रघुनंदन गोखले

गेला संपूर्ण आठवडा बुद्धिबळप्रेमी असलेल्या आणि नसलेल्यांनाही कुतूहल होते, ते या खेळातील विश्वचषकाच्या अंतिम लढतीविषयी; भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्यात कोण जिंकतो याबाबतचे. पराभूत होऊनदेखील त्याने जशी लोकांची मने जिंकली, तसेच काहीसे इतर भारतीय खेळाडूंनीही या स्पर्धेतील प्रदर्शनातून केले. एके काळी सोव्हिएत खेळाडूंचा जो दबदबा जगाच्या पटलावर होता तो हळूहळू भारतीयांबाबत तयार होतो आहे, हे चित्र यातून समोर आले..

minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Aditya Thackeray claimed Sagari Kinara Marg project would ve been completed under Maha Vikas Aghadi
महाविकास आघाडीचे सरकार असते तर प्रकल्प केव्हाच पूर्ण झाला असता, आदित्य ठाकरे यांचा दावा
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
Retired professor lost jewellery worth Rs 10 lakhs recovered at Khandoba fort in Jejuri Pune news
‘मल्हारी’च्या दारी प्रामाणिकपणाची प्रचिती; जेजुरीच्या खंडोबा गडावर निवृत्त प्राध्यापिकेचे दहा लाखांचे दागिने परत

बुद्धिबळतज्ज्ञांच्या अपेक्षेप्रमाणे खेळवेडय़ा भारतीयांना चटका लावणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत १८ वर्षांचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद बलाढय़ मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झाला; पण या छोटय़ा निरागस खेळाडूची झुंजार वृत्ती भारतीयांची मान उंचावून गेली. बाकी सर्व खेळाडू आपापल्या प्रशिक्षकांबरोबर आलेले असताना प्रज्ञानंदसोबत कोण होतं? तर बुद्धिबळाचा गंधही नसलेली त्याची आई नागलक्ष्मी. ‘मेरे पास माँ है’- ‘दीवार’ चित्रपटातील शशी कपूर यांचा हा संवाद खूपच गाजला आणि गेली अनेक दशके तो अनेक ठिकाणी परिस्थितीनुरूप वापरला जातो. प्रज्ञानंदच्या बाबतीत हा संवाद चपखल बसतो. प्रज्ञानंदच्या खेळामुळे, त्याच्या कपाळावरील टिळय़ामुळे आणि त्याच्याबरोबर सतत राहणाऱ्या त्याच्या आईमुळे भारतीय संस्कृती परदेशी लोकांच्या लक्षात येऊ लागली. साक्षात गॅरी कास्पारोव्हलासुद्धा ट्विटरवर लिहावं लागलं की तोसुद्धा अनेक वर्षे त्याच्या आईला बरोबर घेऊन जात असे. मला गॅरीचा कार्पोवविरुद्धच्या जगज्जेतेपदाचा १९८६ सालचा अखेरचा डाव आठवतो. २२ वर्षांच्या गॅरीनं आपला वजीर बळी दिला आणि विजयी परिस्थिती पटावर आणली. त्या क्षणी त्यानं रंगमंचावरून प्रेक्षकांत नजर टाकली आणि पहिल्या रांगेत बसलेल्या आपल्या आईकडे – क्लाराकडे – बघून एक स्मितहास्य केलं. उद्या परदेशी मुलांनी कपाळावर टिळा आणि बरोबर आई अशी नवी फॅशन सुरू केली तर मला आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : बुद्धिबळ ऑलिम्पियाड एक महाजत्रा!

मी अनेक वेळा पाहिलं आहे की, बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलांना आपल्या वडिलांपेक्षा आई बरोबर आलेली हवी असते. प्रज्ञानंद काही वेगळा नसणार. त्याच्या आईला भले बुद्धिबळ कळत नाही; पण आपला मुलगा दमूनभागून आलाय आणि भयंकर मोठय़ा अपेक्षांचे ओझे खांद्यावर वाहतो आहे, हे तिला कळतं. मी पाहिलं आहे की, प्रज्ञानंदची आई रोज त्याला आवडतो म्हणून रसम भात करून वाढते. इतर आयांप्रमाणे त्याचं डोकंही चेपून देत असणार. असो. प्रज्ञानंदनं आपल्या देशाचं नाव अशा देशात जाऊन उज्ज्वल केलं, जो देश भारतापेक्षा पाकिस्तानला जवळचा मानतो! पण प्रज्ञानंदनं बुद्धिबळप्रेमी अझरबैजानी जनता आणि भारतीय क्रीडाप्रेमींना जवळ आणण्याचं काम नक्कीच केलं आहे.

