मुकुंद संगोराम
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. त्यात पुलंचा जीवनपट मांडताना केल्या गेलेल्या अक्षम्य चुका आणि भीषण कलात्मक स्वातंत्र्याचा रोखठोक पंचनामा करणारा लेख..
समस्त महाराष्ट्र गेल्या दोन महिन्यात पुलकित होऊन गेला असतानाच आपण काहीतरी वेगळं केलंच पाहिजे असा हट्ट धरणाऱ्यांनी थेट पुलंवर चित्रपटच काढायचं ठरवलं. पुलं जन्मशताब्दी हे या चित्रपटासाठीचं निमित्त. एकतर सध्या पुलं हे चलनी नाणं आहे आणि त्याचा व्यावसायिक उपयोग करून घेण्याचा मोह कुणालाही होणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. पण केवळ धंदा म्हणून पुलंना वेठीला धरणं, हा त्यांच्यावर घोर अन्याय आहे. ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट असा अन्याय करतो. त्यातून मनात उमटलेलं हे प्रश्नोपनिषद..
१) प्रश्न फक्त हुबेहूब दिसण्याचा नसतो. ज्या व्यक्तीवर चित्रपट काढायचा, ती व्यक्ती आरपार दिसतेय का, हे महत्त्वाचं. ‘डिट्टो’ दिसण्याच्या नादात त्या लोकोत्तर व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवायचं राहूनच जात नाही ना, याची काळजी घेणं हे त्याहूनही अधिक महत्त्वाचं. म्हणजे हाती केवळ तंत्र असून उपयोग नाही, तर कथावस्तू दमदार असावी लागते. इथे तर नायकच असा प्रत्युत्पन्नमती, की त्याचे किती आणि काय काय सांगू, असं व्हायला हवं. परंतु पुलं व्यक्ती होते की वल्ली, अशी शंका तर चित्रपटाच्या नावातच दिसते आहे. मग चित्रपटातून तरी काही कळलं का, की ते व्यक्ती होते की वल्ली? उत्तर : नाही.
२) केवळ चार-दोन विनोदाच्या जोरावर पुलंसारखं व्यक्तिमत्त्व खुलत नसतं, हे निदान या चित्रपटामुळे कळून चुकलं आहे. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या समाजात भिनलेल्या व्यक्तीची ओळख करून द्यायची, किंवा तिच्या पुनभ्रेटीचा आनंद मिळवून द्यायचा, असा या चित्रपटाचा हेतू असेल असं निदान ‘भाई’ चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यावर तरी अजिबातच जाणवत नाही. महाराष्ट्रातल्या इतक्या जणांनी पुलंना अनेक र्वष आपल्या मनात जपलं आहे, त्यांच्यावर प्रेम केलं आहे, त्यांच्या प्रत्येक कृतीवर बारीक नजर ठेवली आहे, त्यांचा प्रत्येक शब्द पुन: पुन्हा वाचला आहे. त्यांची नाटकं, त्यांचे चित्रपट, त्यांची भाषणं अशा अनेक प्रकारांतून पुलं समस्त महाराष्ट्राला पुन:पुन्हा भेटत राहिले. प्रत्येकाशी समरस होत गेले. त्यांच्या हयातीत त्यांच्यावर मराठी माणसानं जेवढं भरभरून प्रेम केलं, तेवढंच प्रेम त्यांच्या निधनानंतरही केलं. नव्या पिढीला पुलं समजावून सांगणाऱ्या आज साठीत असलेल्यांचं सांस्कृतिक पालनपोषण केवळ त्यांच्या विनोदावर झालं नाही, तर त्यांच्या रसिकतेमुळे संगीताच्या प्रेमात पडलेले, संगीत समजावून घेण्याची असोशी असणारे, कवितेचं मर्म सहज समजायला उत्सुक असणारे, अभिनयातील सहजता आणि त्यामागे लपलेली अभिजातता लक्षात येणारे लाखोजण आजही पुलंच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. त्यांच्यावर चित्रपट काढण्यासाठी हे पुरेसं असलं, तरीही ते तेवढंच धोकादायकही होतं.
