रघुनंदन गोखले

‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’च्या वाचकांनी महाविक्षिप्त जगज्जेत्या बॉबी फिशरच्या बालपणापासूनचा प्रवास गेले दोन आठवडे पाहिला आहेच. आज आपण बॉबी सगळ्या अडथळ्यातून जागतिक विजेतेपदाच्या जवळ कसा पोहोचला ते बघू या! गेल्या लेखात आपण पाहिलंच आहे की १९६७ ची जगज्जेतेपदाची आंतर झोनल स्पर्धा बॉबीनं विजय हातातोंडाशी आला असताना कशी सोडून दिली होती ते. तेव्हा नेमकं काय झालं होतं?

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा

आयोजकांशी भांडण आणि स्पर्धेतून बाहेर

बॉबी ‘वल्र्ड वाईड चर्च’ नावाच्या एका संघटनेचा सदस्य बनला होता. त्यांनी आपल्या अनुयायांना शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टी घ्यावी अशी आज्ञावजा सूचना केली होती. टय़ुनिशियामधील आयोजक बॉबीच्या मागणीला मान्य करायला तयार झाले होते. पण बॉबीच्या मागण्या वाढत चालल्या होत्या आणि त्याला इतर खेळाडूंनी कडाडून विरोध केला. झाले, महाशय स्पर्धेतून बाहेर पडले ते थेट आपल्या अमेरिकेतील घरी पोहोचले. यामध्ये मला वाटतं की गैरसमजाचा भाग जास्त होता. कारण टय़ुनिशियामधील आयोजकांना इंग्रजी येत नव्हतं. असो!

बॉबी फिशरनं १९६८ साली इस्राएलमध्ये झालेली नेतान्या आणि क्रोएशियामधील विनकोव्हसी येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा लीलया जिंकल्या. या दोन्ही स्पर्धामध्ये त्यानं एकही डाव गमावला नव्हता. पण या दोन्ही स्पर्धा जिंकल्यावर बॉबी बुद्धिबळ क्षेत्रातून जवळजवळ अंतर्धान पावला. मात्र त्याची बुद्धिबळाची तयारी जोरदार सुरू होती. १८ महिन्यांत बॉबी फिशर फक्त एक डाव खेळला तोही १९६९ च्या ‘मार्शल’ विरुद्ध ‘मॅनहॅटन’ या भारत-पाकिस्तानसारख्या कसोशीच्या लढतीत. त्यानं अँथोनी सैदीला पराभूत केलेला हा डाव अनेकांच्या मते त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट होता.

१९६९ सालची अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे त्यानंतर होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेची निवड करणारी लढत होती. पहिले तीन पदक विजेते आंतर झोनल स्पर्धा खेळणार होते. पण बॉबी हा बॉबी होता. त्यानं स्पर्धेच्या आयोजकांशी भांडण केलं आणि स्पर्धेसाठी तो आलाच नाही. आता काय होणार? बॉबी १९६९-१९७२ या जगज्जेतेपदाच्या साखळीतून बाद झालाच होता अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्याच्या मदतीला आली पाल बेन्को आणि विल्यम लोम्बार्डी ही जोडगोळी. दोघांनीही जागतिक संघटनेला विनंती केली की आमच्याऐवजी आंतर झोनल स्पर्धेत बॉबीला घ्या. अमेरिकन संघटनेनं हा प्रस्ताव पुढे पाठवला आणि माजी विश्वविजेते मॅक्स येवे जागतिक संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे बॉबीचा आंतर झोनल स्पर्धेत प्रवेश झाला.

सोव्हियत संघराज्य विरुद्ध शेष विश्व सामना

बॉबी फिशरनं आपल्या १८ महिन्यांच्या कालावधीत आपल्या खेळातील कच्चे दुवे काढून टाकून आपण एक परिपक्व खेळाडू बनल्याची चुणूक सैदी विरुद्धच्या डावात दाखवली होतीच. पण १९७०-७१ या वर्षांत तर त्यानं कमाल केली. १९७० च्या मार्च आणि एप्रिल या महिन्यांत सोव्हियत संघराज्य विरुद्ध शेष विश्व अशी एक लढत बेलग्रेड येथे आयोजित करण्यात आली होती. दोन्हीकडून प्रत्येकी १०-१० ग्रॅण्डमास्टर्स खेळणार होते. माजी विश्वविजेते डॉ. मॅक्स येवे शेष विश्व संघाचे व्यवस्थापक/निवड समिती बनले. त्यांनी बॉबीला पत्र लिहून आमंत्रित केलं, पण कोणालाही हा विक्षिप्त माणूस खेळेल याची अपेक्षा नव्हती. पण बॉबीनं सर्वांना धक्का दिला आणि ग्रँडमास्टर लॅरी इव्हान्सला आपला मदतनीस म्हणून घेऊन महाशय बेलग्रेडमध्ये अवतरले.