भारतीयांची चमक..

या वर्षी भारताच्या पुरुष (१०) आणि महिला (७) मिळून १७ खेळाडूंनी विश्वचषकात भाग घेतला होता. हा विश्वचषकात उतरलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ होता आणि त्यांनी देदीप्यमान कामगिरीही केली. या सर्व खेळाडूंनी भारताची वाढती प्रतिष्ठा आणखी वृिद्धगत केली. महिलांमध्ये पहिल्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या दिव्या देशमुखनं हंगेरीकडून खेळणाऱ्या अनुभवी होआंग थान ट्रांगला दुसऱ्या फेरीत पराभूत केलं आणि मेरी अ‍ॅन गोम्सनं तर कॅटरिना लहानोचा पराभव करून एकच खळबळ उडवून दिली. कॅटरिना तीन वेळा जागतिक विद्युतगती महिला विश्वविजेती आणि एकदा विश्व जलदगती विजेती होती. दिव्या तिसऱ्या फेरीत तर द्रोणवली हरिका उपउपांत्य फेरीत विश्वचषकविजेत्या गोरियाचकीनाविरुद्ध पराभूत झाल्या, पण कडवी लढत देऊन!

महाराष्ट्राचा अग्रगण्य खेळाडू आणि सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी उप-उपांत्य फेरीत नशिबाची साथ असलेल्या निजात अबासोवकडून पराभूत झाला; पण त्याआधी त्यानं जागतिक विजेतेपदाच्या लढतीत िडग लिरेनकडून हरलेल्या इयान नेपोमानेची याचा दणदणीत पराभव केला होता; परंतु घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळणाऱ्या निजातनं विदितचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंग केलं. उप-उपांत्य फेरीत ८ पैकी चार खेळाडू भारताचे होते आणि ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. रशियन खेळाडूंनाही इतके प्राबल्य यापूर्वी दाखवता आले नव्हते.

निहाल, गुकेश आणि अर्जुन..

प्रज्ञानंदबरोबर निहाल सरीन, डोमाराजू गुकेश आणि अर्जुन एरिगेसी या त्रयीच्या खेळांचाही उल्लेख केला पाहिजे. गुकेशनं तर विश्वचषकादरम्यान गेली ३७ वर्षे भारताचा क्रमांक एकवर असलेल्या विश्वनाथन आनंदला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. अर्जुन आणि प्रज्ञानंदचा उप-उपांत्य फेरीचा सामना इतका चुरशीचा झाला की कोण कधी जिंकेल हे सांगता येत नव्हतं. अखेर प्रज्ञानंदनं तीन मिनिटांच्या अखेरच्या सामन्यात अर्जुनचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. निहाल सरीनही चांगला खेळत होता; परंतु अनुभवी नेपोमानेचीनं त्याला चौथ्या फेरीत चुरशीच्या लढतीत पराभूत केलं.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी: दुर्दैवी अखेर!

प्रज्ञानंदची गरुडभरारी..

२०२१ च्या विश्वचषकात प्रज्ञानंदचं मानांकन होतं ९० वं! सोची या रशियातील निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या या विश्वचषकात प्रज्ञानंद चौथ्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचिर लेग्रेव्हशी हरला होता. या वर्षी बाकू इथं त्याचं मानांकन होतं ३१वं; पण ९० ते ३१ अशी मजल मारताना प्रज्ञानंदनं आपल्या खेळात कमालीची प्रगती केली होती. याची चाहूल मॅग्नस कार्लसनला दुबईमध्ये लागली होती. कार्लसनच्या अल्पाईन वॉरियर्स संघाकडून खेळताना प्रज्ञानंदनं ८ पैकी ७ डाव जिंकून आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणलं होतं; परंतु त्याला त्याच्या संघ सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही आणि मॅग्नसच्या बलाढय़ संघाला हार पत्करावी लागली. त्या वेळी मॅग्नसनं प्रज्ञानंदचं तोंड भरून कौतुक केलं होतं. 

