मनीषा टिकेकर

१ जुलै २०२३च्या ‘लोकसत्ता’च्या अंकात गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा’ या सदरात ‘सौंदर्य आणि सहनशीलता’ या मथळ्याचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात फ्रान्सच्या दक्षिण भागातील भूमध्य किनाऱ्यालगतच्या सुप्रसिद्ध रिव्हिएरा प्रदेशाचे वर्णन केले आहे. यात प्रामुख्याने मार्सेल आणि मेंटॉन नामक लहानशा शहराच्या सौंदर्याचा काहीसा तपशीलवार उल्लेख केला आहे. मेंटॉनच्या सुंदर, सुखद पेस्टल कलर्सच्या एकसारख्या इमारती, झाडीने भरलेले रस्ते, बागा आणि उद्यानं सारं काही इतकं सुरेख की सुंदरतेच्या अतिरेकाने जीव गुदमरून जावा, असा लेखात उल्लेख आहे. लेखाचा समारोप एका मार्मिक प्रश्नाने केला आहे, ‘कशी काय इतकी सुंदरता सहन करत असतील हे बिचारे मेंटॉनवासी..’ खरंच, सुंदरता झेलणं, पेलणं हे इतकं कठीण असतं? मग थोडा विचार करता असं लक्षात आलं की मेंटॉनवासीयांना हे कठीण नसावंच.

Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Madhavi Nimkar
“मी इथे…”, माधवी निमकरने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवरील दाखवली आवडती जागा; भावुक होत म्हणाली…
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती

युरोपियन संस्कृतीवर प्राचीन ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. खरं तर युरोपियन संस्कृतीच्या गाभ्याचं मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत वसलं आहे. देश, कालानुरूप त्यात अनेक बदल नक्कीच झाले, अनेक सांस्कृतिक चळवळी झाल्या, बा प्रभाव पडले, सांस्कृतिक संकरही झाले; परंतु मूळ गाभ्याला फारशी क्षती पोहोचली नाही. ग्रीक संस्कृतीत ‘एस्थेटिक्स’ आणि ‘एक्सलन्स’ या संकल्पनांना वा मूल्यांना मोठं स्थान आहे. एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि एक्सलन्स म्हणजे सर्वोत्तमाची कास. एस्थेटिक्स हे शास्त्र अशासाठी या संकल्पनेचा विचार फार पद्धतशीररीत्या केला गेला होता. या मूल्यात अंतर्भूत होत्या तात्त्विक, नैसर्गिक शास्त्रातील आणि गणितीय संकल्पना. या तात्त्विक आणि शास्त्रीय कल्पनांच्या खोलात न शिरता अगदी सोप्या भाषेत ही संकल्पना समजून घेता येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे, यात अभिप्रेत आहे प्रपोर्शन (प्रमाणबद्धता), सिमेट्री (सममिती), हार्मनी (सुसंवाद, मेळ), बॅलन्स (समतोल) आणि या गुणसमुच्चयातून निर्माण होणारं इंद्रियांना आणि मनाला सुखावणारं (सकारात्मक अर्थी) सौंदर्य. एस्थेटिक्स ही साचेबंद संकल्पना नव्हे. मानवनिर्मित कलाकृतींची रचना किंवा मांडणी यातून होणारा सौंदर्यबोध महत्त्वाचा.

