रघुनंदन गोखले
क्रिकेट शौकिनांना पद्माकर शिवलकर म्हटलं की जी हळहळ वाटते, तीच बुद्धिबळ रसिकांना पॉल केरेस आणि व्हिक्टर कोर्चनॉय ही नावं घेतल्यावर वाटते. गुणवत्ता असूनही शिवलकर भारताकडून पराक्रम करू शकले नाहीत, तसेच प्रत्येक जगज्जेत्याला इतर स्पर्धामध्ये हरविणारे केरेस आणि कोर्चनॉय स्वत: कधीही जगज्जेते होऊ शकले नाहीत. या दिग्गजांसारखी एक दुर्दैवी हकिकत स्वातंत्र्यपूर्व भारतातही घडलेली आहे. त्या खेळाडूचं नाव आहे किशनलाल. या तिघांविषयी..
पॉल केरेस काय आणि व्हिक्टर कोर्चनॉय काय- दोघेही जगज्जेते झाले नाहीत. त्या दोघांचे स्वभावही भिन्न होते. केरेस शांत होता तर कोर्चनॉय शीघ्रकोपी! मी पाहिलेला एक प्रसंग सांगतो- स्पेनमधील एका स्पर्धेतला. कोर्चनॉयचा प्रतिस्पर्धी होता कतारचा अल मोदाहिकी. त्या वेळी फक्त मास्टर असणारा अल मोदाहिकी कोर्चनॉयकडे वेळ कमी असल्यामुळे वाईट परिस्थितीतही खेळत होता. न जाणो घाईघाईत खेळताना म्हाताऱ्याकडून चूक झाली तर! त्यात कोर्चनॉयच्या एका डोळय़ावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे त्याच्या डोळय़ावर पट्टी बांधलेली होती आणि तो इंग्रजी चित्रपटातील समुद्रीचाच्यासारखा दिसत होता. मधेच कोर्चनॉयने रागाने अल मोदाहिकीकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तू डाव सोडत का नाहीस?’’ बाजूला उभी होती अल मोदाहिकीची प्रेयसी- (आणि नंतर झालेली बायको) महिला विश्वविजेती झू चेन! ती न राहवून रागानं म्हणाली, ‘‘का डाव सोडेल तो?’’ कोर्चनॉय म्हणाला, ‘‘कारण मी एक ग्रँडमास्टर आहे आणि हा एक फालतू खेळाडू आहे! त्यानं मला मान द्यायला पाहिजे.’’ सगळे स्तब्ध होऊन ऐकत राहिले.
पॉल केरेस हा किती महान खेळाडू होता याचं ज्ञान बुद्धिबळ रसिकांना करून द्यायची गरज नाही. कारण त्यांनी त्याचे डाव, त्याचे हल्ले करण्याचे कौशल्य बघितलेलं आहेच. पण ज्यांना केरेस हे नाव नवं आहे त्यांना मी दोन-तीन गोष्टींमधून पटवून देण्याचा प्रयत्न करतो. बॉबी फिशरसारख्या प्रतिभाशाली खेळाडूला तीन वेळा पाणी पाजणारा खेळाडू म्हणजे पॉल केरेस! सोव्हिएत संघराज्याकडून सात ऑलिम्पियाडमध्ये प्रतिनिधित्व करून सातही वेळा संघाला सुवर्ण मिळवून देताना स्वत: पाच वैयक्तिक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची लयलूट करणारा, तसंच तीनही वेळा युरोपियन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सोव्हिएत संघाला सुवर्ण मिळवून देताना आणि स्वत:ही वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा पॉल केरेस जगज्जेता व्हायला लायक नाही, असं कोण म्हणेल?