बाकू इथं या वर्षी प्रज्ञानंदनं विश्वचषकाची सुरुवात दिमाखात केली. पहिल्या फेरीत मानांकित खेळाडूंना बाय मिळतो. प्रज्ञानंदनं दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्यांमध्ये अनुक्रमे मॅक्सिम लेगार्ड आणि डेव्हिड नवारा यांचा सरळ सरळ पराभव केला आणि त्याची गाठ पडली ती जगातील दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेल्या हिकारू नाकामुराशी! नुकत्याच एका ऑनलाइन बुलेट (प्रत्येकी फक्त १ मिनिट) स्पर्धेत मॅग्नसला हरवल्यामुळे हिकारू जोरात होता; पण त्याला भारताच्या ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण या युवकानं दुसऱ्याच फेरीत तोंडाला फेस आणला होता. कसाबसा नाकामुरा तिसऱ्या फेरीत पोचला होता.

नाकामुरावर मात..

क्लासिकल पद्धतीने खेळले गेलेले दोन्ही डाव बरोबरीत सुटले आणि तज्ज्ञांनी नाकामुरा जवळजवळ जिंकल्यासारखी भाषा सुरू केली, कारण नाकामुरा हा जलदगती खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये तज्ज्ञ मानला जातो. टायब्रेकर्स हे जलदगतीनं खेळले जातात आणि काही दिवसांपूर्वीच मॅग्नसनं नाकामुराला शरणचिठ्ठी लिहून दिलेली आणि वर त्याच्या जलद खेळाची स्तुती केली होती. याउलट या स्पर्धेत प्रज्ञानंदचा प्रभाव काही दिसला नव्हता- त्याला जलदगती टायब्रेकर खेळायची संधीच मिळाली नव्हती.

नाकामुरानं इंग्लिश प्रकारानं डावाला सुरुवात केली; पण प्रज्ञानंदनं आठव्या खेळीत आक्रमकता दाखवून सनसनाटी निर्माण केली. नाकामुरा गडबडून गेला आणि बघता बघता प्रज्ञानंदच्या मोहऱ्यांनी पांढऱ्या मोहऱ्यांची लांडगेतोड सुरू केली. नाकामुरा शरण आला आणि एकच खळबळ उडाली; परंतु आता आणखी एक डाव बाकी होता. स्पर्धेत टिकून राहायचे तर नाकामुराला या डावात काळय़ा सोंगटय़ांकडून विजय मिळवणं भाग होतं. आता बरोबरी पुरत असल्यामुळे प्रज्ञानंद बचावात्मक खेळेल अशीच सर्वाची अपेक्षा होती; पण आजचा प्रज्ञानंद वेगळाच होता. त्यानं आक्रमक पवित्रा घेऊन नाकामुराला नामोहरम केलं. शेजारीच स्वत:चा जलदगती डाव खेळत असलेल्या मॅग्नसचं या डावावर बारीक लक्ष होतं. त्यानं उठून प्रज्ञानंदची पाठ थोपटली.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : जगज्जेतेपदाजवळ जाताना..

उप-उपांत्य फेरीत प्रज्ञानंदची गाठ होती ती त्याचा मित्र अर्जुन एरिगेसीशी! हल्ला-प्रतिहल्ला यांनी रंगलेल्या या लढतीत प्रत्येकी १५ मिनिटे, मग १० मिनिटे यांनीही निकाल लागेना त्या वेळी दोघांना तीन मिनिटे दिली गेली. या लढतीत प्रज्ञानंदचा विजय झाला. या लढतीनं भारतीय बुद्धिबळपटुंच्या प्रतिभेचा आणि खिलाडूवृत्तीचा आविष्कार जगाला पाहायला मिळाला. आता उपांत्य फेरीत प्रज्ञानंदचा प्रतिस्पर्धी होता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबिआनो कारुआना!

कारुआनावर वर्चस्व..