इथे दोन-तीन गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. प्रस्तुत लेख या विषयातील कोणी तज्ज्ञाने लिहिला नसून, केवळ प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या आवडीतून आणि ग्रीक राजकीय तत्त्ववाद्यांच्या थोडय़ाफार अभ्यासातून जे आकलन झालं आहे त्यावर आधारित आहे. प्रत्येक संस्कृतीचा, समाजाचा सौंदर्यवादी दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्याला प्रामुख्याने ऐतिहासिक आणि भौगोलिक परिमाणं लाभलेली असतात. या लेखाचा उद्देश केवळ ग्रीक सौंदर्यशास्त्राचा एकंदर युरोपिय संस्कृतीवरील प्रभाव एवढय़ा पुरताच मर्यादित आहे.  इतर कोणत्याही संस्कृतीतील सुंदरतेच्या कल्पनांशी तुलना करण्याचा उद्देश नाही. लेखात कलाक्षेत्र या संज्ञेचा वापर व्यापक अर्थाने केला आहे. यात अंतर्भूत आहेत वास्तुकला, शिल्पकला, वस्त्रप्रावरणं, आभूषणं, खाद्य पदार्थाची सजावट, भोजन वाढण्याची पद्धती (प्लेटिंग), संगीत, नृत्य, साहित्य आदी सर्वच. एस्थेटिक्स सर्वस्पर्शी आहे. म्हणजे जीवनाचं कुठलंही अंग एस्थेटिक्सच्या बाहेर नाही. अगदी रोजच्या जीवनात, दैनंदिन वापराच्या वस्तूंतही सुंदरता शोधायची असते आणि सहजगत्या साध्य करायची असते. ती सुंदरता म्हणजे वस्तूंचं सुखद लयदार सौष्ठव.

युरोप आणि अमेरिकेत प्रवास करताना हे सहज नजरेत येतं. किचेन, पेपरवेटसारखी लहान लहान स्मरणचिन्ह खरेदी करताना याची प्रचीती येते. अगदी स्वयंपाकघरातली हातपुसणी, रुमाल- ज्यांची आपण पोतेरं म्हणून संभावना करून पार मातेर करून टाकलं आहे तीही भुरळ पडण्याजोगी असतात. अथेन्समधल्या दुकानात खाद्यतेलाच्या घरगुती वापराच्या काचेच्या बाटल्या (ज्याला आपण तेलाचा कावळा असे संबोधतो) इतक्या सुरेख होत्या की एकदम अर्धा डझन तरी खरेदी कराव्यात अशी भुरळ पडली होती. युरोप, अमेरिकेत पुस्तकांच्या दुकानातही लोभस गोष्टींची रेलचेल असते. वाचन-लेखनाला पूरक अशा अनेक वस्तू- लेखण्या, बुकप्लेट्स, बुकमार्क्‍स, स्टेशनरी- किती काय घ्यावं आणि काय नको असं होऊन जातं. सुंदरतेचं मर्म आहे ते लहानसहान वस्तूंत नेत्रसुखदायकता निर्माण करण्यात. वस्तूंची उपयुक्तता एवढाच काही निकष राहत नाही. सर्वच वस्तू नेत्रदीपक, उठावदार आणि ठसठशीत असाव्यात असं नाही, पण म्हणून त्या एकसुरी असाव्यात असंही नाही. कलाक्षेत्रातील विभिन्न शैलींचा, नानाविध रंगांचा सुरेख मेळ घालणं म्हणजे सौंदर्यदृष्टीची जाण असणं.

जेव्हा शहरांच्या, नगरांच्या सुंदरतेबाबत लिहिलं, बोललं जातं, तेव्हा तिच्या मोजपट्टीत अंतर्भाव असतो तेथील ऐतिहासिक वास्तूंचा, प्रार्थना स्थळांचा, गड-किल्ले- राजवाडे, सार्वजनिक इमारती- वस्तुसंग्रहालयं, नाटय़गृह, संसद भवनं, आधुनिक बांधकामं, निवासी घरं, रस्ते, बाग बगीचे, शिल्पकृती, नगर रचना, सजावट, दुकानं इत्यादी. ग्रीक वास्तुशास्त्रात स्तंभशैलींचं (खांब) मोठं महत्त्व होतं. अथेन्समधील पार्थेनॉन या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूत डोरिक आणि आयॉनिक या दोनही स्तंभ शैलींचं खुबीदार मिश्रण पाहायला मिळतं. तसंच प्राचीन ग्रीसमध्ये कॉरिन्थियन शैलीचे खांबही प्रचलित होते. पुढे रोमन संस्कृतीने या शैलींचा स्वीकार करून टस्कन पद्धतीची त्यात भर टाकली आणि रोमन कॉलम्स जगप्रसिद्ध झाले. ग्रीसमधील ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती पंथाची चर्च, भूमध्य समुद्रातील बेटांवरचे ऐतिहासिक अवशेष, सुबक देखणी गावं आजही पर्यटकांचे आकर्षण ठरतात. सॅंटोरिनी बेटावरच्या शुभ्र धवल भिंती आणि गडद निळ्या रंगाची घुमटं आणि दरवाजे असलेल्या इमारती बेटाला वेगळंच सौंदर्य प्राप्त करून देतात. ग्रीक एस्थटिक्समध्ये शांततेची आणि प्रसन्नतेची (सिरिनिटी) भावना निर्माण करण्यावर तसेच डिझाइन्समध्ये कालातीतता निर्माण करण्यावर भर होता.

