प्रा. विजय तापस
मराठी रंगभूमीवर वावरलेल्या आणि कदाचित एक काळ गाजवलेल्या अनेकानेक नाटककार, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार यांची आज कुणी आठवणही काढत नाही. काळाच्या महाविवरात यच्चयावत सगळंच्या सगळं गडप होण्याचा जो नियम आहे, त्याला अनुसरून मराठी रंगभूमीवर वावरलेले शेकडो लोक जे एकदा नाहीसे झाले ते झाले. त्यांची क्षिती करतो कोण? असाच एक नाटककार म्हणजे विनायक आत्माराम पाठारे! माझे ठाण्याचे ग्रंथप्रेमी सन्मित्र मकरंद जोशी यांनी मला या पाठारेंची आठवण करून दिलीच, पण त्यांचं ‘कलावंतीण’ हे नाटकही त्यांनी मला अगत्याने पाठवलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच! एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं एक प्रभावी नाटक म्हणून ‘कलावंतीण’ या नाटकाचा गौरव करावा की, स्वत:ला ‘कलावंतीण’ म्हणवून घेत गावातल्या चारदोन धनाढय़ उच्चवर्णीय पुरुषांच्या कामभोगाचं साधन होऊन राहणाऱ्या स्त्रियांबद्दल खंत बाळगावी हे कळेनासं झालं आहे. असा प्रश्न पडत असला तरी मला ‘कलावंतीण’साठी विनायक पाठारे यांचे आभारच मानावेसे वाटतात. त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून एक अस्सल सामाजिक दस्तावेज महाराष्ट्रीय समाजापुढे सादर केला आहे.
कलावंतीण, देवळी, भाविणी, पेर्णी, चेडवा, देवदासी, मुरळी अशा विविध नावांनी महाराष्ट्र आणि शेजारच्या गोव्यात जगणाऱ्या स्त्रियांचे समूह म्हणजे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने आणि तथाकथित धर्मव्यवस्थेने जाणीवपूर्वक निर्माण केलेले भोगदासी ऊर्फ वेश्यांचेच समूह होते- आणि आजही आहेत- यात संशय नाही. ‘धार्मिक विधींची कलाबूत लावली म्हणजे त्याच्या आडचं हिडीस सत्य लपत नाही’ हाच आक्रोश प्रत्येक कलावंतीण, देवळी, भाविणी, पेर्णी, चेडवा, देवदासी, मुरळी कधी उघडपणे आणि अनेकदा खासगीत करत आल्या आहेत. कलावंतिणींच्या, भाविणींच्या किंवा मुरळय़ांच्या मनात कितीही लाज-शरम असली, कितीही संताप असला तरी त्या रोजचं जगणं गुमान जगत राहतात, याला एकच कारण म्हणजे भोकाड पसरणारं त्यांचं पोट! स्वत:चं आणि या स्त्रियांवर अवलंबून असणाऱ्यांचं पोट भरण्यासाठी त्या मनातला टाहो दाबून टाकून जगत आल्या आहेत. त्यांच्या या अशा जगण्याचं एक काळंशार पोट्र्रेट म्हणजेच पाठारेंचं ‘कलावंतीण’!
विनायक आत्माराम पाठारे यांनी लिहिलेल्या ‘हिंदूसमाज आणि पतित स्त्रियांची सुधारणा’ या पुस्तकाच्या वाचनप्रभावातून प्रबोधनकार ठाकरे यांनी पाठारे यांच्याकडून त्याच विषयावर नाटक व्हावं असा आग्रह त्यांच्याकडे धरला, तो मनावर घेऊन पाठारे यांनी ‘कलावंतीण’चा घाट घातला. नाटक लिहून झाल्यावर त्याची प्रत्यक्ष रंगमंचावर एन्ट्री होणं- तीही वेळच्या वेळी होणं फार महत्त्वाचं असतं. याबाबतीत ‘कलावंतीण’ सुदैवी ठरलं. नाटक लिहून झाल्यावर चार वर्षांतही जरी ते रंगमंचावर आलं नाही, तरी ते नाटककाराच्या ट्रंकेत कायमचं पडून राहिलं नाही. ‘चित्तरंजन नाटय़ समाज’ या संस्थेने नाटकाचा पहिला प्रयोग तेव्हाच्या विख्यात ‘ग्रँटरोड बॉम्बे थिएटर’मध्ये ६ सप्टेंबर १९३७ रोजी सादर केला. नाटकातली पदं सुंदर मानकर यांनी रचली होती. नऊ पुरुष आणि चार स्त्रीपात्रं असलेल्या या नाटकातल्या सर्वच्या सर्व भूमिका या पुरुषांनीच केल्या होत्या. कदाचित कलावंतिणींच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या या नाटकात स्त्रियांनी स्त्रियांच्या भूमिका