कलेचा इतिहास आणि समकालीन दृश्यकला यांमधून दिसणाऱ्या प्रतिमांना स्त्रीवादी नजरेतून पाहण्याच्या प्रयत्नातून तरी पुरुषी नजरबदलू शकते का, याचा शोध घेणारं पाक्षिक सदर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाईच्या जातीनं कसं दिसलं पाहिजे, हे समाजच ठरवत होता- बायझंटाइन काळातसुद्धा. आणि नंतर- प्रबोधन काळातसुद्धा. मग व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य वगैरे आलं हे ठीक, पण तोवर स्त्रीदेहाच्या वस्तुकरणाची- आणि या वस्तुकरणाच्या प्रेरणांची भलामण अलगदपणे ‘सौंदर्यकल्पना’ म्हणून करण्याची रीत पक्की झाली होती. कवितांमधूनही स्त्रीदेहाची वर्णनं करताना ही रीत राबवली जातच होती.

आपण आज जी चित्रं, शिल्पं वगैरे पाहतो, ती एकेकट्या कलाकारानं केलेली असतात. मग समीक्षक लोक त्या कलाकृतीमागच्या संकल्पनांची चर्चा करतात. याउलट, आपण जर जुन्या कलाकृतींच्या संग्रहालयांत गेलो तर काय दिसतं? ‘मोहेंजोदडो काळातली नर्तिका’ किंवा ‘बायझंटाइन कालखंडातली बाळ येशू आणि मेरी मातेची प्रतिमा’… अशा कलाकृती कुणातरी एकट्यादुकट्या कलाकारानंच घडवलेल्या असतील किंवा नसतीलही. त्याहीपेक्षा, त्या जुन्या कलाकृतींमधल्या कल्पनासुद्धा आणि त्यामागच्या संकल्पनासुद्धा त्याच कलाकाराच्या एकट्याच्या मानता येत नाहीत. हेच निराळ्या शब्दांत असं सांगता येईल की, ‘आधुनिकतावादी काळात व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य स्थिरावण्यापूर्वी कलेचं कार्य सामाजिक आहे, असंच मानलं जायचं’! म्हणजे काय, तर कोणतं दृश्य कलाकृतीत हवं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला नसायचं. समाजाला जी दृश्यं हवी आहेत, तीच कलावंत लोक शिल्पांमधून किंवा चित्रांमधून साकार करायचे. हां… असं साकार करताना आपापली शक्कल लढवायचे जुने कलावंतसुद्धा. पण चित्राचा किंवा कलाकृतीचा ‘विषय’ समाजाला हवा तोच असायचा. हे कसं काय?

‘आधुनिकतावाद’, ‘व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य’ वगैरे शब्द कुणाला जड वाटत असतील तर सोपं उत्तर असं की, त्या जुन्या काळात छपाईचाही शोध लागलेला नव्हता म्हणजेच प्रसारमाध्यमं नव्हती- चित्रं किंवा शिल्पं हीच प्रसारमाध्यमं होती. आज तुम्ही आणि तुमच्या वयाचे/ तुमच्याच व्यवसायातले लोक साधारणपणे यूट्यूब/ इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर जे पाहता ते जसं एकसारखंच असतं- तसंच, पण जरा उलट्या पद्धतीनं त्या वेळच्या समाजातल्या या ‘प्रसारमाध्यमां’चं झालं होतं. आज समाजमाध्यमांतून जे काही प्रसारित होतंय ते आपापला समाज किंवा ‘टार्गेट ग्रूप’, ‘टार्गेट ऑडियन्स’ शोधतंय. याउलट, समाज कसा आहे/ समाजाला काय हवंय हे सगळं सगळ्यांना माहीत आहे, पण प्रसारमाध्यमांचा ताबा मात्र थोड्यांच्या (राजकीय सत्ताधारी, धर्मसत्ताधारी, न्यायाधीश/ नोकरशहा, अमीर/ उमराव वगैरे वजनदार लोकांच्या) हातात आहे… अशा वेळी काय होईल? हे थोडे सत्ताधारी ठरवतील तेच समाजाला हवंय किंवा समाज तसाच आहे, अशी कल्पना प्रसारमाध्यमांतून रेटली जाईल की नाही?

हेच बायझंटाइन काळात घडलं. त्याची उदाहरणं इथं आहेत. पहिली युवराज्ञी थिओडोरा. दुसरी मेरीच. त्यांच्याकडे जरा नीट पाहा. त्याआधी थोडी माहिती : बायझंटाइन साम्राज्य ग्रीसपासून रोम-मार्गे आजच्या इस्तंबूलपर्यंत पसरलं होतं. त्या साम्राज्याचा सुरुवातीचा उत्कर्ष-काळ म्हणजे इसवी सन ३३० ते सन ५६० असा साधारण सव्वादोनशे वर्षांचा.

