रघुनंदन गोखले

एका बुद्धिबळ तत्त्ववेत्त्यानं लिहून ठेवलं आहे की, तुम्ही बुद्धिबळात प्रगती करत आहात याचा मापदंड कोणता? तर सुरुवातीला तुम्हाला मॉर्फी आवडतो. मग तुम्ही आलेखाइनच्या आक्रमक खेळाकडे आकृष्ट होता. आलेखाइन प्रतिस्पर्ध्याला क्षणाचीही उसंत न देता विद्युतगतीनं हल्ला चढवून मात देत असे. खरा आलेखाइन जाणून घ्यायचा असेल तर  बुद्धिबळ शिकावं आणि त्याचे अप्रतिम डाव बघावेत..

Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता साकारणार खलनायक! म्हणाला, “विक्षिप्त स्वभावाचं पात्र…”

‘दोघांमधला श्रेष्ठ कोण? कॅपाब्लांका की आलेखाइन?’ जोपर्यंत बुद्धिबळ खेळ अस्तित्वात आहे, तोपर्यंत बुद्धिबळ रसिक कायम वाद घालत राहणार. याचं मुख्य कारण असं की, दोघेही महान खेळाडू होते. दोघेही जगज्जेते होते. आणि मुख्य म्हणजे दोघांच्या शैलीत खूप फरक होता. कॅपाब्लांकाचा भर असे तो प्रतिस्पर्ध्याला खेळवत खेळवत नामोहरम करण्याकडे, तर आलेखाइन प्रतिस्पर्ध्याला क्षणाचीही उसंत न देता विद्युतगतीनं हल्ला चढवून मात देत असे. अमेरिकन ग्रँडमास्टर रूबेन फाईननं दोघांच्याही खेळाच्या शैलीचं फार सुंदर आणि समर्पक वर्णन केलं आहे. फाईन म्हणतो, ‘‘आलेखाइन विरुद्ध खेळताना अचानक वीज चमकावी तसा  हल्ला येत असे आणि काही कळण्याच्या आत प्रतिस्पर्ध्यावर मात होत असे. या उलट कॅपाब्लांकाच्या प्रतिस्पर्ध्याला कळत असे की, आपल्या राजावर काही वेळानं मात होणार आहे, पण ती थांबवायला तो असाहाय्य्य  असे.’’

यापूर्वी आपण कॅपाब्लांकाविषयी माहिती घेतली आहे आणि आज त्याला १९२७ साली पराभूत करून जगज्जेता बनलेल्या अलेक्झांडर आलेखाइनची कारकीर्द बघू या! एखाद्या खेळाडूला महान कधी मानले जाते? ज्या वेळी त्याची स्तुती त्याचे प्रतिस्पर्धी करतात. बघा माजी विश्वविजेता मॅक्स येवे आलेखाइन विषयी काय म्हणतो ते- ‘‘आलेखाइन बुद्धिबळाच्या पटावरील कवी होता. सामान्य खेळाडूला जे दृष्य पाहून घरी पिक्चर पोस्ट कार्ड पाठवावं असंसुद्धा वाटणार नाही त्या दृष्यामधून आलेखाइन महान काव्य तयार करत असे!’’

दोन दिवसापूर्वी अलेक्झांडर आलेखाइन या महान खेळाडूचा ७७वा स्मृतिदिन होऊन गेला. मॉस्कोमध्ये ३१ ऑक्टोबर १८९२ साली जन्मलेल्या आलेखाइनच्या बालपणाविषयी काही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु आपल्याला त्यात जास्त स्वारस्यही नाही. धनाढय़ कुटुंबात जन्मलेला आलेखाइन आपल्या मोठय़ा भावंडांकडून बुद्धिबळ शिकला. त्यात त्याला सुरुवातीला फार यश मिळालं नाही. परंतु पत्रानं खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धामध्ये तो सातत्यानं भाग घेत असे. (Correspondence Chessच्या विविध राष्ट्रांत संघटना आहेत. गावोगावी पसरलेल्या बुद्धिबळपटूंना आपली खेळी पोस्ट कार्डवर लिहून पाठवावी लागते आणि ३-४ दिवसांनी त्याचं उत्तर आलं की मग पुढील खेळी पाठवायची. हल्ली ई-मेलने काम चालते.)