करायला तेव्हाच्या स्त्री-कलावंत तयार झाल्या नसाव्यात. याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही, कारण पतिव्रता सिंधूची भूमिका करणं वेगळं आणि मालकांची वाट बघत बसलेल्या कलावंतिणीची भूमिका करणं वेगळं! स्त्री कलावंतांचं प्रत्यक्ष आयुष्य आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका यांची गल्लत करणाऱ्या समाजात कलावंतिणीची भूमिका साकार करायला स्त्री-कलावंत तयार झाल्या नसतील तर ते स्वाभाविकच म्हणायला हवं. हे नाटक कोणाचं आहे असा प्रश्न नाटक आलं तेव्हाही निर्माण झालाच. मात्र या नाटकातला आशयझोत जरी ‘कलावंतीण’ म्हणून जगण्याचा मार्ग पत्कराव्या लागलेल्या स्त्रियांवर असला, तरी नाटकाचा खरा रोख सामाजिक विकृतता, पुरुषी भोगलालसा आणि सामाजिक सुधारणा यावर आहे. रूढ विवाह संस्कार आणि विवाहाचे प्रकार यांना सुधारणावादी सतीश आणि श्रीरंग यांचा असलेला विरोध आणि त्यातून पुढे आलेला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’शी नातं सांगणारा ‘सहवास करार’ हा या नाटकाचा फोकल पॉइंट आहे हे विसरून चालणार नाही. या नाटकाचं मला भावलेलं एक वैशिष्टय़ म्हणजे नाटकात काही पात्रांच्या तोंडी असलेली गोवेकरी मराठी आणि प्रमाण मराठी यांची संमिश्रता! गोव्याकडच्या मराठीतले हेल नाटकाला एक प्रादेशिक आयडेंटिटी देतातच, पण पात्रांनाही एक प्रकारची विश्वासार्हता देतात. मला हा भाषेचा संगम खूप अर्थपूर्ण वाटतो. त्यातही नाटक ज्या कलावंतिणींशी निकटचा संबंध राखून आहे त्यांना समजून घेताना हा भाषिक प्रयोग फार साह्यकारी ठरतो. मात्र हा फार पुढचा भाग झाला.
मुळात बोलायचं तर कलावंत, देवळी, भाविणी, पेर्णी, बंदे, र्फजद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला देवदासी हे बिरुद प्राप्त झालेलं आपल्याला लक्षात येतं. ‘देवदासी’ या एका समाजगटातही सहज लक्षात येणारे उच्चनीच भेदाभेद होते. अर्थात त्यांच्यावर सत्ता गाजवणाऱ्यांच्या दृष्टीनं हे अंतर्गत भेदाभेद सोयीचेच होते. या भेदभावांमुळे धर्माच्या नावाने त्यांचं शोषण करणं सोपं होतं. गावातले जमीनदार देवदासींना रखेल म्हणून वागवत. प्रामुख्याने रत्नागिरी आणि प्रामुख्याने गोव्यात गौड सारस्वत ब्राह्मण या जातिसमूहातल्या जमीनदारांकडे सर्व सत्ता एकवटली होती. गोव्यातल्या धनिक ब्राह्मण पुरुषांनी कलावंतीणी, भाविणी यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून पिढय़ांची कालक्रमणा केलेलीही दिसते. सणउत्सवांना देवळात, तर लग्नमुंजींच्या निमित्ताने श्रीमंतांच्या घरात कलावंतिणींचं नाचगाणं होत असे. त्यातूनच देहविक्रयाची पायवाट निर्माण होऊन पुढच्या काळात तोच हमरस्ता झाला. त्यातून पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. हिंदूंच्या या स्वैराचाराचा परिणाम अन्य धर्मीयांवरही झाल्याशिवाय राहिला नसणार. कदाचित त्यामुळेच सतराव्या शतकाच्या शेवटी कलावंतिणींना गोव्याबाहेर हद्दपार करण्याचा हुकूमही राज्यकर्त्यांनी काढला होता. त्याला अर्थातच धनिकांचा आणि ब्राह्मणांचा विरोध होताच. गंमत अशी की, ब्रिटिश राज्यात स्त्रीशोषणाला कायद्याने बंदी अस्तित्त्वात येत असताना गोव्यात मात्र देवदासींच्या शोषणाला उपयुक्त ठरेल असे बदल कायद्यात केले गेले. देवदासी ही हिंदूंची धार्मिक प्रथा असून, त्यात पोर्तुगीज सरकारने ढवळाढवळ करणं योग्य नाही, असं या जमीनदारांनी पोर्तुगीजांच्या गळी उतरवून शोषणाचा जणू परवानाच मिळवला.
