इंदिराबाईंचे व्यक्तिगत खासगी जीवन कवितेत येऊनही त्या ते विशुद्ध व निर्मळ रूपातच आविष्कृत करतात. हा लेखनातील त्यांच्या अभिजाततेचाच वाण होय.
पू र्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळ दीक्षित या १९३६ साली इंदिरा नारायण संत झाल्या. पुढे त्यांची वाङ्मयीन कारकीर्द ‘इंदिरा संत’ याच नावाने घडली. वडिलांच्या नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य अनेक गावांत झाले. जन्म (१९१४) विजापूर जिल्ह्य़ातील इंडी या गावी झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी वडिलांची आकस्मिक छत्रछाया हरपली आणि दीक्षितांचे कुटुंब तवंदी या मूळ गावी चुलत्यांकडे वास्तव्याला गेले. तवंदीच्या अनेक आठवणी लहानपणी वडिलांकडून ऐकलेल्या होत्या. जादुमयी दिव्यातील त्या गूढ तटबंदीला नशिबाने नेले. इंदिराबाईंच्या वडिलांची वृत्ती जेथे रमत असे तिथेच त्यांचे काही वर्षे राहणे झाले. अनागर भागातील अकृत्रिम, रसरशीत असे अनुभव त्यांना येत गेले. जीवनाची एक वेगळीच चाहूल त्यांना लागली.
पुढे त्या शिक्षणासाठी बेळगाव, नंतर पुण्याच्या फर्गसन कॉलेज येथे गेल्या. तेव्हा तवंदीच्या आठवणी त्यांच्या मनात फेर धरू लागल्या. त्यांच्या प्राणप्रिय वडिलांच्या स्मृतीही तवंदीमधल्याच होत्या. त्यामुळेच की काय, इंदिराबाईंनी त्या जीवनावर कथालेखन केले. आज त्यांचे हे पूर्वायुष्य लोकांना अज्ञात आहे, इतके त्यांचे कवयित्रीपण सर्वव्यापी झालेले आहे. तवंदीमधील निरागस जीवन, स्त्रीजीवन त्या कथांमधून त्यांनी प्रतिबिंबित केले आहे. ‘श्यामली’ (१९५२), ‘कदली’ (१९५५), ‘चैतू’ (१९५७) हे इंदिराबाईंचे ‘ई’कार व ‘ऊ’कारयुक्त शीर्षकाचे कथासंग्रह. श्यामली, कदली, चैतू ही नावेही तशी काव्यात्मच आहेत. कर्नाटकात अशी काव्यात्मकता साध्या बोलण्यातही असते. त्या संस्काराची पुसटशी कल्पना या शीर्षकांवरून येते. कथेशिवाय ललितलेखनही इंदिराबाईंनी केले. ‘मृदगंध’, ‘मालनगाथा’ हे त्यांचे ललितलेखसंग्रह आहेत. त्यांनी लोकगीतांचे संकलन व संपादनही केले आहे. परंतु त्या कवयित्री म्हणूनच अधिक वाचकप्रिय झाल्या.
इंदिराबाईंनी १९३०-३१ साली काव्यलेखनास प्रारंभ केला. ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’ (१९७१), ‘गर्भरेशमी’ (१९८२), ‘चित्कळा’ (१९८९) हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. इंदिराबाई अव्याहतपणे सहाएक दशके काव्यलेखन करीत होत्या. या प्रदीर्घ काव्यप्रवासात त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. १९८३ साली त्यांच्या ‘गर्भरेशमी’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘जनस्थान’ पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या.
इंदिराबाई शिक्षणासाठी पुण्यात फर्गसन महाविद्यालयात गेल्या आणि ‘समानशिले व्यसनेशु सख्यम्’ या उक्तीप्रमाणे त्या नारायण संत यांच्या प्रेमात पडल्या. सर्व परिस्थिती प्रतिकूल असतानाही १९३६ साली त्या संतांशी विवाहबद्ध झाल्या. या पती-पत्नीच्या कवितांचा १९४० साली ‘सहवास’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात इंदिराबाईंच्या ३६ कविता आहेत. प्रेम, प्रेमातील हुरहूर, ओढ, प्रतीक्षा, एकमेकांकडील प्रतिकूलतेमुळे की काय; त्यांतून एकमेकांविषयीचा आवेग जाणवतो. हुरहूर आणि त्यापोटी आलेला रसडोळसपणाचा अभाव या कवितांमध्ये दिसून येतो. परंतु प्रतिमांतील उत्कट भावानुभूती ही ‘सहवास’ची जमेची बाजू. खोलवर विचार करता त्यामागे त्यांचा स्वप्नाळूपणा आहे, हे ध्यानात येते.