त्या वेळी सध्या सर्रास वापरण्यात येणारी इलो रेटिंग पद्धती तशी नवीन होती. त्यामुळे २७२० रेटिंग असणारा बॉबी मानाच्या पहिल्या पटावर खेळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण त्या वेळी एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकणाऱ्या बेन्ट लार्सन याने आक्षेप घेतला. त्याच्या मते बॉबी गेली दोन वर्षे खेळलेला नव्हता. त्यामुळे शेष विश्वातील लार्सन हाच सर्वोत्तम खेळाडू होता. आता सर्वांना अपेक्षा होती की बॉबी डोक्यात राग घालून पुढले विमान पकडून अमेरिकेला परतेल, पण बॉबी चक्क दुसऱ्या पटावर खेळायला तयार झाला आणि सामन्याला सुरुवात झाली.

सोव्हियत संघाने चार फेऱ्यांचा हा सामना २०.५ – १९.५ असा निसटत्या फरकानं जिंकला, पण बॉबीनं सर्वोत्तम खेळ करून माजी विश्वविजेत्या टायग्रेन पेट्रोस्यान ला ३-१ असे पराभूत केलं. त्यामुळे त्याला एक कार बक्षीस मिळाली. ( प्रत्येक खेळाडूला स्पर्धेत खेळण्याबद्दल ४०० अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. बहुधा त्यांना प्रवास खर्चही देण्यात आला असावा.) पहिल्या पटावर बेन्ट लार्सननं जगज्जेत्या स्पास्की बरोबर १.५-१.५ अशी बरोबरी केली, पण बॉबीच्या खेळामुळे सगळे सोव्हियत खेळाडू हादरून गेले होते.

हेरसेग नोवी येथील विद्युतगती स्पर्धा

सोव्हियत संघराज्य विरुद्ध शेष विश्व सामना संपला आणि एक प्रायोजक पुढे आला. त्यानं हेरसेग नोवी नावाच्या बेलग्रेडजवळच्या गावी ५ मिनिटे प्रत्येकी अशी विद्युतगती स्पर्धा आयोजित केली आणि सर्वांना खेळण्याची विनंती केली. १२ जण तयार झाले आणि त्यांची २२ फेऱ्यांची स्पर्धा घेण्याचं ठरलं. १२ वर्षांंपूर्वी बॉबीचा मॉस्कोमध्ये नक्षा उतरवणारा दोन वेळचा विश्व विजेता पेट्रोस्यान ही स्पर्धा सहज जिंकेल अशीच सर्वांची अपेक्षा होती. नाहीतर मिखाईल ताल किंवा व्हिक्टर कोर्चनॉय होतेच! पण झालं भलतंच! बॉबी फिशरनं जो विजयाचा धडाका लावला तो स्पर्धा संपली त्यावेळी थांबला. त्यानं २२ पैकी १९ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला! दुसरा आला माजी जगज्जेता ताल- १४.५ गुणांवर! मिखाईल ताल म्हणजे खिलाडू वृत्तीचा आदर्श! तो म्हणाला- ‘‘या स्पर्धेत बॉबीने अचूक खेळ केला. एकदाही त्यानं एकही प्यादंसुद्धा फुकट दिलं नाही. नाहीतर आम्ही बघा – प्रतिस्पध्र्यांना घोडे आणि उंट दान करत होतो.’’

आंतरझोनल स्पर्धा आणि विक्रम

बॉबीनं नोव्हेंबर १९७० मध्ये स्पेनजवळील निसर्गरम्य ‘पाल्मा दि मालोर्का’ या बेटावर झालेली आंतरझोनल स्पर्धा १८.५ गुणांसह जिंकली. संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर होते लार्सन, गेलर आणि ह्युबनर प्रत्येकी १५ गुण मिळवून! एवढय़ा मोठय़ा फरकानं कोणीही आत्तापर्यंत आंतरझोनल स्पर्धा जिंकली नव्हती. सगळीकडे एक वेगळीच हवा निर्माण झाली की, एक महान बुद्धिबळ खेळाडू सोव्हियत वर्चस्व झुगारून देण्यासाठी पुढे आला आहे. ते दिवस होते शीत युद्धाचे आणि त्यामुळे बुद्धिबळ न खेळणारे पाश्चिमात्य लोकही बॉबीच्या बातम्यांत लक्ष घालू लागले. मात्र माजी जगज्जेता आणि सोव्हियत संघराज्याचा खास पाठीराखा मिखाईल बोटिवनीक प्रभावित झाला नव्हता किंवा त्यानं तसं दर्शवलं तरी नव्हतं. तो म्हणाला,‘खरा प्रतिभावान खेळाडू आपल्या बरोबरच्या दर्जाच्या खेळाडूंना सहजी पराभूत करतो. बॉबी तर खालच्या दर्जाच्या खेळाडूंना हरवतो आहे.’ बोटिवनीकला कल्पना नव्हती की लवकरच बॉबी त्याला खोटं पाडणार आहे.