थिओडोरा राजघराण्यातली आहे, हे निराळं सांगावं लागत नाही. तिनं मुकुट घातलाय. भरपूर माळा किंवा दागिने घातलेत. तिचा मुकुट पाहताना काही जणांना समजा ‘मुमताज महल’ (जिच्या स्मृतीसाठी शाहजहाननं ताजमहाल बांधला) हिच्या कुठेतरी कधीतरी पाहिलेल्या चित्रामधला आडवा मुकुट आठवला, तर अशा लोकांना खास शाब्बासकी! इतरांच्या माहितीसाठी आत्ता एवढंच की, मुमताज महल बेगमेचं ते चित्र ब्रिटिश लोक भारतात आल्याच्या बरंच नंतर, एकोणिसाव्या शतकात काढलेलं आहे आणि ते लंडनमध्ये व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमच्या संग्रहात आहे. तिच्याही डोक्यावरला मुकुट आडवा आहे, त्यामुळे बायझंटाइन काळातल्या लेडीज मुकुटाच्या डिझाइन्सची फॅशन शहाजहानच्याही काळात होती की काय असा प्रश्न कुणालाही पडणं रास्तच आहे. रास्त अशासाठी की, शहाजहान जरी सतराव्या शतकातला असला तरी बायझंटाइन साम्राज्याचा आशियाशी व्यापार आधीपासून होताच. या व्यापारासाठी ‘सिल्क रूट’ तेव्हा रुळलेले होते. असो. आपण आत्ता पाहायचंय ते युवराज्ञी थिओडोराच्या चित्राकडे. हे चित्र थिओडोराच्या हयातीत झालेलं नाही. तिच्या मृत्यूनंतर दीडेकशे वर्षांनी, म्हणजे सहाव्या शतकात हे चित्र ‘मोझाइक’ तंत्रानं बनवलं गेलंय. काचांचे आणि टाइल्सचे तुकडे जोडून चित्र करणं म्हणजे मोझाइक. बायझंटाइन काळातले कलावंत या कलेत पटाईत होते. मुख्य म्हणजे, इतक्या निरनिराळ्या रंगांच्या छोट्याछोट्या टाइल्स घडवण्याची कारागिरी तेव्हा प्रगत झालेली होती. बहुतेकदा चर्चमध्येच ही चित्रं असत. राजघराणं आणि त्याच्या पाठीमागे भक्कम उभं असलेलं चर्च, असा तो काळ. याच बायझंटाइन साम्राज्यातल्या पुढल्या काही राजांनी मूर्तिपूजा बंद केली म्हणे… पण ही दोन्ही चित्रं त्याआधीची आहेत. चित्रांची पूजा बायझंटाइन काळात कधी होत नव्हती. सुशोभीकरण आणि स्मृती-संचय हे चित्रांच्या ‘माध्यमा’तून साधलं जायचं.

थिओडोराकडे पाहून झालं असेल तर मेरीकडे पाहूया. या चित्रात बऱ्याच मानवाकृती दिसतात, पण मधोमध मेरी. तिच्या हातात बाळ येशू असल्यामुळे, ती मेरीच आहे हे कुणीही ओळखेल. हे चित्र रंगीत पाहिलंत तर अगदी झगझगीत दिसतं. त्यात सोन्याच्या वर्खाचा मुबलक वापर केलेला आहे. मेरीच्या आणि येशूच्याही डोक्याभोवती प्रभा आहे खरी, पण सगळीच पार्श्वभूमी सोनेरी वर्खाची असल्यानं ही प्रभा दिसतच नाही. आज इटलीच्या टस्कनी प्रांतात असलेलं सिएना शहर हे काही बायझंटाइन साम्राज्यात नव्हतं. तरीही, तिथल्या चित्रकलेवर बायझंटाइन शैलीचा प्रभाव पडलाच होता. या सिएना शहरातल्या कुणा निकोलो डि ब्यूओनाकार्सो नावाच्या चित्रकारानं हे चित्र साधारण १३८० साली रंगवून पूर्ण केलं असावं. चित्रात मेरी आणि येशूखेरीज चार मानवाकृती आहेत, पण वरच्या बाजूला जरा वयानं लहान असलेल्या मुलींसारख्या दिसताहेत त्या म्हणे ‘देवदूत’ आहेत. खालच्या भागात दाढीवाला पुरुष आहे तो संत बार्थोलोम्यू आणि स्त्री आहे ती संत कॅथेरीन, अशी माहिती या चित्राबद्दल फार म्हणजे फारच सहजपणे मिळते. ‘ख्रिास्टीज’ या लिलावसंस्थेनं हे चित्र २०२३ च्या डिसेंबरात झालेल्या लिलावात दोन लाख एक हजार ६०० ब्रिटिश पौंड इतक्या बोलीला विकलं. आता ते खासगी संग्रहात आहे, पण आपल्याला या धंद्याशी सध्या काही देणंघेणं नाही. या चित्रातल्या स्त्री-प्रतिमांकडे जरा पुन्हा एकदा पाहू. काय दिसतंय? किंवा काय दिसत नाहीये?