इंदिराबाईंशी नियती क्रूर चेष्टा करीत होती. जेमतेम दहा वर्षांच्या होण्याआधीच वडिलांचा मृत्यू आणि वैवाहिक सौख्य केवळ दहा वर्षे लाभते- न लाभते तोच पतीचा मृत्यू! ज्या पुरुषावर भिस्त ठेवून निर्धास्त जगायचे असते त्यालाच नियतीने हिरावून नेले. ‘सहवास’मधील ‘अनाथ’ कवितेमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतरच्या अनाथपणाविषयी त्यांचे काव्यविधान आहे :
पराधिन करून गेला लाडक्या जिवाला
नाही काय ओळखले हो घातकी जगाला
वटारून डोळे कोणी पाहता नमावे
ऊर भरून येता, कोठे जाऊन रडावे
यानंतर अवघ्या चौदा वर्षांत पुन्हा आयुष्यात वनवास आला. साधेसे कारण होऊन नारायण संत १९४६ साली गेले आणि आयुष्यच गारठून गेल्याची इंदिराबाईंची भावना झाली. पतिविरह, दु:ख या भावना त्यांच्या सर्जनशील संवेदनेच्या भाग बनून गेल्या. दु:खविरहाच्या या कुपीला त्यांनी सृजनाचा रंग नि गंध दिले. हा एकच विषय केंद्रस्थानी ठेवून आपल्या भावविश्वातील वैविध्य आणि वैचित्र्याची त्यांनी रसिकांना प्रतीती आणून दिली.
इंदिराबाई कविता करू लागल्या, तेव्हा कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, अनिल, पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर हे काहीसे स्थिरावलेले होते. इंदिराबाईंनी त्यांचे अनुकरण केले नाही. (त्या प्रभावित होत्या अनंत काणेकर वगैरेंच्या लेखनाने!) त्यांना स्वत:ची वाट लवकरच मिळाली. ‘शेला’ प्रकाशित झाल्या झाल्या त्याची दखल वाङ्मयगुणांमुळे घेतली गेली. मर्ढेकरही इंदिराबाईंच्या कवितेने प्रभावित झाले होते. श्री. पु. भागवतांना लिहिलेल्या पत्रात (सत्यकथा, मे १९५६) मर्ढेकर म्हणतात, ‘‘सत्यकथेच्या अंकात (जुलै १९५३) इंदिराबाईंची आणि विंदा करंदीकरांची कविता माझ्या शेजारीच छापून आपण नि:शब्द, पण अचूक टीका केली आहे. इंदिराबाईंच्या आणि विंदांच्या कवितांनी माझ्या कवितेला खरोखरच लाजविले आहे. यापुढे कविता लिहू नये असेच या दोन कवितांनी मला प्रेमाचा सल्ला दिला आहे जणू. मर्ढेकरांची प्रवृत्तीशैली- ज्याला इंग्रजीत मर्ढेकरी ्र्िरे म्हणता येईल- अधिक सौंदर्याने मराठी कविता आता मिरवीत आहे. अहंकाराचा दोष पत्करून- मर्ढेकर संपला. आता युग आहे इंदिरा संत आणि विंदांचे. आणि मर्ढेकरांपेक्षा ते कितीतरी मनोज्ञ आहे! यात इंदिराबाई अथवा विंदांच्या स्वतंत्र प्रतिभेचा अनादर नाही. त्यांचे प्रतिभास्वातंत्र्य अनुपम आहे. म्हणूनच त्यांच्या कवितेने मराठी नवीन कवितेचे पाऊल माझ्या तुटपुंज्या रचनेच्या कितीतरी पुढे जाईल अशी माझी अपेक्षा आहे.’’ मर्ढेकरांचे हे विचार या दोघांबाबत खरे ठरले.
