प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail.com
एक दिवस माझे मित्र सतीश नाईक माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘या वेळी मी ‘चिन्ह’ चा खास अंक भास्कर कुलकर्णी यांच्यावर काढणार आहे. तोपर्यंत भास्कर कुलकर्णी हे नाव मला वारली समाजाच्या आदिवासी पाडय़ात काम करणारा एक कलाकार एवढेच ऐकून माहिती होते. पण सतीश नाईक यांनी बॅगमधून बरेच संदर्भ काढले आणि त्यांनी भास्कर कुलकर्णीचे एकेक किस्से सांगायला सुरुवात केली. सतीश नाईकांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्या गोष्टीचा पिच्छा ते सोडीत नसत. दरवेळी नवनवीन काही तरी देणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या ‘चिन्ह’चा दर्जा उत्तम राखला आहे. ते अंक केवळ वाचण्यापुरते नसून त्याची कलात्मक बांधणी, रंगसंगती, सादरीकरण या सर्वच बाबी ते कौशल्याने हाताळतात. त्यामुळे त्यांचा अंक हा नेहमीच संग्रा असतो. त्या दिवशी त्यांनी मला केवळ भास्कर कुलकर्णीची माहितीच दिली नाही, तर कुलकर्णी त्यांच्या अंत:करणात कोठे तरी सामावले आहेत याची प्रचीतीही ते देत होते. या भास्कर कुलकर्णीनी मलाही विचार करायला लावले होते व मीही त्यांची माहिती घेऊ लागलो. सुदैवाने त्यांच्यासोबतचे काही लोक होते, त्यांनीही माझ्या माहितीत भर टाकली.
भास्कर कुलकर्णी मालाड येथे जन्मलेले, आदिवासी जनतेत सतत वावरलेले कलावंत. भटकंती करण्याचा छंद जोपासला, लोककलांचा शोध घेत घेत अनेक कला आणि कलाकारांना जगासमोर आणले. पण या माणसाचे नाव सर्वानाच अस्वस्थ करून सोडतं. आर्ट स्कूलमध्येही त्यांच्याबद्दल दबक्या आवाजात बोलले जाई. अनेकांना स्वत:च्या प्रकाशाने उजळून टाकणारा हा भास्कर स्वत: का लपला, हे कोडं अनेकांना पडतं. चित्रकलेची उपजत आवड असलेल्या भास्करचं कला शिक्षण भाई हळदणकर व पुढे जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये झालं. बाबूराव सडवेलकर, तय्यब मेहता, सोलापूरकर हे त्यांचे समकालीन. शिक्षण पूर्ण केल्यावर कुलकर्णीनी त्यावेळच्या जे. वॉल्टर थॉम्प्सन या जाहिरात संस्थेत बोधचित्रकार म्हणून काम केले. नंतर बोमास (आताची ओगील्वी) मध्ये काम केल्यानंतर त्यांची संशोधनात्मक वृत्ती, ग्रामीण लोककलांचा अभ्यास हे गुण दिल्लीतील कला समीक्षक, सांस्कृतिक कार्यकर्त्यां व इंदिरा गांधींच्या निकटवर्तीय डॉ. पुपुल जयकर यांनी हेरले व त्यांना दिल्लीला ‘विव्हर्स सव्र्हिस सेंटर’मध्ये घेतले. पुपुल जयकर स्वत: लोककलांच्या गाढय़ा अभ्यासक होत्या. आदिवासी कलांचा शोध घेऊन त्याचा आधुनिक पद्धतीने वापर करण्याचे काम त्यांनी भास्कर यांच्याकडे सोपवले.
पुढे सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीतर्फे कुलकर्णीना बिहारमधील मधुबनी येथे तेथील मधुबनी चित्रकलेचा शोध घेण्यास पाठविले. अशी आख्यायिका आहे की प्रभू राम व सीता यांच्या विवाहाच्या वेळी जनक राजाने सर्व मिथिलेच्या नगरवासीयांना त्यांची घरे रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे आदेश दिले. त्यावेळी सर्व घरातील स्त्रिया व मुलींनी पौराणिक विषयावर त्यांच्या पद्धतीने चित्रे रेखाटली. ही चित्रशैली ‘मधुबनी’ या गावाच्या नावाने ओळखली जाते. मात्र बाहेरील कोणाच्या नजरेस ही चित्रे पडली नव्हती. पुढे बिहारमध्ये भीषण असा भूकंप झाला, अनेक घरांची पडझड झाली. त्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विल्यम जी. आर्चर या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या दृष्टीला पडक्या भिंतींवर ही चित्रे दिसली आणि त्याने त्या काळात त्यांचे कलामूल्य जाणून ती जगापुढे आणली. आणि आता तसाच एक चित्रवेडा माणूस तेथे पोहोचला होता. कुलकर्णीनी जेव्हा ती चित्रशैली पाहिली तेव्हा ते अचंबित झाले. ही खास अशा शैलीतील अमर चित्रे डिझाइनची जोड देऊन कागद अथवा कापड अशा माध्यमावर केली तर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल व या स्त्रियांनाही त्याचा आर्थिक फायदा होईल, या हेतूने त्यांनी स्त्रियांचा एक गट केला व त्यांना प्रशिक्षित केले. ही चित्रे केवळ स्त्रिया व मुलींकडूनच काढली जातात. त्या गटात काम करणारी त्यावेळची भास्कर कुलकर्णी यांनी घडवलेली एक मुलगी बाऊवी देवी आज एक सुप्रसिद्ध मधुबनी कलाकार असून पद्म पुरस्कार अन् राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे.
