अरुंधती देवस्थळे
परदेशातलं कुठलंही नामी कलासंग्रहालय पायाखाली घालताना एक विचार असतोच मनाच्या पाठीमागे.. इथे भारतातलं कोणी आहे का? हा शोध अर्थातच आशियाच्या दालनांत जाऊन घ्यायचा असतो. न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधल्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट’मध्ये (मेट) तर ३५००० चित्रं, शिल्पं आणि कलावस्तू आहेत.. आपलं इथलं स्थान कमावलेल्या. एका दिवसात तुम्ही त्यातलं काय आणि किती बघू शकता, हा यक्षप्रश्न इथेही ठाकणार असतोच. अगदी तुम्हाला इथे परत येण्याची संधी मिळू शकली, तरीही! म्हणून जे हाती लागतं ते नीट बघून घ्यायचं असतं; सुटलेल्याचा विचार नाहीच करायचा. माझ्या पहिल्याच संधीत दुपारच्या वेळेला मला कात्सुशिका होकुसाई (१७६०-१८४९) भेटले!! त्यांच्या ‘दी ग्रेट वेव्ह ऑफ कानागावा’ म्हणून पडद्यावर दिसणाऱ्या भल्याथोरल्या चित्राच्या पार्श्वभूमीवर चर्चा चालू होती. त्सुनामीनंतरच्या पाचव्या वर्षांत मला प्रथमदर्शनी ते अस्सल जपानी वाणाचं आधुनिक चित्र वाटलं होतं. त्याचा त्सुनामीशी संबंध नाही, हे मागून कळणार होतं. बघावं जरा म्हणून जी बसले, ते प्रबोधन संपेस्तोवर २५ मिनिटं तिथेच ऐकत राहिले. खाली कॅफेत मैत्रिणीला दिलेली वेळ निघून गेली म्हणून ती १५ मिनिटं वाट बघून निघून गेलेली. एकीकडे तिची माफी मागणारा मेसेज आणि दुसरीकडे होकुसाईंचा शोध घ्यायचं ठरवलं होतं. नंतर कधीतरी सहज नेटवर शोधायला गेले तेव्हा होकुसाई हे प्रकरण काही असं-तसं नाही, ते जपानचे थोर चित्रकार असल्याचा बोध झाला. केवळ ‘मेट’मुळे बरंच काही हाती लागलं.. त्यांच्यावरल्या पुस्तकासकट!
जपानी चित्रकलेच्या इतिहासात रिॲलिस्टिक आणि डेकोरेटिव्ह शैलीच्या मिश्रणातून सुरू झालेल्या ‘उकियो-ए’ (१६०३-६३ च्या दरम्यान) शैलीचं ठळक स्थान आहे. महत्त्वाचं म्हणजे या रिॲलिस्टिक शैलीत देशी (जपानी) आणि पाश्चिमात्य यथार्थवादाचा मिळताजुळता चेहरा समोर येतो. होकुसाईनी हॅन्ड-मेड पेपरवर उकियो-ए (शाब्दिक अर्थ : तरंगते जग) शैलीत काम करून तिला जगन्मान्यता मिळवून दिली. नंतरच्या वान गॉग (Starry Night) आणि मॉने (La Mer) प्रभृतींना स्फूर्ती देणारी ही जपानी कला. जीवनकाळापेक्षा त्यांच्या माघारी त्यांची चित्रं आणि कला जगभरात पोहोचली. विशेषत: ‘दी ग्रेट वेव्ह ऑफ कानागावा’ हे १० (१५ ) मध्ये (१८३०-३३) साकार केलेलं नाटय़, ‘थर्टीसिक्स वूज ऑफ माऊंट फुजी’ या त्यांच्या मालिकेतला मास्टरपीस ठरलं आणि जपानी चित्रकलेचं प्रतिनिधित्व या मालिकेकडे आपसूकच आलं. आंतरराष्ट्रीय कीर्ती वाटय़ाला आली ती मात्र शंभरेक वर्षांनंतर!