प्राचीन ग्रीसची सुप्रसिद्ध ‘की’ डिझाइन- ज्याला ‘मिअँडर’ असंही म्हणतात, ती आजही तितकीच लोकप्रिय आहे. या डिझाइनचे अनेक आधुनिक अवतार आज जगप्रसिद्ध आहेत. तशीच फ्रान्सची शेव्हारान डिझाइन, स्कॉटिश किल्ट्सची (पुरुषांचे स्कर्ट्स), प्लेड (चौकड) डिझाईन आणि स्कॉटलंडमधल्या गॅलिक/ आयरिश ग्रंथी- गाठी (नॉट्स). या सर्वच डिझाइन्स आजही इमारती, शिल्पकाम, वस्त्रप्रावरणं आणि आभूषणं यांच्या सजावटीत, घडणीत वापरल्या जातात. युरोपच्या कलाक्षेत्रात कालानुरूप बदल होत गेले. रोमनेस्क, गोथिक, व्हिक्टोरिअन, निओ-गोथिक, ब्रॉक, रोकोको. क्लासिक, निओ- क्लासिक अशा विविध शैली, पद्धती उदयास आल्या. या साऱ्यांची आपापली वैशिष्टय़े असली तरी ग्रीक एस्थेटिक्समधील हार्मनी, प्रपोर्शन, फॉर्म आणि स्ट्रक्चरचे सौंदर्य कटाक्षाने जपले गेले. व्हिएन्ना शहरातल्या सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूत, सेंट स्टीफन कथ्रिडलमध्ये रोमनेस्क, गोथिक आणि ब्रॉक शैलींचा मेळ साधला आहे. वास्तविक ब्रॉक आणि रोकोको या दोन्ही शैली अति अलंकारिकतेकडे झुकणाऱ्या, परंतु शहरातला बेल्व्हेदेर पॅलेस आणि शहराबाहेरचा शॉनब्रून पॅलेस पाहताना त्यांचा नटवेपणा अंगावर येत नाही. नजरेत भरते ती केवळ त्यांची भव्यता आणि सुंदरता. लंडनचं वेस्ट मिनिस्टर आणि बुदापेस्टचं भव्य पार्लमेंट हाऊस अशीच अनुभूती देऊन जातात. पॅरिसचं गोथिक शैलीचं नॉट्र डाम कथ्रिडल, शॉम्झ एलिझे प्रभाग, लूव्र/लूव्रचा पिरामिड ही सर्वच पॅरिसची भूषणं आहेत. दुसऱ्या महायुद्धात जवळजवळ बेचिराख झालेल्या वॉर्साच्या पुनर्विकसित इमारती पाहिल्या की जुन्या-नव्याचा बेमालूम मेळ कसा घालायचा ते समजतं. प्राग शहराचं सौंदर्य जगभरच्या पर्यटकांच्या कौतुकाचा विषय आहे. युरोपमधील तुलनेने गरीब क्रोएशिया आणि स्लोवेनिया देशांच्या राजधानींच्या शहरांचे, अनुक्रमे झाग्रेब आणि लिब्लुयानाचे मध्यवर्ती विभाग देखणे आहेत. मुंबईसह भारतातील इतर अनेक शहरांमध्ये या सर्व युरोपियन वास्तुकलापद्धतींच्या मेळाचे अनेक देखणे नमुने पाहायला मिळतात.