अशा प्रकारे नोकरी करतानाच कुलकर्णीना आदिवासी, भटक्या जमातीमध्ये वावरण्याचा योग आला. त्यांच्या कलेबरोबरच त्यांची राहणी, जीवनमान यांचा अभ्यासही कुलकर्णी करू लागले. आणि हळूहळू यातूनच त्यांच्या जीवनाचे परिवर्तन होऊ लागले. त्यांच्या संस्कृतीशी ते समरस झाले. आदिवासींच्या कलेचे मर्म जाणून घेऊन, याच जमाती भारतीय कलेचा खरा वारसा जपत आहेत असे ठाम मत त्यांनी मांडले. याच दरम्यान आणीबाणी आली. नंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचे सरकार पराभूत झाले. पुपुल जयकर यांनी राजीनामा दिला. परिणामी कुलकर्णी यांनाही त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी आपला जमलेला भविष्य निर्वाह निधी घेऊन नोकरी सोडली व ते ठाणे जिल्ह्यतील डहाणूजवळील गंजाड या वारली लोकांच्या पाडय़ावर येऊन राहिले. तेथेच जागा घेऊन त्यांनी एक लहानसे घर बांधले. आता भास्कर कुलकर्णी यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली होती.
गावात पाण्याची टंचाई होती. विहीरही नव्हती. त्यामुळे कुलकर्णीनी आपल्या फंडाचे जे पैसे आले होते ते खर्चून विहीर बांधण्यास घेतली. विहीर जसजशी खोल खोल जाऊ लागली, तसतसे पैसेही संपत गेले. पण विहीर कोरडीच राहिली. या काळात कुलकर्णी वारली जीवनाशी पूर्ण समरस झाले होते. त्यांचा पेहरावही वारल्यांप्रमाणे झाला. अन्नही त्यांचेच खाऊ लागले, अविवाहित असल्याने व फकिरी जिणे जगत असल्याने गरजा फारशा नव्हत्याच! वारली लोकांकडून ते बांबू कामटय़ा यांच्या आकर्षक वस्तू बनवून घेणे, चित्रे काढून घेणे, ती मुंबईला विकून ते पैसे आदिवासींना देणे हा नित्याचा प्रकार झाला. एवढेच नव्हे तर या कलाकार लोकांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, जगभर फिरवून आणले. त्यांच्यापैकी एक होता जिव्या सोम्या म्हसे. या वारली कलाकाराला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मात्र आपली सर्व हयात, पैसा या वारली जमातीसाठी घालविलेल्या भास्कर कुलकर्णी यांना त्या सोहळय़ाचे साधे आमंत्रणदेखील देण्यात आले नव्हते.
बस्तरमध्ये तर तेथील धातूंच्या मूर्त्यांचा शोध घेत असता कुलकण्र्याच्या जिवावर बेतणारा एक प्रसंग ओढवला होता. अनेक मूर्ती तिथे टाकून दिल्या जात. अशीच एक पडलेली मूर्ती कुलकर्णीनी उचलून पिशवीत टाकली, ती एका बाईने पाहिली व तिने चोरी केल्याचा बोभाटा करताच त्या गावातील आदिवासींनी कुलकर्णीना पकडून बांधून ठेवले व रात्री त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्यांचा बळी देण्याचे ठरविले. सुदैवाने त्या दिवशी त्यांचा मुखिया तेथे नव्हता म्हणून तो दिवस निभावला. दुसऱ्या दिवशी मुखिया आला. नशिबाने त्याला यांची भाषा कळत होती. आपण सरकारी माणूस असून आदिवासींमध्ये कसे काम करतो, हे समजून सांगितल्यावर कुलकर्णीची सुटका झाली. नंतर ते त्या आदिवासींचेच झाले.