फॅबिआनो कारुआना हा मूळचा इटालियन खेळाडू, आता अमेरिकेकडून खेळतो. जगज्जेतेपद सोडलं तर त्यानं सर्व काही जिंकलं आहे; पण छोटय़ा प्रज्ञानंदविरुद्ध खेळताना तो थोडा दडपणाखाली होता. दोन्ही डावांत त्याला वरचष्मा मिळाला होता; पण प्रज्ञानंदचा बचाव सरस ठरला आणि सामना टायब्रेकरमध्ये गेला. कारुआना हा काही जलदगती खेळासाठी प्रसिद्ध नाही; परंतु अखेरीस तो जगज्जेतेपदाच्या जवळ पोचलेला खेळाडू आहे. त्यानं विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण प्रज्ञानंदच्या राजानं महत्त्वाची भूमिका निभावली आणि स्वत: राजेसाहेबांनी वजिराच्या भागात आक्रमण करून कारुआनाच्या प्याद्यांची शिकार केली. कारुआनानं शरणागती पत्करली आणि श्वास रोखून बघणाऱ्या भारतीयांनी एकच जल्लोष केला.

मॅग्नसशी तुल्यबळ लढत.. 

आता लढत होती ती साक्षात मॅग्नस कार्लसनशी! आपल्याला हरवणारा कोणी शिल्लक नाही म्हणून जगज्जेतेपदावर पाणी सोडणारा मॅग्नस प्रज्ञानंदाशी जपून खेळत होता. त्यानं विजयासाठी खास प्रयत्न न करता क्लासिकल पद्धतीचे दोन्ही डाव बरोबरीत सोडवले. यातच छोटय़ा प्रज्ञानंदचा नैतिक विजय झाला असं मी मानतो! इवानचुकसारख्या महारथीला क्लासिकल डावात २-० असं हरवणारा मॅग्नस प्रज्ञानंदविरुद्ध किंचितसाही वरचष्मा मिळवू शकला नाही; पण त्याचं मुख्य हत्यार बाकी होतं – जलदगतीने खेळले जाणारे डाव! आता वेळ झाली होती त्याच जलदगतीनं खेळणाऱ्या टायब्रेकर्सची!

काळय़ा सोंगटय़ांकडून खेळणाऱ्या मॅग्नसला पहिल्याच डावात प्रज्ञानंद कोंडीत पकडू शकला असता आणि नंतर तर बरोबरीची संधी त्याला आली होती; पण येथेच त्याचा अनुभव कमी पडला. महत्त्वाकांक्षी प्रज्ञानंदनं विजयासाठी धोका पत्करला. अनुभवी मॅग्नसनं डाव लांबवत नेला आणि शेवटी शेवटी वेळ कमी राहिल्यामुळे प्रज्ञानंदच्या झालेल्या चुकांचा फायदा घेत टायब्रेकरचा पहिला डाव सहज जिंकला. दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांकडून सहज बरोबरी करत मॅग्नसनं विजेतेपद मिळवलं; पण प्रज्ञानंदवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ असणारा खेळाडू असं मॅग्नसनं प्रज्ञानंदचं यथार्थ वर्णन केलं.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : बॉबीचे विचित्र चरित्र

विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स स्पर्धामध्ये भाग घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू म्हणून प्रज्ञानंदला जगज्जेतेपदाला गवसणी घालण्याची सुसंधी मिळाली आहे. या स्पर्धा कॅनडामधील टोरांटो येथे एप्रिल २०२४ मध्ये होतील. प्रज्ञानंदचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर रमेश हे आजघडीला भारताचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. उगाच नाही मॅग्नस कार्लसननं त्यांना आपल्या नॉर्वेमधील क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी आमंत्रित केलं होतं! रमेश प्रज्ञानंदची व्यवस्थित तयारी करून घेतीलच; पण सरकारनं प्रज्ञानंदच्या आईचा खर्च उचलला तर या मध्यमवर्गी कुटुंबाचा भार हलका होईल.

दर दोन वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या विश्वचषकानं या वर्षी जगाला भारतीय खेळाडूंच्या प्रतिभेचं दर्शन घडवलं. एके काळी सोव्हिएत खेळाडूंचा जो दबदबा जगाच्या पटलावर होता तो हळूहळू भारतीयांचा तयार होतो आहे आणि एक गोष्ट अनेकांच्या नजरेतून सुटली असेल ती म्हणजे, चिनी खेळाडूंना प्रथमच पदकाविना हात हलवत मायदेशी परतावं लागलं. त्यामुळे भारतीयांचे यश खास आहे!

gokhale.chess@gmail.com

Story img Loader