मॉस्को बुद्धिबळ क्लबच्या वसंत ऋतूमधील बुद्धिबळ स्पर्धेत १९०७ साली १५ वर्षांच्या आलेखाइननं भाग घेतला. ही त्याची पटावरची पहिली स्पर्धा! अलेक्झांडरचा पहिल्या दहातही क्रमांक आला नाही, तर मोठा भाऊ अलेक्सी चौथा आला.

आपण बुद्धिबळ खेळायला उशिरा सुरुवात केली असं मानून दु:ख करणाऱ्यांसाठी आलेखाइनचं उदाहरण आदर्श ठरेल. पहिल्या दहांत क्रमांक आला नाही म्हणून हार मानणारा आलेखाइन नव्हता. त्यानं योग्य प्रकारे मेहनत घेऊन पुढील वर्षी त्याच स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आणि वर्षभरात अलेक्झांडर आलेखाइन हा मॉस्कोमधील सर्वोत्तम खेळाडू मानला जाऊ लागला. वयाच्या १६ व्या वर्षी सेंट पिटर्सबर्ग येथील कायद्याच्या महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला आणि तिथेही त्यानं सर्वोत्तम खेळाडू म्हणून नाव कमावलं.

जानेवारी १९१४ मध्ये आलेखाइनला पहिलं आंतरराष्ट्रीय यश मिळालं. सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एरन निमझोवीचबरोबर त्यानं संयुक्तपणे पहिलं बक्षीस मिळवलं. पण त्यापेक्षा एप्रिल १९१४ मध्ये त्यानं मिळवलेला तिसरा क्रमांक जास्त बहुमोलाचा होता. कारण पहिला आला होता जगज्जेता लास्कर आणि उपविजेता होता कॅपाब्लांका. असं म्हणतात की रशियाच्या झार निकोलसनं या स्पर्धेदरम्यान लास्कर, कॅपाब्लांका, आलेखाइन, ताराश आणि मार्शल यांना ‘ग्रँडमास्टर’ हा किताब दिला. लगेच पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेतही आलेखाइननं पहिला क्रमांक पटकावलाच.

जर्मनीमध्ये मॅनहॅम येथे जुलै – ऑगस्ट १९१४ मध्ये स्पर्धा सुरू होती आणि पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं. सगळय़ा रशियनांची धरपकड झाली- त्यात बुद्धिबळपटूही होते. आलेखाइनला एका महिन्यात सोडून देण्यात आलं आणि स्वित्झर्लंड, इटली, इंग्लंड, स्वीडन आणि फिनलंड अशा खडतर मार्गे आलेखाइन रशियात पोचला. तेथे तो स्वस्थ बसला नाही. जर्मनीत अडकलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी त्यानं निधी उभारण्यासाठी अनेक प्रदर्शनीय सामने खेळायला सुरुवात केली. तसेच रेड क्रॉससाठीही त्यानं काम केलं. त्यानं एका वेळी डोळे बांधून टर्नोपोल येथील रशियन लष्करी इस्पितळात खेळलेला डाव प्रसिद्ध आहे तो त्याच्या एका उत्तम चालीसाठी! वजिराचा बळी देऊन आलेखाइननं तो डाव जिंकला होता.

आता जगज्जेत्या कॅपाब्लांकाविरुद्ध फक्त आलेखाइन लढत देऊ शकतो अशीच सर्वाची खात्री झाली, कारण आलेखाइननं येईल त्या स्पर्धेत जिकंण्याचा सपाटा लावला होता. कॅपाब्लांकानं आलेखाइनला १०,००० डॉलर बक्षीस जमा केल्यासच त्याचं आव्हान स्वीकारू असं सांगितलं. त्या काळी जागतिक बुद्धिबळ संघटना अस्तित्वात नव्हती. जगज्जेता ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे नियम ठरवत असत.

