प्रा. विजय तापस
तुम्ही काही म्हणा, पण आताशा अगदी तुमच्या-माझ्यासकट प्रचंड बुटकी, खुजी माणसंच अधिक दिसतात. बघावं तिथं बुटकी माणसं आणि त्यांच्याहून कित्येक पटीने बुटकी असलेली त्यांची करणीधरणी, त्यांचं त्यांचं बुटबैंगण ‘तेजस्वी कर्तृत्व’ दिसतं. प्रत्येक क्षेत्रात खुजेपणाचा कचरा जागा अडवून बसलेला. समाजशास्त्राचा कौल लावला, तर बुटक्या माणसांच्या राज्यात वा देशात बुटक्या माणसांचीच वारेमाप पैदास होणं अगदी स्वाभाविकच म्हणायला हवं. असं असल्याने आज आपल्याला सगळीकडे बुटकेपणाच भरलेला दिसतो. बुटके राजकारणी, बुटके समाजधुरीण, बुटकेच लेखक, बुटके शास्त्रज्ञ, बुटकेच इतिहासकार आणि बुटकेच भाष्यकार दिसताहेत. लाजेने मान खाली घातली की ती पुन्हा वर उचलण्याचं धैर्यच होऊ नये इतका बुटकेपणा चारी दिशांना खचाखच भरलेला दिसतो. एकेका बिनडोक विचारधारेची झापडं लावलेल्या माणसांची क्षुद्र वळवळ आपण सोसतो आहोत असाच अनुभव अलीकडे अगदी रोजचा झाला आहे. मात्र एके काळी महाराष्ट्रात कोणत्याही बुटकेपणाला लाज यावी, इतका उंचपणा भरलेला होता. १६३० मध्ये शिवनेरीवर जन्माला आलेल्या एका उंचच उंच माणसाने आणि त्याच्या कर्तृत्वशक्तीने असा काही माहोल महाराष्ट्रात निर्माण झाला की, अचानक सगळीकडे उंच माणसं वावरताना दिसायला लागली. अशी माणसं अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपावेतो सर्व क्षेत्रांत दिसू लागली आणि नंतर त्यात जो खंड पडला तो पडलाच. ‘जशी खाण, तशी माती’ या न्यायानं बघताबघता नाश होऊन आता फक्त नाशाच्या लाटा मोजणंच हाती राहिलंय. आपण ज्या उंच माणसांची उंची बघून प्रेरणा घ्यावी, झडझडून कामाला लागावं, त्यांनाच आपण इतकं खुजं करून टाकलंय की, ‘कालाय तस्मै नम:’ असं म्हणत आपण आपल्या सरपटण्याचं पाप दुसऱ्याच्या पदरात घालून मोकळे झालोय. माझं हे म्हणणं तुम्हाला पटेल न पटेल, पण असं झालंय हे खरं! असो.
मी एके काळच्या ज्या उंच माणसांबद्दल बोललो, त्यातलाच एक उंच माणूस म्हणजे वासुदेवशास्त्री वामनशास्त्री खरे! हा माणूस म्हणजे अस्सल बावन्न कसाचं झगझगीत सुवर्ण! काव्य, इतिहासलेखन, इतिहास संशोधन, संपादन आणि नाटक या क्षेत्रांतला एक अधिकारी पुरुष! वासुदेवशास्त्री खरे यांना मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोणीही ‘अग्रणी नाटककार’ म्हणून कधी गौरवलं नाही, त्यांचा उल्लेख मराठीतल्या थोर नाटककारांच्या पहिल्या अव्वल यादीतही कोणी कधी केला नसला तरी मी तसा तो करतो, कारण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातल्या काही व्यक्ती, काही घटना, काही वृत्ती-प्रवृत्ती रंगभूमीच्या अवकाशात आणून एक सामाजिक-सांस्कृतिक डॉक्युमेंट सिद्ध केलं आहे. एक वेळ त्यांच्या नाटकांचा उल्लेख ‘अस्सल ऐतिहासिक नाटक’ असा जरी करता आला नाही- त्यांची नाटय़कथानकं ही जरी काल्पनिक असली, तरी त्यांच्या नाटकांचा संबंध महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक राजकीय वास्तवाशी आहे आणि तसा तो दिसतोही हे मान्यच करावं लागेल. त्यांची ‘तारामंडळ’, ‘चित्रवंचना’, ‘कृष्णकांचन’, ‘शिवसंभव’, ‘उग्रमंगल’ आणि अखेरचं ‘देशकंटक’ ही नाटकं याची साक्ष देतील. ‘नाटक’ म्हणजे आम जनतेशी संवाद स्थापित करणारं, प्रेक्षकाला भावनेच्या नौकेत बसवून त्याला तत्त्वविचारांच्या, मूल्यविचारांच्या काठावर आणून सोडणारं सर्वात प्रभावी माध्यम आहे, याचं नेमकं भान वासुदेवशास्त्री खरेंना असल्यामुळेच ते नाटय़कलेकडे वळले असावेत. लोकमान्य टिळकांच्या संगतीत आयुष्याची पंधरा वर्ष काढणारे खरे नाटकाकडे वळले तरच नवल झाले असते. टिळक-आगरकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचं ‘केसरी’ हे नामकरण खरे यांनी केलं आणि ते दोन्ही चालकांनी स्वीकारलं यातच आपल्याला वासुदेवशास्त्रांचं थोरपण लक्षात येतं.
विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, सार्वजनिक काका, इतिहासाचार्य राजवाडे यांनी नाटककार म्हणून आणि इतर विविध संदर्भात त्यांचा गौरव केला, कारण या सर्वाना प्रिय असलेला ‘राष्ट्रवाद’ हाच पर्यायाने शास्त्रीबुवांच्या नाटकांचा आत्मा होता. आज त्यांच्या अखेरच्या ‘देशकंटक’ नाटकात आपण थोडं डोकावणार आहोत, कारण हे नाटक वरकरणी जसं दिसतं तसं ते अर्थातच नाही. हाती असलेल्या सत्तेने बेफाम झालेल्या, विधिनिषेधाला तिलांजली देणाऱ्या, स्वत:च्या बाईबाजीला उदात्त रूप देऊ पाहणाऱ्या भुजंगराव या सरदाराची कहाणी जरी नाटकात दिसत असली, तरी ती तेवढय़ापुरती मर्यादित नाही. भुजंगाच्या जागी ब्रिटिश राजवट, तो जिच्यावर लैंगिक सुखासाठी अत्याचार करू पाहतो त्या मालतीच्या जागी भारतमाता आणि मालतीचा पती असलेल्या हिंमतरावांच्या जागी लढाऊ बाण्याचा सशस्त्र क्रांतिकारक उभा करून जर आपण नाटक पाहायला सुरुवात केली, तर आपल्याला जे नाटक दिसू लागेल तेच नाटक खरे यांना कदाचित अभिप्रेत आहे, हे आपल्याला पटेल. हिंमतराव जे वागतो आणि मालतीची भुजंगाच्या कैदेतून जी सुटका करतो तोच खरेंना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद आहे हे आपण विसरून चालणार नाही. भुजंग, मालती, हिंमतराव आणि यांच्यासहित इतर पात्रांकडे आपण पाहायला लागलो की, ही कथित पात्रं विविध वृत्ती-प्रवृत्तींची चिन्हव्यवस्था आहे आणि या चिन्हांचा जीवितधर्म ‘राष्ट्रवादाची जोपासना’ हाच असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही.
