प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यंगचित्रं हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय कलाप्रकार आहे. पण आश्चर्य म्हणजे याचं नेमकं, शास्त्रशुद्ध शिक्षण, पदवी किंवा ज्ञान देणारी कलाशाखा कुठेही उपलब्ध नाही. अनेक व्यंगचित्रकारांची पुस्तकं, त्यांना संपादक आणि विचारवंतांनी लिहिलेल्या प्रस्तावना, विद्यापीठातील काही भाषणं, व्यंगचित्रकारांनी स्वत: आपल्या कलेसंदर्भात लिहिलेले लेख तसंच अनुभव यावरच व्यंगचित्रकलेच्या अभ्यासाची भिस्त असते. व्यंगचित्र कसं काढावं यावर शेकडो पुस्तकं उपलब्ध असली तरी त्यापैकी बहुतेक पुस्तकं ही ‘चित्र कसं काढावं’ या शाळकरी प्रकारातलीच आहेत. परंतु व्यंगचित्रांत महत्त्वाची असते ती विनोदी कल्पना! आणि ती अवलंबून असते प्रत्येकाच्या प्रतिभेवर. म्हणूनच उत्तम चित्र काढता आलं तरी त्यात विनोदाचे प्राण फुंकले की मगच ते जिवंत भासू लागतं. आणि इथंच सगळी मेख आहे.

तरीही या कलाप्रकाराची निर्मितीप्रक्रिया अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून काहींनी प्रयोग किंवा प्रयत्न केले आहेत.

मायकेल फोक्स (Michael folks) हे जुन्या पिढीतील लोकप्रिय व्यंगचित्रकार. त्यांनी ‘कार्टून्स’ या त्यांच्या पुस्तकात या कलेच्या दृश्य स्वरूपाविषयी काही मूलभूत विचार खुसखुशीत भाषेत मांडले आहेत अन् काही छान टिप्सही  दिल्या आहेत. चित्राची रचना कशी असावी, पात्ररेखाटन, चेहरेपट्टी, हावभाव, कपडे यांत विविधता असावी, हे ते सांगतात. उदा. श्रीमंत माणूस, सैनिक आणि बँक ऑफिसर यांचे चेहरे वेगळे असावेत हे ते सोदाहरण दाखवून देतात. अर्थात चित्रांची कल्पना आणि विनोद हे ‘गॉड गिफ्ट’ आहे, असेही ते नमूद करतात. व्यंगचित्रकाराचं ‘डेस्क’ कसं असतं याचं त्यांनी काढलेलं सोबतचं चित्र त्यांच्या मिश्कीलपणाची प्रचीती देतं.

मॉर्ट गरबर्ग हे आणखी एक व्यंगचित्रकार आणि संपादक. ‘कार्टूनिंग दि आर्ट अ‍ॅण्ड बिझिनेस’ या त्यांच्या पुस्तकात चित्रं कशी काढावीत इथपासून ते ती कशी विकावीत यांच्या टिप्स त्यात दिल्या आहेत. जगभरातल्या अनेक व्यंगचित्रकारांचे लेख त्यात आहेत. सतत स्केचिंग करत राहा, हा उपयुक्त सल्ला अनेकांनी दिला आहे. काही घडलेले गमतीशीर प्रसंगही या पुस्तकात दिले आहेत.

एक व्यंगचित्रकार सतत एकच कार्टून ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाकडे पाठवत असे आणि ते दरवेळी नाकारले जात असे. (‘न्यू यॉर्कर’कडे दर आठवडय़ाला अंदाजे चार हजार व्यंगचित्रं प्रसिद्धीसाठी येतात आणि त्यातील केवळ तीसच छापली जातात!) एकदा संपादक त्या व्यंगचित्रकाराला म्हणाले की, ‘हे चित्र मी यापूर्वी पाहिलं आहे!’ त्यावर तो व्यंगचित्रकार निर्विकारपणे म्हणाला की, ‘जोपर्यंत तुम्ही ते छापत नाही तोपर्यंत तुम्ही ते अनेकदा पाहणार आहात!’