कॅन्डीडेट सामन्यांचा थरार

बॉबी कॅनडामधील व्हँकुव्हर येथे पोचला त्या वेळी त्याच्या बरोबर कोणीही नव्हतं. या उलट त्याचा प्रतिस्पर्धी मार्क तैमनोवबरोबर दोन ग्रॅण्डमास्टर्स मदतीला आणि सर्व सुखसोयी दिमतीला होत्या. मार्क तैमनोव हा नुसता ग्रँडमास्टर नव्हता, तर उत्कृष्ट पियानोवादक होता. त्याचे पियानोचे कार्यक्रम हाऊसफुल जायचे. ‘पियानोच्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पट्टय़ांशी सहज खेळायची सवय असल्यामुळेच बहुधा मार्क काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही मोहऱ्यांनी छान खेळतो,’ असं माजी जगज्जेता स्मिस्लॉव्ह म्हणत असे. मार्क तैमनोवनं या सामन्यासाठी मिखाईल बोटिवनीकबरोबर खास प्रशिक्षण शिबिरं घेतली होती. ‘आम्ही बॉबीच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या डावांचा सखोल अभ्यास केला आहे आणि एक फाइल तयार केली आहे,’ सोव्हियत ग्रॅण्डमास्टर्स म्हणायचे. बुद्धिबळातील सिसिलिअन बचाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामधला तैमनोव खेळत असलेला उपप्रकार त्याच्या नावानं ओळखला जातो.

व्हँकुव्हर येथे सामन्याला सुरुवात झाली आणि बॉबीनं पहिले दोन्ही डाव जिंकले. दुसरा डाव तैमनोव प्रकारात हरल्यावर मार्क तैमनोवनं बॉबीला विचारलं की तू खेळलास ती १२ वी खेळी मी कधी पाहिलेली नाही. बॉबी म्हणाला, ‘एका सोव्हियत मासिकातील अलेक्झांडर निकिटिनच्या लेखात त्या खेळीचा ओझरता उल्लेख होता.’ तैमनोव खजील झाला आणि त्याने नंतर लिहिले आहे की ‘माझ्या एका देशबंधूने लिहिलेल्या एका खेळीची मलाच कल्पना नव्हती आणि ज्याची मातृभाषा रशियन नाही त्याने मात्र ही खेळी बघून मलाच मात दिली.’ मार्क तैमनोव पार कोसळून गेला आणि सामना ६-० असा हरला. ‘आता कमीत कमी माझ्याकडे माझं संगीत उरले आहे,’ तो खेदानं बॉबीला म्हणाला.

मार्क तैमनोवला शिक्षा

आपल्याकडे भारतीय क्रिकेट संघ हरल्यावर इंदोर येथे पूर्वीच्या विजयानिमित्त उभारलेली बॅट तोडणारे शौकीन आपण पाहिले आहेत. ती गोष्ट झाली सामान्य चाहत्यांची. पण कम्युनिस्ट राजवटीत सरकारला पराभव पचवता येत नाही हे आपण चीननं त्यांच्या बुद्धिबळ संघावर घातलेल्या निर्बंधांवरून मागे एका लेखात बघितलं आहेच. सोव्हियत संघराज्यानं बॉबी फिशरविरुद्धचा दारुण पराभव मनाला लावून घेतला. मार्क तैमनोवला दोन वर्षे बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यास मनाई करण्यात आली; एवढंच नव्हे तर त्याला पियानोचे कार्यक्रमही करता येत नसत. मार्क तैमनोवच्या लिखाणावरही बंदी घातली गेली. हळूहळू ही बंदी शिथिल करण्यात आली आणि १९८० च्या दशकात एक स्पर्धा खेळण्यासाठी मार्क दिल्लीलाही आला होता. त्या वेळचा आपला राष्ट्रीय विजेता प्रवीण ठिपसे यानं त्याला पराभूत केलं होतं. मी मॉस्को येथे सेंट्रल क्लबमध्ये १९८६ साली गेलो असताना त्या भव्य आणि ऐतिहासिक वास्तूचा मार्क तैमनोव महाव्यवस्थापक होता. त्यानं मला त्यानंच लिहिलेलं रशियन भाषेतील त्याच्या खेळाचं पुस्तक भेट दिलं होतं. हा महान बुद्धिबळ खेळाडू आणि संगीतज्ञ २०१६ साली वयाच्या ९०व्या वर्षी मरण पावला.

बॉबीचा पुढला प्रतिस्पर्धी होता बेन्ट लार्सन! तैमनोव सुहृदयी संगीतज्ञ असल्यामुळे बॉबीच्या झंझावातापुढे टिकला नव्हता असं सगळ्यांचं मत होतं. मात्र लार्सन निश्चितपणे बॉबीला धडा शिकवेल असं सोव्हियत बुद्धिबळपटू म्हणू लागले- कमीत कमी त्यांची तशी सुप्त इच्छा होती. पण बॉबीनं त्यांना कसं तोंडघशी पाडलं हे पुढील लेखात बघू!

क्रमश:

gokhale.chess@gmail.com