‘देशकंटक’ हे नाटक वासुदेवशास्त्री खरेंनी १९२२ मध्ये ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’करिता लिहिलं. त्याच वर्षी नाटक रंगभूमीवर येणार होतं, पण कंपनीचे सतत दौरे असल्याने नाटकाला रंगमंच दिसण्याचे चिन्ह दिसेनासे झाले. त्यामुळे संगीत नाटकाचा बाज मोडून नाटकाचं रूपांतर ‘प्रोज’ नाटकात करायचे ठरवून ते नाटक ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ला देण्याचं खरेंनी ठरवलं. प्रोज नाटक १९२४ मध्ये रंगभूमीवर येणार हेही नक्की झालं. मात्र हे बदल घडण्याच्या आतच खरेंचा वयाच्या सहासष्टाव्या वर्षी मृत्यू झाला आणि सारेच यत्न ठप्प झाले. मग त्यांच्या मुलाने- यशवंतराव खरे यांनी नाटक पुन्हा ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’च्या हाती दिलं. शंकर बाळाजी शास्त्री यांनी नाटकातल्या पदांची रचना केली आणि नंतर प्रयोगाच्या सिद्धतेसाठी नाटक ‘बलवंत’च्या हाती सोपवलं. मध्ये परत बराच कालावधी जरी गेला तरी १९३० मध्ये शेवटी एकदाचं नाटक रंगमंचावर आलं. नाटक संगीत असल्याने त्यात- कथानकाची गरज असो-नसो २२ रागदारी रचना, १ कव्वाली, २ लावण्या आणि चार पदांचा भरणा आहे. रागांमध्ये मांड, मोहा, दरबारी, खमाज, आनंद, यमन, पुरिया, केदार, बिहारी, सारंग, अडाना, काफी, कानडा, देसकार, भीमपलास, कामोद, शंकरा, छायानट, ललत, मालकंस, लाजेश्वरी यांचा सढळ वापर केलेला दिसतो. मुळात या नाटकाला थोरले राजाराम छत्रपती यांच्या कारकीर्दीत मावळी पायदळात कारकून असलेल्या अण्णाजीपंत याने मोगलांच्या अखत्यारीत असलेल्या सातारच्या किल्ल्यावर साधूचा वेश घेऊन महंतगिरी चालू केली आणि महंतगिरीची बुंथी घेऊन याने मोगल सैन्याचा विश्वास संपादन केला त्याचा संदर्भ आहे. अण्णाजीपंताने मोगल सैन्यात फितूर तयार केले आणि मराठय़ांना सातारचा किल्ला सर करण्यात मोठेच सा केले. हा संदर्भ नाटककाराने नाटकाच्या तिसऱ्या अंकात अत्यंत चपखलपणे वापरला आहे. बाकी या नाटकात जे मुख्य कथानक आहे, ते मालती- तिची बहीण मंदाकिनी आणि मालतीला साम-दाम-दंड-भेदनीतीने आपलेसे करून तिला भोगण्याची आकांक्षा बाळगणारा भुजंगराव (हा मोगल बादशहाच्या पदरी असलेला हर्षवर्धन किल्ल्याचा किल्लेदार आहे.) यांच्यातील ताणतणावाने व्यापलेले आहे. मालती ही भुजंगरावांची पत्नी असलेल्या मंदाकिनीची थोरली बहीण आहे. नाटककार खरे यांनी आपल्या बहिणीच्या शीलरक्षणासाठी मंदाकिनी नवऱ्याच्या विरोधात जाऊन जो लढा देते त्याला नाटकात महत्त्व दिलं आहे. १९२२ साली नवऱ्याच्या विरोधात जाणाऱ्या स्त्रीची प्रतिमा साकारून खरे यांनी स्वत:चा वैचारिक वेगळेपणा अधोरेखित केलेला दिसतो. मला मालतीची दासी असणारी तिखट लवंगी, स्वत:चे शील धोक्यात असताना लढाऊ पवित्रा घेणारी मालती आणि नवरेशाहीला विरोध करत ठाम उभी राहणारी मंदाकिनी पाहताना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या रणचंडिका हिरिरीने उतरल्या होत्या त्यांची तीव्रतेने आठवण आली. नाटकाच्या अखेरच्या पर्वात थोरल्या राजाराम महाराजांच्या पदरी असलेला मराठा सरदार हिंमतराव आपल्या पत्नीच्या शीलरक्षणासाठी भुजंगाशी संघर्ष करतो, त्याला पराभूत करतो असं चित्रण खरे करतात. मात्र आपल्या मेव्हणीच्या पदरात तिच्या नवऱ्याच्या मृत्यूचे माप न घालता हिंमतराव भुजंगाला जीवदान देत मंदाकिनीचं