जगज्जेत्या आलेखाइनचा प्रतिस्पर्धी निवडण्यासाठी जरी आधी ठरलं नव्हतं, तरी असं मानलं जात होतं की, १९३८ साली होणारी AVRO ही स्पर्धा जिंकणारा आव्हानवीर असेल. कोण कोण खेळणार होतं? तर साक्षात आलेखाइन, माजी जगज्जेते कॅपाब्लांका, मॅक्स येवे, भावी विश्वविजेता बोटिवनीक, अमेरिकन सॅम रेशेव्हस्की, रूबेन फाईन आणि रशियन सालो फ्लोहर! या सगळय़ांमध्ये पॉल केरेस पहिला आला; परंतु दुर्दैव केरेसच्या पाठी हात धुऊन लागलं होतं. जगज्जेता अलेक्झांडर आलेखाइन याच्याबरोबर जागतिक अजिंक्यपद सामन्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्यात भरीस भर म्हणून केरेसचं राष्ट्र एस्टोनिया हे युद्धाच्या ऐन मध्यभागी असायचं. त्यांना कधी सोव्हिएत संघराज्य कब्जात घ्यायचं तर कधी जर्मनी त्यांना जिंकून घ्यायचं!
विश्वविजेता बनायची केरेसची महान संधी महायुद्धामुळे हुकली आणि आलेखाइनचा मृत्यू झाला. जागतिक संघटनेने बुद्धिबळासाठी नियमावली तयार केली. यामध्ये जगज्जेत्याला आव्हानवीर ठरवण्यासाठी एक स्पर्धा घेण्याचं ठरलं. स्पर्धेचा विजेता हा आव्हानवीर ठरणार होता. अशा पाच स्पर्धा केरेस खेळला आणि तब्बल चार वेळा तो उपविजेता ठरला! हातातोंडाशी आलेला घास हुकणं म्हणजे काय ते इथं कळतं. लागोपाठ चार वेळा उपविजेता ठरणाऱ्या केरेसविषयी अनेक दंतकथा आहेत- सोव्हिएत अधिकाऱ्यांना फक्त रशियन वंशाचे जगज्जेते हवे होते. या एस्टोनियन मांडलिक राज्याच्या नागरिकाला जगज्जेता बनू देणं हा त्यांना अपमान वाटत असे आणि म्हणून त्यांनी केरेसला कधीही जगज्जेता होऊ दिलं नाही, पण या सगळय़ांना स्वत: केरेसनं कधीही पुष्टी दिली नाही.
आयुष्यभर जगज्जेतेपदासाठी झगडून केरेसच्या तब्येतीवर परिणाम होत होता. १९७५ साली वयाच्या ५९ व्या वर्षी कॅनडामध्ये वॅन्कुव्हर येथे स्पर्धा जिंकून परत येत असताना, वाटेत फिनलँडची राजधानी हेलसिंकी इथं पॉल केरेसला हृदयविकाराचा झटका आला आणि तेथेच त्याचं निधन झालं. त्याचं शव टॅलिन इथं नेण्यात आलं आणि कोणाही जगज्जेत्याला हेवा वाटेल अशी मानवंदना त्याला देण्यात आली. तब्बल एक लाख लोक त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजर होते. जागतिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी विश्वविजेते मॅक्स येवे स्वत: जातीनं आले होते. एस्टोनियन सरकारनं २००० साली शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव केला. चलनी नोटेवर त्याचं चित्र छापण्यात आलं. सोव्हिएत संघराज्यानं १९९१ साली त्याच्या नावाचं तिकीट काढलं होतं. अनेक जगज्जेत्यांना हा मान मिळाला नसेल. आता दर वर्षी वॅन्कुव्हर(कॅनडा) आणि टॅलिन (एस्टोनिया) इथं ‘केरेस स्मृती स्पर्धा’ न चुकता भरवल्या जातात.