आलेखाइन पैसे जमा करण्यासाठी युरोपभर फिरून प्रदर्शनीय सामने खेळू लागला. याच काळात घडलेली एक कथा मनोरंजक आहे. आलेखाइन फ्रान्समध्ये रेल्वेनं जात असताना मधेच गाडीचं इंजिन बंद पडलं. (आज बसेस बंद पडतात तसं त्या काळी रेल्वेचं इंजिन बंद पडत असावं). गाडीतील सर्व प्रवाशांना  जवळच्या खेडय़ात रात्र काढावी लागणार होती. हॉटेलमध्ये सामान टाकून आलेखाइन मनोरंजनासाठी बाहेर पडला. सिनेमा आणि बुद्धिबळ क्लब यामधलं त्यानं काय निवडलं असेल हे सांगण्याची गरजच नाही. एका पबमध्येच बुद्धिबळाचा क्लब होता. 

क्लबमध्ये एक खेळाडू सर्वाना पटापट हरवत होता आणि त्याच्या विरुद्धच्या बिचाऱ्या खेळाडूला आलेखाइननं न राहवून एक खेळी सुचवली. त्याबरोबर त्या क्लबच्या चॅम्पियनचा राग अनावर झाला. ‘‘एवढीच जर खुमखुमी असेल तर स्वत: खेळ.’’ त्यानं आलेखाइनला आव्हान दिलं आणि वर स्वत: एक प्यादं कमी घेऊन खेळायची ऑफर दिली. आलेखाइनला तर वेळ घालवायचा होता. त्यानं आव्हान स्वीकारलं आणि मुद्दाम कमजोर चाली खेळून तो हरला आणि आधी ठरल्याप्रमाणे त्यानं १ फ्रॅंक विजेत्याला दिला. देताना आलेखाइन म्हणाला, ‘‘तुम्ही एक प्यादं कमी घेतलं त्याचा तुम्हाला फायदा मिळाला असं मला वाटतं. म्हणून आपण परत एक डाव खेळू. या वेळी मात्र मी एक हत्ती कमी घेणार! म्हणजे मलाही तो फायदा मिळेल.’’ क्लबमधले सगळे हसू लागले. तो चॅम्पियन म्हणाला, ‘‘तुम्हाला पैसे जास्त झाले असतील तर माझी हरकत नाही.’’ त्यानं १० फ्रॅंकचा प्रस्ताव ठेवला. आलेखाइन तयार होताच. डाव सुरू झाला आणि हा हा म्हणता आलेखाइननं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. डाव बघायला झालेल्या गर्दीनं आलेखाइनची पाठ थोपटली. एक जण तर म्हणाला, ‘‘तुम्ही कमाल  केलीत. कारण आम्ही आमच्या या चॅम्पियनला क्लबचा आलेखाइन म्हणतो!!’’

यथावकाश जगज्जेतेपदासाठीचा सामना ठरला आणि अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या सामन्यात आलेखाइननं कॅपाब्लांकाला पराभूत केलं. विशेष म्हणजे, जगज्जेतेपदाच्या स्पर्धेपर्यंत आलेखाइनला कॅपाब्लांका विरुद्ध एकही डाव जिंकता आला नव्हता. असं म्हणतात की, कॅपाब्लांकाला इतका अति आत्मविश्वास होता की त्यानं सामन्यासाठी थोडीही तयारी केलेली नव्हती. आलेखाइन आता विश्वविजयासाठी बाहेर पडला होता. त्यानं एकाहून एक स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला आणि आपण खरेखुरे विश्वविजेते आहोत हे सिद्ध केलं. मॅक्स युवे नावाच्या एका डच गणिततज्ज्ञा विरुद्ध १९३५ साली आलेखाइनचा जगज्जेतेपदाचा सामना ठरला. अटीतटीच्या लढतीत तरुण युवेनं आलेखाइनला ९-८ अशा फरकानं पराभूत केलं. परंतु २ वर्षांनंतर आलेखाइन तयारी करून आला आणि त्यानं परतीच्या सामन्यात मॅक्स युवेला पराभूत करून विश्वविजेतेपद परत मिळवलं. नंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि फ्रान्सचं नागरिकत्व घेतलेला आलेखाइन जर्मन कचाटय़ात सापडला. त्याच्या फ्रेंच पत्नीची संपत्ती वाचवण्यासाठी त्याला जर्मन स्पर्धात भाग घ्यावा लागला आणि नाझींचा पाठीराखा असा शिक्का त्याच्या कपाळावर लागला.