कलावंतीण ज्या विधीच्या माध्यमातून जन्माला येई तो विधी ‘शेंस’ विधी म्हणून ओळखला जाई. शेंस विधी म्हणजे जणू काही लग्नच. फरक फक्त इतकाच, की ‘वर’ म्हणून समोर उभी असायची ती पुरुषवेशातील मुलगी. केव्हा केव्हा हे लग्न एका तलवारीशी किंवा कटय़ारीशी होत असे. मग या देवाला नवरा मानणाऱ्या स्त्रिया काळाच्या ओघात रखेल्या म्हणून राहत. कालौघात देवदासींचे दोन गट पडले : कलांवतिणी वा नायकिणी आणि भाविणी. पुरुष हे नाईक आणि देवली म्हणून ओळखले जात. कलावंतिणी गायिका व नर्तकी असत. साधारणत: त्या रखेल्या म्हणून आयुष्याला सामोऱ्या जात. भाविणींपेक्षा त्यांचा दर्जा वरचा असे. भाविणी कमी शिकलेल्या असत. त्या मंदिरांची झाडलोट करीत, दिवे लावीत आणि ईश्वराच्या पूजेत भाग घेत. त्यांना जगण्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यावाचून दुसरा मार्गच उपलब्ध नव्हता. गोव्यात या समाजगटाची संख्या चांगलीच नजरेत भरण्याएवढी होती हे लक्षात घेण्यासारखं आहे. आज संगीतक्षेत्रात ज्यांचा आपण प्रचंड आदराने उल्लेख करतो, त्यापैकी काही स्त्रिया तरी या समाजगटातल्या स्त्रियांची संतती होत्या आणि आहेतही. आज ‘मराठा गोमंतक समाज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटातले अनेक पुरुष राजकारणात ख्यातकीर्त पावलेले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर याच समाजातून आलेले होते.
या समाजाची एवढी नोंद इथे केली आहे ती नाटकाच्या कथानकाशी या सर्वाचा थेट संबंध आहे म्हणून. नाटकातली वत्सला, नीरा या तर थेट स्वत:च्या कलावंतीणपणाबद्दल, त्यांच्या आयुष्यात आलेल्या शेटींबद्दल उघडपणे बोलतात. या दोघींच्याही आयुष्यात किमान चार पुरुष वेगवेगळय़ा टप्प्यांवर येऊन गेले आहेत. आपल्याकडे कालपर्यंत येणारा प्रतिष्ठित पुरुष अचानक आपल्याकडे येईनासा झाला आहे आणि त्यामुळे जगण्याचा आर्थिक भार पेलणं कसं कठीण झालं आहे याबद्दल त्या दोघींतली चर्चा नाटकाला एक वेगळी खोली प्राप्त करून देते. वत्सला आपली धाकटी बहीण असलेल्या सुशीलाला आपल्याच मार्गाने जाण्याचा उपदेश करते आहे.( कारण त्यातून तिचाही आर्थिक प्रश्न सुटणार आहे. ) मात्र सुशीला त्याला नकार देताना दिसते. तिला आशा आहे की, शिकला सवरलेला, स्वतंत्र विचार करणारा, पारंपरिक लग्नसंस्थेला विरोध करणारा सतीश तिच्याशी लग्न करेल. तिला रीतसर लग्न हवं आहे. मात्र तिची ही मागणी सतीश धुडकावतो तेव्हा ती आत्महत्या करते. सुशीलाला ‘सतीशपासून दूर राहा’ असा उपदेश करणारी वत्सला हीच पुढे सतीशशी संबंध प्रस्थापित करते. तो तिला पत्नी म्हणून स्वीकारतो! आवडत्या पुरुषाने रीतसर लग्नाला नकार दिल्याने ज्या स्त्रीने आत्महत्या केली, तिचीच बहीण त्याच पुरुषाशी संबंध जोडते हे विपरीत वास्तव आहे हे खरं, मात्र कुणातरी पुरुषाच्या आश्रयानं राहाण्याखेरीज जिला पर्यायच उरलेले नाहीत तिने काय करावं, हाच भयानक प्रश्न इथे शिल्लक राहतो. नीतीचे प्रश्न, नैतिकता आणि सुशीलेच्या मृत्यूचं दु:ख ही वत्सलेसाठी दुय्यम गोष्ट ठरते. स्वत:ला जगवायचं असेल तर नैतिकतेची मिजास करून चालणार नाही, हे सत्य वत्सलेने स्वीकारलं आहे असं इथे दिसतं. सतीश हा किती उथळ आणि एका बाजूने किती मतलबी आहे हेही नाटककार दाखवतो. स्वत:ला सुधारक म्हणवणारेही अनेकदा निव्वळ स्वार्थीच नव्हे, तर बुरसटलेलेही कसे असतात हेच नाटककार इथे दाखवून देतो.
