रघुनंदन गोखले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माझ्या लेखात वारंवार उल्लेख आल्यामुळे अनेकांनी मला ‘हे ऑलिम्पियाड म्हणजे काय असते रे भाऊ’च्या धर्तीवर प्रश्नांचा भडिमार केला. अनेकांनी ऐकलं होतं की गेल्या वर्षी महाबलीपूरम येथे एक महाकाय ऑलिम्पियाड होऊन गेलं आणि भारतीय संघांनी यामध्ये पदकंही मिळवली होती. परंतु नक्की हा प्रकार काय आहे याची अनेक बुद्धिबळ खेळाडूंनाही माहिती नाही. म्हणून या लेखात आपण बुद्धिबळ ऑलिम्पियाड विषयी माहिती घेऊ या.
मी ऑलिम्पियाडला ‘महाकाय’ का म्हणतो याची कल्पना तुम्हाला येईल ती त्या ऑलिम्पियाडच्या निव्वळ आकडेवारीवरून. पुरुष विभागात (याला हल्ली खुला विभाग म्हणतात कारण ज्युडिथ पोलगार, बांगलादेशची राणी हमीद या पुरुषांमध्ये खेळत असत.) १८८ संघ होते तर महिला विभागात १६२. वर हे सर्व संघ (म्हणजे त्यातील अनुक्रमे ९३७ आणि ८०० खेळाडू) सर्वच्या सर्व ११ फेऱ्या खेळले. तब्बल दोन आठवडे चालणाऱ्या या महाजत्रेत पंच, स्वयंसेवक, अधिकारी वर्ग मिळून एकूण किती माणसे महाबलीपूरममध्ये असतील याचा विचार करा!
सुरुवात कशी झाली?
१९२४ साली पॅरिस येथे ऑलिम्पिक होणार होतं. त्या काळी पॅरिसमध्ये बुद्धिबळ खूप लोकप्रिय होतं आणि ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्याचंही नक्की झालं. नेमकी माशी शिंकली ती हौशी आणि व्यावसायिक बुद्धिबळपटू कसे ठरवायचे या गोष्टीवरून. बुद्धिबळ खेळाडू निराश होऊ नयेत म्हणून जमलेल्या १८ देशांमध्ये एक अनधिकृत सांघिक स्पर्धा घेतली गेली. हेच पहिले (अनधिकृत का होईना) ऑलिम्पियाड! आणि सगळे देश जमलेच आहेत तर त्यांची एक संघटना का बनवू नये, या विचारानं जागतिक बुद्धिबळ संघटनेची स्थापना स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी (२० जुलै १९२४) करण्यात आली. त्यामुळे २० जुलै हा दिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिवस’ म्हणून ओळखला जातो.
१९२६ साली दुसरं ऑलिम्पियाड बुडापेस्ट (हंगेरी) येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या सभेदरम्यान घेण्याचं ठरलं. पण त्यामध्ये फक्त चार देश खेळले. लंडन येथे भरलेलं १९२७ चं ऑलिम्पियाड पहिलं अधिकृत ऑलिम्पियाड मानलं जातं. त्यामध्ये १७ युरोपियन संघ आणि अर्जेटिना असे १८ संघ खेळले. त्यानंतर जमले तर दर वर्षी, नाहीतर जमेल त्या वेळी अशा प्रकारे ऑलिम्पियाड भरवली जाऊ लागली. हा सावळा गोंधळ १९५० पर्यंत सुरू होता. पण जागतिक संघटना चिवटपणे ऑलिम्पियाड घेत राहिली हेच महत्त्वाचं होतं.
हिटलरकाळातील गंमत..
१९३६ साली बर्लिन येथे झालेलं ऑलिम्पिक विविध कारणांनी प्रसिद्ध आहेच, पण अनेकांना माहिती नसेल की, जर्मन बुद्धिबळ संघटनेनं १९३६ साली म्युनिच येथे ऑलिम्पिक संपल्यावर दुसऱ्या दिवशी एक आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आयोजित केली होती. हेच नंतर तिसरं अनधिकृत ऑलिम्पियाड म्हणून प्रसिद्ध झालं. ज्यू खेळाडूंनी भरलेल्या हंगेरी आणि पोलंड या संघांनी जर्मन संघापुढे क्रमांक मिळवून हिटलरचा पारा आणखी वाढवला असणार, पण दुर्दैवानं या गोष्टीला कधीच प्रसिद्धी मिळाली नाही.