अहेवपण कायम राखतात हे खरेंच्या काळातली मूल्यकल्पना समजून घ्यायला मदत करणारं आहे. (मालती वश व्हावी यासाठी भुजंगराव ज्या म्हसोबाला साकडं घालतो आणि त्याच्या पूजेअर्चेसाठी जो अमाप खर्च करतो तो म्हसोबा हा महाराष्ट्रातला एक ग्रामदेव-लोकदेव आहे. हा देव बहुधा गावाच्या शिवेवर वा शेताच्या बांधावर दिसतो. मुख्य म्हणजे तो एक अनार्य देव असून तो भुताखेतांचा नियंत्रक देव आहे. गावोगावी म्हसोबाच्या यात्रा-जत्रा असतात. खंडोबाच्या जेजुरीत जसा ‘ओकाऱ्या म्हसोबा’, ‘नकटय़ा म्हसोबा’ आहे तसाच तो ठाण्यातल्या म्हसे या गावातही आहे. म्हसोबाचंही नवरात्र असतं असं म्हणतात. काय असेल ते असो!) आपण ‘देशकंटक’बद्दल बोलताना भुजंगाच्या जागी ब्रिटिश राजवट, तो जिच्यावर लैंगिक सुखासाठी अत्याचार करू पाहतो त्या मालतीच्या जागी भारतमाता आणि मालतीचा पती असलेल्या हिंमतरावांच्या जागी लढाऊ बाण्याचा सशस्त्र क्रांतिकारक उभा करून जर आपण नाटक पाहायला सुरुवात केली तर एक वेगळाच अर्थबोध आपल्याला होतो असं मी सुरुवातीला म्हटलं आहे. राष्ट्राचा श्वास तो त्याच्या लेकरांचा श्वास, राष्ट्राचं शील म्हणजेच त्याच्या जनतेचं शील या दृष्टीने तुम्ही या नाटकाकडे पाहिलंत तर ‘देशकंटक’ हे दुसरं ‘कीचकवध’च (पहिला प्रयोग: २२ फेब्रुवारी १९०७) आहे असं तुम्ही म्हणाल आणि ते बहुतांशी नितांत सत्यच असेल यातही संशय नाही. देशाचं शील, स्वातंत्र्य आणि स्वत्व यांच्या रक्षणाची जबाबदारी जाणतेपणी घेणं आणि या तिन्ही गोष्टी धोक्यात आल्या असता प्राणपणाने त्यांच्या शत्रूंशी झुंज घेणं यालाच ‘राष्ट्रवादी आचार’ म्हणतात, हीच लोकमान्य टिळकांप्रमाणे वासुदेवशास्त्री खरे या प्रकांडपंडितांची श्रद्धा होती. महाराष्ट्रातील दोन मातब्बर इतिहासकार म्हणजे इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि दत्तो वामन पोतदार. दोघांनीही वासुदेवशास्त्री खरे यांच्याविषयी जे उद्गार काढले आहेत त्यातून शास्त्रीबुवांचे थोरपण सहज लक्षात येणारे आहे. पोतदारांनी शास्त्रीबुवांवरच्या मृत्युलेखात म्हटले आहे की, ‘‘मराठय़ांच्या पानिपतोत्तर इतिहासाबद्दल खरेशास्त्री यांच्याइतका सूक्ष्म माहीतगार कोणीही उभ्या महाराष्ट्रात नव्हता. ते अद्वितीय ठरले ते त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि अत्यंत प्रखर स्मरणशक्तीमुळे. हयातीत नजरेखालून गेलेली लक्षावधी पृष्ठे जणू त्यांच्या मनोमानसी कोरली गेली होती.’’ तर राजवाडे यांनी त्यांच्याबद्दल ‘‘खरेशास्त्री यांच्याएवढा अवाढव्य माहितीचा माणूस एखाद्या राष्ट्रात वारंवार उपजत नसतो. आपले राष्ट्र जागरूक असते, विद्यापीठे तत्पर असती तर शास्त्रीबुवांच्या हातून अधिक दसपट काम झाले असते.’’ असे म्हणतात की, ‘‘शास्त्रीबुवांनी नाटके लिहिली, ती नाटकावरच्या प्रेमाने हे जेवढे खरे, तेवढेच त्यातून येणारे उत्पन्न संसाराकडे आणि इतिहास संशोधनाकडे वळविता येते म्हणून होय.’’ हे जर खरे असेल तर महाराष्ट्राच्या नाटय़प्रेमाचे आणि रंगभूमीचे आभार मानावे तेवढे कमीच नाहीत का? भालचंद्र नेमाडे यांच्या एका कादंबरीची अर्पणपत्रिका ‘बाई जीविताचे धर्म मृतांसि काय वर्णावे?’ अशी आहे. त्याच चालीवर असे म्हणता येईल की, ‘बाई उंच पुरुषांचे धर्म बुटक्यांसि काये सांगावे?’ हे तुम्हाला पटेल ना?
vijaytapas@gmail.com