नाटकात कलावंतिणी-भाविणी यांच्या संपर्कात असणारी आबासाहेब-माधवराव ही जोडी म्हणजे बाहेरख्याली, बदफैली पुरुष. यातले आबासाहेब म्हणजे तर दांभिकतेचा अस्सल नमुना! कलावंतिणीपासून घरच्या मोलकरणीपर्यंत कोणत्याही स्त्रीची शेज त्यांना प्रिय आहे. त्यांचाच मुलगा सतीश. तो एके ठिकाणी बापाला म्हणतो की, ‘‘शुद्ध दांभिक आहात तुम्ही! खबरदार तोंडून ब्र काढाल तर. घरात एक लग्नाची बायको-मग ती नीरा- ती एक धंदेवाईक वेश्या तरी होती; तेही असो; पण घरात कामाला ठेवलेली ती सखू मोलकरीण..’’ पुढे नाटकात येणारे कांतीलाल, हिरालाल हे गुजराती व्यापारी म्हणजे तर किळसवाणा प्रकार. त्यांच्या तोंडी भाषाच ‘स्त्री नावाची वस्तू भोगण्याची!’ त्यांच्या दृष्टीने स्त्रीची योनी हीच मोलाची. योनीपल्याड असलेल्या स्त्रीशी त्यांचा जणू कधी संबंधच आलेला नाही. नाटकात अशाच मानसिक विकृतीशी नातं सांगणारे किंवा कसलाही कामधंदा न करता अत्यंत खुशालीत कलावंतीण स्त्रियांच्या जिवावर जगणारे नात्यागोत्यातले पुरुष आपल्याला चारदोन पात्रांच्या रूपाने वावरताना दिसतात.
विनायक पाठारे यांचं गोव्यातला असो वा महाराष्ट्रातला, त्यांच्या नाटय़लेखनाच्या काळातला जो मराठी भाषिक समाज होता आणि आजही आहे, त्याबद्दलचं एक विधान फारच लक्षणीय आहे. खरं तर ते विधान आजचंच वास्तव सांगणारं आहे. गुजराती-बनिया वर्गाने सर्व प्रकारचा व्यापार कसा स्वत:च्या ताब्यात ठेवला आहे याबद्दल बोलताना एक पात्र म्हणतं, ‘‘ सारा बाजारच्या बाजार या समाजाने काबीज तर केलाच, पण इथल्या बाजारबसव्याही आपल्या कब्जात नि काबूत ठेवल्या! गोवे प्रांतातील झाल्या, तरी त्या आमच्या महाराष्ट्रीय भगिनीच नव्हत का? त्यांचा उदरनिर्वाह आम्हाला चालवता येऊ नये, ही किती शरमेची गोष्ट आहे आपणाला! आताचा काळच असा आला आहे, की आपणाला या भांडवलवाल्या वर्गाचंच दास्य पत्करावं लागणार आहे. रानडे, टिळक, गोखल्यांच्या महाराष्ट्राला या शेटजींच्याच तोंडाकडे आशाळभूताप्रमाणं पाहावं लागणार आहे.’’ या विधानातलं सत्यासत्य जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवेल यात शंका नाही. मला एकच वाटतं, पूर्ण प्रामाणिक आंचेने एका आगळय़ावेगळय़ा विषयाला नाटकाच्या माध्यमातून भिडणाऱ्या विनायक आत्माराम पाठारे या तडफदार नाटककाराची मराठी रंगभूमीच्या तथाकथित व्यासंगी संशोधक-अभ्यासकांनी मुळीच कदर केली नाही. मराठी रंगभूमीचे इतिहासकार प्रामाणिक आणि निरपेक्ष बुद्धीने इतिहासलेखन करणारे आहेत यावर खरंच का विश्वास ठेवायचा? असा विश्वास तुम्ही ठेवता? की ‘अळीमिळी गुपचिळी’ हाच वसा पुढे चालवता?
vijaytapas@gmail.com