केरेसनं आयुष्यात सगळं अपयश न कुरकुरता सोसलं. त्याच्यावर अन्याय झालाही असेल, पण त्यानं निमूटपणे आपल्या दुर्दैवाला तोंड दिलं. याउलट व्हिक्टर कोर्चनॉयची गोष्ट आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या लाडक्या अनातोली कार्पोवला सर्व प्रकारच्या सवलती मिळतात आणि त्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला बाहेर पडलं पाहिजे या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन कोर्चनॉयनं सोव्हिएत संघराज्याला रामराम ठोकला. त्या काळी कोणत्याही खेळाडूला संघराज्याबाहेर जायचं असेल तर आपली बायको आणि मुलं यांना बरोबर नेता येत नसे. आपल्या प्रियजनांना ओलीस ठेवल्यानंतर कोणीही पळून जाणार नाही अशी सरकारची अटकळ होती आणि ते खरंही होतं; पण त्यांनी व्हिक्टर कोर्चनॉय नावाच्या बुद्धिबळप्रेमी ग्रॅण्डमास्टरला पुरतं ओळखलं नव्हतं.
कोर्चनॉय हॉलंड येथे १९७६ साली खेळायला गेला तो परत आलाच नाही. तेथून त्यानं स्वीस सरकारकडे शरणार्थी म्हणून नागरिकत्व मागितलं आणि त्याला ते मिळालंही! सोव्हिएत सरकारची या प्रकरणात छी-थू झाली. पण आंतरराष्ट्रीय दडपणामुळे त्यांना कोर्चनॉयच्या कुटुंबीयांना त्रास देता आला नाही. मुलाला तुरुंगात टाकल्याची बातमी कोर्चनॉय महत्त्वाची स्पर्धा खेळत असताना सोडून देण्यात येत असे. असा हा मनानं कणखर असलेला कोर्चनॉय किती महान खेळाडू होता, हे तुम्हाला त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीवरून कळेल.
व्हिक्टर कोर्चनॉय १९७६ साली पळून जाईपर्यंत सहा वेळा सोव्हिएत संघराज्याच्या ऑलिम्पियाडच्या सुवर्ण पदक विजेत्या संघाचा मानकरी होता. त्याच्या खेळामुळे पाचही वेळा त्याचा संघ युरोपिअन सांघिक स्पर्धा जिंकला होता आणि जगज्जेतेपदाच्या शर्यतीत १९६२ ते १९९१ या तीन दशकांत तो कायम होता. तब्बल चार वेळा तो सोव्हिएत संघराज्याचा अजिंक्यवीर होता! एवढंच नव्हे तर स्विस संघाकडून १९७८ च्या ब्युनोस आइरेस इथल्या ऑलिम्पियाडमध्ये त्यानं पहिल्या पटावर वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं. दोन देशांकडून ऑलिम्पियाड खेळणं आणि दोन्हीकडून सुवर्ण! इतके सातत्य बाकी कोणालाही शक्य झालं नसतं- आणि तेही जगज्जेतेपदाच्या शर्यतीत सतत अपयश पदरात पडत असताना!
सुरुवातीला कोर्चनॉयची कोंडी करण्याचे भरपूर प्रयत्न सोव्हिएत सरकारनं केले. त्याला स्पर्धेसाठी बोलावणाऱ्या आयोजकांवर सोव्हिएत खेळाडू बहिष्कार टाकत असत. अर्थात ते स्वत:हून नसून सरकारच्या दडपणाखाली असायचं. कोर्चनॉयची शैली त्याच्या स्वभावाप्रमाणे होती. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत तो कायम विजयासाठी खेळत असे. मुख्य म्हणजे प्रतिहल्ला हा त्याच्या खेळाचा स्थायिभाव होता. प्रतिस्पर्ध्याला आक्रमण करण्याची संधी द्यायची आणि त्यानं त्यामध्ये थोडी चूक केली तर जोरदार प्रतिहल्ला करून त्याला नामोहरम करायचं असं व्हिक्टर कोर्चनॉयचं धोरण असे.