इथे आणखी एका मुद्द्द्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. युरोपच्या एस्थेटिक्समध्ये उठावदार रंगाना स्थान नाही असं नाही. चर्चमधल्या, महालातल्या मोठमोठय़ा खिडक्यांच्या स्टेन्ड ग्लास पद्धतीच्या तावदानात लाल, पिवळा, निळा, हिरवा हे रंग प्रामुख्याने वापरले जातात आणि तरीही कुठेही भडकपणा जाणवत नाही. रंगांच्या छटांचा मेळ कसोशीने जपला जातो. युरोपातील राजेशाहीत जांभळा, गर्द निळा, लापीस लाझुली दगडाचा निळा, रॉयल ब्लू अशा रंगाचं प्रचालन होतंच आणि आजही आहे. प्राचीन ग्रीसची कलात्मकता संयमित (रिस्ट्रेंड या अर्थी) स्वरूपाची होती, परंतु मध्ययुगीन आणि रेनेसांसकालीन युरोपमध्ये कालात्मकतेचा काहीसा अतिरेक होता हे नाकारता येत नाही. चर्च, महाल, सार्वजनिक इमारतींत एक ऑप्युलन्स, एक प्रकारचा नटवेपणा  पाहायला मिळतो. परंतु वास्तूंच्या त्रिमितिक भव्यतेमुळे तो नटवेपणा दिमाखदारपणात परिवर्तित होतो. युरोपला नैसर्गिक सौंदर्याचं वरदान आहेच, परंतु ते जपणं आणि त्याला मानवनिर्मित सौंदर्याने द्विगुणित करणं हे युरोपियन संस्कृतीचं महत्त्वाचं लक्षण आहे.

तद्नंतर फ्रान्समधून उगम पावून युरोप खंडात पसरलेल्या क्लासिसिझम आणि निओ क्लासिसिझम शैलींचा उदय झाला. या शैलींचा प्रभाव अमेरिकेतही वैपुल्याने आढळतो. २०व्या शतकात अमेरिकेतल्या महानगरांमध्ये अत्याधुनिक सामुग्री वापरून निर्माण केलेल्या अतिभव्य इमारती पाहायला मिळाल्या तरी अमेरिकन राज्यांच्या राजधानींच्या शहरातील सरकारी आणि सार्वजनिक इमारतींवर युरोपमधल्या सतत उत्क्रांतीत होणाऱ्या वास्तुशास्त्राचा आणि  सौंदर्यशैलीचा प्रभाव दिसून येतो, अगदी ग्रेको-रोमन कॉलम्सपासून आर्ट डेको शैलीपर्यंत. लॉस एंजलिसमधल्या लहानशा पॉल गेटी म्युझियमच्या आवारात प्रवेश करता क्षणीच क्लासिकल ग्रीक युगात गेल्याची अनुभूती मिळते, तर त्याच्या म्युझियम शॉपमधील रेनेसांस कालीन नक्षीच्या वस्तू पाहून हरखून जायला होतं.

१९-२०व्या शतकाच्या वळणावर फ्रान्समध्ये आर्ट डेको एस्थेटिक्स उदयाला आलं. याचा भर होता भूमितीय रेषांतून निर्माण होणाऱ्या साधेपणा आणि सुव्यस्थितपणावर. आधुनिक साहित्यसामुग्री आणि अभिजातता यांचा मेळ घालण्याचा हा यशस्वी प्रयत्न होता. अमेरिकेतल्या मायामी शहरात आर्ट डेको शैलीच्या जगातील सर्वाधिक वास्तू आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो मुंबईचा. मुंबईचं भूषण असलेल्या मरीन ड्राईव्ह आणि ओव्हल मैदान परिसरातील इमारती, इरॉस, रिगल आणि जुनं मेट्रो थिएटर आर्ट डेको पठडीतल्या आहेत. सजावटीच्या आणि नित्योपयोगी वस्तूंमध्ये ही शैली आजही आपला आब राखून आहे. गेल्या काही वर्षांत नॉर्डिक शैलीचं प्रचलन झालं आहे. जगभर पसरलेल्या आयकिया स्टोअर्सनी या शैलीला पार सामान्यांपर्यंत पोहचवलं आहे. या शैलीतील वस्तू, अगदी साध्या गृहोपयोगी वस्तू, फर्निचर यात पांढरऱ्या व फिक्कट / हलक्या रंगांचा वापर अधिक. सौंदर्य साधायचं ते सध्या सरळ रेषांमधून, नक्षीकामाची क्लिष्टता वगळून. याचा सूर कुठेतरी आर्ट डेकोशी मिळताजुळता आहे असं वाटतं.