इंदिराबाईंची काव्यप्रवृत्ती पु. शि. रेगे यांच्या अत्यंत जवळची. इतकी, की समानशील वाटावे इतके एकत्व या दोहोंमध्ये वाटते. परंतु ते केवळ अनुभवविश्वाचे एकेरीपण याच अनुषंगाने. बाकी दोघांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीत व्यस्त स्वभावधर्म आहे. रेगे देहस्वी, कामभाव आणि कामभावक्रीडेतील सौंदर्य ही रेग्यांची प्रेरणा. कामभाव ही मूलभूत दैहिक क्रीडा त्यांना जीवनऊर्जा वाटते. त्यातूनच त्यांची आत्मनिष्ठा आविष्कृत होते. अस्तित्वभानाचे ते त्यांना साधन वाटते. ही आत्मनिष्ठा आविष्कृत होताना बुभुक्षित, व्यक्तित्वाची व शारीरभावांची चाळवाचाळव करणारी नसते. स्त्रीशरीर, संभोगभाव, शरीरातील अनोखा आवेग हे रेग्यांच्या कवितेत अत्यंत कातीव व आखीव होऊन उन्नतावस्थेला पोहोचतो. अशी एककेंद्री वृत्ती इंदिराबाईंचीसुद्धा आहे. ती रेग्यांसारखीच बंदिस्त होते. त्यांचा संवेदनस्वभाव बाह्य़ विशाल अशा जगासाठी आपली दारे-कवाडे मिटून घेऊन आंतरिक रुदन करणारा आहे. इंदिराबाईंचे सबंध काव्यविश्व एकसंध मनाच्याच ‘मी’ने भरून राहिले आहे.
तुजविण आता तुझ्या या संसारी
अंगाराच्या सरी वर्षतात
आतबाहेर लागलीसे आग
तुझ घेत माग येऊ कुठे?
त्याचा माग घेणे हीच इंदिराबाईंची काव्यप्रेरणा ठरली. रेगे देहाच्या कमानीमधून सौंदर्य घडवीत नि:शारीर असे कामसौंदर्य दाखवतात, तर इंदिरा संतांच्या काव्यात एक विदेही अवस्था असते. तिचं मानस अतृप्त असतं. तिला प्रेमाधाराची किनार अपेक्षित असते. ती शारीरभावाने पछाडलेली नसते. ती वैदेही मानसविश्वात डुंबलेली असते. ती नियतीच्या श्रृंखलेत करकचून जखडलेली असते. इंदिराबाईंनी स्वत: एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘जे जे सोसले होते, अनुभवले होते, मनाला डसले होते, ते ते आत उकळत होते. कळीतील सुगंधाप्रमाणे प्रत्येक अनुभवघटकात उतरलेल्या काव्यात्म घटकाला शब्दबद्ध करण्याचा मला छंद जडला.’’ इंदिराबाईंच्या या विधानात अनेक गोष्टी सूचकतेने आल्या आहेत. अनेक कौटुंबिक आपत्ती त्यांच्यावर धडाधडा कोसळत राहिल्या. वडिलांचा मृत्यू, त्यामुळे काकांकडे आश्रय, काकांची कडक शिस्त, तारुण्याच्या उंबरठय़ावर संसार बहरत असतानाच पतीचा मृत्यू, तीन मुलांचे एकटय़ाने करावे लागलेले संगोपन आणि भरीस भर पूर्वीपासूनच एकाकीपणाला कवटाळण्याचा स्वभाव यामुळे त्यांचा संवेदनस्वभाव पालवलाच नाही. उलट, अंतर्मुखतेचा पीळ घट्ट झाला.
मन कराया मोकळे
कसा पिसारा खुडावा
जीवे भावे पाळलेला
मोर कोठे उतरावा?
असा तिढय़ाचा प्रश्न बाईंच्या समोर होता.
त्यांची प्रीती, विरह, एकाकीपणाचे दु:ख आणि भावनांचा कल्लोळ निसर्गप्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांत व्यक्त झाला आहे. निसर्ग त्यांच्या कवितेत भिजलेला वाटतो. अचूक प्रतिमा हेरून त्यांनी निसर्गघटकाला आपल्या कवितेचा अविभाज्य अंग केले आहे. इंडी, तवंदी, बेळगाव, फर्गसन कॉलेजच्या मस्तकीची टेकडी या ठिकाणचा निसर्ग त्यांच्या कवितांमध्ये त्यांना आल्हादवतो. कवितेचा एक अंगभूत घटक बनून मनाला तोषवितो.
चिंब पाणथळ, शिथिल माळ हा
मान टाकूनी पडला तापत;
काळी-पिवळी फुलपाखरे
ओल्या गवतावरती उडवित
माळावरल्या पालामधली
रंगीत वाकळ, तशी जुनेरी,
विसरून बघती रंग आपुले
उन्हात हिरव्या आणि रुपेरी
असा निसर्ग, त्याचा अवकाश, त्यातील सजीव-निर्जीव सृष्टी एका लयीत त्या उभी करतात.