व्हिक्टर कोर्चनॉयला पराभव सहन होत नसे. नुकताच नागपूरला खेळून गेलेला रशियन ग्रँडमास्टर पीटर स्विडलर हा नवा असताना कोर्चनॉयशी एक डाव जिंकला. दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी कोर्चनॉय सर्व लोकांच्या देखत त्याला म्हणाला, ‘‘तुला बुद्धिबळ नीट खेळता येत नाही.’’ या म्हाताऱ्याच्या तोंडी कोण लागणार असं मानून बाकी सर्व लोक गप्प बसायचे. पण सचिन तेंडुलकरचा चाहता असलेला स्विडलर गप्प बसला नाही. त्यानं नम्रपणे उत्तर दिलं, ‘‘खरं आहे. मला खूप शिकायचं आहे; पण आतापर्यंत जे शिकलो आहे ते तुम्हाला हरवण्याइतकं पुरेसं नाही का?’’ हॉटेलच्या भोजनगृहात एकच हशा पिकला आणि कोर्चनॉय निरुत्तर झाला.
अनेक वेळा जगज्जेतेपदाच्या भोज्ज्याजवळ जाऊन निराश झालेला कोर्चनॉय अखेर जागतिक विजेता झाला तो जागतिक ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या अजिंक्यपद स्पर्धेत! दुधाची तहान ताकावर भागवणं म्हणतात ते याला. तब्बल ५० वर्षे जगातील अव्वल खेळाडूंमध्ये राहणाऱ्या या बुद्धिबळवेडय़ाला इटलीमध्ये २००६ साली मिळालेलं ज्येष्ठांचं अजिंक्यपद सुखावून गेलं असेल. तरीही २००९ ला तरुणांमध्ये खेळून वयाच्या ७८ व्या वर्षी मिळालेलं स्विस राष्ट्रीय अजिंक्यपद त्याची खरी प्रतिभा दर्शवतं. असा हा असामान्य प्रतिभावान खेळाडू ६ जून २०१६ साली वयाच्या ८५ व्या वर्षी दिवंगत झाला.
जाता जाता उल्लेख करावासा वाटतो तो किशनलाल या दुर्दैवी हिऱ्याचा! मीर सुलतान खानविषयी सर्वानाच माहिती आहे, पण भारताचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू मॅन्युएल एरन यांनी त्यांच्या ‘Chess Mate’ या मासिकात जानेवारीमध्ये एक लेख लिहून किशनलाल या खेळाडूविषयी माहिती दिली आहे. सर उमर हयात खान यांनी सुलतान खानला मदत म्हणून किशनलाल या मथुरेच्या खेळाडूला १९२८ मध्ये पाचारण केलं होतं आणि किशनलाल सुलतान खानला सहजी पराभूत करत होता हे बघून त्यांना धक्का बसला. परंतु त्यांनी किशनलालला मदत करणं दूर, पण त्याला बुद्धिबळ खेळण्यापासून लांब ठेवलं. मॅन्युएल एरन यांना ताजमहालविषयीची दंतकथा आठवते. शाहजहानने कोणी दुसरा ताजमहाल बांधू नये म्हणून कारागिरांचे हात तोडले होते. तसंच काहीसं उमर हयात खान यांनी किशनलालच्या बाबतीत केलं आणि त्याचं बुद्धिबळ बंद करून दुसरा सुलतान खान होऊ दिला नाही. किशनलालनं खेळलेले डाव एरन यांना मिळाले आणि त्यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूला किशनलालची प्रतिभा जोखता आली. भारताचं दुर्दैव असं की किशनलाल १९३४ साली हलाखीत निधन पावला.
जगज्जेते सगळय़ांच्या लक्षात राहतात. इतिहासात त्यांची नावं सुवर्णाक्षरात लिहिली जातात, पण त्यांच्याएवढीच प्रतिभा असलेले खेळाडू विविध कारणांनी मागे पडतात. या खेळाडूंनी इतिहासात आपली नावं विश्वविजेते म्हणून नव्हे, तरी उत्तम खेळाडू म्हणून रसिकांच्या मनावर कोरून ठेवली आहेत हे नक्की.
gokhale.chess@gmail.com