‘अन्यथा’ सदरातील लेखात मेंटॉन शहरातील पेस्टल रंगांतल्या राहत्या घरांचा उल्लेख आहे. पेस्टल एस्थेटिक्स ही एस्थेटिक्सची लहानशी उपशाखा. प्रामुख्याने इंग्लंड, इटली आणि फ्रान्समध्ये ही संकल्पना उदयास आली. युरोपचे निसर्गसौंदर्य आणि संस्कृती यांच्या मिश्रणातून या कल्पनेचा उदय झाला असं म्हटलं जातं. यात मन सुखावणाऱ्या फिक्कट रंगावर भर असतो. मन:शांती देणारे स्वप्नवत दुनियेत घेऊन जाणारे रंग. यात अंतर्भूत आहेत डस्टी पिंक, पावडर ब्लू, जेड ग्रीन, पिस्ता ग्रीन, सेज, लायलॅक, फिक्कट राखाडी आदी तरल रंग म्हणजे आपल्या दृष्टीने विटके रंग! मेंटॉनमधली घरं बहुधा अशाच रंगात रंगलेली असावीत. अशा रंगांची जपणूक आणि स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची. स्वच्छतेमुळे साधेपणाही खुलून दिसतो. गेल्या तीन वर्षांत पाश्चिमात्य देशांत नवं एस्थेटिक्स उदयास आलं आहे – बार्बिकोर अथवा बार्बी एस्थेटिक्स म्हणजे खुल्या आणि गुलाबी रंगाच्या अनेक छटांचा मुक्तहस्ते वापर. याचं प्रेरणा स्रोत आहे बार्बी डॉल!     

ग्रीक एस्थेटिक्सचे जनक होते प्रामुख्याने प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल आणि प्लॉटिनस. ग्रीकांची सौंदर्यशास्त्राची संकल्पना वा मूल्य केवळ तत्त्वज्ञान, साहित्य आणि कलाक्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं. इथे या शास्त्राच्या सैद्धांतिक बाबींच्या खोलात न जाता दोनच प्रमुख मुद्दे मांडता येतील. सुंदरता म्हणजे कोणत्याही वस्तूच्या घटकांची सुसंगती, अथवा मेळ. सुंदरता म्हणजे मनाला प्रसन्नता देणारी, सुखावणारी निर्मिती. या सुंदरतेचा अर्थ व्यापक आहे. ती जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी असावी. तिला सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात अमलात आणणं अपेक्षित होतं. यात बौद्धिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्वाचं सौंदर्य अपेक्षित होतं. व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात, विचार मांडण्याच्या पद्धतीतही सौंदर्य म्हणजे ग्रेस असावी आणि वर्तणूक सुसंकृत (एलिगंट बिहेवियर) असावी हे अंतर्भूत होतं. व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ वस्त्रप्रावरणं व आभूषणं नव्हेत तर त्यात जिज्ञासा, विविध कलांची आवड, रसग्रहण करण्याची क्षमता, उत्तम अभिरुची आणि बौद्धिक व भावनिक परिपक्वता यांचा समावेश आहे. ‘रेनेसांस पर्सनॅलिटी’ आणि इंग्लंड मधल्या ‘जंटलमन’ संकल्पनांत हेच अभिप्रेत असावं. अशी सर्वागीण सौंदर्याची जाण उपजत असते का? तर नाही. ही जाणीव समाजाला आणि व्यक्तीला प्रयत्नपूर्वक करून द्यावी लागते, रुजवावी लागते आणि जोपासावी लागते. ग्रीकांनी सुंदरतेच्या कल्पनेला मूर्त स्वरूप दिलं ते अ‍ॅफ्रोडाइट देवतेला निर्माण करून. परंतु ही देवता शारीरिक सौंदर्य, प्रेम आणि वासना यांची देवता मानली गेली. प्राचीन ग्रीक देवदेवतांचे पुतळे पाहिले की हा समाज शारीरिक सौंदर्य, सौष्ठव आणि प्रमाणबद्धतेसंबंधी किती काटेकोर होता हे लक्षात येतच. पुढे ग्रीसची अ‍ॅफ्रोडाईट रोमन संस्कृतीत व्हीनस म्हणून ख्यात पावली. दुसरा प्रश्न उरतो तो म्हणजे ही संकल्पना अभिजनवादी आणि नागरी आहे का? हे खरं आहे की प्राचीन ग्रीकांची संस्कृती नागरी होती. त्यांचा समाज राजकीयदृष्टय़ा ‘सिटी स्टेट’ किंवा नगर राज्य पद्धतीत आयोजित होता. परंतु सुंदरतेची कल्पना ही काही शहरी संस्कृतीची मक्तेदारी नव्हे. ग्रामीण संस्कृतीही आपल्या स्तरावर दृष्टी, राहणी, कला याबाबतीत सौंदर्यपूर्ण असते, त्यातही सुंदरतेची जाण असते. युरोपमधली गावं, लहान शहरं किती सुरेख, टुमदार असतात हे युरोपमध्ये प्रवास करता अनुभवास येतं. मेंटॉन शहर याच पठडीतलं असावं.

