अरुंधती देवस्थळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जोहानेस व्हर्मिएर (१६३२-१६७५) म्हणजे डच चित्रांच्या सुवर्णकाळाचे एक प्रतिनिधी! त्यांची ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ हा त्याकाळचा मास्टरपीस. तिच्या चेहऱ्यावरच्या शांत, पण ठाव न लागणाऱ्या भावांमुळे हिला ‘उत्तरेची मोनालिसा’ म्हणतात. पण हा साक्षात्कार व्हायला व्हर्मिएरच्या मरणानंतर दोन शतकं उलटावी लागली. मूळचं ४४.५ x ३९ सें. मी.चं (ऑइल ऑन कॅनव्हास) हे पेंटिंग जग हिंडून आता मायदेशी हेगच्या ‘मारित्सहूस’मध्ये परतलं आहे. आज याची प्रतिकृती नाही असं एकही संग्रहालय जगात नसावं. चित्राला कोणी एक मॉडेल असावी असं नाही. तिने डोक्यावर ज्या तऱ्हेने दुरंगी हेड स्कार्फ बांधला आहे तोही त्याकाळच्या स्त्रिया किंवा मुली वापरत नसत. प्रसन्न निळा आणि फिकट लिंबोणीचा पिवळा ही रंगयोजनाही एकमेकांना आणि एकूण चित्रालाच पूरक. चित्राची पार्श्वभूमी बरोक शैलीत वापरली जाणारी काळपट गर्द हिरव्या रंगाची आणि नवतरुण चेहरा स्वच्छ उजेडात नैसर्गिकपणे चमकावा तसा. चित्रातल्या मुलीचे ओठ विलग असल्याने तिच्यावर/ चित्रकारावर असभ्यपणाचा आरोप आला होता. कारण सभ्य स्त्रियांनी कसं, तर अगदी तोंड मिटून मंद मंद हसावं असा सामाजिक संकेत होता. त्या काळात कुलीन स्त्रिया ‘मरीन ज्वेलरी’ म्हणजे मोती किंवा प्रवाळाचे प्रकार वगैरे वापरू लागल्या होत्या. पण मोत्याची आभूषणं महाग असत. हिने कानात घातलेला हा मोती नसून, काचेच्या किंवा पॉलिशने चमकदार बनवलेल्या धातूचा वापर करून त्याला मोत्यासारखं रूप द्यायचा प्रयत्न असावा असं म्हटलं जातं. चित्रात स्कार्फच्या निळाईने जी जादू आणली आहे, तिचा शोध घेता त्यांनी लॅपीस लाझुली या महागडय़ा विरळ खडय़ापासून बनवलेलं अल्ट्रामरिन पिगमेंट वापरलं असल्याचं उघड झालं. हाच रंग त्यांनी आणखी एका तशाच बरोक शैलीतील मास्टरपीस मानल्या गेलेल्या ‘दी मिल्कमेड’मध्ये (ऑइल ऑन कॅनव्हास- ४५.५ x ४१ सें. मी.- १६५७-५८) त्या मुलीच्या अॅप्रन आणि टेबलक्लॉथसाठी वापरला आहे. ही तरुणी मात्र डच सुखवस्तू घराण्यात कामाला असणाऱ्या दणकट बायकांसारखी. बाकी खोलीत फारसं काही नाही. ती एका भांडय़ातून दुसऱ्यात दूध ओततेय. टेबलावरील ब्रेडवरून ही कदाचित न्याहारीची तयारी चाललेली असावी. व्हर्मिएरच्या चित्रांचं एक वैशिष्टय़ हेही, की रुबेन्स आणि रेम्ब्रांसारखेच व्हर्मिएर बहुधा काळा किंवा मातकट रंग बेस/ अंडरपेन्ट म्हणून वापरत आणि चित्रासाठी नक्की छटा मनात असल्यानं महागडी पिगमेंट्स. चित्राच्या विषयाच्या आसपास ते इतर फापटपसारा ठेवत नाहीत. त्यामुळे लक्ष फक्त त्या व्यक्तीवर एकवटतं. आसपास असल्याच काही गोष्टी तर त्या दुर्लक्षिण्याजोग्या. हे चित्र अॅमस्टरडॅमच्या रिक्स म्युझिअममध्ये आहे. व्हर्मिएरच्या कॉम्पोजिशन आणि रंगसंगतीवरच्या उत्कृष्ट पकडीची उदाहरणं असलेली ही दोन्ही चित्रं डच चित्रकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर आहेत.
