डॉ मिलिंद दामले
‘डॉक्युमेण्ट्री निर्मिती म्हणजे पावलोपावली नवशिक्षण, नवसमज आणि नवअनुभूती असते हे खरंच, पण त्याचबरोबर डॉक्युमेण्ट्री म्हणजे ‘शोधाच्या’ म्यानातील एक ‘दुधारी तलवार’ असल्याचंही मला वाटतं…’ भारतातील १३ राज्यांमध्ये माहितीपटांच्या अनोख्या प्रयोगाचे समन्वय करणाऱ्या आणि गेली पंचवीस वर्षे माहितीपटांच्या वर्तुळात कार्यरत लेखकदिग्दर्शकाचा प्रवास…
माझं बालपण सेंट्रल सिनेमा, रॉक्सीपासून अप्सरा, मराठा मंदिर या मोजक्या टॉकीजमध्ये सिनेमा पाहण्यात गेलं. जुन्या व्हिक्टोरिया टर्मिनसपासून ते जुन्या बॉम्बे सेंट्रलपर्यंतचा हा सगळा ‘इलाखा’ चित्रपटगृहांचा एक मोठा ‘मॉल’ होता. त्यातल्या अलंकार, मोती, अलेक्झांड्रा, इम्पेरियल यांची नावं घेण्यालाही लहानपणी मनाई होती. त्याची कारणं मोठं झाल्यावर कळली. या मोजक्या ‘टॉकीज’मधल्या ‘मनोरंजना’च्या आधी पडद्यावर काहीतरी दाखवलं जाई. बहुदा कृष्णधवल रंगात असलेलं अनाकलनीय काहीतरी असे. ते कधी एकदा संपतंय आणि रंगीत संगीत सिनेमा सुरू होतोय असं होई. त्या कृष्णधवल लीडरला डॉक्युमेण्ट्री म्हणतात, हे तेव्हा माहिती नव्हतं. फिल्म इन्स्टिट्यूटला विद्यार्थी म्हणून अॅडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदा डॉक्युमेण्ट्री हा शब्द कानावर पडला आणि त्या विश्वात रमलेल्या अनेक लहान-मोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांची ओळखही झाली. एसएमएस शास्त्री, सुखदेव, झूल वेलानी ही नावं त्यांच्या कामाप्रमाणेच आठवणीत राहिली. Bert Hanzstra या डच दिग्दर्शकाच्या ‘झु’ आणि ‘ग्लास’ यांनी एक गारूड केलं. हे ‘सगळं किती छान आहे’, याच बरोबर आपल्याला हे ‘कळतंय’ याचा आनंद अधिक होता. परंतु हळूहळू जसा त्याचा ‘रसास्वाद’ घ्यायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला हे फक्त आवडलं, पण कळलं काहीच नाहीये, याचा प्रत्यय येत गेला. वरवर सहज, सुंदर आणि सरळ वाटणाऱ्या या डॉक्युमेण्ट्रीज किती खोल, आशयघन आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या आहेत या विचारानेच, आपल्याला अजून खूप शिकायचंय ही जाणीव दृढ झाली.
हेही वाचा >>> निमित्त : समर्पित समाजसुधारक
एक प्रतिमा काहीतरी निर्देश करते, दुसरी प्रतिमा जोडीला आली की एकत्रपणे त्यांचा अर्थ बदलतो, तिसरी त्यांना येऊन मिळाली की आधीच्या दोन प्रतिमा पूर्णपणे वेगळ्याच वाटायला लागतात, असे अनेक अनुभव विद्यार्थी असताना येत गेले. प्रत्येक डॉक्युमेण्ट्री नवीन काहीतरी शिकवत राहिली आणि हे काम साधं नाही या वाक्याला अधोरेखित करत राहिली. मला स्वत:ला पहिली डॉक्युमेण्ट्री डायरेक्ट करायची संधी २००६ मध्ये मिळाली. ‘माझी साखरशाळा’ असं त्याचं शीर्षक होतं. ‘मी पुष्पा बयाजी वारे, यत्ता पाचवी’ अशी ओळख एका चिमुरडीने करून दिली. इंग्रजीत संभाषण साधताना ती पुढे म्हणाली, ‘मला पायलट व्हायचं आहे म्हणून मला शिकायचंय आणि मी शिकले म्हणजे माझ्या आई-वडिलांना ऊस तोडावा लागणार नाही.’ इतके स्पष्ट विचार तेही इंग्रजी भाषेत ऐकून माळशिरसच्या त्या वसाहतीच्या बाहेर भर दुपारच्या तळपत्या उन्हात मी गार पडलो होतो. गाडीचा पंचर काढताना झालेली माझी आणि पुष्पाची भेट कालच झाल्यासारखी वाटते. इथून पुढे पुष्पाचा हात धरून आम्ही चालत राहिलो आणि अगदी सहजपणे ‘माझी साखरशाळा’ तयार झाली. विद्यार्थी, पालक, साखर कारखाने, स्वयंसेवी संस्था आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित दृढ इच्छेचं फलित म्हणजे सहा महिने साखर कारखान्यांच्या ठिकाणांवर, आवारात चालणारी ‘साखरशाळा’. पुष्पा, तिचा भाऊ गणेश, आई सरस्वती, वडील बयाजी आणि तिचे आजी-आजोबा असं एक नवीन कुटुंब साखरशाळेने आम्हाला मिळवून दिलं. ही डॉक्युमेण्ट्री यू एन डी पी, योजना आयोग, राज्य सरकार आणि आय एफ टी आय आय यांनी एका प्रकल्पाअंतर्गत निर्माण केली होती. याच डॉक्युमेण्ट्रीमुळे पुढे मला या प्रोजेक्टचा समन्वयक म्हणून काम करायची संधी मिळाली. भारतातल्या १३ राज्यांमध्ये ३० डॉक्युमेण्ट्री निर्मिती करायचं हे आव्हानात्मक काम प्राध्यापक अनिल झणकर यांच्याकडून माझ्याकडे आलं आणि पुढे चार वर्षं वर उल्लेखलेल्या संस्था, ३० दिग्दर्शक यांच्या मधला समन्वयक म्हणून मी काम करत होतो. भाषा, प्रांत, माणसं, त्यांच्या यशस्वी कथा, काही वेळेस आलेल्या अडचणी यांच्यावरची उत्तरं या सर्व डॉक्युमेण्ट्रीज्मधून मांडायचा प्रयत्न केला. अनेक तरुण, बुजुर्ग, नवीन आणि नामांकित असे ३० दिग्दर्शक या प्रकल्पामध्ये सहभागी होते.
या मोठ्या प्रकल्पानंतर ‘एफटीआयआय’च्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या डॉक्युमेण्ट्रीची निर्मिती करायची संधी मला मिळाली. श्री. ए के झा हे टीआरटीआयचे आयुक्त असताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील आदिवासी बांधवांच्या कला – कौशल्य अधोरेखित करणारी एक मालिकाच आम्ही निर्माण केली. संगीत, नृत्य, खानपान, हस्तकला, शिल्पकला, या सर्व बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या आणि त्यातील विविधतेने मंत्रमुग्ध करणाऱ्या या समृद्ध अशा वारशाला आम्ही ऑडिओ-विज्युअल माध्यमातून डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून चित्रित केलं. २००९ मसुरी येथील एल बी एस एन ए ए (LBSNAA) या लोकसेवेशी निगडित शिक्षण देणाऱ्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. याचे सिंहावलोकन करणारी एक पूर्ण लांबीची डॉक्युमेण्ट्री आम्ही निर्माण केली. भारतीय लोकसेवा जिथे उगम पावते त्या संस्थेवर माहितीपट बनवणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. एकीकडे पन्नास वर्षांपूर्वी सेवेमध्ये असलेले आणि आज निवृत्त आयुष्य मजेत व्यतीत करणारे अधिकारी आणि दुसरीकडे नुकतेच लोकसेवेत रुजू झालेले तरुण अधिकारी यांच्यामध्ये यांच्या मधल्या काळात बदललेला/ न बदललेला भारत आणि बदललेली / न बदललेली व्यवस्था (सिस्टीम) याचा लेखाजोखा, LBSNAAच्या कार्यपद्धतीकडे बघत बघत आम्ही मांडला. अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्याचा योग या निमित्ताने आला. त्यावेळी प्रशिक्षण घेणारे अनेक अधिकारी आज पंधरा वर्षांनंतर भारत सरकारच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये रुजू आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये कोसी नदीला आलेल्या पुरानंतर झालेल्या विस्थापनावर आणि पुनर्वसनावर आधारित एक डॉक्युमेण्ट्री आम्ही निर्माण केली. जीवनदायीनी नदी जेव्हा उग्ररूप धारण करते तेव्हा जे काही होऊ शकतं ते सर्व या माहितीपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने खूप जवळून अनुभवायला मिळालं.