इंदिराबाईंच्या कवितेतील लय मोहमयी आहे. याचे कारण त्यांची लोभस व सुकुमार अशी भावकाव्यानुकूल शब्दकळा होय. या सुंदर, लययुक्त, लोभस शब्दकळेसह बाईंनी सुरुवातीला लोकगीतानुकूल अशी रचना केली आहे. कदाचित तवंदीमधील संस्कार असतील ते. ओवीगीते सूर्योदयाबरोबर कानावर येत असतील. त्या संस्कारातून ओवी-अभंग अशा स्वरूपाची रचना ‘सहवास’मध्ये झाली आहे. परंतु नंतर नाही. दर कवितासंग्रहानंतर इंदिराबाईंची त्याच त्या संवेदनेची कविता प्रगल्भ होत गेलेली दिसते.
इंदिराबाईंचा संवेदनस्वभाव अत्यंत तरल असा आहे. त्यांचे सारे अनुभवविश्व भूतकाळात अवगुंठित होऊन वर्तमानात ‘मी’ आणि ‘तू’च्या रूपात अभिव्यक्त होते. पतीनिधन ही परमावधीची दु:खद घटना कवितेतून प्रतिबिंबित होत नाही. ती दु:खद भावना गाढ स्नेहाद्र्र; परंतु विरह-व्याकूळ रूपात प्रकटते. कौटुंबिक दु:ख, मोडून पडलेल्या संसाराची चौकट इंदिराबाईंच्या काव्यविश्वात दिसत नाही. ही त्यांची थोरवी म्हटली पाहिजे. पाय मोडून न बसता त्याला आठवत, त्याच्या स्मृतींचा रिमझिम पाऊस मनात वर्षवत त्या ‘मनुष्यत्वाचा पुरुषार्थ’ सिद्ध करतात. अंतर्मुख होऊन, भावविव्हल होऊन कोसळून न पडता आत्मनिष्ठेने, आत्मनिमग्पणे काव्यवाट चालतात. पतीनिधनानंतर भूतकाळातील भावविश्वात स्वत:चा विलय करून प्रेयसी आणि प्रियकर या असीम, निर्मळ, नितळ नात्यात त्या कवितेतून लोभसपणे व्यक्त होतात. पतीवरची निष्ठा, तो आहेच असे मानण्याची अपार श्रद्धा या गोष्टी उच्चतर अशा आहेत. पती-पत्नी नात्यातील प्रेमऐक्याची अत्यंत दुर्मीळ घटना इंदिराबाईंच्या जीवनात आणि काव्यात आढळते. ही एक प्रकारे उच्चकोटीची मानवीयता आणि जीवशिवऐक्यभाव असेच म्हटले पाहिजे.
इंदिराबाईंचे व्यक्तिगत खासगी जीवन कवितेत येऊनही त्या ते विशुद्ध व निर्मळ रूपातच आविष्कृत करतात. हा लेखनातील अभिजाततेचाच वाण होय. त्यांच्या अभिव्यक्तीत संयम आणि प्रसाद हे विशेष आहेत. इंदिराबाई म्हणतात, ‘‘माझी कविता माझ्या भावनात्मक आयुष्याशी निगडित आहे. पण ती माझी सखी नव्हे किंवा माझी प्रतिकृती नव्हे. जीवनातील संघर्षांत व्यक्तिमत्त्वाच्या ज्या ठिणग्या उडतात, त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतिबंध म्हणजे माझी कविता.’’ म्हणूनच इंदिराबाई संत यांची कविता थोर ठरली. परंतु ठासून गुणवत्ता आणि तितकीच महत्ता असूनही त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होऊ शकल्या नाहीत याचे वाईट वाटते.
विशुद्ध व निर्मळ अभिजातता
इंदिराबाईंचे व्यक्तिगत खासगी जीवन कवितेत येऊनही त्या ते विशुद्ध व निर्मळ रूपातच आविष्कृत करतात. हा लेखनातील त्यांच्या अभिजाततेचाच वाण होय. पू र्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळ दीक्षित या १९३६ साली इंदिरा नारायण संत झाल्या. पुढे त्यांची वाङ्मयीन कारकीर्द ‘इंदिरा संत’ याच नावाने घडली. वडिलांच्या नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य अनेक गावांत झाले.
First published on: 06-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about indirabai