३) हा धोका या चित्रपटामुळे स्पष्ट झाला. ज्यांनी पुलंना पाहिलंय ते किंवा ज्यांना ते काहीच माहीत नाहीत अशा कुणालाही पुलंच्या कलाजीवनापेक्षा त्यांच्या खासगी जीवनात किती रस असेल? शक्यता फारच कमी.
पुलं आणि सुनीताबाई यांना अपत्यप्राप्ती झाली किंवा नाही, याबद्दल त्याही काळात आणि आताही कुणाच्या मनात विकृत कुतूहल असण्याची शक्यता नाही. पण या चित्रपटाच्या पहिल्या भागात सर्वाधिक वेळ या गोष्टीला दिला गेला आहे.
४) बरं, जे दाखवलंय, त्याने नेमकं काय साधलं? पुलं हे एक आत्ममग्न व्यक्तिमत्त्व होतं, त्यांना स्वत:च्या आनंदापुढे काहीही महत्त्वाचं वाटत नसे; एवढंच काय, तर सुनीताबाईंनी ‘ती गोड बातमी’ सांगायची ठरवली, तर ती त्यांना सांगूही न देण्याचं औद्धत्य करणारे असे हे व्यक्तिमत्त्व होतं. कुणाला रस असेल असल्या कानगोष्टीत? ‘आहे मनोहर तरी’मधला छोटा संदर्भ घेऊन त्याला सांगोवांगीच्या तिखटमिठाची फोडणी देणं हीच खरी विकृती. दोन तासांच्या अवधीत चित्रपटात पुलंचं पहिलं लग्न आणि दुसरं लग्न यापलीकडे फारसं काही नाही.
५) सुनीताबाईंनीच लिहून ठेवलेल्या आणि ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आठ आण्यातलं लग्न’ हा लेख वाचला तरी त्या लग्नाला डॉ. वसंतराव देशपांडे उपस्थित नव्हते, हे समजून येईल. मंगला गोडबोले यांनी ‘सुनीताबाई’ या त्यांच्या पुस्तकातही याबद्दल लिहिलं आहेच. तरीही समजा, गेलेच असतील वसंतराव- तर ते काय दारू प्यायला गेले होते की काय? केवळ कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली धादांत खोटी माहिती सांगून काय मिळवलं महेश मांजरेकरांनी?
६) पुलं, वसंतराव आणि भीमसेन यांचं सगळं जगणं केवळ दारूशीच संबंधित होतं की काय, अशी शंका या चित्रपटामुळे यायला लागते. भाईंच्या लग्नासाठी रत्नागिरीस गेलेल्या वसंतरावांचे डोळे विदेशी मद्याचं नाव घेतल्यावर कसे लकाकतात, आणि नुकतंच लग्न झाल्यामुळे ‘नको.. नको’ म्हणत असतानाही दारू पिणारे पुलं यांची रंगीत मफल संपून परतताना पावसात अडकलेले हे दोघंही एका घराच्या पडवीत आसरा घेतात आणि त्या घरात राहणारे अंतू बर्वा त्यांना आत बोलावून थेट मद्याचाच पेला पुढे करतात आणि लागोपाठ दोन वेळा मद्यसेवनाचा आनंद मिळवणारे वसंतराव हर्षवायूने उत्फुल्ल होताना दिसतात. हे तर चारित्र्यहननच म्हणायचं.