हेही वाचा >>> अभिजात : तो राजहंस एक : अमेडेव मोडीलियानी
व्हर्मिएर एक श्रेष्ठ कलाकार असूनही त्यांची कीर्ती फक्त त्यांच्या गावात- म्हणजे डेल्फ्ट आणि त्याच्या आसपासच सीमित राहिली. याला कारण त्यांची स्वत:ची माफक महत्त्वाकांक्षा हे तर होतंच. का कोणास ठाऊक, त्यांना आपली चित्रं दूरदेशी जावीत असं काही वाटत नसे. पण हेही कारण असेल की त्यांची अर्ध्याहून अधिक चित्रं पीटर वान रिजवान नावाच्या स्थानिक पॅट्रन/ आर्ट डीलरने ताब्यात घेतली होती. त्यातली काही त्याने अॅमस्टरडॅम, अँटवर्पसारख्या ठिकाणी विकली. पण बाकीच्यांचा हिशोब राहिला नाही. (एक मात्र खरं, रिजवान दाम्पत्याशी त्यांचे इतके जिव्हाळ्याचे संबंध होते की रिजवानच्या पत्नीने आपल्या मृत्युपत्रात व्हर्मिएरला ५०० फ्लुरिन्स देण्यात यावेत अशी तजवीज केली होती.) त्यांची हाती लागली ती चित्रं प्रकाशात आणण्याचं श्रेय विल्यम बर्जर हे टोपणनाव घेतलेल्या फ्रेंच टीकाकाराचं. त्यांनी व्हर्मिएरच्या चित्रांबद्दल एक दीर्घ लेख लिहिला आणि व्हर्मिएरना, त्यांच्या ‘स्फिन्क्स ऑफ डेल्फ्ट’ला पुनर्जन्म मिळाला. अचानक त्यांची चित्रं चर्चेत आली. वॉशिंग्टन डीसीच्या नॅशनल गॅलरीत भरलेल्या त्यांच्या प्रदर्शनाला कलासमीक्षक आणि रसिकांची भरभरून पावती मिळाली. मागल्या शतकाअखेरी त्यांच्या ‘गर्ल विथ अ पर्ल इअरिरग’ची कल्पित कहाणी ट्रेसी शेव्हालीये यांनी कादंबरीच्या रूपात प्रकाशित केली. तिच्या वीस लाख प्रती बाजारात दोन वर्षांत विकल्या गेल्या. त्यावर आधारित त्याच नावाने बनलेल्या फिल्मला ऑस्कर नामांकनं मिळाली. त्यांचं हे मूळ चित्र जपान, युरोप व अमेरिकेत अनेक ठिकाणी हिंडवलं गेलं. पण आता त्याच्यावर काळाच्या खुणा दिसू लागल्यामुळे ते एकाच ठिकाणी- म्हणजे मारित्सहूसमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००४ मध्ये या चित्राची किंमत ३० मिलियन पौंड्स लावली गेली होती. या दोन्ही चित्रांच्या प्रतिकृती ‘दी लेसमेकर’, ‘दी अॅस्ट्रॉनॉमर’, ‘वूमन होल्डिंग अ बॅलन्स’ आणि ‘दी जिओग्राफर’ या व्हर्मिएरच्या आणखी चार उल्लेखनीय चित्रांबरोबर लूव्रच्या सली विभागात डच सुवर्णयुगाच्या मास्टर्सच्या पंक्तीला जाऊन बसल्या आहेत. सुरुवातीच्या काळात व्हर्मिएरने काढलेली डेल्फ्टची लँडस्केप्स अतिशय शांत, सुंदर आहेत.
हेही वाचा >>> अभिजात : मीटीओरा धरती आणि आकाश यामधलं शिल्प
व्हर्मिएरना कलेचं शिक्षण कुठे मिळाल्याचे उल्लेख सापडत नाहीत. कला आणि तंत्र ते स्वत:च शिकले असावेत. वडील इन कीपर होते आणि आर्ट डीलिंग करू पाहत होते. कदाचित व्हर्मिएरमध्ये कलेचं बीज रुजायला हे बालपणातलं चित्रं पाहणं, कलेची पारख करणं कारणीभूत झालं असावं. १६५३ मध्येच ते कलाक्षेत्रात दबदबा असलेल्या पेंटर्स गिल्डचे सभासद झाले होते- तेही वयाच्या एकविसाव्या वर्षी! पण तिथलं कुरघोडीचं राजकारण आणि तात्त्विक मतभेदांमुळे त्यांना ज्येष्ठांकडून काही शिकण्यापेक्षा मन:स्तापच जास्त होई. वडील कर्ज मागे ठेवून वारले, त्यामुळे त्यांना कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी बहुधा त्यांनी एका श्रीमंत घराण्यातल्या मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर व्हर्मिएर घरजावई बनून सासुबाईंच्या घरात राहायला आल्याने त्यांच्या देखभालीचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. आयुष्यभर ते एकाच घरात राहिले. आणि पहिल्या मजल्यावर भरपूर सूर्यप्रकाश असलेला छोटासा स्टुडिओच त्यांनी आयुष्यभर वापरला. चित्रं बऱ्यापैकी विकली जात असल्याने त्यांचं आयुष्य सुस्थितीत चाललं होतं. पण शेवटची काही वर्षे देशाची अर्थव्यवस्था खालावल्याने त्यांना त्याचा फटका बसला. आर्थिक चणचण सुरू झाली. व्हर्मिएरची चित्रं हॉलंडमधल्या त्याकाळच्या रोजच्या साध्यासुध्या जीवनावर आधारलेली. चेहरे आणि त्यांच्यावर प्रकाशाचा वेगवेगळ्या कोनांतून खेळ हे त्यांचं वैशिष्टय़. प्रयत्नपूर्वक बनवलेले गाळीव, घोटीव रंग आणि त्यांचा प्रभावी वापर हुकमी तंत्रशुद्धता दाखवणारा. एकेक चित्र मनासारखं होण्यासाठी त्यावर शांतपणे दिवसचे दिवस काम चाले. नवरा चांगला कलाकार आहे हे त्यांच्या श्रीमंत घरातून आलेल्या पत्नीला माहीत असूनही तिची चिडचिड होई. सतत येणाऱ्या बाळंतपणांमुळे ती वैतागलेली असे. दोघांना पंधरा मुलं झाली होती. त्यातली अकरा जगली.