एकूणात जागतिक व्यंगचित्रकलेत ‘न्यू यॉर्कर’चा वाटा खूप मोठा आहे. वाचकांमध्ये या कलेविषयी अभिरुची वाढवण्यासाठी गेली अनेक वर्षे ते एक मजेशीर उपक्रम/ स्पर्धा राबवीत आहेत. ते प्रत्येक अंकात मथळा किंवा लिखित भाष्य नसलेलं एक व्यंगचित्र प्रसिद्ध करतात. त्याला सुयोग्य मथळा किंवा वाक्य  सुचवा असं आवाहन करतात. आणि वाचकांच्या आलेल्या चार उत्तम कल्पना पुढील अंकात प्रसिद्ध करतात. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यापैकी सोबतचे हे एक चित्र. या गमतीशीर चित्रात वाचक कशा पद्धतीने विचार करतात आणि प्रतिक्रिया देतात, हे बघण्यासारखं आहे.

निक मेग्लीन हे ‘मॅड’ या जगविख्यात व्यंगचित्र नियतकालिकाचे अनेक र्वष संपादक होते. त्यांनी ‘ुमरस इलस्ट्रेशन’ या नावाचं एक पुस्तक संपादित केलं आहे. या पुस्तकात ते म्हणतात, ‘‘विनोद सुचण्यासाठी कोणताही फॉम्र्युला नाही. सुचलेला विनोद चांगला आहे की नाही हे सांगणं खूप अवघड असतं. कारण प्रत्येकाचा सेन्स ऑफ ुमर वेगळा असतो. आणि आपला सेन्स ऑफ ुमर सगळ्यात शार्प आहे असं प्रत्येकालाच वाटत राहतं. त्यामुळे चांगल्या कल्पना काही वेळेला फक्त स्केचबुकमध्ये राहतात आणि किरकोळ वाटणाऱ्या कल्पना लोक डोक्यावर घेतात. त्यामुळे व्यंगचित्रकाराने वाचकांच्या हास्याची अपेक्षा न करता खाली मान घालून काम करत राहणं हेच  योग्य आहे. वस्तुस्थितीचे मर्म समजावून घेऊन ते निर्भीडपणे रेषांद्वारे चित्रित करण्याचं कर्म करीत राहणं हाच व्यंगचित्रकारांचा धर्म आहे!’’

व्यंगचित्रकार काही वेळेला आपल्याला सुचलेल्या कल्पना साठवून ठेवतो आणि गरज पडेल तेव्हा वापरतो, हे व्यंगचित्रकार सायमन बॉंड यांनी सोबतच्या चित्रात मजेशीर पद्धतीने दाखवून दिलंय.