असंच आणखी एक अनधिकृत ऑलिम्पियाड १९७६ साली खेळलं गेलं, ते जागतिक संघटनेनं यजमानपद इस्राएलला दिल्याविरुद्ध. सगळ्या इस्राएलविरोधी देशांनी एकत्र येऊन एक प्रति-ऑलिम्पियाड लिबियाची राजधानी त्रिपोली येथे साजरं केलं आणि पाकिस्तानला त्या वासरांच्या लढतीत लंगडी गाय म्हणून कांस्य पदकही मिळालं. तरीही त्यांना एल सॅल्वाडोर आणि टय़ुनिशिया यांना पराभूत करता आलं नव्हतंच. या ऑलिम्पियाडमध्ये ३४ देशांनी भाग घेतला होता. त्यात मुख्यत्वेकरून मुस्लीम आणि रशियाच्या बाजूला झुकणाऱ्या देशांनी भाग घेतला होता. ते दिवस भारतात सुरू असलेल्या आणीबाणीचे होते. त्यामुळे भारतानं दोन्ही ओलीम्पियाडमध्ये भाग न घेता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
अधिकृत ऑलिम्पियाडमध्ये मात्र ७४ देशांनी भाग घेतला होता. पहिल्यांदाच महिलांचे वेगळे ऑलिम्पियाड पुरुषांच्या बरोबरीनं घेतले गेले होते. सोवियत संघराज्य आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या हंगेरी आणि युगोस्लाव्हिया या देशांनीही भाग न घेतल्यामुळे बॉबी फिशरशिवाय खेळणाऱ्या अमेरिकेला महायुद्धानंतर पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवता आलं. नेदरलँड्स आणि इंग्लंड यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली.
बॉबीचा बहिष्कार आणि पंचांचं अपहरण..
एवढय़ा प्रचंड संख्येने खेळाडू एकत्र जमणार म्हटल्यावर आयोजकांवर ताण पडणार हे तर उघडच आहे. त्यात जर बॉबी फिशरसारखा एखादा छिद्रान्वेषी असेल तर भर पडणारच. स्वित्झर्लंडमध्ये लुगानो या निसर्गरम्य ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये खेळायला सगळे उत्सुक असले तर त्यात नवल ते काय? भरपूर गर्दी झाली लुगानोला! थोडी गैरसोय होणे स्वाभाविक होतंच, पण बॉबी हा बॉबी होता. तो आला, त्यानं एकूण व्यवस्था पाहिली. दाटीवाटीनं बसलेल्या ठिकाणी खेळणं योग्य नाही असं त्यानं मनात ठरवलं आणि तात्काळ अमेरिकेला जाणारं विमान पकडलं.
जागतिक संघटना बुद्धिबळाचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून नव्या नव्या देशांना संधी देत असते आणि काही वेळा या देशातील संघटना अनुभवाच्या कमतरतेमुळे गोंधळ घालतात. अर्जेन्टिनामधील ब्युनोस आयर्स येथे १९७८ साली झालेलं २३वं ऑलिम्पियाड असंच होतं. त्या स्पर्धेदरम्यान काही गुन्हेगारांनी मुख्य पंचांचं अपहरण केलं आणि ऑलिम्पियाडच्या गोंधळात आणखीनच भर पडली. त्या ऑलिम्पियाडदरम्यान घडलेली ती एकमेव चांगली गोष्ट होती, असं ब्रिटिश ग्रँडमास्टर टोनी माईल्स नंतर हसत हसत म्हणाला.
चष्म्याचा गोंधळ..
२०२० चा पदार्थ विज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. रॉजर पेनरोज यांचा भाऊ डॉ. जोनाथन पेनरोज हाही चांगला खेळाडू होता. १९६०च्या लिपझिग ऑलिम्पियाडमध्ये जगज्जेत्या तालला हरवून त्यानं खळबळ उडवून दिली होती. या मानसशास्त्रज्ञाचा एक डाव निव्वळ त्याचा चष्मा हॉटेलवर राहिल्यामुळे गेला होता. पण एका आफ्रिकन खेळाडूची तर फारच पंचाईत झाली होती. एका ऑलिम्पियाडमध्ये डोळ्यानं अधू असलेला खेळाडू नेमका आपल्या हॉटेलमध्ये चष्मा विसरला आणि डाव सुरू झाले. बुद्धिबळ खेळाडूंना सहज कळेल म्हणून मी खाली त्या खेळ्या देतो.
चष्मा विसरलेले महाशय खेळत होते काळ्या सोंगटय़ांनी! डाव खालीलप्रमाणे सुरू झाला. 1. d4 Nf6 2. c4 e6 3. Nf3 Bb4 4. Bd2 आता बोगो इंडियन प्रकारात येथे काळा खेळाडू Qe7 खेळून वजिराने आपल्या उंटाला जोर देतो. पण हे चष्मा विसरलेले महाशय वजीर समजून राजा Ke7 खेळले. त्यांचा प्रतिस्पर्धी अवाक् झाला आणि त्यानं उंटानं उंट मारून शह दिला. खरी मजा नंतर झाली. आपल्या नाटय़ाच्या नायकानं चक्कं स्वत:च्या राजानं (वजीर समजून) दूरचा उंट मारण्याचा प्रयत्न केला आणि एकच खळबळ उडाली. पंचांनी ती खेळी अवैध आहे असं सांगितल्यावर आपल्या नायकाला लक्षात आलं की काय झालं. त्याला फेफरं आलं आणि त्या डावाची नोंद खेळाडू (स्ट्रेचरवरून बाहेर नेल्यामुळे) वेळे अभावी हरला अशी करण्यात आली.
