंगांची रचना आणि त्या, त्या प्रसंगाची परिणामकारकता य. गो. जोशी यांनी इतकी प्रभावी केली आहे की मुळातली कथा आणि नाटकातलीही कथा बऱ्याच मोठय़ा प्रमाणात मेलोड्रॅमॅटिक असूनही त्या व्याज-नाटकाला इथे आपोआपच वेसण घालण्यात आली आहे. या नाटकात एक अधिक कथानक आहे ते पुष्पधन्वा-वीरसेन आणि कलावती-गुणवती या जोडय़ांचं. यातल्या पुष्पधन्वा आणि कलावती यांनी परिलगानुभव घेण्यासाठी अनुक्रमे स्त्रीवेश आणि पुरुषवेश धारण केला आहे. ही जोडी एका विवाहित जोडप्याच्या रूपात राजा श्रियाळाकडे जाऊन  इच्छाभोजनात सहभागी होते तेव्हा राजा या जोडप्याला अष्टपुत्रलाभाचा आशीर्वाद देतो. राजा श्रियाळाच्या ठायी असलेल्या भक्तीतेजामुळे त्याचे शब्द खरे व्हायचे असतील तर त्याच्या दैवताला कलावतीचा पुरुष आणि पुष्पधन्वाला स्त्री म्हणून कायम करणं भाग पडतं. हा िलगबदल घडल्याने त्या दोघांची जी गोची होते, ते कथानक त्यातल्या साऱ्या नाटय़ासहित य. गो. जोशी यांनी प्रभावीपणे रंगवलं आहे. नाटकातला पुष्पधन्वाचा मित्र वीरसेन हा मला १९३३ मधला कट्टर सनातनी धर्मवादी वाटतो. इंग्रजी शिक्षणाच्या आणि स्त्री-सुधारणांच्या नव्या लाटेत स्त्रिया जेव्हा पुरुषांच्या बरोबरीच्या गोष्टी करू लागल्या तेव्हा ‘स्त्रीचं क्षेत्र चूल आणि मूल हेच आहे’ असं मानणाऱ्या अहंमन्य पुरुषांचा तथाकथित िलगश्रेष्ठत्वाचा अभिमान फणा काढून उभा राहिला. त्या काळात घरोघरचे अहंमन्य पुरुष जे बोलत होते त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला वीरसेनाच्या शब्दांतून ऐकू येतो. तो शंकराला म्हणतो की, ‘‘हल्ली स्त्रियांचं पुरुषीकरण आणि पुरुषांचं स्त्रीकरण चाललं आहे. यांना नाही आत्मसंयमन. पण प्रौढविवाह आणि ध्येय यांच्या देखाव्याचे पतंग उडवीत हे एकीकडे लोकांना फसवितात आणि मनात झुरून स्त्रीसहवासाची उणीव आपल्याच बायकी वागण्याने भरून काढतात. स्त्रियांच्या पुरुषी थाटाच्या वागण्याला हे असे बायकी पुरुष जबाबदार असतात. स्त्रियांनी कोमलच राहायला पाहिजे आणि पुरुषांनी दणकटच असायला पाहिजे.’’ लेखकाच्या भोवती जे वारे वाहत असतात ते त्या, त्या संवेदनशील लेखकाच्या लेखनात कसे प्रकट होतात त्याचा हा नमुना म्हणावा का? की लेखकाची ही वैचारिक भूमिका मानायची? य. गो. जोशी यांच्या बाबतीत या दोन्ही शक्यता संभवतात/ संभवू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं.

देवांचं मानुषीकरण माणसं करतात आणि लोकोत्तर माणसाचं दैवतीकरणही माणूसच करतो. या दोन्ही गोष्टी करण्यात माणूस स्वत:ची सोय बघत असतो. ‘शिवलीलामृत’ पोथीतल्या श्रियाळ शेठचं अगदी अस्संच झालं आहे. हे असं व्हायला कोणती गोष्ट कारण झाली हे तुम्हाला माहिती नसेल तर आता पुढचा मजकूर वाचा. मराठीत ‘औट घटकेचा राजा’ हा वाक्प्रयोग ज्याने औट घटकाच राज्य केलं त्या अत्यंत विख्यात दानशूर सावकार असलेल्या श्रियाळ शेठ यांच्याशी, त्यांच्या कर्तृत्वाशी संबंधित आहे. राजा श्रियाळ शेठ सावकार हे बहामनी राज्यात होते. ते अतिशय उदार आणि दानशूर होते. महाराष्ट्रात सलग बारा वर्षांचा जो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ (१३९६-१४०७) पडला आणि लोक अन्नावाचून जेव्हा तडफडू लागले तेव्हा श्रियाळ सावकारांनी दुष्काळाच्या काळात गावागावांतून बैलगाडय़ा फिरवून लोकांना धान्याचं वाटप करून हजारो जीव वाचवले. त्यांच्या या कामगिरीवर खूश होऊन बादशहाने ‘काय हवं ते इनाम मागून घ्या’ असं जेव्हा त्यांना म्हटलं, तेव्हा शेठ श्रियाळ यांनी साडेतीन तासांसाठी बादशाही मागितली. बादशहाने ती दिली. त्या साडेतीन तासांत श्रियाळ शेठने बादशहाची धान्याची कोठारं आणि खजिना लोकांसाठी रिकामा केला. म्हणून या सावकारांना ‘औट घटकेचा राजा’ हे बिरुद येऊन चिकटलं. धान्य लुटणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्रियाळ शेठ इतके आनंदी झाले की त्या हर्षांतच त्यांना मृत्यू आला. या घटनेचा वापर श्रीधर नाझरेकर यांनी ‘शिवलीलामृता’त करून राजा श्रियाळाला देवत्वाच्या श्रेणीत नेऊन बसवलं. त्याचा परिणाम असा झाला की, आज राजा श्रियाळाला जाऊन सातशे वषर्ं झाली तरी आजही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी- म्हणजे षष्टीला बारामती, जेजुरी, पुण्यातल्या रास्ता पेठी आणि इंदापूरमध्ये श्रियाळ शेठ षष्टीचा उत्सव साजरा केला जातो. श्रियाळ शेठची पूजाअर्चा, त्यांना नैवेद्य करून त्यांची मिरवणूकही काढली जाते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की देवांना माणूस करण्यात आणि माणसाला देव करण्यात आपण कसे नामचीन आहोत ते!

vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about author yashwant gopal joshi life zws