दारूच्या व्यसनामुळे पोखरला गेलेला आलेखाइन पोर्तुगालमधील इस्टोरील या गावी हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला. तोपर्यंत बुद्धिबळ क्षेत्राला व्यवस्थित मार्ग दाखवण्यासाठी जागतिक बुद्धिबळ संस्था (FIDE ) स्थापन झाली होती. त्यांनी  त्याचं पार्थिव इतमामानं पॅरिसला आणलं आणि आजही त्याचं स्मारक पॅरिसमध्ये बघायला मिळतं.

अतिशय आक्रमक पद्धतीनं खेळणारा आलेखाइन लोकांमध्ये वावरताना हसतमुख आणि खिलाडू वृत्तीचा होता. परंतु एकदा त्याच्या मुखवटय़ामागील चेहेरा अचानक उघड झाला. एका स्पर्धेत त्याला एका नवख्या खेळाडूनं पराभूत केलं. आलेखाइननं बाहेर येऊन त्या खेळाडूची स्तुती केली- ‘छान खेळला पोरगा’ टाईपचं काहीतरी बोलला आणि आपल्या पंचतारांकित खोलीत गेला. खोलीत गेल्यावर त्यानं त्याच्या रागाला वाट करून दिली. त्यानं खोलीतलं सर्व फर्निचर तोडून टाकलं. हॉटेलनं त्याच्याकडून सगळे पैसे सव्याज वसूल केल्यामुळे ही गोष्ट उघड झाली.

आलेखाइन तसा गमत्या होता. त्यानं दोन वेळा बोगोलजुबोव या रशियन ग्रॅण्डमास्टरला जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत हरवलं होतं.  बोगोलजुबोव विषयी तर त्याचे विनोद खूप प्रसिद्ध आहेत. आलेखाइन  म्हणतो, ‘‘मी एकदा मेलो आणि स्वर्गात गेलो. तेथे मला सगळे खेळाडू भेटले, कारण सगळय़ा बुद्धिबळ खेळाडूंना स्वर्ग मिळतो असं मला सांगण्यात आलं होतं. मला स्टाइनिट्झ, लास्कर, कॅपाब्लांका, निमझोवीच भेटले, पण बोगोलजुबोवचा पत्ताच नव्हता. चौकशी केली तर मला सांगण्यात आलं की, बोगोलजुबोवला इथं परवानगी नाही. मी म्हटलं, ‘‘का नाही? बाकी बुद्धिबळ खेळाडू तर आहेत येथे!’’ तर मला सांगण्यात आलं, ‘‘बोगोलजुबोव स्वत:ला बुद्धिबळ खेळाडू समजतो, पण तो काही खरा बुद्धिबळपटू नाही!!’’

थोडक्यात, आलेखाइन हे विविध पैलूंचं व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्या खेळातूनही आक्रमकता, बचाव, डावाच्या अंतिम भागावरची पकड या सर्व गोष्टी उठून दिसतात. वाचकांना खरा आलेखाइन जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी बुद्धिबळ शिकावं आणि त्याचे अप्रतिम डाव बघावेत. मग तुम्हीच म्हणाल, ‘‘असा खेळाडू पुन्हा होणे नाही!’’

gokhale.chess@gmail.com

Story img Loader