वयाच्या सहाव्या वर्षी होकुसाईंनी लिहिणं शिकायला सुरुवात केली. जपानी लिपी चित्रमय. जाड ब्रश शाईत बुडवून वाहत्या रेषांमधून लिहीत जायचं. सोपं नसायचं ते. पण त्यातून आकार देण्याचं कौशल्य गवसायचं. वडील आरसे बनवण्याचं काम करत. त्या काळात आरसे ब्रॉंझचे असत. म्हणून वापरायची बाजू सतत पॉलिश करून स्वच्छ ठेवावी लागे. मोठय़ा मुलाने त्यांच्या व्यवसायात मदत करायची रीत त्यांच्याही कुटुंबात पाळली जात असावी. बाराव्या वर्षी त्यांनी पुस्तकाच्या दुकानात नोकरी सुरू केली. तिथे कलाकारांनी बनवलेले चेरीच्या झाडाच्या लाकडाचे ब्लॉक्स त्यांच्या पाहण्यात आले; जे त्याकाळी छपाई आणि पुस्तकांतल्या चित्रांसाठी वापरले जात. इथेच त्यांची ‘उकियो-ए’शी ओळख झाली. त्यांनी ते बनवण्याचं कौशल्य शिकून घेतलं. ज्यात रस होता तो निसर्ग, त्यातील फुलं, पानं, प्राणी लाकडात बारकाईने कोरणं सोपं नव्हतं. या शैलीत काढल्या जाणाऱ्या चित्रांचे विषय म्हणजे संगीत वाजवणाऱ्या गेईशा, सामुराई, काबुकी नाटकातील दृश्य, नट किंवा तत्सम. चित्रं प्रथम एका रंगात, नंतर दोन रंगांत आणि नंतर अनेक रंगांत पॉलिक्रोम वूडन ब्लॉक्स पिंट्र्स बनवून अशी तांत्रिक प्रगतीनुसार बदलत गेली. अशा कलेला फारशी किंमत नसे. दोन वाडगे नूडल्स देऊन एक पिंट्र घेता येई. हाताने काढलेल्या अभिजात चित्रांच्या किमती अर्थातच उंची असत. म्हणून ही उकियो-ए पिंट्र्स भराभर विक्रीने लोकप्रिय होत.
‘दी ग्रेट वेव्ह ऑफ कानागावा’ हे या शैलीतलं प्रातिनिधिक चित्र. समुद्रात उठलेल्या महाकाय लाटेच्या अजस्र उसळीमुळे पलीकडे दिसणारा बर्फाच्छादित माऊंट फुजी केवढासा दिसतो आहे! त्या वेगवान उसळीची त्याच्याभोवती फ्रेम तयार झाल्यानं समुद्राच्या विराट रूपापुढे शक्तीचं प्रतीक असलेला पर्वत फिका पडल्यासारखा वाटतो. ही कमाल होकुसाईंच्या कॉम्पोझिशनची! समुद्रात तीन बोटीही आहेत. त्यात काही माणसंही. त्यांना आपल्या सामर्थ्यांने लाट अक्षरश: सी-सॉसारखी वर उचलतेय. हे चित्र आकाराने मोठं नसूनही भव्य वाटणारं आहे. होकुसाईंनी याची तीन चित्रं बनवली आहेत. तपशील बदलून, पण लाट आणि तिचं महाकाय रूप अर्थातच केंद्रस्थानी ठेवून. इतक्या वर्षांनंतरही या चित्रातील निळ्या रंगाच्या छटा तशाच टिकून आहेत म्हणून त्याचं शास्त्रशुद्ध संशोधन केल्यावर समजलं की निळाईच्या विविध छटा प्रुशिअन ब्लू (जर्मनीत रासायनिक प्रक्रियेने बनवण्यात येणारा टिकाऊ निळा!) आणि पारंपरिक रीतीने शेतातून पैदास केलेली नीळ यांच्या मिश्रणांतून साध्य केल्या आहेत. होकुसाईंच्या ३०,००० हून अधिक चित्रांपैकी अनेकांत विविड ब्लूचा वापर दिसत राहतो. या चित्राच्या िपट्र्स किंवा यावर आधारित स्टेशनरी मग्ज आणि टीशर्टपासून पडद्यांपर्यंत वस्तू जगभरात निर्माण झालेल्या दिसतातच; पण त्याचं आकर्षण इतकं, की मॉस्कोतल्या सहा इमारतींच्या दर्शनी भागावर त्याचे ६०००० चौरस फुटांचे म्युरल २०१८ मध्ये बनवलं गेलं आहे.
होकुसाईंनी जीवनात अनेकदा स्वत:चं नाव बदललं. कधी त्या काळात प्रचलित गुरू-शिष्य परंपरेला अनुसरून, तर कधी अमुक एक प्रसंगामुळे. किंवा वेगळी शैली म्हणजे वेगळ्या सृजनाचा जन्म म्हणून नवं नाव धारण करण्याची प्रथा होती. पण यांच्याबाबतीत जरा अतिरेकच झाला. चित्रांनी मागोवा घ्यायचा तर त्यांच्या ३० वेगवेगळय़ा सह्य आहेत. त्यांचा अर्थ वेगवेगळा. घरंही ९३ वेळा बदलली. कदाचित अस्थिरता हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग असावा. त्यांनी जुन्या चिनी थोरांची चित्रं बारकाईने पाहिली होती. फ्रेंच आणि डच मास्टर्सच्या कलेशीही अवैध मार्गाने देशात आलेली एनग्रेिवग्ज बघून ओळख झाली होती. अशा मिश्र प्रभावाखाली त्यांची शैली समृद्ध होत राहिली. मुलांसाठी काही सचित्र पुस्तकंही त्यांनी लिहिली. माणसं आणि प्राण्यांची ४००० मजेदार चित्रं काढून मुलांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या १५ पुस्तकांचा संच त्यांनी बनवला. तो ‘होकुसाई मांगा’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यातून मुलांना चित्रकलेचे प्राथमिक धडे मिळू शकतात.