६) प्राध्यापकीसाठी बेळगावला गेलेले देशपांडे दाम्पत्य तेथील वातावरणाच्या प्रेमात पडून सर्वकाळ तिथेच स्थायिक होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, नोकरीच गेल्याने त्यांना परत पुण्याला येणं भाग पडलं.. ही वस्तुस्थिती. पण तिच्या जवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या या चित्रपटात- एका संध्याकाळी महाविद्यालयातून परत आलेल्या पुलंना सुनीताबाई विचारतात, ‘कसा गेला आजचा दिवस?’ तर त्याला पुलंचं उत्तर- ‘कॉलेज सुटल्यावर काय करणार? कंटाळा आलाय इथं..’ पुलंनीच अनेकदा बेळगावमधल्या त्यांच्या वास्तव्याचे अनेकविध किस्से सांगितले आहेत. कॉलेज नवं असल्याने पुलंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिथे अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करून नुसती धमाल उडवून दिली होती. नाटक, आर्ट सर्कल, चित्रपट अशा अनेक गोष्टींत पुलं अगदी रमले होते. पण चित्रपटात मात्र ‘बेळगाव म्हणजे कंटाळा’!
७) ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुलंच्या पुस्तकातील अनेक पात्रं पुलंना या चित्रपटात ओढूनताणून कधीही भेटतात. त्याला काही आगा नाही की पिछा. त्यामुळे ही पात्रं केवळ पुलंचे फुसके विनोद ऐकवण्यासाठीच येतात आणि क्षणार्धात लोप पावतात. त्यामुळे ना पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होत, ना ती पात्रं कोण आहेत, ते समजत. पुलंना अपघात होतो आणि त्यांच्या पायाला प्लास्टर घालावं लागतं. ही घटना घडली तेव्हा पुलंची बाबासाहेब पुरंदरेंशी ओळखही नव्हती. पण चित्रपटात मात्र पुलंच्या घरी तरुण बाबासाहेब येतात आणि पुलंही एका पायावर कोणत्याही गडावर जायला तयार असल्याचा विनोदही करतात. अशा एकेका वाक्याच्या विनोदासाठी एकेक पात्र येतं आणि विनोद होताच निघून जातं. नंतर त्या पात्रांचं आणि पुलंचंही काय होतं, कोण जाणे!
८) साऱ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीवर आपल्या सर्जनाचे शिंपण करणाऱ्या पुलं, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, गदिमा, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचे एकमेकांशी असलेले सौहार्दाचे, जिव्हाळ्याचे संबंध ही त्या काळातही कौतुक वाटणारी गोष्ट होती. पण या चित्रपटात पुलं, वसंतराव आणि भीमसेनजी जेव्हा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याचे निमित्त दारू हेच असते. हे थोर कलावंत अट्टल दारूडे होते आणि उरल्यासुरल्या वेळेत ते संगीत करीत, असा गाढव समज या चित्रपटाने होण्याची शक्यताच अधिक. ज्या काळात हे तिघेही आपापल्या क्षेत्रात जे काही नवसर्जन करत होते, त्याला अनेकांचे आशीर्वाद होते. हिराबाई बडोदेकर या त्यापकी एक.
९) भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात आपल्या असामान्य कर्तृत्वाने हिराबाईंनी फार महत्त्वाचे कार्य केले. १९२२ मध्ये जाहीर मफलीत त्यांनी आपला शालीन, अभिजात स्वर लावला तेव्हा आपण काही मोठी सामाजिक क्रांती करत आहोत याचंही भान त्यांना नव्हतं. पण हिराबाईंनी भारतातील गायिकांसाठी महामार्ग तयार केला आणि आजवरच्या सर्व स्त्री- कलावंतांनी त्यासाठी त्यांच्या ऋणातच राहणं पसंत केलं. अशा या हिराबाई ऊर्फ चंपूताई या तिघांसाठीही अक्षरश: देवासमानच होत्या. हे या तिघांनीही अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. पण या चित्रपटात हे दोघंही हिराबाईंना ‘अरे-तुरे’च्या भाषेत संबोधतात. एवढंच काय, पण दारू संपली तर ती त्यांच्याकडे- म्हणजे चंपूताईंकडे मिळेल, असंही सुचवतात. हद्द तेव्हा होते, जेव्हा हे तिघं चंपूताईंच्या घरी पोहोचतात आणि त्या दरवाजा उघडताच म्हणतात, ‘मला माहिताय, तुम्ही कशासाठी आलात?’ या तिघांच्याच नव्हे, तर समस्त संगीत दुनियेतील कुणाच्या स्वप्नातही जे घडू शकणार नाही, ते इथं घडताना आपण पाहतो. चित्रपटातल्या चंपूताई साधारण या तिघांच्याच वयाच्या दिसतात. (हिराबाईंचा जन्म १९०५ चा. म्हणजे या तिघांपेक्षा त्या वयानं बऱ्याच मोठय़ा होत्या.)