व्हर्मिएरची चित्रं फार नाहीत. त्यांची ४६ च्या आसपास चित्रं उजेडात आली आहेत. त्यांना प्रत्येक चित्राला बराच वेळ लागे. रंगही काही पिगमेंट्स आणि वेगवेगळे पदार्थ खलून, गाळीव भुकटीतून, मिश्रणांमधून परिश्रमपूर्वक बनवावे लागत. त्याच्या चित्रांचे विषय रोजच्या जीवनातले.. विशेषत: स्त्रियांच्या जीवनातले असत. जसे की ‘गर्ल रीडिंग अ लेटर अॅट अॅन ओपन विंडो’ हे ८३ x ६४.५ सें. मी. (१६५७) किंवा ‘दी म्युझिक लेसन’ हे ७४.६ x ६४.१ सें. मी. (१६६५) ही दोन तैलचित्रे. ‘दी म्युझिक लेसन’ सध्या क्वीन्स गॅलरीमध्ये लावलेलं आहे. चित्रात एक वेशभूषेवरून खानदानी वाटणारी पाठमोरी स्त्री तेवढय़ाच औपचारिक कपडय़ातल्या शिक्षकाकडून व्हर्जिनल (त्याकाळचं एक लोकप्रिय वाद्य) वादन शिकत आहे. काळ्या-पांढऱ्या चौरसांच्या डिझाइनचा फ्लोअर असा दिलाय, की या कक्षाला एक खोलीचं परिमाण मिळतं, पडदाविरहित खिडक्यांमधून येणारा मंद प्रकाश. तिच्यासमोरच्या आरशात तिचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. जुजबी फर्निचर. घराची स्थिती फारशी चांगली नसावी हे कक्षाच्या एकंदर उजाड स्थितीवरून लक्षात येण्यासारखं. चित्रांचे विषय असणाऱ्या स्त्रिया सुंदर होत्या असं मुळीच नाही. त्या करत असलेल्या कामांत काही विशेष सौंदर्य होतं असंही नाही. तरीही ही चित्रं सुंदर वाटतात, कारण प्रमाण आणि रंगयोजनेवर असणारी चित्रकाराची अचूक पकड.
हेही वाचा >>> अभिजात : कलाविष्कारातील अष्टपैलुत्व नतालिया गोंचारोवा
व्हर्मिएरची चित्रं स्थळ-काळाच्या सीमा ओलांडून स्वत: अनुभवलेला एक स्तब्ध क्षण पाहणाऱ्याच्या नजरेला बहाल करतात. ही पाहिली तर जाणिवेतून निघणारी सोपी-सरळ व्याख्या. पण तो क्षण नेमका पकडून त्याचं सोनं करण्याची क्षमता त्यांनी त्या काळात स्वत:च्या कलेत कशी आणली असावी याबद्दल आपण फक्त तर्क करू शकतो. स्फिन्क्ससारखी त्यांची ताकद दिसते, पण तो बहुतांश अज्ञातच राहतो! व्हर्मिएरची चित्रं आणि त्यामागचा कलाकार यावर गेल्या ५० वर्षांत बरंच संशोधन करायचा प्रयत्न झालाय. पण खात्रीलायक असे फक्त काही दुवे सापडले आहेत. त्या दुव्यांवर आधारित बीबीसीने १९८९ मध्ये त्यांच्यावर ‘Take Nobody’ s Word’ For It’ ही सुंदर डॉक्युमेंटरी बनवली आहे. ती अभ्यासूंनी जरूर पाहावी. वयाच्या ४३ व्या वर्षी व्हर्मिएरना मरण आलं.. असमयीच! चार-पाच वर्षांपूर्वी अमेरिकेतील सदबीच्या लिलावात व्हर्मिएरचं चित्र आठ आकडी डॉलर्समध्ये गेलं. बाहेर डेल्फ्टमध्ये भयानक व्यापारी उलथापालथ चालू असताना स्टुडिओच्या कोपऱ्यात आयुष्यभर शांत क्षणाचं सौंदर्य टिपत राहणाऱ्या व्हर्मिएरना वेळीच कलेचं चीज न झाल्याने कर्ज आणि पैशांची चिंता अस होऊन नैराश्याचा झटका यावा आणि त्यातच त्यांची जीवनयात्रा संपावी हे खरोखरच दुर्दैव!
arundhati.deosthale@gmail.com