ग्रीकांच्या एस्थेटिक्स या मूल्याशी एक्सलंस हे मूल्य घट्टं बांधलेलं होतं. याला ग्रीक शब्द आहे अरेट वा अ‍ॅरेटा. या मूल्यालाही ग्रीकांनी देवत्व बहाल केलं होतं म्हणजे अरेट ही ग्रीक पुरासाहित्यातील (मायथॉलॉजी) दुय्यम स्तरावरील देवता होती. एक्सलंस म्हणजे सर्वोत्तमाची कास. हे मूल्य केवळ अभ्यासाने, दीघरेद्योगाने आणि व्यासंगाने साध्य होतं. सर्वोत्तमता मानवात, प्राण्यात आणि वस्तूंत शोधायची आणि साधायची असते असा ग्रीकांचा विश्वास होता. पुढे रोमन संस्कृतीतही सर्वोत्तमतेला स्थान मिळालं. रेनेसांस कालीन मायकेल अ‍ॅन्जेलो आणि लिओनर्दो द विन्ची त्यांच्या कलाकृतींएवढेच एक्सलंसच्या ध्यासासाठी ख्यात आहेत. ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया एथिक्स, एस्थेटिक्स आणि एक्सलंस या संकल्पनांनी उभारला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ग्रीसचा हा वारसा युरोपने जपला. मेंटॉनवासी याच वारशाचा भाग आहेत. असं म्हणतात की, रोमने सैन्यबळावर विस्तीर्ण साम्राज्य उभं केलं. परंतु ग्रीसने आपल्या संस्कृतीच्या बळावर सुदूर साम्राज्य उभारलं. असो. पाश्चिमात्य जगाची उभारणी या ग्रेको-रोमन वारशावर झाली आहे. एडगर अ‍ॅलन पो याचं एक वाक्य इथे स्मरतं ‘ग्लोरी दॅट वॉझ ग्रीस अँड ग्रॅण्डय़ुर दॅट वॉझ रोम.’  १९व्या शतकाच्या आरंभी जॉन किट्सने सौंदर्याचे मर्म सोप्या भाषेत सांगितलं होतं- ‘अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉरएव्हर.’ ग्रीक संस्कृतीला हे मर्म कित्येक शतकं आधीच उमगलं होतं.

(लेखिका राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि दक्षिण आशियाच्या अभ्यासक आहेत.)  

tikekars@gmail.com

Story img Loader