व्यंगचित्रकारांच्या अनेक राज्यांत संस्था आहेत आणि त्या आपापल्या परीने उपक्रम राबवीत असतात. महाराष्ट्रात ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’ ही संस्था नियमित काही उपक्रम करीत असते. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आणि विकास सबनीस हे दादरच्या सावरकर स्मारकात अनेक वर्षे व्यंगचित्रकला शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी वर्ग घेत असत. हे महत्त्वाचंच काम आहे. केरळची ‘कार्टून कला अकादमी’ ही उत्साही कलावंतांची संस्था. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसमोर देशभरातील व्यंगचित्रांचं प्रदर्शन त्यांनी आयोजित केलं होतं, यावरून त्यांची ऊर्जा लक्षात यावी. आणखी एक महत्त्वाचं काम बंगलोरची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट’ ही संस्था करते. संस्थेतर्फे वर्षभर विविध प्रदर्शनं, व्यंगचित्रं स्पर्धा, व्याख्यानं आयोजित करण्यात येतात. व्ही. जी. नरेंद्र (जे स्वत: व्यंगचित्रकार आहेत.) अत्यंत निष्ठेनं गेली १२ वर्षे हे काम करत आहेत. रायपूर, छत्तीसगढ येथून त्र्यंबक शर्मा हे गेली २५ वर्षे ‘कार्टून वॉच’ हे मासिक प्रकाशित करीत आहेत. बाळासाहेबांचा ‘मार्मिक’ही आता नव्या जोमानं प्रकाशित होत आहे. विवेक मेहेत्रे यांनी अनेक व्यंगचित्रकारांचे संग्रह प्रकाशित केले आहेत. अनेक व्यंगचित्रकारसुद्धा आपापल्या परीने कार्यशाळा घेऊन या कलेविषयी जागरूकता निर्माण करत असतात. ‘निवडक मराठी व्यंगचित्रं’ हा मी संपादित केलेला (सध्या फक्त वाचनालयातच मिळणारा) गेल्या १०० वर्षांचा मराठी व्यंगचित्रकलेचा इतिहास सांगणारा ग्रंथ हा देशपातळीवरील अभूतपूर्व ग्रंथ आहे. व्यंगचित्रकलेच्या बाबतीत या सर्व गोष्टी नक्कीच आश्वासक आहेत.

मराठीत व्यंगचित्रकलेचं मर्म समजावून घेऊन ते रसिकांपर्यंत पोहोचविण्यात अनेकांचा हातभार लागला आहे. त्यातील काही निवडक नावं घेणं आवश्यक आहे. मधुकर धर्मापुरीकर यांनी केवळ  व्यंगचित्रांविषयीचे रसग्रहणात्मक लेख लिहिले नाहीत, तर व्यंगचित्रांच्या पुस्तकांचा अबब संग्रह त्यांनी मोठय़ा कष्टाने जमवलेला आहे. ग्रंथसंग्राहक शशिकांत सावंत, लेखिका शकुंतला फडणीस, प्रा. प्रकाश चव्हाण यांनी या कलेविषयी सातत्यानं लिहिलं आहे. अवधूत परळकर यांनी तर ‘सर्वोत्तम सरवटे’ (लोकवाङ्मयगृह) हा ग्रंथ संपादित करून मोलाचंच काम केलं आहे. प्रा. अविनाश कोल्हे यांनी महाविद्यालयांमध्ये सातत्याने व्यंगचित्रकलेविषयीच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

अलीकडच्या काळात व्यंगचित्रं हा विषय अनावश्यकरीत्या नाजूक आणि भावनाप्रधान बनला आहे. एखाद्या व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्यामुळे एखादी व्यक्ती, समाज, राजकीय पक्ष, इतकेच नव्हे तर एखादं राष्ट्र हमरीतुमरीवर येणं हे निरोगी समाजाचं लक्षण नक्कीच नाही. ही व्यंगचित्रांची ‘नस्ती कटकट’ कायमस्वरुपी टाळण्यासाठी म्हणून आपल्याकडेही काही वर्षांपूर्वी पाठय़पुस्तकातील सर्व व्यंगचित्रं वगळण्याचा क्रांतिकारक निर्णय लोकशाही (!!) पद्धतीने घेण्यात आला. देशातील नवी पिढी व्यंगचित्रांच्या बाबतीत मठ्ठच राहावी यासाठीचे हे महत्त्वाचे अभिनंदनीय कृत्य!

या साऱ्या पाश्र्वभूमीवर गेले वर्षभर चाललेल्या या लेखमालेत जगातील शंभरहून अधिक व्यंगचित्रकारांची ओळख करून देण्यात आली.. ज्याचं वाचकांनी सहर्ष स्वागत केलं. हा प्रतिसाद सुखावणारा आहे. या कलेबाबत वेळोवेळी केलेलं भाष्य वाचून त्यांच्या चेहऱ्यावर किंचित का होईना, हास्य फुललं असेल, हे नक्की!

(समाप्त)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about drawing cartoon hasya ani bhasya dd70