होकुसाईंच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. एदो (पूर्वीचं तोक्यो) आणि नागोयासारख्या शहरांत सणासुदीला ते वेगवेगळ्या जपानी पुराणकथांवर आधारित २००० चौरस फुटांची रंगीबेरंगी चित्रं दरवर्षी काढत.. उकियो-ए शैलीत. असं म्हणतात की, एकदा त्यांनी बुद्ध भिक्षूचं बनवलेलं चित्र इतकं विस्तृत होतं की ते घराच्या छपरावर जाऊन पाहावं लागे. तर दुसऱ्यांदा अशी कमाल, की तांदळाच्या एका दाण्यावर त्यांनी दोन पक्षी कोरले होते.
हजारेक पुस्तकांमधली चित्रं, अनेक पेंटिंग्ज आणि कलावस्तू निर्मिणाऱ्या होकुसाईंच्या आयुष्याची संध्याकाळ सर्जनशीलतेचा सर्वोत्कृष्ट कालखंड ठरली. एव्हाना त्यांना लौकिकार्थाने यश आणि समृद्धी मिळालेली होती. पण वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहावे लागले होते. पन्नासाव्या वर्षी त्यांच्यावर वीज पडली होती, पण सुदैवाने त्यांना काही इजा नाही झाली. अधूनमधून त्यांना अर्धागवायूसारखे काहीतरी होई आणि हात चालत नसे. वयाच्या सत्तरीत त्यांनी ‘थर्टी सिक्स व्ह्यू ऑफ माऊंट फुजी’ (१८२६-३३) मालिकेत एकूण ४६ अतिशय देखणी चित्रं काढली. आजवर शिकलेलं सर्व काही त्यांनी या मालिकेत ओतलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये काढलेली फुजी पर्वताची आणि समुद्रासोबत काढलेली ही चित्रं. ‘फुजियामा मला आध्यात्मिक बळ देतो. थकल्याभागल्या मनाला जादूने नवजीवन देतो,’ असं ते म्हणत. दुनियेने आपलं फक्त हे आणि यापुढचं काम विचारात घ्यावं, आधीच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करावं असा त्यांचा आग्रह असे. दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या पत्नीचे मृत्यू त्यांना पाहावे लागले होते. मुलांकडून उपेक्षा वाटय़ाला आली होती. एक नातू त्यांची काळजी घेण्यासाठी जवळ होता खरा, पण तो पार बिघडलेला.
सुदैवाने त्यांची मुलगी आणि प्रिय शिष्या ओ इ त्यांच्याबरोबर राहायला आली आणि ते परत चित्रकलेत रमू लागले. हिच्या जन्माच्या वर्षी त्यांनी ‘फेमस साइट्स ऑफ ईस्टर्न कॅपिटल्स’ आणि ‘एट व्ह्यूज ऑफ एडो’ ही दोन पुस्तकं लिहून छापली होती. पण आता हात पूर्वीसारखा साथ देत नव्हता. तरी त्यांनी माउंट फुजीची आणखी शंभरेक चित्रं काढली, ज्यांची तीन पुस्तकं झाली. मग एकदा अचानक घर व स्टुडिओला आग लागून चित्रं भस्मसात झाली. बाप-लेकीला काही दिवस देवळात आसरा घ्यावा लागला. त्या काळात त्यांनी स्वत: ला Gakyo Rojin Manji (म्हणजे ‘चित्रांचं वेड लागलेला म्हातारा’) हे नवं नाव घेतलं होतं. इच्छाशक्ती इतकी दुर्दम्य, की आपल्याला देवाने दीर्घायुष्य द्यावं आणि चित्रकलेच्या सोपानाने अंतिम सत्याकडे पोहोचण्याचा मार्ग शोधू द्यावा असं त्यांना वाटे. मात्र ही इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांचं ८९ व्या वर्षी देहावसान झालं तेव्हा त्यांची मुलगी शांतपणे म्हणाली होती, ‘‘वडील आता काय करत असतील, कसे असतील हा प्रश्न मला नाही पडत. ते असतील तिथे आनंदात असतील. स्वत:साठी नवं नाव शोधलं असेल. आणि नव्या चित्राच्या जुळवाजुळवीला लागले असतील याची मला पूर्ण खात्री आहे..’’
arundhati.deosthale@gmail.com