वक्षस्थळं आणि त्यांचे उभार कुठे आहेत या स्त्री-प्रतिमांना? पुन्हा थिओडोराकडे पाहा. तिथेही उभार नाहीत. पुरुषांनी, बहुतेकदा पुरुषांसाठीच रंगवलेल्या स्त्री- प्रतिमांमध्ये जो भाग सर्वांत आकर्षक वगैरे वगैरे मानला जातो, तोच इथं नाही… असं कसं?

याचं उत्तर बायझंटाइन काळातल्या स्त्री-विषयक कल्पनांमध्ये, कायदे-कानूंमध्ये शोधता येईल.

बायझंटाइन काळात स्त्रीच्या चारित्र्याला अर्थातच महत्त्व होतं आणि त्या अर्थानं तोही काळ पुरुषप्रधानच होता. पण ‘पाय घसरण्या’पासून स्त्रीचं संरक्षण पुरुषांनी केलं पाहिजे, अशीही रुढी तेव्हा होती आणि मुलीचे फक्त वडील वा भाऊच नव्हे तर काका आणि मामा यांच्यापर्यंत ही शीलरक्षणाची जबाबदारी होती. नवऱ्याला जर पत्नीच्या चारित्र्याचा संशय आला तर तो तिला सोडून देऊ शकत असे आणि हीच मुभा पत्नीलासुद्धा होती… पण तिचा वापर स्त्रियांकडून किती व्हायचा कोण जाणे. हे सारे तपशील फार निराळे वाटत नसतील तर एक भलताच तपशील- जो याच मजकुरात मघाशी कुठेतरी होता- तो आठवून पाहूया. ‘सिल्क रूट’ बायझंटाइन साम्राज्यापर्यंत पोहोचलेले होते… कपडेलत्ते हे केवळ लज्जारक्षणासाठीच नव्हे तर हौसेनं, आवडीनं परिधान केले जात होते. स्त्री आणि पुरुष दोघांचेही कपडे पायघोळ असत. देहाचा आकार झाकून टाकण्याइतपत वस्त्र-प्रावरणं अंगावर घातली जायची, हे अनेक बायझंटाइन चित्रांमधून दिसू शकतं. शिवाय राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र. त्यामुळे तर स्त्रीला भोग्यवस्तू मानूनसुद्धा चार लोकांत तसं कबूल करणं चुकीचं मानलं जात असेल.

परिणाम असा की, बाईला बाईसारखी छाती नसली तरी चालेल, असं बायझंटाइन साम्राज्यकाळातल्या बहुतेक साऱ्या चित्रकारांनी ठरवून टाकलेलं दिसतं. काही पाश्चात्त्य इतिहासकारांचं असंही मत आहे की, एकंदर सोळाव्या शतकापासूनच युरोपीय समाजात छातीवरल्या उभारांना महत्त्व येऊ लागलं आणि तेच कलाकृतींतही दिसू लागलं… म्हणजे प्रबोधनकाळाचा प्रभाव वाढत होता तेव्हाच चित्रांमध्ये स्त्रीचं वस्तूकरणही वाढत होतं, असं मानावं काय?

याचा खल इतिहासकारांनी जरूर करावा. आपल्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे.

बाईच्या जातीनं कसं दिसलं पाहिजे, हे समाजच ठरवत होता- बायझंटाइन काळातसुद्धा. आणि नंतर- प्रबोधन काळातसुद्धा. मग व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य वगैरे आलं हे ठीक, पण तोवर स्त्रीदेहाच्या वस्तुकरणाची- आणि या वस्तुकरणाच्या प्रेरणांची भलामण अलगदपणे ‘सौंदर्यकल्पना’ म्हणून करण्याची रीत पक्की झाली होती. कवितांमधूनही स्त्रीदेहाची वर्णनं करताना ही रीत राबवली जातच होती. बायझंटाइन काळाकडे पाहायचं, ते तो काळ स्त्रियांसाठी न्याय्य होता म्हणून नाही… पण ‘बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं’ याबद्दलच्या त्या काळच्या कल्पना निराळ्या आहेत म्हणून. या सामाजिक कल्पनाच आहेत. समाजानं त्या लादलेल्याच आहेत. खूप पुढल्या काळात, चित्रकारांना व्यक्तिस्वातंत्र्याचे फायदे मिळू लागल्यावर या लादलेल्या कल्पनांबरहुकूम चित्रं काढली जाण्याचा शिरस्ता काही प्रमाणात बदलल्याचं जरी दिसत असलं, तरी त्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्याच्या टिपिकल आधुनिकतावादी मूल्यापेक्षा ‘स्त्रीवादा’चं बंडखोर- आणि म्हणून नकोसं- मूल्य कारणीभूत ठरलं आहे, असं ‘दर्शिका’ या सदरातल्या पुढल्या लेखांपैकी काही लेखांतून दिसेल. तोवर सध्या थांबूया.