१०) अजून एक भयंकर धक्का पुढे बसतो. तो म्हणजे भाई, भीमसेनजी आणि वसंतराव तिथं पोहोचतात तेव्हा कुमार गंधर्व तिथं आधीच येऊन मफल जमवत बसलेले असतात. (पुलं आणि कुमारजी, वसंतराव आणि कुमारजी, पुलं आणि वसंतराव यांचे दृढ नातेसंबंध सगळ्यांना ठाऊक आहेत.) आणि मग या चित्रपटातला क्लायमॅक्स घडतो. तो म्हणजे हे तिघंही एकत्रित गायन करतात. कलात्मक स्वातंत्र्य घ्यायचं घ्यायचं म्हणजे किती, याचा हा एक अतिशय निकृष्ट नमुना! कुमारांचं गाणं संपता संपताच वसंतराव आपलं गाणं- ‘कानडा राजा पंढरी’चा सुरू करतात. वसंतरावांबरोबर हे गाणं कुमारजी आणि भीमसेनजीही गातात. आधी हे गाणं भीमसेनजीच गाणार होते, असाही एक जावईशोध त्यामुळे लागतो. वसंतरावांचं गाणं संपता संपताच कुमारजी ‘सावरे अजैय्यो’ सुरू करतात. वसंतरावांनी कुमारांना गुरुस्थानीच मानलं होतं. पण भीमसेनजी आणि कुमारजी यांची गायकी पूर्णत्वाने भिन्न. तरीही या चित्रपटात भीमसेनजीही ‘सावरे अजैय्यो’ गाऊ लागतात, तेव्हा पायाचीही सगळी बोटं तोंडात जायची तेवढी बाकी राहतात. त्यात आणखी भर म्हणजे किराणा घराण्याचे अध्वर्यु असलेल्या अब्दुल करीम खाँसाहेबांची कन्या असलेल्या हिराबाईही ते गाणं गाऊ लागतात. गाणं संपल्यावर लहान मुलीसारखं उठून टाळ्याही वाजवतात. संगीतविश्वात याहून मोठा चमत्कार घडल्याचं आजवर कुणी पाहिलेलं नाही. पण ‘भाई’ चित्रपटात हे सहज घडू शकतं. या सगळ्यांनी ते जिथे कुठे असतील तिथे नक्की कपाळावर हात मारून घेतला असेल!
११) ज्या व्यक्तीबद्दल फारशी माहिती नाही, जिच्या कर्तृत्वाचा मागमूसही सापडत नाही आणि तरीही त्या व्यक्तीवर चित्रपट काढायचा, हा हट्ट धंदेवाईकच असू शकतो. ज्यांना पुलं ही काय चीज आहे हे माहिती आहे, ते हा चित्रपट पाहून दोन अश्रू गाळतील. पण ज्यांना पुलं माहीतच नाहीत, अशांना ते एकतर व्हिलन तरी वाटतील किंवा फुटकळ विनोद करणारे विदूषक तरी! एखाद्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाला केलेला हा सलाम की त्याची पातळी खाली आणण्याचा केलेला अश्लाघ्य प्रयत्न?
mukund.sangoram@expressindia.com