पळून जाऊन लग्न आणि उपाध्यक्षांना अटक..
कोर्चनॉय हा सोवियत संघराज्य सोडून एका स्पर्धेदरम्यान पळून गेला हे आपण ‘दुर्दैवी महानायक’ या लेखात बघितलं आहेच. परंतु चक्कं ऑलिम्पियाडच्या दरम्यान सोवियत महिला खेळाडू अमेरिकन संघाच्या कर्णधाराबरोबर लग्न करून पळून गेल्याचंही उदाहरण आहे. १९८८ च्या सलॉनिकी, ग्रीस येथील ऑलिम्पियाडमध्ये ही प्रेमकहाणी घडली. एलेना अख्मिलोस्काया १९८६ साली महिला जगज्जेतेपदाची लढत माया चिबूरडॅनीत्झे विरुद्ध हरलेली होती आणि ती सोवियत संघाची मुख्य खेळाडू होती. तिनं अमेरिकन संघाचा कर्णधार जॉन डोनाल्डसन याच्या बरोबर ग्रीसमधून ऑलिम्पियाड सुरू असताना पोबारा केला आणि सोवियत संघराज्यामध्ये एकच खळबळ उडवून दिली.
२००४ च्या कॅल्व्हिया येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये पोलिसांनी चक्कं जागतिक संघटनेच्या उपाध्यक्षाला अटक करून त्याच्यावर खटला भरल्याची घटना घडली होती. स्पेनच्या किनाऱ्याजवळील एका निसर्गरम्य माजोरका बेटावरील या ऑलिम्पियाडमध्ये ग्रँडमास्टर झुराब अजमाईपराशविली या उपाध्यक्षानं आयोजकांकडे चक्कं दोन खोल्यांची मागणी केली- एक खेळाडू म्हणून आणि दुसरी जागतिक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून! त्या बेटावर असलेल्या मर्यादित संख्येच्या हॉटेलमध्ये सगळ्या संघांना कशीबशी जागा देऊन आयोजक कावले होते. त्यात या उच्चपदस्थांची अवाजवी मागणी! बक्षीस समारंभाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त होता तरी झुराबनं सुरक्षा रक्षकांना धुडकावून स्टेजवर जायचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षक आणि झुराब दोघेही जखमी झाले. आयोजकांनी त्याचा फायदा घेऊन उपाध्यक्ष महाशयांची गठडी वळली आणि त्यांना कितीतरी दिवस तुरुंगात टाकले. अखेर जागतिक संघटनेचे अध्यक्ष किरसान इल्युमजिनॉव्ह यांना स्पेन सरकारच्या नाकदुऱ्या काढून आपल्या उपाध्यक्षांची सुटका करून घ्यावी लागली.
ऑनलाइन आणि महिला ऑलिम्पियाड..
करोना काळात जागतिक संघटनेनं दोन ऑलिम्पियाड घेतली आणि त्या दोन्हीमध्ये भारतीयांनी चमकदार कामगिरी केली होती. या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय खेळाडू सुरुवातीला घरून आणि दुसऱ्या वेळी चेन्नईमधील एका हॉटेलमधून खेळले. महिलांसाठी ऑलिम्पियाड १९५७ सालापासून १९७४ पर्यंत वेगळे घेत असत. मात्र त्यानंतर पुरुषांच्या (खुल्या) ऑलिम्पियाडबरोबर महिलांचंही ऑलिम्पियाड घ्यायला सुरुवात झाली. सुरुवातीला तीन बोर्ड आणि एक राखीव खेळाडू अशी रचना असणाऱ्या महिलांच्या ऑलिम्पियाडच्या नियमात सुधारणा करण्यात आली. ड्रेस्डेन, जर्मनीमधील ऑलिम्पियाड (२००८) पासून चार खेळाडू आणि एक राखीव असे महिलांचे संघ पुरुषांच्या बरोबरीनं भाग घेतात.
पुरुष संघ हॅमिल्टन – रस्सेल चषकासाठी झुंज देतात तर महिलांसाठी पहिल्या महिला विश्वविजेत्या वेरा मेनचीकच्या नावानं ट्रॉफी दिली जाते. माजी महिला जगज्जेत्या नोना गॅिप्रदाषविली हिच्या नावानं एक ट्रॉफी देण्यात येते. ज्या देशाच्या दोन्ही संघांची एकूण कामगिरी सरस असेल त्यांना ही ट्रॉफी मिळते. गेल्या वर्षी भारताच्या दोन्ही संघांनी कांस्य पदके मिळवल्यामुळे भारताला हा मान मिळाला.
एकूण भारताच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि म्हणूनच पुढे एका स्वतंत्र लेखात आपण भारतीय संघांची ऑलिम्पियाड आणि एकूण सांघिक स्पर्धामधील कामगिरी पाहू या!
gokhale.chess@gmail.com