आता अगदी अलीकडेच पूर्ण झालेल्या आणि सुमारे आठ वर्षं तयार होत असलेल्या एका वेगळ्या विषयावरच्या डॉक्युमेण्ट्रीबद्दल सांगतो, ज्याचं नाव आहे ‘महाराष्ट्रातील कांदळवने.’
आजही अनेक जणांना महाराष्ट्राच्या खूप मोठ्या किनारपट्टीवर असणाऱ्या आणि ज्याला निसर्गाचे वरदानच म्हणावं लागेल अशा कांदळवनांबद्दल माहितीच नाही. वाशीच्या खाडी पुलावरून जाताना डावी-उजवीकडे जी हिरवळ दिसते ते काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर अनेक जण ‘जलपर्णी’ असे उत्तर देतात. ‘किनारपट्टीची संरक्षक भिंत’ असा ज्याचा उल्लेख करता येऊ शकेल अशा कांदळवनांचा खरं तर हा अपमानच आहे. तर हे ‘कांदळवन’ म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात त्यातल्या काही मोजक्या आणि महत्त्वाच्या प्रजाती आहेत, कांदळवनांची आपली स्वत:ची अशी एक ‘इकोसिस्टीम’ आहे, न्यायालयाचं खूप मोठं संरक्षण आता या कांदळवनांना लाभलं आहे. या कांदळवनांच्या संरक्षणासाठी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम होत आहे. एक स्वतंत्र कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान, राज्याच्या वन विभागात स्थापन झाला आहे, हे सर्व पैलू मांडणारी आणि गेल्या आठ वर्षात कांदळवन वाचविण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे चित्र दाखविणारी ही डॉक्युमेण्ट्री आहे. ‘कांदळवन’ या महत्त्वाच्या नैसर्गिक जादूकडे बघण्याचा प्रयत्न या माहितीपटाच्या माध्यमातून झाला आहे. त्याच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल लिहिणे आणि त्याचे महत्त्व वाचकांना पटवणे हा एक पुस्तकाचा विषय आहे. जिज्ञासूंनी ही डॉक्युमेण्ट्री नक्की पहावी.
गेल्या २५ वर्षात संगीत, नाट्य, वनस्पती, विज्ञान, निसर्ग, संवर्धन, मनुष्य, त्याच्या गरजा आणि त्याची प्रगती अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरती डॉक्युमेण्ट्री निर्माण करताना माझं स्वत:चं आयुष्य समृद्ध होत गेलं आहे, असं रोजच जाणवत राहतं. डॉक्युमेण्ट्री निर्मिती म्हणजे पावलोपावली नवशिक्षण, नवसमज आणि नवअनुभूती असते हे खरंच, पण त्याचबरोबर डॉक्युमेण्ट्री म्हणजे ‘शोधा’च्या म्यानातील एक ‘दुधारी तलवार’ असल्याचं मला वाटतं. त्या तलवारीची एक बाजू म्हणजे ‘सत्य’ आणि दुसरी बाजू म्हणजे बनवणाऱ्याचं ‘मत’. बनवणाऱ्याला ही तलवार कधी एकदा शोधाच्या म्यानातून बाहेर काढतो, असं होत असावं, पण एकदा का ती बाहेर आली म्हणजे मग आपलं ‘मत’ आणि ‘सत्य’ अशी दोन्हीकडून धार असलेली ती तलवार हाताळणे म्हणजे मोठं कठीण, किंबहुना जिकरीचंच काम असतं. अशा दुधारी तलवारी खूप कष्टाने किंवा अगदी लिलया पेलणाऱ्या आणि सिनेमाच्या इतिहासात आपलं नाव कायमच कोरणाऱ्या सर्व ‘डॉक्युमेण्ट्री’वाल्यांना माझा सलाम!
एफटीआयआय’मधून ‘फिल्म आणि टीव्ही एडिटिंग’ या विषयांत विशेष प्रावीण्य मिळविल्यानंतर डॉक्युमेण्ट्री निर्मिती आणि दिग्दर्शनात कार्यरत. लेखन आणि संकलन असलेल्या ‘द्विजा’ फिल्मसाठी राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मान.‘महाराष्ट्रातील कांदळवने’ या डॉक्युमेण्ट्रीचे विविध महोत्सवांत प्रदर्शन. mida_1978@yahoo.com