पण एवढे होऊनही हा कलंदर कलावंत सर्वच श्रेय, मानमरातब यांपासून नेहमीच वंचित राहिला. आज जनतेमध्ये ज्या लोककलांचा प्रसार झाला आहे, त्यांना प्रकाशात आणण्याचे श्रेय प्रामुख्याने कुलकर्णीकडे जाते. आपला सर्व पैसा या लोकांसाठी त्यांनी खर्च केला. पण याच लोकांनी त्यांच्यावर आघात केले. त्यांचा पुतण्याच याला कारणीभूत ठरला. त्याने शिरकाव करून कलेचे व्यापारीकरण केले. लोक गावातील गुंडांकडून त्रास देऊ लागले. ज्या वारली चित्रकाराच्या जागेवर कुलकर्णी यांनी घर बांधले होते, त्याला फितवून त्यांच्याकरवी त्रास देण्यास सुरुवात केली. ज्या वारली लोकांसाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्याच लोकांनी त्यांच्या या प्रेषिताला गाव सोडून जाण्यास भाग पाडले. सर्वार्थाने कुलकर्णी पोरके झाले, निराधार झाले, पण वारली चित्रकलेविषयी त्यांचा आदर मात्र थोडाही कमी झाला नाही.
पुढे कुलकर्णी गोव्याला गेले. त्यापूर्वी काही काळ सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांना, विशेषत: तेथील प्रसिद्ध अशा ठकी या बाहुलीला वेगळे रूप देण्याचे कामही त्यांनी केले. गोव्यात त्यांना त्यांचे एकाकीपण व वैफल्यग्रस्त जीवनाचे दु:ख ते मदिरेत बुडवू लागले. त्यानंतर ते तमिळनाडूजवळील सत्यमंगलम् या कुंभार वस्तीच्या खेडय़ात राहून ‘इंडिया फेस्टिवल’ या लंडनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी कारागिरांना प्रशिक्षित करत होते. त्यानंतरचे त्यांचे ध्येय होते ते नर्मदा प्रदक्षिणा करण्याचे! पण आयुष्याच्या उत्तरार्धात समाजाकडून मिळालेल्या उपेक्षेने ते पार खचले होते. मद्यपान वाढत होते. प्रकृती ढासळत होती. आपला मृत्यू बिहारमधील दरभंगा येथेच व्हायला हवा असे ते म्हणत. एवढे ते दरभंग्याशी समरस झाले होते. आणि झालेही तसेच! २४ एप्रिल १९८३ रोजी दरभंगा येथील एका रुग्णालयात अवघ्या ५३ व्या वर्षी एक सर्जनशील, मनस्वी आणि कलंदर जीवनाचा शेवट झाला.
भास्कर कुलकर्णीनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दीडशेहून जास्त रोजनिश्या लिहिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण दृष्टिपथात येईल. त्यामध्ये कलेचे चिंतन आहे, ज्ञानधारणा आहे; योग, संगीत, काव्य, नाटय़, वेद, समाधी असा एकही विषय नाही, जो या रोजनिश्यांमध्ये वंचित आहे. यामध्ये मनातील विचार शब्दबद्ध केले आहेत, तसेच चित्रबद्धही केले आहेत. ‘स्थिर राहतो, तो माणूस संपतो,’ हे भास्कर कुलकर्णी यांचे बोधवचन होते. ज्ञानाचे व कलेचे खरे उपासक असलेले कुलकर्णी असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार होते. संवेदनक्षम मनाचे लेखक होते. ते चित्रे रंगवत होते, पण त्यात सातत्य नव्हते. योगविद्येपासून ते तंत्रविद्येपर्यंत अभ्यास करून त्यांनी त्या आत्मसात केल्या होत्या. कलासक्त जीवन ते स्वत: जगले, त्यातील मर्म त्यांनी आपल्या रोजनिश्यांच्या पानापानांवर लिहून ठेवले. अनेक रेखाटनांची पखरण त्यावर केली. वारल्यांचे ‘तारपा’ वाद्य ते समरसून वाजवीत. आपल्याच राज्यात लोकांनी त्यांच्या वाटय़ाला वनवास दिला. तर दरभंग्यातील लोकांनी त्यांना देवपण देऊन त्यांचे मंदिर बांधले. एका कलासक्त जीवनाची आख्यायिका बनली. भास्कर कुलकर्णी यांना पुन्हा उजेडात आणण्याचे काम सतीश नाईक यांनी केले. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे २० वर्षांनी नाईकांनी आपल्या ‘चिन्ह’ वार्षिकामधून भास्कर कुलकर्णी नावाच्या सूर्याला, जो झाकोळला होता त्याला पुन्हा झळाळी आणली. वारली व मधुबनी या चित्रशैली प्रकाशात आणणाऱ्या या चित्रभास्कराला मनोमन वंदन!